युगपुरुषाच्या कर्तृत्वाचा यथोचित गौरव

10 Jun 2023 15:01:33
युगपुरुष शिवाजीराजांच्या पराक्रमाचे झळाळते सोनेरी शिखर म्हणजे राज्याभिषेक दिन! याच दिवशी तर शिवाजीराजे भोसले छत्रपती झाले. या अलौकिक दिनाचे यंदाचे 350वे वर्ष. या मंगल प्रसंगाच्या आठवणी जागविण्याची सुवर्णसंधी शुभाकांक्षी मंडळी सत्तेवर असतानाच आली. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि सांस्कृतिक मंत्रालयाने आपले स्वत्व दाखवत या कार्यक्रमांचे देखणे आयोजन केलेे. या सरकारने एका युगपुरुषाच्या कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला आहे.
 
rajyabhishek sohala 2023
छत्रपती शिवाजी! या सात अक्षरी मंत्राने गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रावर गारूड घातले आहे आणि सरत्या काळाबरोबर या नावाचा महिमा देशाच्या सीमासुद्धा ओलांडत आहे. अशा या युगपुरुष शिवाजीराजांच्या पराक्रमाचे झळाळते सोनेरी शिखर म्हणजे राज्याभिषेक दिन! याच दिवशी तर शिवाजीराजे भोसले छत्रपती झाले. या अलौकिक दिनाचे यंदाचे 350वे वर्ष. त्याचा योग साधून या मंगल प्रसंगाच्या आठवणी जागविण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. सुदैवाची गोष्ट अशी, की ही संधी साधणारी शुभाकांक्षी मंडळी सत्तेवर आहेत. एरवी, छत्रपती शिवाजींच्या कर्तृत्वातील गाभ्याची गोष्ट काढून टाकून स्वत:चा अजेंडा रेटणार्‍या मंडळींच्या हाती आतापर्यंत सत्तेची सूत्रे होती. त्यामुळे त्यांनी रंगविलेले छत्रपती हे जनसामान्यांच्या हृदयात साठवून ठेवलेल्या छत्रपतींच्या मूर्तीशी तद्दन विपरीत असायचे.
 
 
सध्याच्या सरकारने शिवराज्याभिषेक दिनाच्या 350व्या वर्ष सोहळ्याचे औचित्य साधून जे कार्यक्रम आयोजित केले, त्यांचा आढावा घेतला तरी समयसूचकता आणि औचित्य यांचे भान राखल्याची भावना निर्माण होते. हिंदुत्वाशी गद्दारी करून सत्तेवर आलेल्यांना हिंदुत्वासाठीच दूर करून सत्तेवर आलेले हे सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या उपक्रमातून या विचारांचे प्रतिबिंब पडणे साहजिक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही महाराजांच्या विचारांचा जागर केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराजांच्या आयुष्याचे व जीवितकार्याचे मर्म कशात आहे, याचीही उजळणी केली.
 
 
rajyabhishek sohala 2023
 
या कार्यक्रमांची अनौपचारिक सुरुवात झाली ती 350व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या विशेष बोधचिन्हाने. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनाच्या 350व्या वर्ष सोहळ्यानिमित्त संपूर्ण वर्षभरात मराठी मनांमनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा पुन्हा जागर व्हावा, जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्या वेळी हे बोधचिन्ह वापरण्यात येणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला.
 
 
 
शिवकालीन मंगलचिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणारे संदर्भ हे या बोधचिन्हाचे वैशिष्ट्य असून राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे सुनील कदम यांनी हे बोधचिन्ह तयार केले आहे. त्यानंतर 350व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा औपचारिक प्रारंभ झाला. गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तो करण्यात आला. या वेळी ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोगही झाला. या दि. 2 ते 6 जून 2023 या कालावधीत होणार्‍या प्रदर्शनात तलवार, पट्टा, कट्यार, गुर्ज, भाला, खंजीर, चिलखत, गुप्ती, बंदूक अशी जुन्या काळातील चारशेहून अधिक शस्त्रे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. गेट वे ऑफ इंडियाच्या गाभार्‍यात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व शस्त्रास्त्र वापराची प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली. याशिवाय दिवसातून चार वेळेस युद्धकला सादरीकरणाची व शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली. तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 2 जून रोजी राजस्थानी लोककलांचे, 3 व 4 जून रोजी महाराष्ट्राच्या लोककलांचे, 5 ते 7 जून 2023 या कालावधीत गोवा व गुजरात या राज्यांच्या लोककलांचे सादरीकरण झाले.
 

rajyabhishek sohala 2023 
 
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, की “छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपतींच्या काळातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेल्या शिवकालीन साहित्याचे आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल.”
 
