अशोकराव : गुणांचा समुच्चय

03 Apr 2023 18:02:59
@अरविंद सिंग। 7506433393
मला अशोकजींबद्दल वडिलांप्रमाणे आदरयुक्त भीती वाटते. त्यांच्याकडून गुरूप्रमाणे आदर्श व नैतिकतेची शिकवण मिळते, तर कधी त्यांच्यातील मित्रत्वाच्या भावनेतून धीर व पाठिंबाही मिळतो. त्यामुळे वडील, गुरू व मित्र असे सर्व एकाच व्यक्तीमध्ये पाहायला मिळतात, त्या व्यक्तीचे नाव अशोक चौगुले.
ashokrao
 
दंतकथेतील एखाद्या दानशूर, प्रजेची सेवा करणार्‍या आदर्शवादी राजाशी अशोक चौगुले यांची तुलना केली, तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ज्यांच्याकडून नीतिमूल्ये शिकावीत व ती आचरणात आणावी असे वाटावे, अशी माणसेच दुर्मीळ आहेत आणि असाच एक दुर्मीळ माणूस म्हणजे अशोक चौगुले.
 
 
माझा 1995 सालापासून अशोकजींशी परिचय आहे. मी माझे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना, अशोकजींच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या हिंदू विवेक केंद्रामध्ये मी संशोधन साहाय्यक म्हणून अर्धवेळ काम करायचो. हिंदू विवेक केंद्रामध्ये येणार्‍या लेखकांना, विचारवंतांना संदर्भग्रंथ, वर्तमानपत्र कात्रणे अथवा त्यांच्या विषयांशी संबंधित लागणारे साहित्य उपलब्ध करून देणे असे संशोधन साहाय्यकाचे काम होते. तिथे काम करत असतानाच अशोकजींशी परिचय वाढला. मी माझ्या पदवीनंतर स्वत: पैसे कमवावे व त्यापुढे माझ्या शिक्षणावरील खर्च कुटुंबीयांवर येऊ नये, अशी माझ्या कुटुंबीयांची इच्छा होती.
 
 
 
मला पुणे विद्यापीठातील रानडे इन्स्टिट्यूटमधून बॅचलर इन कम्युनिकेशन व जर्नालिझम हा पदवी अभ्यासक्रम करावयाचा होता, म्हणून मी प्रवेश परीक्षा, ग्रूप डिस्कशन व मुलाखत हे टप्पे पूर्ण करून प्रवेश मिळविला खरा, परंतु मुख्य अडचण होती ती पैशांची. मला वार्षिक फी व सहा महिन्यांकरिता पेइंग गेस्ट म्हणून लागणारे भाडे असे एकत्रित 20 हजार रुपये द्यायचे होते. आता काय करायचे? हा यक्षप्रश्न उभा ठाकला. मी धाडस करून अशोकजींना मदतीकरिता विचारणा करायची, असे ठरविले. तेव्हा अशोकजी नर्मदा सिमेंट या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.
 


ashokrao 
 
मी घाबरत घाबरत अशोकजींना फोन केला व मला शिक्षणाकरिता 15 हजार रुपयांचे लोन हवे, असे सांगितले. “उद्या माझ्या कार्यालयातील अकाउंटंट आर.जी. कुलकर्णी यांना भेट, ते तुला लागणारे पैसे देतील” असे त्यांनी पुढच्या 30 सेकंदात मला सांगितले. सांगायचे तात्पर्य असे की, असे नव्हते की अशोकजींनी मदत केली नसती तर मी पत्रकार झालो नसतो; परंतु एखाद्याच्या गरजेच्या वेळेला मदत करण्याची त्यांची वृत्ती व दानत मी कधीच विसरू शकत नाही. 1998 साली 15 हजार रुपये ही खूप मोठी रक्कम होती, पण माझ्या शिक्षणाकरिता त्यांनी क्षणाचाही विचार न करता मदत देऊ केली. माझी अ‍ॅडमिशन झाल्यानंतर मला हिंदू विवेक केंद्रामध्ये अर्धवेळ काम करता येणार नव्हते व पैशांची परतफेड कशी करायची याबाबत मी अशोकजींना विचारणा केली, त्यावर अशोकजी म्हणाले, “किती पैसे आहेत यापेक्षा त्याची खरी गरज असताना मदत मिळाली, हे तू कधीच विसरू नकोस.”
 
मी माझे शिक्षण पूर्ण करून मुंबईत परत आलो व इंडियन एक्स्प्रेसमध्ये नोकरीला लागलो. एक-दोन पगार मिळाल्यानंतर प्रथम अशोकजींनी दिलेले पैसे परत करायचे ठरविले व साहेबांना फोन केला. अशोकजी मला दिलेल्या पैशांबद्दल विसरूनही गेले होते. मला म्हणाले, “कसले पैसे?” मी आठवण करून दिल्यावर त्यांनी ’‘ते पैसे तुझ्या शिक्षणासाठी दिले होते असे समज” असे सांगितले.
 
 
 
अशोकजींच्या बाबतीत त्यांनी एकदा विषय संपविल्यावर पुन्हा तो काढण्याचा आग्रह करू नये. त्यांचा तो स्वभावच आहे. एकदा त्यांनी भूमिका घेतली की ते त्या भूमिकेशी ठाम राहतात. अशा सैद्धान्तिक गोष्टी वाचायला किंवा ऐकायला चांगल्या वाटतात, परंतु अशा व्यक्तींशी वैयक्तिक संबंध हाताळणे अवघड असते. पण अशोकजींच्या बाबतीत तसे कधीच होत नाही.
 
