इवल्याशा आगपेटीचा विस्तारलेला छंद

07 Apr 2023 17:38:43
@अंजोर पंचवाडकर

विविध छंदांच्या या मालिकेत आज आपण कौस्तुभ शेज्वलकर यांच्या आगळ्यावेगळ्या अशा आगपेट्या जमविण्याच्या छंदाविषयी आणि त्यांच्या कुतूहलपूर्ण संग्रहाविषयी माहिती घेणार आहोत. तसेच त्याच्या अन्य छंदाविषयीसुद्धा ओझरता प्रकाश टाकणार आहोत.

The hobby of collecting firewood
 
कौस्तुभ, आपल्या वाचकांना तुझ्या संग्रहाचा आवाका लक्षात यावा म्हणून विचारते, की तुझ्या संग्रहात अंदाजे किती आगपेट्या असतील?
 
 
साधारण 40-एक देशांच्या मिळून अंदाजे 15-16 हजार आगपेट्या माझ्या संग्रही असतील.
 
 
या छंदाला सुरुवात कधी आणि कशी झाली? तुला केव्हा वाटलं की आपण आगपेट्या जमवाव्यात?
 
तुझा कदाचित विश्वास बसणार नाही, पण खूप लहान - पहिलीत असताना मी आगपेट्या जमवायला लागलो. आम्ही लहानपणी गोट्या खेळताना जिंकलो/हरलो की आगपेट्यांच्या लेबलांची देवाणघेवाण करायचो. मी गोट्या खेळण्यात फार काही तरबेज नव्हतो, पण ही लेबल्स मला फार आवडायची. ती जिंकावीत म्हणून मी फार गंभीरपणे खेळायचो.
 
 
अरे वा! म्हणजे 72 सालापासून अव्याहत 50 वर्षं हा छंद जोपासतोयस तर!
 
 
नाही ना. मी तिसरीत जाईपर्यंत दोनशे-अडीचशे आगपेट्या मी जमवल्या होत्या. त्यानंतर आम्ही ते घर बदललं. शिफ्टिंगमध्ये माझा तो संग्रह कुठेतरी गळपटला. मला खूप वाईट वाटलं. पण नवीन घर, नवीन शाळा, नवीन मित्र या नादात मी ते विसरून गेलो. मग पुढे सातवीत असताना एक वेगळं आणि इंटरेस्टिंग लेबल सहज हाती आलं. आणि मग तेव्हा परत या छंदाने उचल खाल्ली.
 
 
अच्छा. मग परत मित्रांबरोबर आगपेट्यांची अदलाबदल करून संग्रह वाढत गेला का? तू नेमक्या कशा जमवतोस आगपेट्या?
 
पूर्वी अदलाबदल, संग्रही नसलेली आगपेटी दुकानातून विकत घेणं, ओळखीतले, नात्यातले, ज्यांना माझा छंद माहीत होता असे लोक, वेगळी आगपेटी दिसली की माझ्यासाठी घेऊन येत. अंबरनाथमध्ये विमको ही आगपेट्या बनविणारी कंपनी होती. कधी तिच्या आसपास फेर्‍या मारून त्यांनी टाकून दिलेली लेबल्स मी आणि माझे मित्र, आम्ही गोळा करत असू. अगदी रस्त्यात अनोळखी माणसाकडे एखादी वेगळी आगपेटी दिसली की ’तुमच्याकडची ही आगपेटी मला देता का?’ असं मी विचारायचो (अजूनही विचारतो). काहीशा अशाच मार्गाने संग्रह वाढत होता. इंटरनेटवरून माहिती मिळत होती, पण साधारण 9-10 वर्षांपूर्वी सोशल मीडियाचा वापर सुरू झाला आणि मग माझ्या संग्रहात झपाट्याने वाढ होत गेली.
 

The hobby of collecting firewood 
 
 
सोशल मीडिया हे तुझ्यासारख्या छांदिष्ट लोकांना वरदानच आहे म्हणजे.. त्याविषयी जरा सांगशील का?
 
