मुंगीने हत्ती गिळला..

05 Apr 2023 17:28:35
जेव्हा धर्मग्लानीतून समाज उभा राहत जातो, तेव्हा अधर्मी लोक अस्वस्थ होतात, आदळआपट करतात, आसुरी शक्ती सर्व बाजूने एकवटतात आणि धर्म जगणार्‍यांचा ळ सुरू करतात. या कालखंडातून आपण चाललो आहोत. विरोधकांना कमी लेखू नये. त्यांच्याकडे वैचारिक शक्ती नसली, तरी विध्वंसक शक्ती खूप आहे. तिचे नीट आकलन करून घ्यायला पाहिजे आणि या शक्तीशी सर्वांना लढायचे आहे.
 
vivek
 
 
सार्वत्रिक निवडणुका 2024मध्ये आहेत. संसदीय लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला सत्तेवरून खाली खेचून आपले सरकार आणण्याचा अधिकार सर्व विरोधी पक्षांना असतो. ज्या संसदीय लोकशाहीत दोन प्रमुख पक्ष असतात, त्या देशात एकेका पक्षाची आलटून पालटून सत्ता येते. इंग्लंड हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. भारतात संसदीय पद्धतीची लोकशाही असली, तरी दोन तुल्यबळ पक्ष भारतात कधी उभे राहिले नाहीत. जवळजवळ 50 वर्षे एकाच पक्षाची - म्हणजे काँग्रेसची देशात सत्ता राहिली. 2014पासून काँगे्रसच्या र्‍हासाला प्रारंभ झाला आणि 2014मध्ये व 2019मध्ये त्या पक्षाचे 54 खासदार निवडून आले. काँग्रेसची जागा भाजपाने घेतली. भाजपा आता दहा वर्षे सत्तेवर आहे.
 
 
भाजपाला सत्तेवरून कसे खेचायचे आणि आपली सत्ता कशी आणायची, याची व्यूहरचना सर्व विरोधी पक्ष करू लागले आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून काँग्रेसमध्ये नवचैतन्य भरण्याचा प्रयत्न केला. किती चैतन्य निर्माण झाले आणि किती ग्लानी आली, हा शोधाचा विषय आहे. काँग्रेस पुन्हा उभी राहील किंवा राहुल गांधी ती उभी करू शकतील, यावर राहुल गांधी सोडून अन्य कुणाचा विश्वास नाही.
 
 
 
मध्यंतरी आप पक्षाचे एक संस्थापक आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली. उपमुख्यमंत्र्याला अटक होणे ही विरोेधी पक्षांना मोठी संधी वाटली. नऊ विरोधी पक्षांतील नेत्यांनी संयुक्तपणे पंतप्रधानांना पत्र लिहिले. सामान्य लोकांनी ते वाचलेदेखील नसेल, पण बातम्या शोधणार्‍या मीडियाला ते फार मोठे वाटले. यानंतर दुसरी घटना घडली. राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा दिली, त्यात त्यांची खासदारकी गेली. भारत जोडो यात्रेमुळे जो स्वत:ला राजहत्तीवर बसलेला समजत होता, तो हत्तीवरून खाली आदळला. विरोधी पक्षनेत्यांना तीदेखील आणखी एक संधी वाटली. सोनिया गांधी यांच्या घरी असे सगळे ओवाळून टाकलेले नेते एकत्र झाले. त्यांनी खलबते केली. महाराष्ट्रातील पवार स्तुतिपाठकांनी पवारांना ‘जाणता राजा’, ‘आधुनिक चाणक्य’ अशी विशेषणे लावलेली आहेत. ते चाणक्यदेखील त्या बैठकीत होते.
 

