कंचित हिंदुत्व

विवेक मराठी    20-Jun-2023   
Total Views |
उबाठामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपायचे नाव घेत नाही. दुसर्‍या पक्षातील एखादा नेता जरी पक्षात घेतला, तरी त्याच्या अगोदराच्या उपद्रवांमुळे सेनेचीच कोंडी होत आहे. एखाद्या पक्षाशी युती केली तरी त्यामुळे उबाठा सेनेला आपल्या भूमिकांशी तडजोड करावी लागत आहे, टीका सहन करावी लागत आहे. यामुळे आज उबाठा कार्यकर्त्यांची अवस्था तीन माकडांसारखी झाली आहे.


Aurangzeb's
 
 
एखाद्या राजकीय पक्षाने आपल्या भूमिकेशी किंवा आपल्या राजकीय स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीचा फटका कसा बसतो, हे शिवसेनेपेक्षा दुसरा कोणताच पक्ष देशात सांगू शकत नाही. आपल्या भूमिका बदलामुळे आपल्या पक्षाचे नाव गेले, चिन्ह, नेते, आमदार, खासदार हे पक्षच घेऊन गेले.. एवढी मोठी हानी होणारा भारतातील एकमेव पक्ष ठरला असेल. हे सर्व झाले ते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी आणि त्यानंतर हिंदुत्ववादी भूमिकेशी घेतल्या फारकतीमुळे! आज उबाठा सेना फक्त काही भागांपुरती मर्यादित राहिली आहे. उबाठामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपायचे नाव घेत नाही. दुसर्‍या पक्षातील एखादा नेता जरी पक्षात घेतला, तरी त्याच्या अगोदराच्या उपद्रवांमुळे सेनेचीच कोंडी होत आहे. एखाद्या पक्षाशी युती केली तरी त्यामुळे उबाठा सेनेला आपल्या भूमिकांशी तडजोड करावी लागत आहे, टीका सहन करावी लागत आहे. यामुळे आज उबाठा कार्यकर्त्यांची अवस्था तीन माकडांसारखी झाली आहे.
 
 
उबाठा सेनेने कोणाला पक्षात घ्यावे, कोणाशी युती करावी याचा तरी किमान विचार करायला हवा. ज्यांची हयात हिंदुत्वाच्या विरोधात राजकारण करण्यात गेली, त्यांच्या पक्षांशी युती केल्यानंतर दुसरे काय होणार? पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दलित मतांसाठी, वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांना पक्षात घेतले. त्यांना घेताना त्यांचा इतिहास काही पाहिला नाही. त्यांच्या वाचाळ तोंडामुळे आणि हिंदू देवदेवतांबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्यांमुळे आज पक्षच अडचणीत सापडत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी, वारकरी संप्रदायाने त्यांच्या पक्षप्रवेशाचा निषेध केला. त्यांचे वक्तव्याचे वादळ शमते ना शमते, तर उद्धव गटाने आपल्या पक्षाला बळकटी देण्यासाठी संभाजी ब्रिगेडशी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यांची भूमिका आणि उबाठा गटाची भूमिका यांच्या मोठी दरी आहे. ते कमी म्हणून काय, भारिपा बहुजन पार्टीशी युती केली. भारिपाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आजवरचा इतिहास पाहता, शिवसेनेशी वैचारिक संघर्षबरोबरच अकोल्यातील स्थानिक पातळीवर निवडणुकांमध्ये त्यांचा संघर्ष आहे. अशा स्थितीत दोन्ही पक्ष एकत्र आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि प्रबोधनकारांचे विचार यामुळे आणि दोन्ही नातू एकत्र येत आहेत, त्यांच्या विचारांचा जागर करणार आहेत असे गोंडस विधान केले. एवढ्यापर्यंत ठीक होते. पण भारिपाच्या वंचित आघाडीत एमआयएम घटक पक्ष आहे. मग एमआयएम आणि उद्धव गट एकत्र येईल का? अशा चर्चा त्या वेळी रंगल्या होत्या. एमआयएम व भारिपाचे मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण यामुळे उबाठा सेना अडचणीत येऊ शकते, अशी शक्यता त्यामुळे वर्तवली जात होती. याची प्रचिती आता येऊ लागली आहे. कारण अकबरुद्दीन ओवेसी यांनी गेल्या वर्षी औरंगजेबाच्या माजारीवर चादर चढवली होती, त्याच्याकडून आणखी वेगळी अपेक्षा काय करू शकतो? पण भारिपा बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी या वर्षी संभाजीनगरमधील मजारीला भेट देऊन मजारीवर फुले चढवली. संभाजीनगरमधील पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची ही कृती असली, तरी उबाठा सेना आणि भारिपा यांची आता अधिकृत युती झाली आहे. त्यामुळे या कृतीमुळे उबाठा सेनेवर आता टीका होऊ लागली आहे. त्यांची पक्षाची भूमिका आहे, ते स्वतंत्र आहेत अशी खा. अनिल देसाई यांनी सारवासारव केली असली, तरी यावरून उबाठा सेनेच्या हिदुत्ववादी भूमिकेत पुन्हा उडचणी निर्माण होऊ लागली आहे.
 
ज्याने या राज्यातील जनतेवर अत्याचार केले, त्याचे मात्र नाव शहराला होते. तरीही येथील हिंदू समाज शांत होता. त्याची कबरही येथे जतन केली. याचा अर्थ असा नाही की क्षुद्र राजकारणासाठी, मतांसाठी त्या कबरीवर जाऊन चादर चढवावी, फुले अर्पण करावी.. तरीही येथील हिंदू समाज शांत आहे. तो निदर्शने करून निषेध व्यक्त करीत आहे. पाकिस्तानासारखे हिंसक आंदोलन करून त्या कबरीच उद्ध्वस्त करीत नाही. हे प्रकाश आंबेडकर, ओवेसी यासारख्या राजकारण्यांनी लक्षात घ्यायला हवे... 
 

vivek 
 
राहुल गांधी स्वा. सावरकरांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शेलका दमही भरला, पण काँग्रेसने त्याला केराची टेपली दाखवली. बाळासाहेब ठाकरे सावरकरांचे हिंदुत्व, विचार मान्य करणारे होते. ज्या ज्या वेळी काँग्रेसने किंवा अन्य पक्षांनी सावरकरांचा अपमान केला, तेव्हा खुद्द बाळासाहेबांनी त्यांचा समाचार घेतला होता, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही केलेे होते. पण उद्धव ठाकरे यांना आज सावरकरांचा अपमान करणार्‍यांना सज्जड दमही नीट भरता येत नाही. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातील सरकारने शालेय अभ्यासक्रमात सावरकरांवर असलेले धडे अभ्यासक्रमातून वगळले. आता पुन्हा यावर शिवसेनेची भूमिका काय? असा सवाला उपस्थित केला जात आहे. सेनेला याविरोधात कोणतीही ताठर भूमिका घेता येत नाही. काहीतरी मिळमिळीत भूमिका घेऊन वरील प्रसंगासारखा हासुद्धा प्रसंग निभावला जाईल असे दिसते. पण त्यामुळे गेलेली अब्रू, पक्षाची लय पुन्हा येणार नाही. आता यापासून वाचण्यासाठी एकच उपाय राहतो, तो म्हणजे देवेगौडा यांनी जेव्हा पक्ष स्थापन केला, तेव्हा जनता दल (सेक्युलर) असे नामकरण केले होते, तसेच उबाठा (सेक्युलर) असे नामकरण केल्यास सर्वच टीकेपासून वाचता येईल!