महाराष्ट्रासाठी धडा

15 May 2023 13:41:36

bjp
 
महाराष्ट्राची निवडणूक वाटते तितकी सोपीही नाही. महाराष्ट्रात पक्षात होणारी नवी भरती आणि विचारनिष्ठ जुने कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र बनत जाणारा आहे. पक्षांतर्गत संघर्ष पक्षाला दुर्बळ करतो. यातून पक्ष नेतृत्वाला मार्ग काढावा लागेल. मार्ग काढत असताना कर्नाटकाचे उदाहरण एक धडा म्हणून डोळ्यासमोर ठेवायला हरकत नाही.
प्रजासत्ताकात जनता सार्वभौम असते. या सार्वभौम जनतेने कर्नाटकात काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. तो निर्णय आनंदाने स्वीकारला पाहिजे. परंपरेने कर्नाटक हा काँग्रेसचा गड राहिला आहे. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत सर्व देश काँग्रेसच्या विचाराच्या विरोधात गेला, तरी कर्नाटकचे मतदार काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले. चिकमंगळूर या मतदारसंघातून श्रीमती इंदिरा गांधी यांना कर्नाटकातून निवडून लोकसभेत पाठविले होते. कर्नाटकाच्या मतदारांनी या वेळीदेखील काँग्रेस पक्षाला विजयाचे थोडे टॉनिक देण्याचे काम केलेले आहे.
 
 
काँग्रेसलादेखील एका विजयाची खूप आवश्यकता होती. काँग्रेस पक्षाने एकजूट करून उत्तम रणनीती आखली, योग्य उमेदवारांची निवड केली. मतदारसंघातील प्रश्नांना महत्त्व दिले, पक्षात फाटाफूट झाली नाही, भाजपा शासनाला पर्याय देण्याची रचना उभी केली, लोकांना बदल हवा आहे हे त्यांनी हेरले आणि त्यात ते यशस्वी झाले. राजकीय विश्लेषकांनी काँग्रेस पक्षाच्या विजयाची पाच, सात, दहा अशी वेगवेगळी कारणे मांडली आहेत. बायोकॉनच्या प्रमुख आणि देशातील थोर उद्योजिका किरण मुजुमदार शॉ यांनी काँग्रेस विजयाची तीन कारणे सांगितली, ती अशी - 1) पायाभूत सुविधांचा विकास, 2) समृद्ध आर्थिक व्यवस्था, 3) सामाजिक सामंजस्य. मतदार या तीन गोष्टींचा विचार करतात. तसा विचार करून मतदारांनी काँग्रेसला संधी दिली आहे. त्यांचे हे मत पक्षीय राजकारणाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीचे असल्यामुळे फार महत्त्वाचे आहे.
 

bjp 
 
भारतीय जनता पार्टीने सर्व शक्ती पणाला लावून निवडणूक लढविली, परंतु त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. जनतेने भाजपाला आत्मचिंतनाची संधी दिली आहे. जनतेने भाजपाला पूर्ण नाकारले असे झाले नाही. भाजपाचे वरिष्ठ नेते आत्मचिंतन करतीलच. रणनीतीच्या चुका ते दुरुस्त करतीलच. या निमित्ताने जे विचार मनात आले, ते येथे मांडण्याचा प्रयत्न करतो.
 
 
राज्याची निवडणूक लढविताना तीन विषय महत्त्वाचे ठरतात - 1) राज्यातील जनतेचे जीवन जगण्याचे प्रश्न, 2) या प्रश्नांशी समरस झालेले स्थानिक नेते, 3) समर्थ प्रादेशिक नेतृत्व. या तीन गोष्टींचा जर खूप अगोदरपासून गंभीर विचार केला गेला, तर निवडणूक लढविणे सोपे जाते. सगळ्याच राजकीय पक्षात महत्त्वाकांक्षी नेते भरपूर असतात. ते एकमेकांना काटशह देण्याचे काम करीत राहतात. कर्नाटकात हेच घडले. माजी मुख्यमंत्र्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विचारधारेवर चालणार्‍या पक्षाला हा प्रचंड धक्का होता. भाजपाचे अनेक प्रादेशिक वरिष्ठ नेते निष्क्रिय राहिले. पुढल्या वर्षी महाराष्ट्रात निवडणुका होतील. महाराष्ट्रात कर्नाटकाची लागण होणार नाही, याची प्रादेशिक नेतृत्वाला काळजी घ्यावी लागेल.
 
 
भाजपाची विचारसरणी हिंदुत्वाची आहे. राज्यघटनेचे 370 कलम, रामजन्मस्थानावर श्रीरामाचे मंदिर, पाकिस्तानी दहशतवादाला जशास तसे उत्तर, समान नागरी कायदा इत्यादी राजकीयदृष्ट्या हिंदुत्वाचे कालपरवापर्यंतचे विषय होते. यातील बहुतेक विषयांवर भारतीय जनता पार्टीने भरीव काम केलेले आहे. निवडणूक राजकारणाची गंमत अशी असते की, तेच तेच तेच विषय सारखे चालत नाहीत, नवीन विषय शोधावे लागतात. हिंदुत्वाचा प्रभाव वाढत गेल्यामुळे काही अतिरेकी हिंदू-मुसलमान समाजाविषयी भन्नाट वक्तव्य करीत राहतात. रोजच्या जगण्याशी ज्याचा संबंध नाही, असे हिजाबसारखे विषय पुढे आणतात. अशा विषयांनी मते मिळत नाहीत, हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून हिंदुत्वाची मांडणी जनतेच्या आकांक्षाच्या संदर्भात करता आली पाहिजे.
 
