हाथी चलेें अपनी चाल..

26 May 2023 20:02:42

G20
 हे सगळे केवळ काश्मीरमधल्या सकारात्मक बदलाचे निदर्शक नाही, तर भारताच्या बदलत्या स्थितीचे, जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या प्रभावाचे निदर्शक आहे. ‘हाथी चलें अपनी चाल, कुत्ते भौंकते रहे हजार’ या म्हणीचे प्रतिबिंब या घडामोडींमध्ये दिसते.
 
हितशत्रू असलेल्या शेजारी राष्ट्रांच्या विरोधाला, त्यांनी घेतलेल्या नेहमीच्याच आक्षेपांना न जुमानता काश्मीर येथील श्रीनगरमध्ये झालेली पर्यटन कार्यगटाची तिसरी बैठक भारताने यशस्वी करून दाखवली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही तीन दिवसीय बैठक पार पडली.
 
 
याच दरम्यान, ‘G20 अध्यक्ष या नात्याने देशाच्या कोणत्याही भागात शिखर परिषदा आयोजित करण्याचा भारताला अधिकार आहे. तो भारताचा अंतर्गत विषय आहे’ याची भारताने संयुक्त राष्ट्राच्या अधिकार्‍यांना स्पष्ट शब्दांत जाणीव करून दिली आणि त्यांच्या आक्षेपातील हवाच काढून घेतली. चीन-पाकिस्तानला प्रत्यक्ष कृतीतून हिंमतीचे आणि निश्चयाचे दर्शन घडवले.
 
 
सिलिगुडी आणि दार्जिलिंगनंतर पर्यटन कार्यगटाची ही तिसरी बैठक होती. काश्मीरनंतर चौथी बैठक गोव्यात होणार आहे. 370 कलम हटवल्यानंतर आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर या प्रदेशात अतिशय वेगाने विकासाचे वारे वाहू लागले आहेत. त्याचे अनेक दाखले देता येतील. ज्या राज्याचा विकास एका विशेष सांविधानिक तरतुदीमुळे काही दशके खुंटला होता, जो भूभाग गेली काही वर्षे दहशतवादाचा मोठा अड्डा बनला होता आणि ज्याच्यामुळे इथली तरुणाई भरकटली होती, त्या काश्मीरचा चेहरामोहरा गेल्या 4 वर्षांत बदलतो आहे. या बदलांची दृश्यमानता वाढते आहे. शासन-प्रशासनाच्या स्तरावर चालू असलेल्या प्रयत्नांना काश्मिरी नागरिक - विशेषत: इथली तरुणाई सकारात्मक प्रतिसाद देते आहे. केवळ विकासाच्या संधीच प्रगतीच्या दिशेने घेऊ जातील याची खात्री पटत चालल्यानेच काश्मिरी तरुणांनी दहशतवादाकडे पाठ फिरवली आहे. गेल्या 4 वर्षांत काश्मीर खोर्‍यातल्या दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली असून गेल्या वर्षभरात इथल्या पर्यटकांच्या संख्येने एक कोटीचा आकडा पार केला आहे.. भरकटवल्या गेलेल्या काश्मिरी युवकांना या सगळ्या संधींचे मोल आता लक्षात आले आहे. त्यामुळेच G20 अंतर्गत Y20 ही युवाशक्ती डोळ्यासमोर ठेवून झालेल्या बैठकीला काश्मिरी युवकांचा प्रतिसाद उल्लेखनीय होता. ही बैठक पर्यटन कार्यगटाच्या बैठकीआधी 11-12 मे दरम्यान झाली.
 
 
ही सर्व तेथील बदलाची शुभचिन्हे आहेत. ‘आजवर शांती और अमन‘च्या फक्त पोकळ गप्पा झाल्या, आता मात्र त्या दिशेने खरी वाटचाल चालू झाली आहे. त्याचे दृश्य परिणाम दिसत असल्याने आणि मधुर फळे चाखायला मिळत असल्याने काश्मिरी जनमत वेगाने बदलते आहे. तेच येथील भाजपाविरोधी पक्षांचे आणि शेजारी राष्ट्रांचेही दुखणे आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीवर सध्या सामसूम असली, तरी पाकिस्तान आणि चीन मात्र अद्यापही झालेले बदल मान्य करायला तयार नाहीत.
 
