वेळ समूहाने लढण्याची आणि आत्मपरीक्षणाची

02 Jun 2023 18:07:33
 
vivek
मुस्लिमांमधील वाढती धर्मांधता, कट्टरता आणि दारूल इस्लामचे त्यांचे उद्दिष्ट यातून लव्ह जिहादसारखे ‘टूल’ तयार होते, हे खरे. मात्र ते यशस्वी का होते? यावरही विचार केला पाहिजे. अनेक कारणांनी विसविशीत झालेली हिंदू समाजाची वीण अशा संकटांना आमंत्रण देते आहे, म्हणूनच मुस्लीम धर्मांधतेला आळा घालतानाच आपल्या कच्च्या दुव्यांवरही एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. अतिशय धाडसाने वास्तवाची थेट जाणीव करून देणार्‍या या चित्रपटाला भारतभरातल्या चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहून सावध व्हावे यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ठिकठिकाणी या चित्रपटाचे विनामूल्य खेळ लावले.
 
 
गेली काही वर्षे हिंदू समाजाला पडलेला लव्ह जिहादचा विळखा आता अधिकाधिक घट्ट होत चालल्याची जाणीव या विषयात काम करणारे कार्यकर्ते व अभ्यासक-लेखक सातत्याने करून देत असले, तरी ते मान्य करण्याची सर्वसामान्यांची मानसिकता नव्हती. ‘द केरला स्टोरी’ने या विषयाची भयावहता प्रभावीपणे मांडली आणि हे संकट आपल्या उंबर्‍यापर्यंत येऊन पोहोचल्याची जाणीव सर्वसामान्यांना झाली. हा चित्रपट पाहताना चित्रपटगृहामध्ये पसरलेला सन्नाटा ज्यांनी अनुभवला असेल, त्यांना हे जाणवले असेल.
त्याला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे निर्मात्याला किती कोटींचे उत्पन्न मिळाले, याची चर्चा करण्यात माध्यमांनी जास्त रस दाखवला असला, तरी उत्पन्नापेक्षाही चित्रपट हे जनजागृतीचे किती प्रभावी माध्यम आहे, हे त्याला होत असलेल्या गर्दीने आणि लोकांच्या अभिप्रायामुळे अधोरेखित केले.
 
  
बुद्धा इन ट्रॅफिक जॅम, ताश्कंद फाइल्स, द कश्मीर फाइल्स आणि आता आलेला ‘द केरला स्टोरी’.. अशा चित्रपटांची निर्मिती करणार्‍यांची संख्या आजही नगण्य वाटावी इतकी कमी असली, तरी त्यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. लोकांना खडबडून जागे करण्याचे काम हे चित्रपट करत आहेत असे निश्चित म्हणता येईल. निर्मिती म्हणून कदाचित ते फारसे दर्जेदार नसतील, पण वास्तवाला भिडण्याची त्यांची हिंमत दाद देण्याजोगी. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे, वास्तवाचे भान देणारे साधन आहे, याची जाणीव करून देणारे हे चित्रपट आहेत.
 
  
मात्र डोळ्यावर कातडे ओढून बसलेल्या निबर वृत्तीच्या छद्म पुरोगाम्यांनी या काल्पनिक कथा असल्याचा ढोल बडवायला सुरुवात केली आहे. समाजमाध्यमांवरही त्यांचीच ‘री’ ओढणारे अनेक जण आहेत. तेही ‘द केरला स्टोरी’ आणि अनुषंगाने हा विषय म्हणजे ‘मनगढन कहानी’ असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. हा गदारोळ चालू असतानाच, गेल्या आठवड्यात देशाच्या राजधानीत साहिल खान नावाच्या नराधमाने 16 वर्षांच्या अल्पवयीन साक्षीची, बघ्यांच्या गर्दीसमोर निर्घृण हत्या केली. त्या गुंडप्रवृत्तीच्या साहिलची दहशत इतकी की स्वत:च्या जिवाच्या भीतीने एकही जण साक्षीला वाचवायला पुढे येऊ धजावला नाही. मात्र त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या काहींनी या भयंकर घटनेचे मोबाइलवर चित्रीकरण करून त्याची व्हिडिओ क्लिप तयार केली आणि समाजमाध्यमांमधून ती प्रचंड व्हायरल झाली. या साहिलने स्वत:ची खरी ओळख लपवून, आपण हिंदू असल्याचे भासवत साक्षीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते आणि जेव्हा तिला या वास्तवाची जाणीव झाली, तेव्हा ती त्याच्यापासून लांब झाली अशी माहिती आता समोर येत आहे. त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर तो कडवा मुस्लीम असल्याचे अनेक पुरावे आता पोलिसांना मिळत आहेत. आपण अल्लाशिवाय अन्य कोणाला घाबरत नसल्याचे त्याने मोठ्या फुशारकीने सांगितले आहे. या सगळ्याचा विचार करता हे प्रकरणही लव्ह जिहादचे असू शकते, असे मानायला वाव आहे. हा सगळा तपास सर्वांसाठी उपलब्ध असतानाही अनेकांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे.
 
