नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट एका अर्थाने आरोग्य मंदिर

13 May 2023 13:16:38
vivek
मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लांब रांगा बघताक्षणीच देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भव्य कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न पाहिले. डॉ शैलेश जोगळेकर, परिणय फुके, सुमित वानखेडे, राजूरकर, आनंद पाठक अशा आपल्या विश्वासू टीमला सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी हे स्वप्न सत्यात उतरवले आणि या संपूर्ण प्रकल्पाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे.
नागपूर - देशाचे मध्यवर्ती शहर, महाराष्ट्राची उपराजधानी, भारताचा भौगोलिक मध्यबिंदू दर्शविणारे शहर, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. मध्यंतरी देशाच्या पंतप्रधानांनी समृद्धी महामार्गाची भाग्यरेषा नागपुरातून ओलांडली. नागपूर आणि संपूर्ण विदर्भासाठी स्वप्नपूर्तीचा आनंद राहील अशीच अभिमानाची आजची घटना आहे, कारण मध्य भारतातील सगळ्यात मोठे कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण 27 एप्रिलला झाले. एका अर्थाने आज नागपूरच्या दोन मातबर नेत्यांनी शहरात जी विकासगंगा आणली, त्यासाठी ते कौतुकास पात्र आहेत. 2014मध्ये देशात परिवर्तनाची लाट आली आणि पाठोपाठ महाराष्ट्रही विकासासाठी तत्पर झाला. त्या वेळी विक्रमी विजय संपादन करत नवे सरकार आले आणि त्या वेळी झालेले हेच परिवर्तन कमी वेळेत अतिशय दर्जेदार विकासकार्य नागपूरला झाले. डॉ. शैलेश जोगळेकर यांनी दिवसरात्र एक करून डॉ. मालिनी जोशी, डॉ. डी.के. शर्मा यांच्यासारख्या अनेक सहकार्‍यांच्या मदतीने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सत्यात उतरवले आहे. अर्थात ही संकल्पना सत्यात उतरवणे तसे कठीण काम होते. पण जिद्द आणि चिकाटी आणि सतत काहीतरी उदात्त करण्याच्या ध्येयाने प्रेरित असे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पेतून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभी राहिली आहे.
 
 
मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लांब रांगा बघताक्षणीच देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भव्य कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न पाहिले. डॉ शैलेश जोगळेकर, परिणय फुके, सुमित वानखेडे, राजूरकर, आनंद पाठक अशा आपल्या विश्वासू टीमला सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी हे स्वप्न सत्यात उतरवले आणि या संपूर्ण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
 
 
नागपूरच्या आउटर रिंग रोडवर असलेल्या जामठा येथे आज हजारो रुग्णांवर महात्मा फुले योजना आणि धर्मादाय रुग्णालय योजना अंतर्गत मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार सुरू आहेत. या इन्स्टिट्यूटमधील जनरल वॉर्डसुद्धा एखाद्या पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असा आहे. येथील रेडिएशन थेरपीसाठी उभारण्यात आलेली यंत्रणा जगातील अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. नियमित केमोथेरपी घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांचे वॉर्ड प्रशस्त, आल्हाददायक आणि स्वच्छ आहेत. येथे अ‍ॅडमिट असणार्‍या रुग्णासोबत एका नातेवाइकाची या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
 
एके ठिकाणी छान वाचनात आले की, प.पू. गोळवलकर गुरुजी यांच्या निधनानंतर खूप जणांनी त्यांच्यावर पुस्तके लिहिली, मात्र सावली म्हणून सर्व सार्वजनिक आणि संघाच्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत राहिलेल्या डॉ. आबाजी थत्ते यांना कार्यकर्त्यांनी जेव्हा पुस्तक लिहिण्याचा आग्रह केला, तेव्हा ते म्हणाले, “श्रीराम जी के साथ हनुमान जी बहुत समय तक रहे; पर श्रीराम का चरित्र ऋषि वाल्मीकि ने लिखा, हनुमान ने नहीं।” अशाच देवदुर्लभ असलेल्या आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेतर्फे संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची ही भव्य वास्तू निर्माण झाली आहे.
 