 
या दृष्टीने विचार करता तीन विषय पुढे येतात - 1) हिंदुत्व आणि आर्थिक विकास, 2) हिंदुत्व आणि सामाजिक न्याय, 3) हिंदुत्व आणि सर्वपंथसमादर. हे तीन विषय वैचारिकदृष्ट्या विस्ताराने मांडता येण्यासारखे आहेत. हिंदुत्व या विषयावर सा. विवेकने अत्यंत परिश्रमपूर्वक साडेचारशे पृष्ठांचा ग्रंथ केला आहे. या ग्रंथाचे वाचन भाजपातील प्रमुख नेत्यांनी करायला पाहिजे. राजकारणातील आपल्यालाच सर्व काही समजतं ही भावना ठीक आहे, परंतु अन्य लोकांना विचाराची खोली खूप समजते, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे.
 
 
या दृष्टीने विचार करता तीन विषय पुढे येतात - 1) हिंदुत्व आणि आर्थिक विकास, 2) हिंदुत्व आणि सामाजिक न्याय, 3) हिंदुत्व आणि सर्वपंथसमादर. हे तीन विषय वैचारिकदृष्ट्या विस्ताराने मांडता येण्यासारखे आहेत. तशी क्षमता असणारे कार्यकर्ते भाजपात आहेत. राजकीय पक्षाचे काम विचारांवर प्रवचने देण्याचे नाही. राजकीय पक्षाचे काम विचार कृतिरूपात आणण्याचे असते. उदा., - विकास याचा अर्थ पायाभूत सुविधांचा विकास, शेतमालाला योग्य भाव, सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक भत्ता, व्यवसाय देणार्‍या कौशल्याचे प्रशिक्षण, असे असंख्य विषय येतात. सामाजिक न्याय या विषयात दुर्बल घटकांना आर्थिक सवलती, नोकरी व्यवसायात प्राधान्य, त्यांच्या आरोग्य आणि अन्नसुरक्षेची काळजी इत्यादी विषय येतात. राजकीय पक्षाला त्याच्या योजना मांडाव्या लागतात. आपल्या राज्यघटनेने सर्वांना उपासनेचे स्वातंत्र्य दिलेले आहे. प्रत्येक धर्म-संप्रदायातील लोकांत कालबाह्य रूढी असतात. यातील काही रूढी त्या त्या समाजाच्या लोकांनी सोडवायच्या असतात, तर काही रूढी राज्यघटनेच्या कलमांची अंमलबजावणी करून सोडवायच्या असतात. राजकीय पक्षाला याचाच संतुलित विवेक करावा लागतो. राजकीय नेत्यांची धार्मिक विषयांवरील टिप्पणी संतुलित असावी लागते. सर्वसामान्य हिंदू सहिष्णू असतो. त्याला उग्र हिंदुत्व आवडत नाही. सर्व देवांचा सन्मान करावा, अशी त्याची मानसिकता असते.
 

bjp 
 
कर्नाटकाच्या निवडणूक निकालाचे परिणाम भाजपाला अनुकूल होतील की प्रतिकूल होतील, याच्या चर्चा चालू आहेत. 2024 निवडणुकीत विरोधी पक्षांच्या एकजुटीचा विषय चालू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देशभर दौरा करीत आहेत. 2024ची निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर लढविली जाईल. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी कर्नाटकात जनतेने प्रचंड गर्दी केली होती. हीच स्थिती देशभर आहे. विरोधी पक्षाच्या एकजुटीचे नेतृत्व कोण करणार? त्यात काँग्रेसला कोणते स्थान राहणार? राहुल गांधी यांचे नेतृत्व सगळे राजकीय पक्ष मान्य करतील का? असे नाजूक प्रश्न आहेत. आजतरी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला अखिल भारतीय पर्याय नाही हे जितके खरे आहे, तितकेच सर्व राज्यांत भाजपाचे समर्थ प्रादेशिक नेतृत्व उभे राहिले आहे, असेही नाही. योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान असे काही नेते सोडले, तर दिल्ली, पंजाब, राजस्थान, ओडिशा, आंध्र, केरळ इत्यादी राज्यांत सक्षम प्रादेशिक नेतृत्व उभे राहिलेले नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आजतरी पर्याय नाही. महाराष्ट्राची निवडणूक वाटते तितकी सोपीही नाही. महाराष्ट्रात पक्षात होणारी नवी भरती आणि विचारनिष्ठ जुने कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र बनत जाणारा आहे. पक्षांतर्गत संघर्ष पक्षाला दुर्बळ करतो. यातून पक्ष नेतृत्वाला मार्ग काढावा लागेल. मार्ग काढत असताना कर्नाटकाचे उदाहरण एक धडा म्हणून डोळ्यासमोर ठेवायला हरकत नाही.
Powered By Sangraha 9.0