 
फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर वेगवेगळ्या छंदांशी संलग्न अनेक ग्रूप्स आहेत. त्यातल्या आगपेट्या जमविणार्‍या ग्रूप्सच्या माध्यमातून माझ्यासारखे अनेक जण भेटतात. त्यांच्याशी चर्चा, संवाद यामुळे आपल्याला हवं असलेलं एखादं लेबल कुठे मिळेल ते समजू लागलं. शिवाय ebayसारख्या साइट्सवर संग्रहांचे लिलाव होतात. त्या लिलावांकडे लक्ष ठेवणं, योग्य बोली लावणं हे सगळं फार इंटरेस्टिंग आहे. काही आगपेट्यांचे विक्रेते असतात, त्यांना संग्राहकांची आवड, इंटरेस्ट्स माहीत असतात. त्यांच्याकडे काही विशेष सेट्स आले की ते आपणहोऊन संपर्क साधतात.
 
 
यावरून आठवलं, मी फेसबुकवर तुझ्या काही पोस्ट्स पाहिल्यात, ज्यामध्ये तू त्या विशिष्ट दिवसासाठीच्या आगपेट्यांचे फोटो शेअर केले होतेस. या वर्गीकरणाविषयी सांग ना. ही कल्पना तुला कशी सुचली?
 
 
काही ठरावीक धागा किंवा थीम्स घेऊन आगपेट्या जमवाव्यात असं वाटण्याला एक प्रसंग कारणीभूत आहे. खरं तर वर्गीकरण सगळेच संग्राहक करतात. डिस्प्लेसाठी वर्गीकरण आवश्यक आहेच. पण ते साधारण ढोबळ असतं - म्हणजे प्राणी, पक्षी, फळं, फुलं, वाहनं अशा ठरावीक वर्गवार्‍या असतात. एका संग्राहकाकडे हत्तीचं चित्र असलेल्या 600 आगपेट्या आहेत. त्यामधले बारकावे संग्राहकांना कळतात. पण सामान्य माणूस हत्तींची चित्र असलेल्या सलग 600 आगपेट्या बघून कंटाळून जाईल. एकदा मी, माझा एक संग्राहक मित्र आणि एक मैत्रीण टाउन हॉलमध्ये आगपेट्यांचं प्रदर्शन पाहायला गेलो होतो. मैत्रीणीला प्रदर्शन बघण्यात रस होता, पण ती संग्राहक नव्हती. मी आणि मित्र प्रत्येक आगपेटी बारकाईने पाहत होतो. आम्ही चौथ्या-पाचव्या टेबलपाशी पोहोचेपर्यंत मैत्रिणीचं पूर्ण प्रदर्शन बघूनही झालं होतं आणि नंतर ती चक्क कंटाळली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नुसताच प्रचंड संग्रह आणि ढोबळ वर्गीकरण यापेक्षा सामान्य लोकांना रस वाटेल, उत्सुकतेने त्यांना तो डिस्प्ले पूर्ण बघावासा वाटेल, कुतूहल वाटेल असं काहीतरी करायला हवं.
 The hobby of collecting firewood
 
अच्छा, म्हणजे एक ठरावीक विषय घेऊन तू आगपेट्यांचे संच जमवायला त्यानंतर सुरुवात केलीस का?
 
 
तसं म्हणता येईल. आणि दुसरं म्हणजे या क्षेत्रातसुद्धा इतके संग्राहक आहेत की नुसता आकडा वाढवून स्पर्धा करत राहणं कठीण आहे आणि मला ते फारसं रुचतही नाही.
 
 
मी ज्यांना या क्षेत्रातले आदर्श किंवा गुरू मानतो, ते विनायक जोशी ज्यांच्या संग्रही 50 हजारच्या आसपास आगपेट्या आहेत, त्यांनाही माझ्या unique थीम्सचं कौतुक वाटतं.
 
 
तुझ्या अशा काही खास संचाबद्दल किंवा थीम कलेक्शनबद्दल थोडं सांग ना.
 
 
Calendar through matchboxes ही एक वर्गवारी मी प्रथम केली. जे फेसबुक वापरतात त्यांना माहीत असेल, वर्षभर रोज कुठले ना कुठले जागतिक दिवस जाहीर केलेले असतात. आज काय जागतिक चहा दिवस, आज काय पर्यावरण दिवस, इंजीनियर्स डे, डॉक्टर्स डे.. त्याशिवाय कामगार दिवस, महिला दिवस असे किंवा भारतीय महत्त्वाचे दिवस म्हणजे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, गांधीजयंती, गणपती, दिवाळी यासारखे सण.. तुला सांगतो, रोज कुठला ना कुठला ’दिन’ असतोच, तर कधीकधी एखाद्या दिवशी एकपेक्षा जास्त ’विशेष दिन’ असतात. मग मी ते दिन माझ्या संग्रहातील आगपेट्यांच्या आधारे दाखवायला सुरुवात केली.
 
 
गणपतीचं चित्र असलेल्या आगपेट्यांमध्ये परदेशी आगपेट्याही आहेत, ते बघून बघणार्‍यांना गंमत वाटते. किंवा माझी दुसरी थीम आहे,space exploration through matchboxes.. त्यामध्ये प्रत्यक्ष अंतराळ या विषयाशी संबंधित आगपेट्या आहेतच. पण संच तयार करताना मी माणसाने प्रथम उडणारा पक्षी बघितला, तेव्हाच त्याला जमिनीच्या वर जाण्याची प्रेरणा मिळाली असं लक्षात घेऊन, उडणारे पौराणिक प्राणी, उडता घोडा वगैरे लेबल्स त्यात घेतली. पहिलं विमान, त्यात होणारी प्रगती, वर म्हटलं तसं अंतराळाशी संबंधित लेबल्स, स्टारवॉर्ससारख्या थीम मी त्यात घेतल्या.
 
 
 
लोकांना या विषयात गंमत आणि कुतूहल दोन्ही वाटत असेल, नाही?
 
होय. शिवाय काही गोष्टी लोकांना माहीत असतात, पण त्या विषयांसंबंधित आगपेट्यासुद्धा आहेत, हे माहीत नसतं. अशा वर्गवारी करताना history through matchboxes - म्हणजे त्या त्या गोष्टीचा/विषयांचा इतिहास मी आगपेट्यांच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करतो.
 
 
The hobby of collecting firewood
 
म्हणजे थीम ठरवली की आगपेट्या गोळा करायला दिशा मिळते, असं म्हणता येईल का?
 
दिशा तर मिळतेच, शिवाय मी माझ्याकडे असलेल्या संग्रहातून असे संच तयार करून ठेवतो. मध्ये कोरोना जगभर पसरला होता. त्या वेळी मी covid through matchboxes असं वर्गीकरण करताना त्यातल्या ज्या ज्या गोष्टींची चर्चा/बातमी झाली, त्या आगपेट्या माझ्या संग्रहातून बाजूला काढल्या. इन्फ्लुएन्झाची काळजी कशी घ्यायची ती माहिती देणारी झेकोस्लोवाकियाची एक मॅचबॉक्स सिरीज होती. त्यात अगदी कोरोनासाठीची काळजी घेतो तशा, मास्क वापरा, अंतर राखा, थुंकू नका अशा सूचना देणार्‍या आगपेट्या होत्या. वुहान गावासंबंधी एक आगपेटी होती, एक ऑक्सिजन सिलिंडर कंपनीची, एक एक्स रेसंबंधित चित्र असलेली, एक ’कोरोना’ नावाच्या हॉटेलची आगपेटी असं सगळं त्या संचात समाविष्ट केलं.
 
