अराजकाच्या गर्तेत पाकिस्तान

10 May 2023 18:28:39
 
pakistan
लष्करी हुकूमशाहांनी इम्रान खानला अटक करून महागाईच्या कहराचा, राजकीय, सामाजिक अस्थिरतेचा सामना करणार्‍या पाकिस्तानला अराजकाच्या खोल गर्तेत नेले आहे. यातून पाकिस्तान बाहेर पडेल की पाकिस्तानची शकले होतील, हे काळच सांगेल.
एकाच देशाचे तुकडे झाले आणि कृत्रिम सीमारेषा ठरवून भारत आणि पाकिस्तान हे देश जागतिक पटलावर उदयास आले. या गोष्टीला पंचाहत्तर वर्षे उलटून गेली आहेत. या पंचाहत्तर वर्षांचा लेखाजोखा एका वाक्यात मांडायचा, तर असे म्हणता येईल की ‘भारत म्हणजे स्थैर्य, प्रगती, शक्तिसंपन्नता आणि पाकिस्तान म्हणजे अराजक, बेबंदशाही, अस्थिरता.’ आज या गोष्टीची साक्ष देत पाकिस्तान जळताना दिसत आहे. निमित्त आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानला पाकिस्तानी लष्कराने केलेली अटक. माजी क्रिकेटपटू इम्रान खानने पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाची स्थापना करून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता आणि पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने सत्ताप्राप्ती केली होती. त्याच इम्रान खानला हायकोर्टाबाहेर लष्कराने ताब्यात घेतले. जमीन घोटाळ्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून लष्कराकडून मला विषारी इन्जेक्शन देऊन माझी हत्या करण्यात येईल अशी भीती इम्रान खानने व्यक्त केली आहे. संपूर्ण पाकिस्तानमध्ये पीटीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी जाळपोळ सुरू केली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जागोजागी लष्कर तैनात करण्यात आले आहे.
 
 
 
पाकिस्तानचा आजवरचा इतिहास पाहिला, तर आपल्या लक्षात येईल की गेल्या पंचाहत्तर वर्षांत पाकिस्तानी लष्कराने सत्ता काबीज करून लष्करी राजवट लागू होण्याचे प्रसंग अनेकदा आले आहेत. निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या पक्षांची सत्ता उलथवून लावण्यासाठी लष्कराने अनेक वेळा पुढाकार घेतला आहे. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पक्ष होताना पीटीआयला लष्कराने अप्रत्यक्ष मदत केली आहे.. नव्हे, नव्हे, लष्कराने इम्रान खानला पंतप्रधानपदी बसवून सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला. इम्रान खान सत्तेवर आल्यावर त्याने पाकिस्तानला सावरण्याचा प्रयत्न केला, काही धाडसी निर्णय घेतले. पण त्यालाही सत्ताच्युत व्हावे लागले. हा ताजा इतिहास असून सत्ताकाळात केलेल्या जमीन घोटाळ्याचा आरोप करून लष्कराने त्याला अटक केली. इम्रान खानला अटक झाल्यावर पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर असल्याचे मत व्यक्त केले आणि काही तासांनी आपले मत मागेही घेतले.
 
 
पाकिस्तानची आजची आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे. तेथे महागाईचा कहर चालू असून पाकिस्तानी नागरिक या सर्व परिस्थितीमुळे संतप्त आहेत. अस्थिरता ही पाकिस्तानच्या पाचवीला पूजली आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग या सर्वच क्षेत्रांत गेल्या पंचाहत्तर वर्षांत मूलभूत गोष्टींची पूर्तता होऊ शकली नाही. त्यातच सातत्याने होणारा लष्करी हस्तक्षेप विकासाला मारक ठरतो आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याची कोणतीही व्यवस्था पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्ष करू शकला नाही. अशा परिस्थितीमध्ये लष्कराने इम्रान खानला अटक करून पाकिस्तानी नागरिकांसाठी अराजकाची गर्ता अधिक खोल केली आहे. सातत्याने लष्करी सत्ता हा पाकिस्तानच्या भाळी लिहिलेला शाप आहे आणि सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. सातत्याने लष्करी राजवट आणि मूलभूत गरजा पूर्ण न झाल्यामुळे पाकिस्तानातील काही प्रांत फुटीच्या मानसिकतेत आहेत. पंजाब, पख्तून, खैबर या प्रांतांत मागील काही वर्षांपासून पाकिस्तानपासून वेगळे होण्याची मानसिकता बळावत आहे. एकूणच पाकिस्तानमध्ये राजकीय, सामाजिक अस्थिरतेचा कडेलोट झाला आहे. कोणतीही राजकीय पक्षाला लोकशाही मार्गाने राज्य करू द्यायचे नाही या सदैव लष्करी हुकूमशाहीच्या टाचेखाली पाकिस्तानी जनता चिरडली जात आहे. जनतेच्या मनात लष्कराविरुद्ध असंतोषाची भावना बळावत आहे.
 
 
 
पाकिस्तानमधील या सर्व घटनाक्रमाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण केले जात आहे. इम्रान खानला अटक केल्यानंतर निर्माण झालेला जनप्रक्षोभ संपवणे या गोष्टीला प्राथमिकता द्यावी लागेल, हे पाकिस्तानी लष्करशहा ओळखून आहेत आणि त्यासाठी ते शेजारी राष्ट्रावर हल्ला करून जनमत शांत करण्याची शक्यता आहे, असा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला असून भारताला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. याआधी अनेकदा सपाटून मार खाणार्‍या पाकिस्तानच्या लष्कराकडून सहानुभूतीसाठी काश्मीरमध्ये कुरापती वाढू शकतात. थेट हल्ला करण्याची पाकिस्तानची ताकद नाही. मात्र असे पाऊल उचलले गेले, तर ते त्यांच्या अंगलट येईल हे वेगळे सांगायला नको. लष्करी हुकूमशाहांनी इम्रान खानला अटक करून महागाईच्या कहराचा, राजकीय, सामाजिक अस्थिरतेचा सामना करणार्‍या पाकिस्तानला अराजकाच्या खोल गर्तेत नेले आहे. यातून पाकिस्तान बाहेर पडेल की पाकिस्तानची शकले होतील, हे काळच सांगेल.
Powered By Sangraha 9.0