अशी करा वरई, राळा, बर्टी पिकांची लागवड

विवेक मराठी    17-Jun-2023
Total Views |
डॉ. दिनेश कानवडे । 8275332112
 
 
Varai, Rala, Cultivation of Bertie crops
कृषी क्षेत्राच्या विकासकार्यात लघु तृणधान्य (श्रीधान्य) पिके दुर्लक्षित राहिली आहेत, पण आंतरराष्ट्रीय श्रीधान्य वर्षामुळे या पिकांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त पौष्टिक श्रीधान्यांची लागवड होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर वरई व राळा, बर्टी या पिकांची सुधारित पद्धतीने लागवड कशी करावी? याविषयी माहिती सांगणारा हा लेख.
आपल्या देशात पूर्वापार श्रीधान्यांची लागवड केली जाते. या धान्यांच्या उत्पादनासाठी कमीत कमी खर्च येतो. पौष्टिक श्रीधान्यांचे उत्पादन, काढणीपश्चात व्यवस्थापन, प्रक्रिया करणे अशी श्रीधान्याची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी प्रथम लागवडीचे क्षेत्र वाढणे गरजेचे आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वरई, राळा आणि बर्टी या श्रीधान्यांची सुधारित पद्धतीने कशी लागवड करावी, याविषयी माहिती जाणून घेऊ या.
 
 
वरई (Little Millet)
 
 
वरई या पिकास भगर/वरी/कुटकी या नावांनीसुद्धा ओळखले जाते. पौष्टिक तृणधान्य गटातील इतर पिकांच्या मानाने या पिकाचे धान्य सर्वात लहान आकाराचे आहे, म्हणून याला इंग्लिशमध्ये लिटल मिलेट (Little Millet) असे म्हणतात.
 
 
भारतातील पारंपरिक पिकांपैकी हे एक पीक आहे. महाराष्ट्रात अमरावती (चिखलदरा, धारणी), अहमदनगर (अकोले), नाशिक, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इ. भागात या पिकाची लागवड केली जाते. वरई हे दुर्गम प्रदेशात राहणार्‍या लोकांचे प्रमुख अन्न आहे. उपवासाकरिताही प्रमुख अन्न म्हणून भाताच्या स्वरूपात याचे सेवन करतात.
वरई हे एकदल प्रकारातील पीक असून याची उंची वाणानुसार 30 ते 150 सें.मी.पर्यंत वाढते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे मऊ असतात. खोड काडीसारखे बारीक व सरळ वाढणारे आहे. भात पिकासारखी फुले येतात, 4 ते 25 सें.मी. लांबीच्या लोंब्या येतात. दुष्काळजन्य परिस्थितीत तग धरणारे पीक आहे. जास्त पर्जन्यमान प्रदेशात चांगले उत्पन्न मिळते.
 
आहारविषयक महत्त्व - या पिकात पुढीलप्रमाणे पौष्टिक घटक भरपूर आहेत -
 
 
Varai, Rala, Cultivation of Bertie crops
 
अनुकूल हवामान - वार्षिक पर्जन्यमान 2500 मि.मी., समुद्रसपाटीपासून 2100 मी. उंचीपर्यंत प्रदेशात होतात. वाढीसाठी पोषक तापमान - 23 ते 270 से.
 
जमीन - हलकी ते मध्यम चांगल्या निचर्‍याची निवडावी. अतिशय हलक्या जमिनीत चांगले उत्पन्न मिळत नाही. उताराच्या जमिनीमध्ये लागवड करताना अशा जमिनीमध्ये मशागत आणि लागवड उताराच्या आडव्या दिशेने करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी 15 ते 20 गाड्या कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.

लागवड - या पिकांची रोप लागण पद्धत पारंपरिक आणि प्रचलित आहे. यासाठी प्रथम रोपवाटिका गादीवाफ्यावर तयार करून 20-25 दिवसांची रोपे पुनर्लागवडीसाठी वापरतात. दोन ओळीत 22.5 सें.मी., तर दोन रोपांमध्ये 10 सें.मी. अंतर ठेवून रोपण करावे. यासाठी 4 ते 5 किलो/हेक्टरी बियाणे वापरावे.

