आपल्या आवडीच्या आणि अधिक अर्थपूर्ण गोष्टींना पुरेसा वेळ देऊ पाहणारी, एक शांत सहज जीवनशैली नव्या पिढीला आकर्षित करू लागली आहे. ती अधिकाधिक रुजत गेली, तर इकडे तंत्रज्ञान कितीही हायस्पीड झालं, शब्द कितीही त्रोटक झाले, तरी कुणास ठाऊक एखादा फ्रँक पुन्हा एखादं पत्र लिहून बाटलीत बंद करून समुद्रात टाकेल. एखाद्या दालिनला ते कधीतरी सापडेल आणि संवादाचा पूल त्यांना पुन्हा एकदा सांधेल. काळ, वेग, संवादाची साधनं, भाषा बदलत राहील, आतला ’माणूस’ मात्र तसाच राहील.
फ्रँक यूस्बेक या 5 वर्षाच्या जर्मन मुलाने प्रवास करत असताना एक पत्र लिहून बाटलीत घट्ट बंद करून बाल्टिक समुदात टाकलं. ‘माझे वडील आणि मी डेन्मार्कला जाणार्या जहाजातून प्रवास करत आहोत. हे पत्र जर तुम्हाला मिळालं तर मला उत्तर द्या, मी पुन्हा पत्र लिहीन’ असं त्याने त्यात लिहिलं होतं. फ्रँकने त्या पत्रात 1987मधली तारीख आणि त्याचा कोसफेल्ड शहरातला पत्ता लिहून ठेवला होता. तब्बल 24 वर्षांनी - म्हणजे 2011मध्ये दालिन कोरोत्किख या 13 वर्षांच्या रशियन मुलाला समुद्रकिनार्यावरच्या वाळूत ती बाटली सापडली. दालिनच्या वडिलांना जुजबी जर्मन येत असल्याने त्यांना मजकूर कळला. त्यांनी फ्रँकला उत्तर पाठवलं. तेव्हा फ्रँकचं वय 29 होतं. त्याचे पालक त्या पत्रातल्या पत्त्यावर अजूनही राहत होते. फ्रँकला तो प्रवास आता नीटसा आठवतही नव्हता. इंटरनेट व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून फ्रँक आणि दानिल एकमेकांना भेटले. दानिलने फ्रँकला ती बाटली आणि ते पत्र दाखवलं. हे पत्र इतक्या वर्षांनी सापडणं, त्यांनी एकमेकांना भेटणं या योगायोगाचं दोघांना खूप नवल वाटत होतं. दोन अनोळखी लोक अनेक वर्षांनी एका पत्राच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले. ही दशकापूर्वीची घटना. अपेक्षित व्यक्तीलाही पत्र पोहोचण्याची पूर्वी जिथे खात्री नसे, तिथे या प्रयोगाचं भविष्य पूर्णपणे अनिश्चित होतं. तरीही हे शक्य झालं.