vivek 
 
या सर्व चाणक्यांचे बाप आजतरी नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. त्यांचा पराभव करणे हे गल्लीतील चाणक्यांना शक्य नाही. असे झाले तर असे म्हणावे लागेल की, मुंगीने हत्ती गिळला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह म्हणजे भाजपा यांची शक्तिस्थाने कोणती आहेत, ते आधी बघू या. भाजपाची शक्तिस्थाने तीन आहेत, ती अशी - 1) कालसापेक्ष हिंदुत्व, 2) राष्ट्रवाद, 3) कल्याणकारक विकासवाद. ज्यांनी स्वत:ला चाणक्य ठरवून घेतले आहे, अशा विरोधी दलातील चाणक्यपुत्रांना या तिन्ही गोष्टींना पर्याय द्यावा लागेल. आणि असा पर्याय देणे त्यांना या जन्मात शक्य होईल असे वाटत नाही. ही आत्मप्रौढी नाही, तर वास्तव आहे.
 
 
हे वास्तव कसे आहे? एकतर भारतात जेवढे म्हणून प्रादेशिक पक्ष उभे राहिले आहेत, त्यातला बहुजन समाज पार्टीसारखा पक्ष सोडला, डीएमके सोडला, तर सर्वच पक्ष या ना त्या प्रकारे काँग्रेसची विचारधारा मांडणारे आहेत. काँग्रेसच्या विचारधारेचे तीन बिंदू आहेत - 1) ते हिंदूविरोधी आहेत, 2) ते सनातन राष्ट्रवादाविरुद्ध आहेत, 3) अकल्याणकारक, भ्रष्टाचारी, तुष्टीकरणवादी आहेत. काँग्रेसचा पंतप्रधान निर्लज्जपणे म्हणतो की, “देशाच्या साधनसंपत्तीवर देशातील अल्पसंख्य मुसलमान आणि ख्रिश्चन यांचा पहिला अधिकार आहे.” त्यांच्या पानात श्रीखंड-पुरी आणि हिंदूच्या पानात पातळ वरण व जाडीभरडी भाकरी हे काँग्रेसचे 50 वर्षांपासूनचे धोरण आहे. या धोरणामुळे काँग्रेसने अब्जावधी रुपये खर्च करून अब्दुल्ला आणि मुफ्ती परिवार पोसला. काश्मिरी मुसलमानांच्या मनात फुटीरतेची बीजे रोवली, त्याचे भयानक परिणाम झाले आणि तीन लाखाहून अधिक काश्मिरी पंडित आपल्या मातृभूमीतच निर्वासित झाले! हे भयानक पाप आहे.
 
 
राष्ट्रवादाशी काँग्रेसला काही देणेघेणे नाही. काँग्रेसचा राष्ट्रवाद म्हणजे धर्मशाळा राष्ट्रवाद आहे. या देशाची प्राचीन संस्कृती आहे, हे काँग्रेसला मान्य नाही. काँग्रेस म्हणजे या देशाची संमिश्र संस्कृती आहे. अरब आणि मोगल आक्रमक होते, हे काँग्रेस मानत नाही. ते देशात आले, त्यांनी देश आपला मानला आणि देशात राहिले म्हणून ते आपले आहेत असे काँग्रेसने पोसलेले इतिहासकार आणि पत्रपंडित, टीव्हीवरील अँकर आपल्याला सांगत असतात.
 
 
विरोधी नेते एकत्र आले म्हणजे विरोधी ऐक्य झाले, असे मीडिया सोडून कुणालाही वाटत नाही. हे नेते व्यासपीठावर एकत्र येतात, ऐक्याची घोषणा करतात, हातात हात घालून फोटोसेशन करतात, अशा फोटोमुळे विरोधी पक्षांचे ऐक्य तयार होत नाही. पाणवठ्याच्या ठिकाणी मासे खायला कावळे येतात, बगळे येतात, पाण्यात पोहणारे पक्षी येतात, पाणकावळे येतात, त्यांचे लक्ष्य पाण्यातील मासा खाण्याचे असते, म्हणून या सर्वांचे ऐक्य झाले असे कधी कुणी ऐकले नाही. प्रत्येक जातीचा पक्षी आपले स्वतंत्र जीवन जगतो. असे सर्व विरोधी पक्षांचे आहे. त्यांच्या जाती स्वतंत्र आहेत. त्यांची विचारसरणी (असल्यास) स्वतंत्र आहे. त्यांचे लक्ष्य वेगळे आहे. त्यांची कार्यशैली वेगळी आहे. असे वेगवेगळे लोक एकजुटीचे नाटक करू शकतात, सत्तेचे फाटक उघडू शकत नाही.
 