रोपवाटिका - एक एकर क्षेत्र लागवडीकरिता 2 ते 3 गुंठे रोपवाटिका लागते. गादीवाफा 1 मी. रुंद, 8 ते 10 सें.मी. उंच आणि उतारानुसार लांबी ठेवावी. गादीवाफ्यावर 3 किलो शेणखत प्रति चौ.मी. प्रमाणात बी पेरणीपूर्वी थर द्यावा. दोन ओळीत 7-8 सें.मी. अंतर ठेवून 1-2 सें.मी. खोलीवर बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. प्रतिगुंठा 1 किलो युरिया द्यावा.


Varai, Rala, Cultivation of Bertie crops
 
बीजप्रक्रिया - बियाणे पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास प्रथम 3-4 ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. यानंतर झेचिरियम ब्रासिलेब्स आणि स्परजिलस अवोमोरी या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया 25 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात केल्यास उत्पन्नात 10-15 टक्के वाढ होते.

पाणी व्यवस्थापन - लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास 20-25 दिवसांनी पहिले पाणी आणि 40-45 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.
 
आंतरमशागत - तणामुळे उत्पन्नात 25 टक्क्यांपर्यंत घट होते. ती टाळण्यासाठी लागवडीनंतर एक महिन्याच्या आत गरजेनुसार खुरपणी आणि कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. आवश्यकतेनुसार तणनाशक वापरावे. यासाठी पेरणीपूर्व आयसोप्रोल्युरॉन 1 किलो क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी अथवा पेरणीनंतर 20-25 दिवसांनी 2, 4 डी सोडियम क्षार (80%) क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी या प्रमाणात फवारणी करून पीक तणमुक्त ठेवावे.
 
 
खत व्यवस्थापन - 40:20:20 किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रतिहेक्टरी, पैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद, पालाश लागवडीच्या वेळेस द्यावे.
आंतरपीक - या पिकामध्ये आंतरपीक म्हणून उडीद, तीळ, सोयाबीन, तूर ही पिके 2:1 या प्रमाणात घेता येतात.
पीक संरक्षण - लागवडीनंतर 10 ते 12 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो. तो रोखण्यासाठी क्वीनॉलफॉस 2 मि.ली. प्रतिलीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

 
सुधारित वाण - फुले एकादशी, सरासरी धान्य उत्पादन 12 ते 14 क्विं/हे., कडबा उत्पादन 20-25 क्विं/हे., कालावधी 120-130 दिवस., बीएलएम 18-21 (पूर्वप्रसारित वाण)

 
काढणी आणि मळणी - पीक पक्व झाल्यानंतर, लोंबीतील दाणे झडण्याच्या आत जमिनीलगत पिकाची कापणी करून मळणी करावी. धान्य स्वच्छ करून उन्हात वाळवून हवेशीर ठिकाणी साठवण करावी. कडब्याच्या पेंड्या बांधून गुरांच्या चार्‍यासाठी गंजी रचून ठेवावी.
 
 
राळा (Foxtail Millet)
 
या पिकास भादली, जर्मन मिलेट असेही संबोधतात. या पिकाचे कणीस झुपकेदार असून पक्वतेच्या वेळेस कोल्ह्याच्या शेपटीसारखे अर्धगोलाकार होते, म्हणून इंग्लिशमध्ये याला ‘फॉक्सटेल (कोल्ह्याची शेपटी) मिलेट’ असे म्हणतात. हिंदीमध्ये कागनी, गुजरातीमध्ये कांग, तर पंजाबीमध्ये कंगनी म्हणतात.
 
राळा हे एकदल प्रकारातील पीक आहे. जातीनुसार 60-100 सें.मी.पर्यंत उंच वाढणारे, खोड काडीसारखे सरळ वाढते. फुटव्याची संख्या 3-5पर्यंत असते. पाने गवताळ असून मऊ किंवा त्यावर लव असते. कणीस 10-30 सें.मी. लांब, अर्धगोलाकार, केसाळ झुपकेदार असते. पीक पक्वतेच्या अवस्थेमध्ये कणसात दाणे भरल्यामुळे कणसे खाली झुकतात. वाणपरत्वे 70-130 दिवसांच्या कालावधीत हे पीक कापणीस येते.