पत्र हाताने लिहायचं, पाठवून द्यायचं, कधीतरी ते मजल दरमजल करत पोहोचणार, मग ती व्यक्ती सवडीने उत्तर पाठवणार, तेही पुन्हा कूर्मगतीने कधीतरी पोहोचणार. या सगळ्यात चिकाटी, संयम यांचा कस लागायचा. पत्र पोहोचलं असेल का? याची हुरहुर, उत्तराची वाट पाहणं यात एक गंमत होती. कधीकधी काही पत्रं हव्या त्या स्थळी हव्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नसत. कधी तारीख उलटून गेल्यावर नेमणुकीचं पत्र पोहोचत असे, तर कधी पाहुणे येऊन गेल्यानंतर ते येणार असल्याचं पत्र पोहोचत असे. कधी ’आम्ही येणार म्हणून कळवले होते, पत्र पोहोचले नाही का!’ म्हणत चतुर पाहुणे दत्त म्हणून हजर होत. इतक्या गोंधळातही लिखित स्वरूपात भावनांचा व्यवहार किंवा आदानप्रदान करणारं ते एकमेव आणि लोकप्रिय माध्यम होतं. आता पोस्ट ऑफिस आधुनिक झाली, डिजिटल झाली, पण त्यातून वैयक्तिक पत्र पाठवणं जवळपास बंद झालं. सगळं संभाषण ऑनलाइन स्वरूपात केलं जाऊ लागलं. पोस्टकार्ड आजही फक्त पन्नास पैशाला मिळतं आणि जोडकार्ड 1 रुपयाला. तरीही माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या 15 वर्षांत पोस्टाने पाठवलेल्या पत्रांच्या संख्येत 85 टक्क्यांनी घट झाली आहे. सुमारे 62 कोटी भारतीय इंटरनेट वापरतात, तर ’ट्राय’च्या आकडेवारीनुसार देशातली 75 टक्के जनता मोबाइल फोन वापरते. नुसतं बटण दाबून जगाच्या कानाकोपर्यात संपर्क साधणं इतकं सोपं आणि स्वस्त झाल्यामुळे साहजिकच या शर्यतीत पत्रं मागे पडली.
हे खरंय की पत्राची जागा ईमेल किंवा एसएमएस, मेसेंजर किंवा व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्सनी घेतल्याने प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतींमध्ये बदल झाला आहे. ब्लू टिक, मेसेज सेंट, रिसिव्ह्ड अशा सूचनांमुळे मजकूर पोहोचला असेल ना, याबाबतची उत्सुकता संपली. ’अमुक अमुक टायपिंग’ किंवा ’ऑनलाइन’ असं दिसत असल्याने उत्तर येईपर्यंत वाट पाहण्याइतका संयम उरला नाही. संदेशांच्या देवाणघेवाणीतलं अंतर सहन करण्यासाठी हवी असलेली चिकाटी वापरात न आल्याने नष्ट होऊ लागली. वेळ नाही या कारणाने मजकुराची लांबीही कमी होऊ लागली आहे. कित्येक जण तर व्हिडिओच्या किंवा फोटोंच्या माध्यमातून शब्देविण संवादू लागले. शब्दसंख्याच नव्हे, तर शब्दही संकोचू लागले. शॉर्टफॉर्मची नवी भाषा रुळली. पूर्वी पत्रात थोडेफार वापरले जाणारे मो.सा.न, ल.आ. अशा स्वरूपाचे शॉर्टफॉर्म होते. आता कित्येक जण संक्षिप्त रूपातच संवाद साधतात. GM, TYSM, LOL वगैरे. काही BTW (by the way) चं रच्याकने (रस्त्याच्या कडेने) असं गमतीदार अनुवादित रूपही वापरतात. पुढची पायरी म्हणजे शब्द अल्पाक्षरीच नव्हे, तर एकाक्षरी होऊ लागले आहेत - उदा., Yesऐवजी Y, OKऐवजी फक्त K.
हे सगळं पाहता लिखित पत्रांबरोबर नातेसंबंध, आपुलकी हे सगळं इतिहासजमा होत चाललंय, माणसांमधला नात्याचा ओलावा आटत चाललाय असं जुन्या पिढीला वाटतं. याबद्दल ’गेले ते दिन गेले’ स्वरूपाचे मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात ही पिढी अत्यंत आघाडीवर असते. परंतु संवादाची साधनं बदलली म्हणजे माणूस बदलतो का? भावना बदलतात का? नक्कीच नाही. त्याची अभिव्यक्ती तेवढी बदलते. माणसांचे नमुने मात्र तस्सेच असतात.
पूर्वी ‘संतोषी मातेच्या चमत्काराचं पत्र अमुक जणांना पाठवा’ नाहीतर तुमच्यावर संकट येईल, या प्रकाराची अजब पत्र येत, आता तशा स्वरूपाच्या ईमेल्स किंवा व्हॉट्सअॅप मेसेजेस येतात, एवढाच फरक. उलट आता ईमेल किंवा एसएमएसद्वारे स्मायली किंवा इमोटिकॉन्स वापरून वेगवेगळ्या भावना व्यक्त करता येतात. ही सोय पूर्वी नव्हती. नावडत्या माणसांना टाळण्याच्या पद्धती बदलल्या. सोशल नेटवर्किंग साइटवर रिक्वेस्ट टाळून उपेक्षा करणारे आहेत. फोन टाळणारे आहेत. अगदी घ्यावाच लागला तर हॅलो हॅलो रेंज नाहीये .. म्हणत बंद करणारे आहेत. “मी चौकातच आहे’ असं घरबसल्या मोबाइलवर खुशाल ठोकून देणारे आहेत. साधीभोळी किंवा भामटी अशी दोन्ही प्रकारची माणसं पूर्वी वास्तव जगात होती, तशीच आता आभासी जगात आहेत. आता लाइक नावाचं एक अद्भुत बटण किंवा चिन्ह आहे. आनंद, दु:ख, ईर्षा, मोह, राग, हास्य या सगळ्या भावना त्याच आणि तशाच आहेत. बदल इतकाच की त्या व्यक्त करण्यासाठी इमोजी आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि थेटपणे त्या व्यक्त केल्या जातात. अपवाद वगळता पूर्वी पत्रातली भाषा काहीशी औपचारिक असायची, ’पत्र लिहिण्यास कारण की, इकडे सर्व कुशल, अमुकची तब्येत कशी आहे, तमुकला आशीर्वाद’ वगैरे. आता हे सगळं एका ’हाय’ आणि ’फाइन’मध्ये आटोपू लागलं आहे.
आधी जग इतकं जवळ आलं नव्हतं, पण नाती घट्ट होती. नाती आजही आहेत, पण खासगीपणाच्या नव्या संकेतांमुळे नात्याची वीण जरा सैल झाली. दुसरीकडे जीवनाकडे पहाण्याची दृष्टी आणि विषयदेखील विस्तारले.
आता 6जी येईल. संवाद अधिक घाईने साधला जाईल. तरीही खास व्यक्तीकडून आलेला मेसेज उघडून पाहण्याची असोशी तशीच आहे. ’पत्र लिही, पण नको पाठवू शाईमधुनी काजळ गहिरे’ म्हणणार्या इंदिराबाई आज नाहीत. कविता मात्र आहे. आधुनिक माध्यमातून ती फॉरवर्ड होते आहे. संवादाचं माध्यम असंच बदलत राहिलं, तरी ’चिठ्ठी आयी है’मधली मौज तशीच आहे.
जगण्याचा अफाट वेग सोसेनासा झालेल्यांसाठी इतक्यात ’स्लो लिव्हिंग’ ही चळवळ रुजू लागली आहे. फास्ट फूड, वेगवान प्रवास, तत्काळ निर्णय, झटपट बातम्या, ताबडतोब प्रतिक्रिया, एका क्लिकसरशी वायुवेगाने घरपोच येणारे खाद्यपदार्थ, एंटर करताच झटक्यात जाणारे संदेश या सगळ्या भाऊगर्दीत दीर्घ श्वास घेऊन गती मंदावायला मदत करणारी, आपल्या आवडीच्या आणि अधिक अर्थपूर्ण गोष्टींना पुरेसा वेळ देऊ पाहणारी, एक शांत सहज जीवनशैली नव्या पिढीला आकर्षित करू लागली आहे. ती अधिकाधिक रुजत गेली, तर इकडे तंत्रज्ञान कितीही हायस्पीड झालं, शब्द कितीही त्रोटक झाले, तरी कुणास ठाऊक.. एखादा फ्रँक पुन्हा एखादं पत्र लिहून बाटलीत बंद करून समुद्रात टाकेल. एखाद्या दालिनला ते कधीतरी सापडेल आणि संवादाचा पूल त्यांना पुन्हा एकदा साधेल. काळ, वेग, संवादाची साधनं, भाषा बदलत राहील, आतला ’माणूस’ मात्र तसाच राहील.