 
विरोधी ऐक्य होण्यासाठी भाजपाच्या तीन शक्तिस्थानांना पर्याय देईल असे विषय शोधावे लागतील. एक विचारसरणी पुढेे आणावी लागेल. राष्ट्रवादाची व्याख्या करावी लागेल आणि कल्याणकारक विकासवादाला पर्याय द्यावा लागेल. हे करण्यासाठी प्रतिभा पाहिजे, अफाट कल्पनाशक्ती पाहिजे, आणि खूप गंभीर चिंतनाची सवय असली पाहिजे. केजरीवाल व्हाया नितीशकुमार व्हाया पवार यापैकी अशी कोणात शक्ती आहे? हे सर्व नेते जातींच्या प्रश्नांवरून जनतेला फसवू शकतात, भुरळ घालू शकतात, त्यांना चुकीच्या मार्गाने नेऊ शकतात, जातवाद वाढवू शकतात, धर्मवाद वाढवू शकतात; परंतु यापैकी कुणीही पर्याय देईल अशी विचारसरणी देऊ शकत नाही. यांचे कार्यक्रम म्हणजे एक जण ब्राह्मणांना शिव्या देणार, दुसरा उच्च जातींना शिव्या देणार आणि तिसरा लोकांना फुकटखाऊ बनविणार, ही त्यांची शक्ती आहे. ती देशाला घातक, मारक आणि देशाचे प्रचंड नुकसान करणारी आहे.
 
 
 
असे जरी असले, तरी 2024ची निवडणूक ही वेगळ्या संदर्भात अटीतटीची होणार. त्यामुळे ज्या कुणाला भाजपा पुन्हा सत्तेवर यावा असे वाटते, त्या सर्वांनी चोवीस तास जागरूक राहणे गरजेचे आहे. निरनिराळ्या प्रकारचे आरोप केले जातील. मोदींच्या भाषेत सांगायचे तर मोदींचे विरोधक मोदींची कबर बांधण्यास आतुर झालेले आहेत. आणि हे खरेदेखील आहे. मोदी विश्वनेता आहेत असे सगळे विश्व म्हणते, पण हे वाक्य उच्चारण्यास एकाही विरोधी नेत्याची जीभ उचलली जात नाही. सर्व गरिबांना असे वाटते की मोदी आमचे तारणहार आहेत. केजरीवाल व्हाया नितीशकुमार-पवार यांना असे वाटते की, मोदी आमची सत्ताग्रहणहार आहेत.. म्हणजे आम्हाला सत्तेवर येऊ देत नाहीत.
 
 
भारताचा सनातन अनुभव असा आहे की, जेव्हा धर्मग्लानीतून समाज उभा राहत जातो, तेव्हा अधर्मी लोक अस्वस्थ होतात, आदळआपट करतात, आसुरी शक्ती सर्व बाजूने एकवटतात आणि धर्म जगणार्‍यांचा छळ सुरू करतात. या कालखंडातून आपण चाललो आहोत. विरोधकांना कमी लेखू नये. त्यांच्याकडे वैचारिक शक्ती नसली, तरी विध्वंसक शक्ती खूप आहे. तिचे नीट आकलन करून घ्यायला पाहिजे आणि या शक्तीशी सर्वांना लढायचे आहे. स्वस्थ बसून चालणार नाही. जो बसला, तो संपला आणि ज्याने चारिका केली, त्याच्या गळ्यात यशाची माळ पडते. यश हीच आपली नियती आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
 
 
Powered By Sangraha 9.0