Varai, Rala, Cultivation of Bertie crops

 
मानवी आहाराबरोबरच पाळीव पक्ष्यांसाठी (Love Birdsसाठी) खाद्यान्न म्हणूनसुद्धा राळा पिकाच्या धान्याचा उपयोग होत आहे. जनावरांसाठी चारा म्हणून या पिकाच्या कडब्याचा उपयोग केला जातो.
आहारातील महत्त्व - राळ्यामधील पोषणघटक

Varai, Rala, Cultivation of Bertie crops

 
सुधारित लागवड तंत्रज्ञान

अनुकूल हवामान - उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात, समुद्रसपाटीपासून 2000 मी. उंचीपर्यंत आणि वार्षिक पर्जन्यमान 500-750 मि.मी. असलेल्या भागात राळा पीक चांगले येते.
 
जमीन - विविध प्रकारच्या जमिनीमध्ये तग धरून राहण्याची क्षमता जरी या पिकामध्ये असली, तरी अधिक उत्पन्नाच्या दृष्टीने निचर्‍याची, पोयटा असलेली जमीन अधिक उत्पन्नासाठी योग्य समजली जाते. अतिपावसाच्या किंवा दलदलीच्या प्रदेशात चांगले पीक येण्यास अडचणी येतात.
 
 
पेरणी - महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये जुलैमध्ये तिसर्‍या आठवड्यापर्यंत राळा पिकाची पेरणी केली जाते.
पेरणीपूर्वी जमिनीची नांगरट करून कुळवाच्या साहाय्याने जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी 5 टन कुजलेले शेणखत टाकावे. दोन ओळीत 25-30 सें.मी. अंतर ठेवून दोन रोपांत 8-10 सें.मी. अंतर राहील अशा बेताने 2-3 सें.मी. खोलीवर पेरणी करावी.

बियाणे प्रमाण - हेक्टरी 5-7 किलो या प्रमाणात बियाणे पेरावे.
 
शिफारशीत वाण - पीडीकेव्ही यशश्री (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा महाराष्ट्रात 2023मध्ये प्रसारित झालेले पहिले वाण), पीएस-4.
 
पाणी व्यवस्थापन - लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास 20-25 दिवसांनी पहिले पाणी आणि 40-45 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.
आंतरमशागत - तणामुळे उत्पन्नात 25 टक्क्यांपर्यंत घट होते. ती टाळण्यासाठी लागवडीनंतर एक महिन्याच्या आत गरजेनुसार खुरपणी आणि कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. आवश्यकतेनुसार तणनाशक वापरावे. यासाठी पेरणीपूर्व आयसोप्रोल्युरॉन एक किलो क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी अथवा पेरणीनंतर 20-25 दिवसांनी 2,4 डी सोडियम क्षार (80 टक्के) क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी या प्रमाणात फवारणी करून पीक तणमुक्त ठेवावे.
 
 
खत व्यवस्थापन - 40:20:20 किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रतिहेक्टरी द्यावे, पैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळेस द्यावे.
 
 
आंतरपिके - राळा + कापूस (5:1), तूर (5:1) ही आंतरपीक पद्धती फायदेशीर आहे.
 
काढणी आणि मळणी - राळा पीक वाणपरत्वे 70-130 दिवसांत काढणीस तयार होते. पक्व झालेल्या पिकाची जमिनीलगत कापणी करावी किंवा पक्व झालेली कणसे वरची वर कापून घ्यावीत. कणसे उन्हात वाळवून मळणी करावी. स्वच्छ केलेले धान्य उन्हात वाळवून हवेशीर ठिकाणी साठवण करावी. कडब्याच्या पेंढ्या बांधून व्यवस्थित गंजी रचावी.
 
उत्पादन - धान्य उत्पादन 15-18 क्विं. प्रतिहेक्टरी आणि कडबा उत्पादन 20-40 क्विं. प्रतिहेक्टरी.
 
बर्टी (Barnyard Millet)
 
बर्टी या पिकास सावा, शमुल, सावर्‍या या नावांनीही ओळखतात. इंग्लिशमध्ये याला ‘बार्नयार्ड मिलेट’ म्हणतात. गुजरातीमध्ये सया, हिंदीमध्ये झंगोरा, तामिळमध्ये कुधिरवाली, तर कन्नडमध्ये ओडलू या नावाने बर्टी परिचित आहे.
 
