मुंगेरीलालचे वंशज

18 May 2023 19:24:12
 तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व करणे म्हणजे पंतप्रधानपद टप्प्यात येणे अशा समजुतीत असलेल्या मुंगेरीलालांच्या दिवास्वप्नांना काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयाने खीळ बसली आहे. त्याचबरोबर हिमाचल, कर्नाटकात भाजपाला विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, कारण भाजपाचे स्थानिक नेतृत्व समर्थ नव्हते, म्हणून. तेव्हा त्या पक्षाला ओहोटी लागली अशा गैरसमजात राहून या तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांनी स्वप्नांचे इमले उभारू नयेत. या दोन्ही राज्यांत विधानसभेपेक्षा वेगळी स्थिती लोकसभा मतदारसंघातली आहे. तिथे भाजपाचे पारडे जड आहे. तेव्हा तिसर्‍या आघाडीतल्या नेत्यांनी डोळे उघडे ठेवून परिस्थितीचे विश्लेषण केले, तर ते निवडणुकीत यशस्वी होतील न होतील, पण किमान लढतील तरी विचारपूर्वक. मुंगेरीलालच्या या वंशजांनी किमान तेवढे तरी करावे.
 
vivek
 
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत प्राप्त केले. इतके यश त्या पक्षालाही अनपेक्षित असले, तरी हिमाचल प्रदेशनंतर मिळालेल्या या दुसर्‍या विजयाने पक्षात थोडी धुगधुगी निर्माण झाली, तर ते स्वाभाविकच म्हणायला हवे. गेली काही वर्षे सातत्याने अपयशाला सामोरे गेल्यानंतर आणि समर्थ नेतृत्वाच्या अभावामुळे या पक्षाला जी अभूतपूर्व मरगळ आली होती, त्या मरगळीची धूळ या विजयाने झटकली जाऊ शकते. मात्र, या यशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला तगडे आव्हान देण्याएवढी ताकद काँग्रेसमध्ये आली असल्याचे समजणे ही राजकीय अपरिपक्वता आहे. विजयाचा कैफ उतरला की ही वस्तुस्थिती काँग्रेसमधील (उरल्यासुरल्या) बुजुर्गांच्या लक्षात येईलही.. किंबहुना ती एव्हाना आलीही असेल. पण काँग्रेसच्या कृपाप्रसादावर ज्यांचे अस्तित्व अवलंबून आहे, असे स्वयंघोषित राजकीय विश्लेषक आणि भाजपाविरोधी मजबूत आघाडी उभी करण्याची स्वप्ने पाहणारे विरोधक हे वास्तव स्वीकारण्याच्या मन:स्थितीत अद्याप तरी नाहीत.
 
 
 
गेला काही काळ जी काँग्रेस आणि त्यांचे नेते तिसर्‍या आघाडीतील काहींना अगदी नकोसे झाले होते, त्यातलेच काही आता काँग्रेसने तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व करावे अशी चर्चा करू लागले आहेत. काँग्रेविषयीच्या मताच्या लंबकाने एकदम दुसरे टोक गाठायला हा विजय कारणीभूत ठरला आहे, हे नक्की. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व करण्याचे दिवास्वप्न पाहणार्‍या राजकीय नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेचाही चक्काचूर झाला आहे.
 
 
 
2014पासून काँग्रेसला देशभरात सर्वच ठिकाणी दारुण पराभवाला समोरे जावे लागत होते. जिथे विजय मिळत होता, तिथे सत्ता राखता आली नाही.. अगदी कर्नाटकातल्या गेल्या विधानसभा निवडणुकीनंतरही हेच घडले. या पार्श्वभूमीवर, हिमाचल आणि कर्नाटकातील विजय काँग्रेसला सुखावणारा आहे. राष्ट्रीय पक्षाला डावलून तिसरी आघाडी करू पाहणार्‍या, प्रादेशिक वा विशिष्ट भौगोलिक प्रदेशात कार्यरत असलेल्या राजकीय पक्षांच्या मर्यादाही त्यामुळे स्पष्ट झाल्या आहेत.
 
 
काँग्रेसला बाजूला ठेवून तिसरी आघाडी करावी, अशी ममता बॅनर्जी यांच्यासह के. चंद्रशेखर राव, नितीश कुमार, अखिलेश यादव आणि अगदी शरद पवार यांचीसुद्धा इच्छा होती. मात्र दोन राज्यांतील काँग्रेसच्या लक्षणीय विजयानंतर, काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी करण्याबाबत फेरविचार होऊ शकतो. तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केलेले विधान या संदर्भात सूचक ठरावे. “ज्या राज्यात काँग्रेसचे प्राबल्य आहे, तिथे काँग्रेसला सोबत घेऊन आघाडी करू” असे त्यांनी जाहीरपणे म्हणणे म्हणजे, काँग्रेसचे महत्त्व लक्षात आल्याचे निदर्शक आहे.
 
 
 
भाजपाविरोधात तिसरी आघाडी करताना काँग्रेस नको अशी सर्व प्रादेशिक पक्षांची इच्छा अगदी कालपरवापर्यंत होती. कारण तसे झाले, तर स्थानिक मतदार जेव्हा काँग्रेसचा उमेदवार नाकारतात तेव्हा आम्हालाही नाकारतात, असे अनेकांचे म्हणणे होते. त्याचबरोबर, सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या कारणांमुळे काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा राहुल गांधींकडे असली, तरी नेतृत्व करण्याची त्यांची कुवत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची त्यांच्यात ताकद नाही, त्यांचे नेतृत्व जनतेला मान्य नाही असे अनेक मुद्दे प्रादेशिक पक्षांकडून अगदी कालपरवापर्यंत पुढे केले जात असत. कर्नाटक निकालानंतर मात्र तिसर्‍या आघाडीत मतपरिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत.
 
 
 
ममता बॅनर्जींच्या विधानानुसार जर देशात काँग्रेससह तिसरी आघाडी झालीच, तर राहुल गांधींकडे तिचे नेतृत्व येईल. हे आघाडीतल्या किती प्रादेक्षिक पक्षांना मान्य होईल? आणि त्यापैकी काहींनी ही गोष्ट मान्य केलीच, तर तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व आणि पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत असलेल्या अनेक नेत्यांचे काय? शरद पवार यांच्यासह तिसर्‍या आघाडीतले अनेक नेते पंतप्रधान होण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. ते सहजपणे राहुल गांधींचे नेतृत्व मान्य करतील असे वाटत नाही.
 
 
कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मिळालेेेल्या बहुमतामुळे त्या पक्षाची तिथे ताकद वाढली आहे असे समजणे चुकीचे ठरेल. समोर उभ्या ठाकलेल्या जेडीएससारख्या पक्षाच्या चुकांमुळेही कर्नाटकात काँग्रेसचे पारडे जड झाले, हे लक्षात घ्यायला हवे.
 
 
आगामी विधानसभा निवडणुकांतही काँग्रेसला उल्लेखनीय यश मिळाले, तर मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपासाठी आव्हान निर्माण करू शकेल. मात्र गेल्या निवडणुकीचा इतिहास काही वेगळेच सांगतो. 2019च्या लोकसभा निवडणुकीअगोदरही कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आले होते. पण तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपाने या राज्यांत दणदणीत विजय प्राप्त केला होता. तेव्हा याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता या वेळी नाकारता येत नाही. शिवाय राज्यासाठी सरकार निवडताना आणि केंद्रातले सरकार निवडताना मतदारांचे निकष वेगवेगळे असतात, या वस्तुस्थितीकडेही डोळेझाक करता येत नाही.
 
 
 
तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व करणे म्हणजे पंतप्रधानपद टप्प्यात येणे अशा समजुतीत असलेल्या मुंगेरीलालांच्या दिवास्वप्नांना काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयाने खीळ बसली आहे. त्याचबरोबर हिमाचल, कर्नाटकात भाजपाला विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, कारण भाजपाचे स्थानिक नेतृत्व समर्थ नव्हते, म्हणून. तेव्हा त्या पक्षाला ओहोटी लागली अशा गैरसमजात राहून या तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांनी स्वप्नांचे इमले उभारू नयेत. या दोन्ही राज्यांत विधानसभेपेक्षा वेगळी स्थिती लोकसभा मतदारसंघातली आहे. तिथे भाजपाचे पारडे जड आहे. तेव्हा तिसर्‍या आघाडीतल्या नेत्यांनी डोळे उघडे ठेवून परिस्थितीचे विश्लेषण केले, तर ते निवडणुकीत यशस्वी होतील न होतील, पण किमान लढतील तरी विचारपूर्वक. मुंगेरीलालच्या या वंशजांनी किमान तेवढे तरी करावे.
 
 
 
आणि पराभवातून शिकून भाजपाच्या नेत्यांनीही नेमकी व्यूहरचना करावी. रात्र वैर्‍याची नसली, तरी परीक्षा पाहणारी आहे, याचे भान ठेवावे. हिंदुत्वाचे खंदे समर्थक असलेला भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष सत्तेत असणे ही देशाची गरज आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0