मणिपूरमध्ये शांतता पाळा रा. स्व. संघाचे आवाहन

19 Jun 2023 12:35:42
* रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवेदना 
 
rss
 
नागपूर : मणिपूर राज्यांत गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार चिंताजनक असून राज्यात शांतता आणि स्थैर्य अत्यंत महत्त्वाचे आहे. परस्परांमध्ये विश्वास संपादन करून संवादातून राज्यात शांतता प्रस्थापित करू या, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे. मणिपूरमध्ये दि. ३ मे रोजी चुराचांदपूर येथे लाई हरा ओबा उत्सवाच्या वेळी काढण्यात आलेल्या विरोध रॅलीनंतर राज्यात हिंसाचार सुरू झाला. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक असल्याचे रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
 
 
राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे व्यथित झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढे म्हटले आहे की, या हिंसाचारामुळे ५० हजारांपेक्षा अधिक जण निर्वासित झाले आहेत. लोकशाहीत हिंसाचार आणि द्वेष यांचे कदापि समर्थन होऊ शकत नाही. परस्पर संवाद, शांतता आणि बंधूत्वाची आजघडीला गरज असल्याचेही संघाने म्हटले आहे.
 
 
 
मैतेई समुदायात असलेली असुरक्षा आणि अस्वस्थतेची भावना आणि कुकी समुदायाची वास्तविक चिंता याप्रकरणी दोन्ही समुदायांनी या संकटकाळात शांततेसाठी पुढे येऊन संवाद साधण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस, सैन्य आणि केंद्राच्या एजन्सी तसेच शासन या सर्वांनी पुढे येऊन या संकटकाळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, असे आवाहनही संघाने केले आहे. तसेच, निर्वासितांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचेही सूचित केले आहे. मणिपूरमधील राजकीय नेते, सर्वसामान्य जनता यांनीही राज्यात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते करावे. ज्यामुळे राज्यात मानवी जीवन सुकर होईल आणि राज्यात सुरक्षा शांतता प्रस्थापित होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

- मुंबई तरुण भारत 
Powered By Sangraha 9.0