  
आजवर अस्थैर्याचे आणि दहशतवादाचे केंद्र म्हणून जगात ओळख असलेले काश्मीर यापुढे जगासाठी पर्यटनाचे मुख्य केंद्र व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून G20च्या पर्यटन कार्यगटाची बैठक काश्मीर येथे आयोजित करण्यात आली. दहशतवादाचे एक मुख्य केंद्र अशी जागतिक स्तरावर ओळख बनलेल्या काश्मीरला, या निमित्ताने एका जागतिक स्तरावरील बैठकीचे आयोजन करण्याची संधी मिळाली. नेमके हेच पाकिस्तानला खुपले. स्वत:च्या देशाचा गाडा ओढण्याची ताकद गमावून बसलेल्या पाकिस्तानला काश्मीर खोर्‍यात मात्र शांतता नांदायला नको आहे. म्हणूनच O.I.C. अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजच्या सदस्य असलेल्या देशांनी - म्हणजे त्यातल्या इजिप्त, सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान या G20चे सदस्य असलेल्या देशांनी या बैठकीला जाऊ नये, असे पाकिस्तानने आवाहन केले. तर, काश्मीर हा विवादित प्रदेश असल्याचे कारण पुढे करत G20 गटाचा सदस्य असूनही चीनने या बैठकीला अनुपस्थित राहिला. मार्चमध्ये G20च्या अरुणाचल प्रदेशात झालेल्या बैठकीतही चीन सहभागी झाला नव्हता. त्या वेळी पाकिस्तानने चीनच्या या बहिष्काराचे समर्थन केले होते. काश्मीरच्या बाबतीत पाकची तळी उचलत चीनने त्याची परतफेड केली असावी.
 
  
मात्र या दोन देशांच्या बहिष्काराला कोणीही फारशी किंमत दिली नाही, असे या बैठकीसंबंधात आलेल्या वृत्तांच्या आधारे म्हणता येईल. भारताने G20तील सदस्य देशांव्यतिरिक्त ज्या देशांना निमंत्रित केले होते, त्या देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले. त्याचबरोबर UN, IMF, World Bank, WHO, ASEAN अशा आंतरराष्ट्रीय संस्थांचे उच्चपदस्थ असे सुमारे 60 जण बैठकीला उपस्थित होते. चीनच्या पोटदुखीचे तेही एक कारण आहे. पाकिस्तानच्या आवाहनानंतर तुर्कस्तान, सौदी अरेबिया या दोन देशांनी अधिकृत सरकारी प्रतिनिधी पाठवले नसले, तरी त्या दोन्ही देशांंचे राष्ट्रध्वज अन्य सदस्य देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आले होते. तसेच त्यांनी पाठवलेले पर्यटन क्षेत्रातील खाजगी व्यवसायिक या देशांचे प्रतिनिधित्व करत होते. तुर्कस्तानात आणि सौदी अरेबियात खाजगी उद्योगावर सरकारची पकड आहे, त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय खाजगी व्यवसायिक या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
  
 
अशा प्रकारे पाकिस्तानच्या आणि चीनच्या कुरापतींचा परिणाम ना सहभागी देशांवर झाला, ना आयोजक भारतावर. सहभागी झालेले सर्व प्रतिनिधी भारताच्या अगत्यशीलतेने, समृद्ध संस्कृतिदर्शनाने आणि निसर्गसौंदर्याने प्रभावित होऊन परतले. बांधकाम क्षेत्रातील दुबईचा एक नामांकित ग्रूप श्रीनगरमध्ये एक मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पुढे आला आहे. इथे आलेली ही पहिलीच मोठी परदेशी गुंतवणूक.
 
 
हे सगळे केवळ काश्मीरमधल्या सकारात्मक बदलाचे निदर्शक नाही, तर भारताच्या बदलत्या स्थितीचे, जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या प्रभावाचे निदर्शक आहे. ‘हाथी चलें अपनी चाल, कुत्ते भौंकते रहे हजार’ या म्हणीचे प्रतिबिंब या घडामोडींमध्ये दिसते.
Powered By Sangraha 9.0