नखे आणि दात नसलेला वाघ

12 May 2023 12:27:10
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना खरोखरच बरोबर घेतील की कौशल्याने दूर ठेवतील? भाजपाशी युती असताना दादागिरी करता येत होती. न दिलेली आश्वासने भाजपाने दिली आहेत, असे सांगता येत होते, आता काय सांगणार? आणि दादागिरी कोणाबरोबर करणार? हे दोन्ही पक्ष दादागिरी चालवून घेणार नाहीत आणि त्यांना हे पक्के माहीत आहे की उद्धव ठाकरे आता वाघ आहेत, पण नखे आणि दात नसलेले.
MVA
तेव्हाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी 2019 साली आघाडी केली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. जनतेचा तसा आदेश नव्हता. जनादेश शिवसेना आणि भाजपा युतीसाठी होता. उद्धव ठाकरे यांनी या जनादेशाचा विश्वासघात केला आणि ज्यांच्यावर विश्वासून राहाणे अत्यंत धोकादायक आहे, अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केली. अडीच वर्षे त्यांचे सरकार टिकले. त्यांच्याच पक्षातील एकनाथ शिंदे यांनी बंड केले, ते शिवसेनेतून बाहेर पडले. ते आता मुख्यमंत्री झालेले आहेत.
 
 
एकनाथ शिंदे यांचे शासन आपला कार्यकाळ पूर्ण करील की ते मध्येच गडगडेल, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या. सर्वोच्च न्यायालयाने दि. 11 मे रोजी या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाप्रमाणे एकनाथ शिंदे यांचे सरकार राहील, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कितीही आदळआपट केली, तरी त्याचा काहीही उपयोग नाही. त्यांची आदळआपट म्हणजे जंगलात बसून रडणे आहे. ऐकायला कोणी नाही आणि सांत्वन करायला कोणी नाही.
 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ज्याप्रमाणे शिंदे शासनाचे भवितव्य निश्चित झाले, त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे भवितव्य काय असेल? हा नवीन प्रश्न निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यात महाविकास आघाडीचे भवितव्य असा विषय नव्हता. परंतु एक राजकीय परिस्थिती नवीन समीकरणे घडवून आणत असते. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे टाळले. ते त्यांनी टाळल्यामुळे शिंदे सरकार स्थिर झाले. राजकारणात एखादा पक्ष सत्तेत स्थिर होणे म्हणजे त्याचा दुसरा भाऊबंद अस्थिर होणे, असे असते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना आता पूर्वीपेक्षा अधिक अस्थिर झालेली आहे.
 
 
 
महाविकास आघाडी 2019 साली अस्तित्वात आली. अशा आघाड्या होत असतात. दोन-चार पक्ष एकत्र येतात, समान कार्यक्रमाची घोषणा करून निवडणुकीला सामोरे जातात. घोषित झालेला समान कार्यक्रम लोकांना दाखविण्यासाठी असतो आणि खरा कार्यक्रम सत्ता मिळवून मंत्रिपदे मिळविण्याचा असतो. प्रत्येक पक्ष आपला राजकीय स्वार्थ पाहतो. प्रसिद्धी माध्यमांना खाद्य पुरविण्यासाठी समान कार्यक्रम असतो. सामान्य मतदार पक्षाचे जाहीरनामे वाचतदेखील नाहीत. महाविकास आघाडीचा समान कार्यक्रम म्हणजे भाजपाला सत्तेवर येऊ न देणे आणि सत्ता आपल्या हाती घेणे, हा होता. 2019च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी हा कार्यक्रम जाहीर केला नव्हता. निवडणूक निकालानंतर त्यांनी आघाडी केली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याची खूप घाई झाली होती. त्यांची महत्त्वाकांक्षा हेरून शरदराव पवार आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा शून्य अनुभव होता. त्याच्या उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव होता. उद्धव ठाकरे मंत्रीमंडळाचा चेहरा राहतील आणि सर्व सत्ता आपल्याकडेच राहील, हे चाणाक्ष शरदराव पवारांना आणि काँग्रेसमधील नेत्यांना समजत होते. न समजणारे उद्धव ठाकरे, त्यांचा पुत्र आदित्य ठाकरे आणि सेनापती संजय राऊत हे होते. उद्धव ठाकरे यांना पाच वर्षे वापरता येईल, असे दोघांना वाटले. पण उद्धव ठाकरे यांचेच आमदार त्यांना सोडून गेले आहेत. काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने त्यांना सोडले नाही. यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय शक्ती अतिशय कमी झालेली आहे.
 