 
बर्टी हे एकदल वर्गातील पीक असून वाणानुसार 50-130 सें.मी. सरळ उंच वाढते. पिकास 4-7 फुटव्याची संख्या असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे असून पानावर बारीक लव असते. हे पीक दुष्काळजन्य तसेच अतिपर्जन्यमान असलेल्या भागात तग धरून राहते. धान्य आणि चारा अशा दुहेरी उद्देशासाठी बर्टी या लघु पौष्टिक तृणधान्याची लागवड केली जाते. भारतात उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशा, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत याची लागवड केली जाते. भारतात 0.93 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून 0.73 लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता 758 किलो/हेक्टर एवढी आहे.
उपवासासाठी बर्टी भाताप्रमाणे शिजवून त्याचा वापर केला जातो. नवरात्रीमध्ये, तसेच इतर उपवासाच्या दिवशी पचण्यास हलका अन्नपदार्थ म्हणूनही बर्टी भगरीला अनेकांची पसंती असते.
 
 
आहारातील महत्त्व - धान्याचे पोषणमूल्य प्रति 100 ग्रॅम
 
प्रथिने 6.3 स्निग्ध पदार्थ 2.2

कर्बोदके 65.5 तंतुमय पदार्थ 9.8

खनिज द्रव्ये 4.4 झिंक (मि.ग्रॅ.) 3.0

लोह (मि.ग्रॅ.) 15.0 फॉस्फरस (मि.ग्रॅ.) 280

नियासिन (मि.ग्रॅ.) 4.20
 
बर्टी धान्य हा प्रथिनाचा चांगला स्रोत असून हे प्रथिन सहज पचण्याजोगे आहे.
 
यात पिष्टमय पदार्थाचे प्रमाण कमी असून शरीरात त्यांचे सावकाश पचन होत असल्यामुळे आधुनिक जीवनशैलीत कमी श्रमाचे किंवा बैठे काम करणार्‍यांसाठी बर्टी धान्य वरदान आहे.
 
 
यातील नियासिन घटकामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
 
 
बर्टी धान्यात असलेल्या लिनोलिक, पामेटिक आणि ओलिक या असंपृक्त स्निग्धाम्लांमुळे हृदयरोगी व मधुमेही यांच्यासाठी हा उपयुक्त आहार आहे.
 
 
रक्तातील साखरेची आणि लिपिडची पातळी कमी करण्यासाठी बर्टीचे सेवन प्रभावी ठरते.
 
 
बर्टी धान्य ग्लुटेनमुक्त (Glutenfree) असल्यामुळे ग्लुटेनची अ‍ॅलर्जी असणार्‍यांना उपयुक्त आहार आहे.
 
सुधारित लागवड तंत्रज्ञान
 
जमीन - हलकी ते मध्यम जमीन उपयुक्त. पाणी धरून ठेवण्याची क्षमता उत्तम.
 
हवामान - उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात येणारे पीक. समुद्रसपाटीपासून 2700 मी. उंचीपर्यंतच्या भागात पीक लागवड. वार्षिक पर्जन्यमान 200 ते 400 मि.मी. आवश्यक.
 
हंगाम - खरीप हंगाम.
 
पेरणी - बर्टीची लागवड पेरणी पद्धतीने केली जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात रोप लागवड करतात.
पेरणी अंतर - 30 सें.मी. ु 10 सें.मी.
 
बियाणे - 3 ते 4 कि. प्रति हेक्टरी.
 
पूर्वमशागत, बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन राळा पिकाप्रमाणेच.
 
आंतरपीक पद्धती - बर्टी + राजमा 4:1 प्रमाणात फायदेशीर.
 
 
पीक संरक्षण - पीक सहा आठवड्याचे झाल्यापासून खोड माशीचा प्रादुर्भाव जास्त होतो. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात दिसतो. क्विनॉलफॉस 2 मि.ली. प्रतिलीटर या प्रमाणात फवारावे. मावा आणि लष्करी अळीसाठी क्लोरोपायरिफॉस 50% प्रवाही 20 मि.ली. प्रति 10 लि. पाण्यात सायंकाळच्या वेळेस फवारावे.
 
 
काढणी व मळणी - पक्व झालेले पीक जमिनीलगत कापावे किंवा वाळलेली कणसे पीक उभे असताना कापावी. उन्हामध्ये वाळवून बडवावे किंवा मशीनद्वारे मळणी करून स्वच्छ धान्य उन्हात वाळवून साठवण करावी.
 
उत्पादन - धान्य - 18-20 क्विं./हे., कडबा - 20-25 क्वि./हे.
 
 
शेतकर्‍यांनी पेरणी करण्यापूर्वी पुरेसा पाऊस पडल्यानंतर जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याची खात्री करूनच पेरणी करावी.
 
 
(लेखक बुलडाणा येथील कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत)