उन्माद संपवायला हवा

17 May 2023 14:27:32
 समकालीन सामाजिक वातावरण हे तुष्टीकरणातून निर्माण झालेल्या उन्मादाचे अनुभव देणारे आहे. अकोला, नगर आणि त्र्यंबकेश्वर येथील घटना या उन्मादाची साक्ष देणार्‍या आहेत. कधी राजकारणासाठी, तरी कधी समाजमन सदैव अस्वस्थ ठेवण्यासाठी काही गट सक्रिय असतात. लांगूलचालन करताना फुटीरतावादाची पेरणी होत असते. यातूनच समाजजीवनात ताणतणाव निर्माण होत आहेत. मुस्लीम समाजात हिंदूंवर हल्ला करण्याची मानसिकता तयार झाली असून वेगवेगळ्या ठिकाणी ती प्रकट झाली आहे. ही मानसिकता मोडून काढण्यासाठी सरकारने कडक धोरण अवलंबिले पाहिजे.
 
vivek
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि सत्ताधारी भाजपाच्या वाट्याला विरोधी पक्षाची जबाबदारी आली. काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले असून आमच्यामुळेच कर्नाटकात सत्ता प्राप्त झाली, असा मुस्लीम समाजाकडून दावा केला जातो आहे आणि या दाव्यानुसार उपमुख्यमंत्रिपद व पाच मंत्रिपदे मिळावीत अशी कर्नाटकात मुस्लीम समाजाचे नेते आग्रही मागणी करत आहेत. आमच्यामुळे तुम्ही आहात अशा आवेशात कर्नाटकात मुस्लीम नेते व वक्फ बोर्डाचे मौलवी बोलत आहेत. बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने चार टक्के मुस्लीम आरक्षण रद्द केले. ते आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. आमच्या मतांची किंमत आम्ही वसूल करणार अशा मानसिकतेचा अनुभव सध्या कर्नाटकात येत आहे. जे हिंदुत्वाचा विरोध करतील त्यांच्या पाठीशी संघटित होऊन उभे राहायचे, हे मुस्लीम समाजाने ठरवले आहे. काँग्रेसने मुस्लीम समाजाला पंधरा जागा दिल्या, पैकी नऊ जागांवर मुस्लीम उमेदवार निवडून आले आहेत. आपले वाढते राजकीय बळ वापरून मुस्लीम समाज सरकारला वेठीस धरू पाहत आहे. राजकारणात आपली शक्ती कशी आणि कुठे वापरली तर आपला फायदा होईल आणि एक दबावगट म्हणूनही आपले अस्तित्व टिकवून ठेवता येईल, याचा पूर्ण विचार करूनच कर्नाटकात मुस्लीम समाज मैदानात उतरला आहे. आज पाच मंत्रिपदांसह उपमुख्यमंत्रिपद मागणारा मुस्लीम समाज भविष्यात कशा प्रकारे काँग्रेसवर आपली पकड घट्ट करतो, हे समजून घेतले पाहिजे. कारण हा दबाव केवळ राजकीय हिस्सेदारीसाठी नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक जीवनातही आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी आहे. बजरंग दलावर बंदी घातली जावी यासाठी पुढील काळात मुस्लीम समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतो आणि या आंदोलनास काँग्रेस पक्ष अप्रत्यक्षपणे पाठिंबा देऊ शकते. हिंदू, हिंदुत्व, हिंदू जीवनदृष्टी इत्यादींना विरोध करणारे एकत्र येणार आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचा प्रयत्न करत राहणार, अशी काहीशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. कर्नाटकात निवडणूक निकाल सुरू असताना ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिल्या गेल्या. या सार्‍या पार्श्वभूमीवर कर्नाटकात मुस्लीम समाजाला सोबत घेऊन काँग्रेसला पुढे जावे लागणार होते, त्यामुळे लांगूलचालनाची पातळी आणखी किती खाली घसरते, हे लवकरच लक्षात येईल. मुस्लीम समाज कर्नाटकात आपला राजकीय दबाव निर्माण करून त्यांना हवे ते प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नात आहे.
 बजरंग दलावर बंदी घातली जावी यासाठी पुढील काळात मुस्लीम समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतो आणि या आंदोलनास काँग्रेस पक्ष अप्रत्यक्षपणे पाठिंबा देऊ शकते.
 
