जनाबांचे सावरकरप्रेम

विवेक मराठी    29-Mar-2023   
Total Views |
उद्धव ठाकरे यांनी सावरकरांबद्दल काँग्रेसला केलेले आवाहन किती बेगडी आहे, याचे दर्शन आजवर वारंवार घडलेल्या घटनांमधून दिसून येत आहे. आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत, राहुल गांधींच्या सोबत आहेात, पण   सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अशी त्यांनी बोटचेपी, मिळमिळीत भूमिका घेतली आहे. खरे तर या बाबतीत भूमिका कशी घ्यावी याचे त्यांनी बाळासाहेबांकडून शिक्षण घेणे आवश्यक होते. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना कडक शब्दात धमकीवजा इशारा देणे गरजेचे होते. जर सावरकरांचा अपमान करणार असलात, तर तुम्हाला आमचा पाठिंबा नाही. पण अशी परखड भूमिका घेतल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे जनाबांचे सावरकरप्रेम भाषणापुरतेच होते.
 
shivsena
उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे सभा झाली. सामना वृत्तपत्राच्या भाषेत ‘अतिविराट’ अशी झाली. उद्धव ठाकरेंची मुंबईबाहेर सभा होणे हाच खरे तर शिवसैनिकांसाठी आनंदीआनंद असतो. उद्धव ठाकरे सभेव्यतिरिक्त काही त्या भागाचा दौरा करत नाहीत. कोणाला भेटत नाहीत. त्यामुळे त्यांचे दर्शन धूमकेतूप्रमाणे असते आणि माध्यमेसुद्धा फुटबॉलच्या फायनल मॅचप्रमाणे सभेचे ते वृत्त कव्हर करतात.. मग सभा खेडची असो वा मालेगावची. दोन्ही सभांसाठी माध्यमे मात्र वातावरणनिर्मितीची अगदी जय्यत तयारी करताना दिसून आली. अगदी ज्याला सभेला जायचे नसते, त्यालाही जाण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम माध्यमे करीत असल्याचे दिसून येते. भाजपाद्वेषापायी ठाकरे गटाविषयी माध्यमांना असलेला कळवळा समजू शकतो.. आपण माध्यमे आहोत याचे भान विसरून ते प्रचार करत असतात..


shivsena
 
मालेगाव बाह्य हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ होता. महाराष्ट्रात मंत्री असलेले दादा भुसे हे येथून चार वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेचे वर्चस्व नाकारता येत नाही. पण आता दादा भुसे हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे उद्धव गटासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. भाजपाचे येथील उमेदवार अद्वय हिरे यांना आपल्या पक्षात घेऊन भुसे यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिकचे संपर्कप्रमुख व प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी या सभेच्या यशस्वीतेची जबाबदारी घेतली होती. मग जनाब ही उपाधी मिळाली असेल तर काही नवल वाटायला नको. एखाद्या सभेचे नियोजन करताना ती सभा मीडियात व विरोधी पक्षाने तिचा जास्त गाजावाजा होईल, याकडे आयोजकांना पाहावे लागते. मीडियात कसे चर्चेत राहावे, हे राऊत यांना अचूक माहीत आहे. त्यामुळे उर्दू भाषेतील फलक, त्यातील ‘जनाब’ ही उपाधी, आम्ही कसे सेक्युलर झालो आहोत याचेही दर्शन घडवायचे होते, हे करण्यात राऊत बर्‍यापैकी यशस्वी झाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 80च्या दशकात देशात सेक्युलॅरिझमचे, डाव्या विचारसरणीचे वारे वाहत असताना बाळासाहेब हिंदुत्वाकडे का झुकले, हिंदुहृदयसम्राट झाले याचा उद्धव ठाकरे, संजय राऊत जराही विचार करत नाहीत. तेच संजय राऊत बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार, सावरकरांचे बाळासाहेबांना असलेले प्रेम आपल्या सामना वृत्तपत्रातील ‘सच्चाई‘ या स्तंभातून अनेक वेळा मांडत आले आहेत. त्यामुळे ज्वलंत हिंदुत्वाचा विचार करणारी शिवसेना सेक्युलर होताना सामान्य शिवसैनिकाला किती यातना होत असतील, याचा विचारच न केलेला बरा...
 
 
shivsena
उद्धव ठाकरेंनी मालगावमध्ये खेडच्या भाषणाची तीच स्क्रिप्ट पुन्हा वाचली. मिंधे, गद्दार, खोके, ओके हे त्यांचे ठरलेले भाषण करून सभेत रंग भरण्याचा प्रयत्न केला. काही दिवस ते भाषण ठीक वाटते, पण त्यात नवीन्य नसल्याने श्रोतेही त्याकडे पाठ फिरवत आहेत. दसरा मेळाव्याच्या भाषणापासून त्यांची ही शिवराळ भाषणे सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याची खिल्ली उडवत, उद्धवजींकडे कशी लिमिटेड डिक्शनरी आहे, असा उपरोधात्मक टोला लगावला आहे. पण उद्धव ठाकरे यांचे ‘कुणी निंदा कुणी वंदा’ अशा प्रकारे तेच तेच भाषण सुरू असते. आता या वेळी त्यांनी सर्वांना अनपेक्षित झटका दिला, तो म्हणजे राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करू नये, असे त्यांनी आवाहन केले. उद्धव ठाकरे यांचे आवाहन किती बेगडी आहे, याचे दर्शन आजवर वारंवार घडले आहे. आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत, राहुल गांधींसोबत आहेात, पण वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अशी त्यांनी बोटचेपी, मिळमिळीत भूमिका घेतली आहे. खरे तर या बाबतीत भूमिका कशी घ्यावी, याचे त्यांनी बाळासाहेबांकडून शिक्षण घेणे आवश्यक होते. हिंदुत्वाचा, मराठीचा मुद्दा यावर बाळासाहेबांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपालाही खडेबोल सुनावले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना कडक शब्दात धमकीवजा इशारा देणे गरजेचे होते. जर सावरकरांचा अपमान करणार असलात, तर तुम्हाला आमचा पाठिंबा नाही. पण अशी परखड भूमिका घेतल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे जनाबांचे सावरकरप्रेम भाषणापुरतेच होते असेच म्हटले, तरी वावगे ठरणार नाही.
 


shivsena