 
म्हणून आता प्रश्न असा निर्माण होतो की, महाविकास आघाडी अस्तित्वात राहील का? भाजपाची सत्ता नको म्हणून ती अस्तित्वात आली. आता मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे आहेत. शिवसेनेची सत्ता नको म्हणून उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जवळ करतील का? केले, तर भाजपाची सत्ता नको याचे काय होणार? आणि उद्धव ठाकरे मतदारांना काय सांगणार? शिवसेनेची आणि धनुष्यबाणाची सत्ता नको, असे सांगणार का? सध्या ते घर सोडून सभा घेत आहेत आणि या सभेत दोन हात बाजूला पसरून ते भाषण करतात, ऐकणार्‍यांना भावनिक आवाहन करतात. काही लोक टाळ्या वाजवितात आणि नंतर प्रतिक्रिया देतात की, “साहेबांच्या भाषणात काही दम नव्हता.” असे हे ‘दम’ हरवून बसलेले नेते आहेत.
 
 
MVA
 
पुढील वर्षी निवडणुका होतील, तेव्हा समविचारी पक्षांची युती होईल. ज्यांचे बल समसमान असते, त्यांच्यात मैत्री होते. उद्धव ठाकरे यांचे जनसमर्थन पूर्वीइतकेच राहिले आहे का? याचा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष सातत्याने घेत राहतील. त्यांच्या सभेतील गर्दीवरून हे अंदाज बांधता येत नाहीत. राजकीय सभेला माणसे सर्व प्रकारच्या व्यवस्था करून आणावी लागतात. बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकण्यासाठी लोक आपणहोऊन जात. नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक येतात. अन्य सर्वांना गर्दी जमवावी लागते. अशी जमविलेली गर्दी मतदान करीत नाही. त्यांची संख्या मोजून राजकीय शक्तीचा अंदाज बांधता येत नाही. गर्दीवरून शक्ती मोजायची झाली, तर राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी असते, पण मतदानाच्या दिवशी मतपेट्या रिकाम्या राहतात.
 
 
आघाडी होण्यासाठी समान कार्यक्रम आणि समान विचारधारा असावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा समान आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची आणि अन्य दोन पक्षांची विचारधारा एक नाही. कार्यक्रम पत्रिका विचारधारेवर ठरवावी लागते. भाजपाची सत्ता नको, हा एकमेव समान कार्यक्रम होता. आता भाजपाची सत्ता नाही, सत्ता एकनाथ शिंदेंची आहे, म्हणजे शिवसेनेची आहे. शिंदे-शिवसेना आणि भाजपा यांची युती आहे. या युतीची सत्ता नको, असा नकारात्मक कार्यक्रम होऊ शकतो. नकारात्मकता सर्वांना एकत्र बांधून ठेवण्यास फारशी उपयुक्त नसते. नकारात्मक विचारांना प्रतिस्पर्ध्याकडूनही तेवढाच जोरदार नकारात्मक प्रतिसाद दिला जातो. शिवसेना-भाजपाची सत्ता नको एवढाच कार्यक्रम असेल, तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जीव तोडून काम करून सत्ता आणतील. नकारात्मक आव्हानाने प्रतिस्पर्ध्याची सुप्त शक्ती जागविली जाते.
 