 

ashokrao
 
असाच एक किस्सा आहे कोनराड एल्स्ट यांचा. कोनराड एल्स्ट यांना सात वर्षांपासून हृदयविकाराचा त्रास होता. डॉक्टरांनी त्यांना हृदयारोपण हाच पर्याय असल्याचे सांगितले होते व हृदयारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर 6 महिने सक्तीची विश्रांती घेणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला होता. कोनराड यांची सर्व जमापुंजी शस्त्रक्रियेकरिता खर्च होणार होती. मग शस्त्रक्रियेनंतर सहा महिने घरी बसून उदरनिर्वाह कसा चालणार? हा प्रश्न त्यांना सतावत होता. त्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’सारखी संकल्पना अस्तित्वात नव्हती. अशा वेळी अशोकजी त्यांच्या व्यवसायाशी निगडित कामाकरिता बेल्जियमला गेले असता एके दिवशी अचानक अँटवर्प येथील एल्स्ट यांच्या घरी पोहोचले. एल्स्टशी गप्पा मारताना त्यांनी अशोकजींना त्यांची समस्या सांगितली. अशोकजींनी त्यांना सहा महिन्यांकरिता लागणारा खर्च देण्याचे केवळ मान्यच केले नाही, तर त्यांनी तत्काळ मदतदेखील केली. त्यामुळेच कोनराड एल्स्ट ऑपरेशननंतर उठू शकले. त्यानंतर त्यांच्यावरील हिंदुत्व विचारसरणीचा प्रभाव हा अशोकजींमुळेच आहे. अशोकजी हे एवढे मोठे व्यक्तिमत्त्व, एक यशस्वी उद्योजक आहेत, तरीही ते अत्यंत साधेपणाने राहतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात नम्रता आहे. त्यांच्या आवतीभोवती कसलाही थाटमाट नसतो. त्यांच्या नम्रतेबाबतचा एक किस्सा तर मला सांगायलाच हवा.
 
 
एकदा मला कामानिमित्त गोव्याला जावे लागले. मी तीन-चार दिवसांकरिता गोव्याला गेलो. मी गोव्याला येणार आहे याची जाण्यापूर्वी अशोकजींना कल्पना दिली. त्यांनी विचारले, “गोव्यात कुठे राहणार आहेस?” मी हॉटेलात राहणार असल्याचे त्यांना सांगितले. ते म्हणाले, “हॉटेलात कशाला? तू माझ्या घरी राहायला ये.” मी तीन-चार दिवस अशोकजींच्या गोव्यातील घरी मुक्कामास होतो व गोव्यातील चौगुल्यांचे आदरातिथ्य उपभोगले. त्याच मुक्कामात एके दिवशी अशोकजींबरोबर बॉगमालो बीचवर सायंकाळी फिरायला गेलो. साडेपाच वाजलेले. अशोकजींनी ड्रायव्हरला तुमची ड्युटी संपली, आता घरी जा असे सांगितले व स्वत:कडे गाडीची चावी घेतली. नंतर आम्ही गप्पा मारत एका जॉइंटमध्ये बसलो. जसजशी संध्याकाळ होत गेली, तसतशी तेथे गर्दी वाढू लागली. गर्दीबरोबर म्युझिकचा आवाजही वाढला. अशोकजींनी वेटरला म्युझिकचा आवाज कमी करायला सांगितले, पण त्याने काही म्युझिकचा आवाज कमी केला नाही. थोड्या वेळाने अशोकजींनी पुन्हा वेटरला म्युझिकचा आवाज कमी करण्यास सांगितले. त्या वेळी मात्र वेटर उद्धट बोलला, “आपल्याशिवायही इतर अनेक लोक आहेत, त्यांना कोणाला म्युझिकचा त्रास होत नाही.” अशोकजी त्याला काहीच बोलले नाहीत. मला मात्र त्या वेटरचा प्रचंड राग आला होता, त्याची बोलण्याची पद्धत अत्यंत चुकीची होती. आमचे जेवण झाले व आम्ही जॉइंटच्या बाहेर गाडीच्या दिशेने निघालो. अशोकजींना पाहून एक गृहस्थ धावत आमच्या दिशेने आला व त्याने अशोकजींचे पाय धरले व म्हणाला, “आपण येणार होता, तर मला पूर्वकल्पना द्यायची होती ना. आज आम्ही जे काही आहोत, ते आपल्या वडिलांच्या मदतीमुळेच आहोत.”
 
 
ashokrao
 
मग मला कळले की हा गृहस्थ त्या जॉइंटचा मालक होता. ही गोष्ट अशोकजींना माहीत होती, तरीही त्यांनी कसलाही आविर्भाव न दाखविता अत्यंत नम्रपणे वेटरच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा मला पुन्हा एकदा त्यांच्या मोठेपणाचा प्रत्यय आला.
मागील 28 वर्षे मी त्यांना पाहात आलोय, असे अनेक किस्से आहेत. मी त्यांच्यासोबत अत्यंत सहजपणे वावरू शकलो ते त्यांच्यातील साधेपणामुळे, त्यांच्या मोठेपणामुळे.
 
 
मला अशोकजींबद्दल वडिलांप्रमाणे आदरयुक्त भीती वाटते. त्यांच्याकडून गुरूप्रमाणे आदर्श व नैतिकतेची शिकवण मिळते, तर कधी त्यांच्यातील मित्रत्वाच्या भावनेतून धीर व पाठिंबाही मिळतो. त्यामुळे वडील, गुरू व मित्र असे सर्व एकाच व्यक्तीमध्ये पाहायला मिळतात, त्या व्यक्तीचे नाव अशोक चौगुले.
 
Powered By Sangraha 9.0