 
आपल्या वडिलांवर मुंबईत उपचार सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी मनाशी पक्का निर्धार केला की विदर्भ, बाजूचा छत्तीसगड, मध्य प्रदेश येथील रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे, सर्व सोयीसुविधा असणारे, माफक दरात उपचार असणारे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करायचे. मित्र शैलेशजी जोगळेकर यांच्याबरोबर हा प्रकल्प आज सत्यात उतरला आहे. या संघस्वयंसेवक द्वयीने एकत्रितपणे हे कार्य पूर्णत्वास नेले आहे.
 
 
vivek
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन सुरू झालेल्या या देवदुर्लभ कार्याला आबाजी थत्ते यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या देवेंद्रजी फडणवीस आणि शैलेशजी जोगळेकर यांच्या मेहनतीची जोड मिळाली आणि स्वप्नवत वाटावे असे भव्य कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण झाले. त्यांनी यासाठी केलेले कष्ट आणि परिश्रम यासाठी हे दोघेही कौतुकास पात्र आहेत. 27 एप्रिल 2023 ही तारीख नागपूरकरांनी सदैव स्मरणात ठेवावी अशीच आहे. एखाद्या शहराचा सर्वांगीण विकास कसा असू शकतो - इन्फ्रास्ट्रक्चर, वाहतूक, आरोग्य, पर्यावरण अशा कुठल्याही क्षेत्रात असले, तरी तो एका शहराला सर्वांगीण विकासाकडे नेणारा असणार आहे.
 
 
“काही वर्षांपूर्वी ज्यांनी संकल्प सोडत एवढी भव्यदिव्य लोकोपयोगी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारली, त्यांच्याविषयी बोलायचे झाल्यास माझ्या तोंडून केवळ शाब्बास हेच शब्द निघतील” असे म्हणत सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी रुग्णालयासाठी अहोरात्र कष्ट घेणार्‍यांचे मनापासून कौतुक केले. दरम्यान, आता रुग्णालय उभारणार्‍यांनी तर इमारत उभी केली. पण समाजाचे काय? समाजातील लोकांनीही मिळेल त्या माध्यमाने याकरिता मदतीसाठी पुढाकार घ्यावा. पैसा, श्रम, वेळ जे जवळ असेल ते देण्यासाठी पुढे यावे, असे डॉ. मोहनराव भागवत यांनी आवाहनही केले. कर्करोगाशी लढू अन् विजयी होऊ, असा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
 
 
vivek
 
“आपण उभारलेल्या रुग्णालयाच्या सभोवताली केलेले सौंदर्यीकरण बघताक्षणीच मनाला भुरळ घालणारे आहे. यामुळे या रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना हे चक्क आरोग्याचे मंदिरच वाटेल‘’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने गौरवोद्गार काढले. अत्यंत देखणा आणि गौरवपूर्ण हा लोकार्पण सोहळा नागपूरकरांनी अनुभवला.
 
 
पूर्वीचे नागपूर आणि आताचे नागपूर यात नक्कीच फरक जाणवणार आहे. मागास विदर्भाचा चेहरामोहरा बदलण्याचे कार्य नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांच्या दूरदृष्टीने आणि विकासाच्या माध्यमातून होत आहे. ही विकासगंगा अशीच सतत प्रवाहित राहावी हीच नागपूरकर म्हणून सदिच्छा आहे. आपण वेळोवेळी जे प्रकल्प या भागात आणले, ते पूर्णत्वास गेल्याने आपल्याला झालेला आनंद आम्ही अनुभवतो आहे. आपण निर्माण केलेली ही विकासगंगा येणार्‍या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरणार आहे, हा पूर्ण विश्वास आहे आणि हीच समृद्धी आणि आरोग्य क्षेत्रातील हा मैलाचा दगड महाराष्ट्राला आणि विशेषत: विदर्भाला भूषण ठरणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0