 
दुसरं उदाहरण द्यायचं झालं, तर हॉटेलशी किंवा खाद्यपदार्थाशी संबंधित आगपेट्यांच्या गटात अमेरिकेतल्या ट्विन टॉवर्सवर हल्ला होऊन ते पडण्यापूर्वी ’विंडो ऑन द वर्ल्ड’ हे हॉटेल तिथे होतं, त्याची आगपेटी त्या संचात आहे. किंवा पिझ्झा हटचा खूप जुना मॅस्कॉट असलेली आगपेटी त्यात आहे. त्यावरून लोकांना त्या त्या गोष्टींचा बदलता इतिहास कळू शकतो.
 
आता एखाद्या वस्तूची प्रगती कशी होत गेली, हे दाखवायला आगपेटी हे मॉडेलसुद्धा आहेच की!
 

The hobby of collecting firewood 
 
म्हणजे आगपेट्यांद्वारे आगपेट्यांच्या इतिहास?
 
 
1827च्या सुमारास जॉन वॉकरने आगपेटीचा शोध लावला. ’अग्नी पेटविण्याची सामग्री खिशात बाळगता येते’ या एका कारणासाठी हा शोध उपयुक्त आणि महत्त्वाचा असला, तरी सुरुवातीच्या त्या आगपेट्या फार धोकादायक होत्या. विडीचं बंडल असतं, तसं गुल लावलेल्या काड्यांचं बंडल असं. ते कधी खिशातल्या खिशात पेट घेई. अपघात होत. 1830च्या सुमारास सेफ्टी मॅचबॉक्सचा शोध लागला. मात्र त्यांचं व्यावसायिक उत्पादन 1850मध्ये होऊ लागलं. या सेफ्टी मॅचबॉक्स वापरणार्‍यासाठी धोकादायक नसल्या, तरी त्या बनविणार्‍या कामगारांसाठी धोकादायक होत्या. पिवळ्या फॉस्फरसच्या संपर्कात राहिल्याने त्यांना ‘फॉसिजॉ’ हा जबड्याचा रोग होत असे. 1888मध्ये अ‍ॅनी बेझन्ट यांनी त्या विरोधात जनजागृती करायला सुरुवात केली. Salvation armyया सामाजिक संघटनेने घातक अशा पिवळ्याऐवजी लाल फॉस्फरस वापरून आगपेट्या बनविल्या. अर्थात या नवीन आगपेट्या महाग होत्या. त्या वेळी लोकांना या विषयाशी जोडण्यासाठी, त्यांनी वाईट अशा स्वस्त आगपेट्या न घेता या थोड्या महाग पण चांगल्या आगपेट्या विकत घ्याव्यात म्हणून, Lights in the darkest England अशा, तर काही उत्पादकांनी ‘नो मोअर फॉसिजॉ’ अशा आगपेट्या काढल्या. शेवटी 1906 साली बर्न कन्व्हेंशनमध्ये पिवळ्या फॉस्फरसवर बंदीच घालण्यात आली. हा सगळा इतिहास लेबलांच्या मदतीने सांगता येतो. यातल्या काही आगपेट्या, साल्वेशन आर्मीच्या आगपेटीचे रीप्रिंट माझ्या संग्रही आहेत. माझ्या संग्रहात असलेली सगळ्यात जुनी आगपेटी 1856 सालची आहे.
 
 
इंटरेस्टिंग! आगपेट्यांच्या माध्यमातून इतिहास सांगता येतो, तसंच आणि काही वैशिष्ट्य सांगता येईल का?
 
तुला आश्चर्य वाटेल, पण पूर्वी सोशल मीडियासारखा या आगपेट्यांच्या वापर केला गेलाय.
 
 
म्हणजे?
 