 
महाविकास आघाडी शरदराव पवार यांच्यामुळे अस्तित्वात आली. पक्षातील त्यांचे स्थान सध्या दोलायमान झालेले आहे. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तीन दिवसांनी मागे घेतला. ‘माझे ऐकणार नसाल तर मी पक्ष सोडून जातो, मी घरी बसतो.’ असे ज्यांना सांगायचे होते त्यांना ते समजले. संभाव्य बंडखोर आता शांत झालेले आहेत, परंतु ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे.
 
 
नवीन वादळ केव्हा सुरू होईल हे सांगता येणार नाही. वातावरणातील वादळाची अचूक पूर्वसूचना देता येते, राजकीय वादळ ते उत्पन्न झाल्यानंतरच समजते. उद्धव ठाकरे यांनी 2019 साली भाजपा संपविण्याचा डाव खेळला, तो त्यांच्यावर उलटला. आता आपलीच लंगोटी कशी वाचवायची या विवंचनेत ते सापडलेले आहेत. उद्धव ठाकरे यांची गरज दोन्ही काँग्रेसना होती. 2024 साली ती राहील हे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. ते 2019चे उद्धव ठाकरे नाहीत. विधानसभेतील राजकीय शक्ती क्षीण झालेला हा नेता आहे, हे आता राजकीय वास्तव आहे. त्यामुळे अशा क्षीण नेत्याला घेऊन कोणीही युती करणे शक्य वाटत नाही. राजकारण हे व्यक्तिगत मैत्रीवर अथवा प्रेमावर चालत नसते. त्याची गणिते अतिशय व्यावहारिक असतात.
 
 
 
महाविकास आघाडीचे भवितव्य एकनाथ शिंदे यांच्या शासनावर जसे अवलंबून आहे, तसेच या आघाडीचे भवितव्य तिन्ही पक्षांच्या आपापसातील मतैक्यावर आहे. एकेकाळी काँग्रेस पक्षाकडे स्वबळावर सत्ता आणण्याची शक्ती होती. शरदराव पवार काँग्रेसपासून वेगळे झाल्यापासून या शक्तीचे विभाजन झाले. आज असलेल्या काँँग्रेस नेत्यांत स्वबळावर सत्ता आणण्याचे नेतृत्वगुण नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांना स्वपक्षात कोणते स्थान आहे? असा प्रश्न शरदरावांनीच विचारला होता आणि अशोकराव चव्हाण यांना नांदेड सोडून कोण विचारते? असाही प्रश्न विचारला जातो. या दोन्ही नेत्यांना महाराष्ट्रव्यापी मान्यता नाही. ते मिळविण्याची त्यांनी कधी धडपडही केलेली नाही. नाना पाटोले यांनादेखील काँग्रेस पक्षात सार्वत्रिक मान्यता आहे, असे कोणी म्हणत नाही.
 
 
राष्ट्रवादीशी युती करण्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही. राष्ट्रवादीलादेखील काँग्रेसशिवाय पर्याय नाही. एकाच काँग्रेस संस्कृतीत वाढलेले हे दोन राजकीय गट आहेत. ते इतर वेळी कितीही भांडले, तरी निवडणुकीच्या काळी ते एकत्र येणारच. या दोन तुल्यबळांच्या युतीत उबाठाचे काय होणार? हे दोन्ही पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना खरोखरच बरोबर घेतील की कौशल्याने दूर ठेवतील? भाजपाशी युती असताना दादागिरी करता येत होती. न दिलेली आश्वासने भाजपाने दिली आहेत, असे सांगता येत होते, आता काय सांगणार? आणि दादागिरी कोणाबरोबर करणार? हे दोन्ही पक्ष दादागिरी चालवून घेणार नाहीत आणि त्यांना हे पक्के माहीत आहे की उद्धव ठाकरे आता वाघ आहेत, पण नखे आणि दात नसलेले.
Powered By Sangraha 9.0