 
 
शिवराज्याभिषेक 350व्या वर्ष सोहळ्याचा खरा रोमांच पाहायला मिळाला रायगड किल्ल्यावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात. हा कार्यक्रम महत्त्वाचा होता, कारण एक तर तो तिथीने साजरा झाला. दुसरे म्हणजे तो रायगड किल्ल्यावर झाला. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडशिवाय अन्य कोणतेही स्थान त्यासाठी शोभून दिसले नसते. खरा शिवराज्याभिषेक तिथेच तर झाला होता. ध्वनिचित्रफीतीच्या माध्यमातून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाने या सोहळ्याला आगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
 

rajyabhishek sohala 2023 
 
“छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रनिर्माणाचे व्हिजन दिले” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. “छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासनाचा, राष्ट्रकल्याणाचा, लोककल्याणाचा मार्ग दाखविला. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले. कठीण काळात जनतेत आत्मविश्वास जागविला. सैन्य नेतृत्वाचे गुण त्यांनी शिकविले. राष्ट्रनिर्माणाचे व्हिजन दिले. महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी आरमाराचे महत्त्व जाणले. त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. महाराजांनी एकता आणि अखंडता यांना प्राधान्य दिले. आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब ‘एक भारत - श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत होते. त्यांनी स्वराज्यही स्थापन केले आणि सुराज्यही स्थापन केले. आपल्या सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा” असे पंतप्रधान म्हणाले. याच भाषणात “महाराजांनी आक्रमकांच्या विरोधात लढाच दिला नाही, तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला” हे पंतप्रधान मोदी यांनी उच्चारलेले वाक्य महत्त्वाचे होते.
 
 
“छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कारभार करतोय, याचा आम्हाला अभिमान आहे” असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापगडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार असल्याची घोषणा केली. तसेच किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे आणि मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले, “शिवराज्याभिषेक सोहळा आपण अनुभवत आहोत, हे आपले भाग्य आहे. राज्य कसे करावे, हे शिवरायांनी जगाला शिकविले. छत्रपतींची राजमुद्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर आणली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली येथे झाले पाहिजे.”
 
 
मुख्य सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतर सर्व मान्यवरांनी जगदीश्वर मंदिर येथे जाऊन जगदीश्वराचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. होळीचा माळ येथे उपस्थित राहून त्यांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक आणि ढोलपथकांचे सादरीकरण पाहिले. सकाळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते सप्तसिंधू जलाभिषेक, सिंहासनारोहण मुद्राभिषेक हे विधी करण्यात आले. या सोहळ्यात राज्यातील 1,108 नद्यांतील आणि जलाशयातील पाण्याने अभिषेक करण्यात आले.
 
 
असाच आणखी एक कार्यक्रम झाला 6 जून रोजी, तो म्हणजे सांस्कृतिक कार्य विभाग आणि राजभवन, महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी 1960मध्ये विशेष सुवर्ण आणि रौप्यपदक काढण्यात आले होते. आता राज्याभिषेक दिनाच्या 350व्या वर्ष सोहळ्यानिमित्त पुन्हा तसे प्रयत्न व्हावेत, असे राज्यपालांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातून विविध नेत्यांनी स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व केले. त्यांच्या काळातील गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे ते म्हणाले.
या निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले, की “राज्याभिषेक सोहळा वर्षाच्या निमित्ताने जगातील 193 देशांत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्याचा संकल्प सरकारने केला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने वर्षभरात विविध कार्यक्रम करण्याचे नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘टॉकिंग बुक‘ काढण्यात येणार आहे. तसेच अन्य कार्यक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे. या विशेष टपाल तिकिटाची किंमत पाच रुपये इतकी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी असलेले सुवर्ण चलन होन हे या टपाल तिकिटावर घेण्यात आले आहे.”
केवळ वारसा असून चालत नाही, त्या वारशाला न्याय देण्याची दानत आणि वृत्तीही अंगी लागते. सुदैवाने हा ऐतिहासिक योग आलेला असताना या वारशाचे भान असलेले सत्ताधारी राज्यात व केंद्रात आहेत. फडणवीस यांनी मांडलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, याची येथे आठवण करून द्यावीशी वाटतेय. हे भान असल्यामुळेच असे भव्य, परंतु दिखाऊ नसलेले आणि ठोस काही तरी देऊन जाणारे कार्यक्रम होत आहेत. आपल्या इतिहासाला उजळणी दिली जातेय.
 
 
यंदाच्या सोहळ्याआधी दोन वर्षे - म्हणजे 2020 आणि 2021मध्ये एवढे कार्यक्रम तर सोडा, पण साधा रायगडावरील कार्यक्रमसुद्धा झाला नाही. त्यात 2020ची परिस्थिती एक वेळ मान्य करता येईल, पण 2021? त्या वेळी तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी दिलेला शुभेच्छा संदेश पाहा. ते म्हणतात, ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण. क्षणोक्षणी केवळ रयतेच्या सुखाचा विचार करणार्‍या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन. त्यांचा लोककल्याणकारी राज्यकारभार जगात आदर्श मानला जातो. आव्हानांवर मात करताना धीरोदात्तपणे पुढे जाण्याचा त्यांचा बाणा आज मार्गदर्शक ठरतो आहे. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून पुढे जाण्यासाठी, दिलेला हा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आपण वचनबद्ध होऊ या. हे वचन त्यांच्या चरणी अर्पण करू या. यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिवछत्रपतींना त्रिवार मुजरा!’
 
 
यात कुठेही आक्रमकांच्या विरोधातील शिवरायांच्या पराक्रमाचे वर्णन नाही की आपण स्वत: त्या मार्गावरून चालण्याचा उद्घोष नाही. जे करायचे ते इतरांनी आणि जे बोलायचे ते सहकारी पक्षांना विचारून, ही त्यांची तेव्हाची नीती होती, त्यालाच साजेसा हा प्रकार होता.
 
 
त्या तुलनेत सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी आपले स्वत्व दाखवत या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सरकारने एका युगपुरुषाच्या कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला आहे.
Powered By Sangraha 9.0