समूहाच्या सवयींचा अभ्यास करणार्‍यांच्या मते, एखाद्याने आगपेटी वापरायला काढली की ती साधारणत: 8 लोकांच्या दृष्टीस पडते. त्या काळी, जेव्हा टेलीव्हिजनचाही वापर होत नव्हता, रेडियो आणि वर्तमानपत्र यावर सरकारी प्रभाव होता, तेव्हा एखादा संदेश देण्यासाठी आगपेटीच्या वेष्टणांचा फार युक्तीने वापर केला गेला. एखादी हौशी व्यक्ती आपल्या मुलाच्या जन्माचा, पदवीधर झाल्याचा आनंद, किंवा कुणी जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी आगपेट्यांच्या लेबलांवर छापून जाहीर करे. एखादं ऑफिस/उद्योग आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी लेबल्स छापे. रशियाने तर आपल्या देशाचा विकास इतर जगाच्या नजरेस पडावा यासाठी फार कौशल्याने आगपेट्यांचा उपयोग केलेला दिसतो. रशियाची अंतराळ भरारी, औद्योगिक, कृषी, आर्थिक प्रगती लोकांनी बघावी म्हणून त्यासंबंधी अत्यंत अद्ययावत गुळगुळीत लेबल्स तयार केली. (यामुळेच संग्राहकांकडे रशियाच्या भरपूर आगपेट्या दिसतात.) शिवाय वॉन्टेड अतिरेक्यांचे फोटो आणि त्यांना पकडून देणार्‍यांस लावलेल्या लाखो डॉलर्सच्या इनामाची माहिती पूर्वी काही देश आगपेट्यांवर छापायचे. तसंच प्रसिद्ध आणि आदरणीय व्यक्तींचं चित्र असलेल्या आगपेट्याही छापल्या जायच्या. 1930-65 हा आगपेट्यांच्या सुवर्णकाळ समजला जातो. या काळात जागतिक युद्धासंबंधित विषय असलेल्या काही महत्त्वाच्या आगपेट्या माझ्याकडे आहेत. आगपेटी ही त्या काळी सतत हाताळली जाणारी गोष्ट होती. दोस्तराष्ट्रांनी मानसशास्त्रीय युद्धनीती वापरून शत्रूच्या सैनिकांना नामोहरम करण्यासाठी काही सूचना देणार्‍या आगपेट्या जर्मन भाषेत छापून त्या विमानातून जर्मन सैनिकांच्या बेसजवळ टाकलेल्या आहेत. म्हणून मी म्हणतो की एक प्रकारे सोशल मीडियासारखाच त्यांचा वापर केला जाई.
 
 
कौस्तुभ, हे सगळं फारच वेगळं आणि उत्सुकता चाळवणारं आहे. तुझ्या संग्रहातील काही लक्षणीय आगपेट्यांबद्दल सांग ना.
 
 
मी वर सांगितलंय तसं अतिरेकी ओसामा, सद्दाम, एक पाकिस्तानी अतिरेकी यांचं वॉन्टेड पोस्टर असलेल्या आगपेट्या आहेत माझ्याकडे. जेव्हा अमेरिका-रशिया शीतयुद्ध सुरू होतं, तेव्हा गुप्त संदेश पाठविले जात. ते सोडविण्यासाठी लागणारा कोड वर्ड्सचा (decipher tablesचा) तक्ता पेनमध्ये किंवा अक्रोडामध्ये गुंडाळी करून पाठविला जात असे. पुढे ही युक्ती माहीत झाल्यावर ते कागद शत्रूकडून हस्तगत केले जाऊ लागले. मग हे तक्ते छापण्यासाठी मॅचबॉक्सेसचा आणि जास्त करून मॅचबुक्सचा वापर सुरू झाला. मॅचबुक्स म्हणजे छोट्या पुस्तकासारखी आगपेटी, ज्यात कंगव्याचे दात असतात तशा उभ्या काड्या खालून जोडलेल्या असतात. मॅचबुक्सवर मजकूर छापायला जागा जास्त असते. अशा कोड वर्ड्स असलेल्या मॅचबुक्सची रेप्लिका (प्रतिकृती) माझ्या संग्रहात आहे.
 
तसंच आगपेटीच्या उत्पादनाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा असलेली ’नो मोअर फॉसीजॉ’ लिहिलेली रीप्रिंट आगपेटी माझ्याकडे आहे. यातल्या मूळ आगपेट्या म्युझियममध्ये बघायला मिळतात.
 