  
अशा प्रकरणांना ‘लव्ह’ जिहाद म्हणताना आपण प्रेम या संकल्पनेचा अवमान करत आहोत. हा तर ‘लस्ट’ जिहाद आहे. वासनेला आणि धर्मद्वेषाला हिंदू समाजातील मुली बळी पडत आहेत, हे समजून घ्यायला हवे. वाढीच्या कोवळ्या वयात मुलींना वाटणार्‍या आकर्षणांचा फायदा घेऊन जाळ्यात ओढायचे आणि एकदा का सावज जाळ्यात आले की धाकदपटशा दाखवून, धमक्या देऊन ताब्यात ठेवायचे अशी ही कार्यपद्धती आहे. त्याचबरोबर घराघरातून कमी होत चाललेल्या मोकळ्या, आश्वासक संवादामुळे मुली सहजपणे जाळ्यात अडकत आहेत. ज्या वयात शरीर-मन-बुद्धीचा झपाट्याने विकास होत असतो, त्या कालखंडात मुलींना फक्त त्यांच्या शारीरिक वाढीची आणि त्यातून उत्पन्न होणार्‍या गरजांची जाणीव करून देणे, या वयात ज्या वस्तूंचा मोह असतो त्या पुरवत त्यांना आपल्या जाळ्यात खेचणे असे प्रकार चालू आहेत. मुलगा असो वा मुलगी, हे वय नवनवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अतिशय सक्षम असते. मात्र त्याची जाणीव करून देणारे, या नैसर्गिक ऊर्मीला योग्य वळण लावणारे आजूबाजूला नसतील, तर आयुष्याला विपरीत वळण लागते. ही जबाबदारी जशी कुटुंबाची, तशी आजूबाजूच्या समाजाची आणि जिथे मुले शिक्षण घेतात त्या शैक्षणिक संस्थांचीही असते. मात्र यातल्या प्रत्येक घटकाला आपल्यावरच्या जबाबदारीचा विसर पडल्यामुळे किंवा या मार्गाने हिंदू मुलींबरोबरच समस्त हिंदूंवर ओढवलेल्या संकटाची दाहकता अद्याप लक्षात न आल्याने मुलींचा बळी तर जातोच आहे आणि एकूणच हिंदूंवरचे संकटही वाढते आहे.
 
 
 
मनोरंजनाच्या नावाखाली चंगळवादाचे आकर्षण निर्माण करणारी, उपभोगाला सर्वोच्च प्राधान्य देणारी आणि लैंगिकतेविषयी नको त्या वयात अतिरेकी कुतूहल निर्माण करणारी प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे निरंकुश झाली आहेत. गरीब-श्रीमंताच्या हातात सहजी दिसणारा स्मार्टफोन या सगळ्यात कळीची भूमिका बजावतो आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली सीमारेषा धूसर होता होता पुसली जात आहे. संवादासाठी आलेल्या या नव्या माध्यमामुळे घराघरातला प्रत्यक्ष संवाद कमी होतो आहे. यामुळे घरातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळणारे वडीलधार्‍यांचे मार्गदर्शन संपले आहे. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नको नसलेली, हक्क-अधिकाराविषयी जागरूक पण कर्तव्याचा विसर पडलेली ही नवी पिढी मुस्लीम धर्मांधांची शिकार होते आहे.
 
 
मुस्लिमांमधील वाढती धर्मांधता, कट्टरता आणि दारूल इस्लामचे त्यांचे उद्दिष्ट यातून लव्ह जिहादसारखे ‘टूल’ तयार होते, हे खरे. मात्र ते यशस्वी का होते? यावरही विचार केला पाहिजे. अनेक कारणांनी विसविशीत झालेली हिंदू समाजाची वीण अशा संकटांना आमंत्रण देते आहे, म्हणूनच मुस्लीम धर्मांधतेला आळा घालतानाच आपल्या कच्च्या दुव्यांवरही एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
 
 
‘द केरला स्टोरी’ने ओढवलेल्या संकटाची जाणीव करून देत धोक्याची घंटाही वाजवली आहे. आपल्याला ती ऐकू आली आहे का? हा प्रश्न आहे.
 
Powered By Sangraha 9.0