 महाराष्ट्रात मात्र मुस्लीम समाज राजकारणात आपला दबावगट सक्रिय करू शकला नसला, तरी आपले उपद्रवमूल्य सातत्याने प्रकट करण्याची त्याला खुमखुमी येत असते. या वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमी उत्सवाच्या काळात झालेली दंगल हे मुस्लीम उन्मादाचे वास्तव रूप होते. काहीही करून धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मुस्लीम समाज प्रयत्न करत आहे. रामनवमीच्या मिरवणुकीला विरोध करताना अल्लाशिवाय दुसर्‍या कोणाला मान्यता नाही अशी धार्मिक कट्टरता दिसून आली होती. मात्र हीच कट्टरता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात घुसताना कोठे गेली होती? कशासाठी मुस्लीम समाजाला त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश हवा होता? या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. ज्या मंदिरात केवळ हिंदूंना प्रवेश आहे, तेथे मुस्लीम समाजाला प्रवेश कशासाठी हवा आहे? त्र्यंबकेश्वर येथील हिंदू समाज जागृत असल्याने मुस्लीम समाजाला मंदिरात प्रवेश करता आला नाही. या मंदिर प्रवेशाविरुद्ध पोलिसांनी तक्रार नोंदवली असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. शासन, प्रशासन या घटनेची गंभीर दखल घेत आहे. हे जरी खरे असले, तरी हिंदू समाजासाठी ही धोक्याची घंटा आहे, हे समजून घेतले पाहिजे. एकदा का मुस्लीम समाज त्र्यंबकेश्वर येथे मंदिरात प्रवेश करू लागला की त्र्यंबकेश्वराचे त्र्यंबकपीर व्हायला वेळ लागणार नाही. आतासुद्धा त्र्यंबकेश्वराला चादर चढवण्यासाठी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जात होता. एकदा ही वहिवाट सुरू झाली की हळूहळू तेथे दावा सांगण्यास सुरुवात केली जाईल, हे ध्यानात घ्यावे लागेल. त्र्यंबकेश्वर येथील हिंदू समाजबांधवांची जबाबदारी आता वाढली असून कायम सजग राहावे लागणार आहे.
 
 
 
अकोला येथील घटना हीसुद्धा मुस्लीम उन्मादाची साक्ष देत आहे. केरळा स्टोरी या चित्रपटासंबंधी समाजमाध्यमातून मत प्रकट केले, या कारणामुळे अकोल्यात मुस्लीम समाजाने आपला उन्माद दाखवून दिला आहे. अकोल्यात झालेल्या दोन गटांतील दंगलीत एकाचा मृत्यू झाला आहे. सामाजिक शांतता नष्ट करण्यासाठी आणि आपला उन्माद व्यक्त करण्यासाठी अकोल्यात मुस्लीम समाजाने पुढाकार घेतला होता, असे तपासाअंती लक्षात येते आहे. समाजमाध्यमातून भावना दुखावल्या अशी तक्रार दाखल करण्यासाठी जमलेल्या मुस्लीम समाजाकडे प्राणघातक शस्त्रे आणि पेट्रोल बाँब होते. याचाच अर्थ ही दंगल पूर्वनियोजित होती. केरळा स्टोरीचे निमित्त पुढे करून ही दंगल घडवली गेली आहे. नगर जिल्ह्यात शेवगाव येथील मिरवणुकीवर हल्ला करून मुस्लीम समाजाने आपला धार्मिक उन्माद दाखवून दिला आहे. या दंगलीत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अकोला आणि शेवगाव येथील घटना या हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी पुरेशा आहेत असे आम्हाला वाटते. सामाजिक सलोखा आणि शांतता कायम ठेवण्याचा ठेका केवळ हिंदू समाजाने घेतला नाही, हिंदू समाज कोणत्याही अनुचित मार्गाचा अवलंब करणार नाही. मात्र समोरून हल्ला केला गेला, तर मात्र त्याचा जोरकस प्रतिकार करण्याशिवाय हिंदू समाजाकडे दुसरा पर्याय नसेल, याची शासनाने नोंद घ्यावी.
 
 
 
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्याचप्रमाणे जो धार्मिक उन्माद उफाळून येतो आहे, त्याचाही बिमोड करण्याची जबाबदारी शासनाची आहे. छत्रपती संभाजीनगर, अकोला, शेवगाव या ठिकाणी झालेल्या घटना लक्षात घेतल्यानंतर मुस्लीम समाज कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट होते आहे. धार्मिक उन्माद आणि तुष्टीकरण यामुळे मुस्लीम समाज फुटीरतावादाची शिकार होतो आहे. हा उन्माद मोडून काढण्यासाठी सरकारने कडक कारवाई करावी. समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने आता कडक धोरण अवलंबले पाहिजे. शासनाने बोटचेपी भूमिका घेतली, तर या मुस्लीम उन्मादाचा वणवा राज्यभर पसरेल आणि म्हणून केवळ राजकीय फायदा लक्षात न घेता समाजजीवनात निर्माण होणार्‍या या घटनाची दखल घेतली पाहिजे. उन्माद संपवला पाहिजे. ही काळाची गरज आहे.

Powered By Sangraha 9.0