 
एक गंमत सांगतो, आपली जी ज्ञानेंद्रियं आहेत, त्याच्या संबंधित काही आगपेट्या माझ्याकडे आहेत. म्हणजे एक आगपेटी आहे, त्यातल्या काड्या ओढल्या की सुवास येतो. तर एक आहे, त्या जळताना दुर्गंध सोडतात. एक आगपेटी आहे, त्यातल्या काड्या ओढल्या की टिकली फुटल्याचा आवाज येतो. एक यांत्रिक (मेकॅनिकल) मॅचबॉक्स आहे, तिचा खण ओढला की ’जिंगल बेल जिंगल बेल’ हे गाणं वाजतं. फरच्या वस्तू बनविणार्‍या एका कंपनीने जाहिरात करण्यासाठी वर चक्क फरचा गोंडा लावलेली आगपेटी काढलेली आहे. अशा गंध, श्रवण, स्पर्श यांचा अनुभव देणार्‍या आगपेट्या माझ्याकडे आहेत. एक थोडं मजेशीर मजकूर असलेलं लेबल आहे. आगपेटीच्या कव्हरवर हिटलर पृथ्वीचा गोळा कवेत घेऊन उभा आहे असं कार्टून आहे. त्या कार्टूनच्या पृष्ठभागावर काडी ओढण्याची घर्षणपट्टी आहे आणि खाली लिहिलं आहे strike at the base of the problem.
 
बापरे, किती वैविध्य असतं आगपेट्यांच्या लेबलांमध्ये! तू वर प्रसिद्ध व्यक्तींच्या लेबलांचा उल्लेख केलायस. तुझ्याकडे यातल्या काही असतील ना?
 
 
अर्थातच. माझ्याकडे यूरी गागारिनचं चित्र असलेल्या 50एक आगपेट्या आहेत. त्याखालोखाल इंग्लंडच्या राजघराण्यातील व्यक्तींची चित्रं असलेल्या 30 आणि आपल्या महात्मा गांधीजींची चित्रं असलेल्या 20-22 आगपेट्या माझ्या संग्रहात आहेत.
 
 
आगपेट्यांच्या सुवर्णकाळ मागे सरून लायटर आणि धूम्रपान करणार्‍यांची संख्याही घटल्यामुळे आगपेट्यांचं उत्पादन घटलं असेल ना? मग आता तुम्ही संग्राहक नवीन आगपेट्या कशा मिळवता?
 
 
होय, लायटरचा वापर जसा वाढत गेला, तसा आगपेट्यांच्या वापर फारच कमी झाला. पण आता या क्षेत्रातल्या काही कंपन्या संग्राहकांसाठी म्हणून खास संच छापून घेतात, collectors किंवा limited editions. उदाहरण द्यायचं झालं, तर मध्यंतरी एका कंपनीने नवरात्रीचा संच काढला होता. त्या editionsमध्ये जऱ रस असेल, तर आम्ही असे संच ऑनलाइन मागवतो.
 
 
तुम्ही आगपेट्या विकत घेता, त्याच्या साधारण किंमती काय असतात?
 
 
इतर कुठल्याही संग्राह्य वस्तूंप्रमाणेच दुर्मीळ आगपेट्यांच्या किंमतीही बदलत/वाढत असतात. मी (वर सांगितलेली हिटलरचं चित्र असलेली) एक आगपेटी 8 डॉलर्सना घेतली होती. तशी आगपेटी तिच्या दर्जानुसार शंभर-सव्वाशे डॉलर्सना विकायला आलेली अधूनमधून दिसते.
 
 
कौस्तुभ, तुझ्या घरातल्या लोकांना तुझ्या या छांदिष्टपणाबद्दल काय वाटतं? त्यांची मदत होते का?
 
 
माझा एक भाऊ अमेरिकेत असतो, त्याची मला खूपच मदत होते. कारण अनेक परदेशी विक्रेते आगपेट्यांचं पार्सल भारतात पाठवायला तयार नसतात. अशा वेळी मी त्या भावाच्या अमेरिकेतल्या पत्त्यावर मागवतो. तो भारतात येताना त्या घेऊन येतो. बाकी दुसरा भाऊ, वहिनी, आई हे माझा नादिष्टपणा चालवून घेतात ही मोठीच मदत आहे. इतक्या आगपेट्या, त्यांचे संच साठवायला जागा बरीच लागते, त्याबद्दल कुणी तक्रार करत नाही.
 
 
तू सुरुवातीला प्रदर्शनाचा उल्लेख केलास, तू भरवतोस का प्रदर्शनं?
 
 
वेगवेगळे छंद असणारे लोक एकत्र प्रदर्शन भरवतात, त्यात वेळ, सवड असेल तर मी भाग घेतो. आता एप्रिलमध्ये गोरेगावला एक प्रदर्शन होणार आहे, त्यात माझा सहभाग असणार आहे.
 
 
कौस्तुभ, तुझ्या इतर छंदांविषयीसुद्धा सांग ना थोडक्यात..
 
मला वाचायला आवडतं. पूर्वी मी पुस्तकं, नकाशे भरपूर विकत घेत असे. आवडलेल्या काही इंग्लिश पुस्तकांचे/लेखांचे अनुवाद मी केले आहेत. तसंच मला भटकायलाही प्रचंड आवडतं. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, केप टु कैरो जीपने, कोकण किनारपट्टी चालत अशी भ्रमंती मी केली आहे. मला प्रवासात नवनवीन अनुभव घ्यायला आणि जाऊ तिथलं ’लोकल ़फूड’ खायला आवडतं.
 
 
वा! भ्रमंती हा छंद इतर अनेक छंदांचा पूरक छंद असतो नेहमीच, नाही का? तुझे काही अनुभव?
 
 
अगदीच. मी प्रवासात नेहमी साध्या आगपेट्या बरोबर ठेवतो. जऱ एखाद्याकडे असलेली आगपेटी मला हवी असेल, तर मी त्याला माझ्याकडची आगपेटी देऊन त्यांची मागतो. लोकांना या प्रकाराची गंमत वाटते. मागे मी वारीचा अनुभव घेण्यासाठी आळंदी-पंढरपूर वारीला गेलो होतो. तिथेही लोकांना उत्सुकता वाटायची. शिवाय संपलेली आगपेटी घेऊन हा माणूस भरलेली देतोय, याचं आश्चर्यही! एखादा इरसालही भेटतो. आपल्याला रस आहे म्हणून मुद्दाम न देणारा. पण असे फार थोडे. केप टु कैरो प्रवासातही मला फार छान अनुभव आले. सुदानमधल्या मुक्कामी एका दुकानात मला भारतीय आगपेटी मिळाली. मी भारतीय, शिवाय संग्राहक म्हटल्यावर त्याने पैसे घेतले नाहीत. मी कधीही फुकट मागत नाही, पण तरीही सुदानमधल्या पुढच्या प्रवासातही कुणीच पैसे घेतले नाहीत. सहसा मला चांगलेच अनुभव आलेले आहेत.
 
 
कौस्तुभ, माझ्या प्रश्नांची गाडी आगपेट्यांवरून आता तुझ्या भ्रमंतीकडे वळते आहे. लेखनसीमा, शब्दमर्यादा या कारणास्तव नाइलाजाने थांबावं लागणार. आगपेट्यांच्या या अगदी वेगळ्या दुनियेत तुझ्यामुळे छान सफर झाली. खूप नवीन माहिती मिळाली. डोळस छंद कसा जोपासावा याचं अनेकांना मार्गदर्शनही मिळालं असणार, त्यासाठी खूप खूप आभार. तुला आणि तुझ्या पुढच्या सर्व योजनांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
 
Powered By Sangraha 9.0