@राजस वैशंपायन
। 8425084587
इंटरनेट अर्काइव्ह ही एक डिजिटल स्वरूपाची लायब्ररी म्हणून 1996पासून विकसित होऊ लागली. जगभरातील ग्रंथालये, पुराभिलेखागार, शैक्षणिक आणि संशोधन संस्था, न्यायव्यवस्था, राष्ट्रांची सरकारे यांबरोबर मिळून आणि मायक्रोसॉफ्ट व गूगल या दोघांच्या सहकार्याने इंटरनेट अर्काइव्हने स्वत:चे ज्ञानाचे आणि माहितीचे जाळे निर्माण केले. 2023मधील त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार इंटरनेट अर्काइव्हवर सध्या तीन कोटीपेक्षा जास्त पुस्तके, एक कोटीपेक्षा जास्त ध्वनिफिती संकलित केल्या गेल्या आहेत. डिजिटल ग्रंथालयासंदर्भात माहिती देणारा लेख...
1996 हे वर्ष आंतरजालाच्या (इंटरनेटच्या) इतिहासातील एक महत्त्वाचे वर्ष मानले जाते. या वर्षी ‘इंटरनेट अर्काइव्ह’ या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना झाली. ब्रूस्टर केह्ल नावाच्या अमेरिकेतील एम.आय.टी. संस्थेतून डिजिटल लायब्ररी आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयातील पदवीधराने आपल्या काही समवयस्क आणि समविचारी लोकांना सोबत घेऊन इंटरनेट अर्काइव्हची सुरुवात केली. मराठीमध्ये ‘अर्काइव्ह’साठी ‘पुराभिलेखागार’ असा पारिभाषिक शब्द आहे. कोणत्याही संस्थेतील किंवा व्यवस्थेतील ऐतिहासिक दस्तऐवज, माहिती यांचा भविष्यकाळात कधीही उपयोग करता येईल अशा स्वरूपात केलेला संग्रह म्हणजे पुराभिलेखागार किंवा अर्काइव्ह. पारंपरिक पुराभिलेखागारात कागदी किंवा तत्सम भौतिक रूपात माहितीचे किंवा भूतकाळातील महत्त्वाच्या दस्तऐवजांचे जतन केले जाते. इंटरनेट अर्काइव्हचे स्वरूप याहून अगदी भिन्न आहे. 1950 आणि 60च्या दशकांपासून आंतरजालाचा जागतिक वापर झपाट्याने वाढत गेला आणि त्यावरून होणारी माहितीची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात वाढली. जागतिक पटलावर, मुख्यत: सोव्हिएत युनियनच्या विभाजनानंतर इंटरनेटच्या प्रसाराला आणि वापराला अचानक खूप मोठे क्षेत्र खुले झाले. याचा परिणाम असा झाला की, विविध स्वरूपातील माहितीचा जगभरातील प्रवास कित्येक दशपटींनी वाढला आणि अधिकाधिक व्यवस्थांनी व संस्थांनी आंतरजाल कार्यप्रणाली अवलंबून स्वत:च्या कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार केला.
ब्रूस्टर केह्ल
मुळात संगणक बायनरी स्वरूपात माहिती गोळा करतो आणि त्याला बायनरी स्वरूपातीलच आदेश समजतात आणि मिळालेल्या माहितीवर पुढील प्रक्रियासुद्धा बायनरी स्वरूपात केल्या जातात. त्यामुळे संगणकाला पारंपरिक स्वरूपात माहिती संकलित करून ठेवण्यासाठी ती बायनरी स्वरूपातच जतन करावी लागते. खूपच मोठ्या प्रमाणात आंतरजालावर निर्माण होणार्या माहितीचे संकलन, जतन आणि पुढील पिढ्यांसाठी वापरण्याजोगी ठेवण्यासाठी एका वेगळ्या व्यावसायिक व्यवस्थेची आवश्यकता सर्वच संगणक शास्त्रज्ञांना जाणवत होती. सार्वजनिक आणि खुल्या प्रकारे माहितीचे, ज्ञानाचे संकलन आणि प्रसारण ही पारंपरिक दृष्टीने ग्रंथालयांची जबाबदारी असते. त्यामुळे आंतरजाल माध्यमातही डिजिटल स्वरूपाची ग्रंथालये ही भूमिका पार पाडू शकतील, या विश्वासाने डिजिटल लायब्ररी किंवा डिजिटल स्वरूपातील ग्रंथालय या विषयावर अनेक मोठ्या तंत्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम सुरू केले. एम.आय.टी.ने तयार केलेल्या अशाच एका अभ्यासक्रमाची परिणती म्हणजे इंटरनेट अर्काइव्ह ही व्यवस्था.
इंटरनेट अर्काइव्ह ही एक डिजिटल स्वरूपाची लायब्ररी म्हणून 1996पासून विकसित होऊ लागली. जगभरातील ग्रंथालये, पुराभिलेखागार, शैक्षणिक आणि संशोधन संस्था, जगभरातील कंपन्या, न्यायव्यवस्था, राष्ट्रांची सरकारे यांबरोबर मिळून आणि मायक्रोसॉफ्ट व गूगल या दोघांच्या सहकार्याने इंटरनेट अर्काइव्हने स्वत:चे ज्ञानाचे आणि माहितीचे जाळे निर्माण केले. इंटरनेट अर्काइव्हने कागदपत्रे, पुस्तके, दस्तऐवज स्कॅन करून, चित्रफिती, चलचित्र, ध्वनिफिती, निरनिराळी सॉफ्टवेअर्स, संगणक प्रोग्रॅम आणि अगदी गेम्स यांचे संकलन आणि जतन सुरू केले. 2023मधील त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार इंटरनेट अर्काइव्हवर सध्या तीन कोटीपेक्षा जास्त पुस्तके, एक कोटीपेक्षा जास्त ध्वनिफिती आणि चित्रफिती आणि कित्येक अब्ज सॉफ्टवेअर्स, प्रोग्रॅम्स इत्यादी गोष्टी संकलित केल्या गेल्या आहेत.
अर्काइव्हच्या कामाची सुरुवात स्वयंसेवकांच्या माध्यमातून केली गेली. त्यानंतर ज्या संस्था आणि व्यवस्था आपणहोऊन या कार्यात सहभाग घेतील, त्यांच्या माध्यमातून हे काम पुढे गेले. मात्र या सर्व व्यवस्थेच्या मर्यादा लक्षात घेऊन कामाचा आवाका आणि गती वाढवण्यासाठी इंटरनेट अर्काइव्हने एक अतिशय वेगळ्या प्रकारचा आंतरजाल प्रोग्रॅम तयार केला. हा ’वेब क्रॉव्हलर’ प्रकारचा प्रोग्रॅम होता. आज आपण ज्याला बॉट किंवा अधिक ओळखीचा चॅटबॉट म्हणून ओळखतो, त्याचेच हे प्राचीन रूप. आंतरजाल माध्यमात संचार करणारा, बायनरी भाषा समजणारा एक कोळी म्हणजे ’वेब क्रॉव्हलर’. हा कोळी आंतरजाल विश्वात संचार करतो आणि त्याला आखून दिलेल्या नियमाप्रमाणे आणि मार्गाप्रमाणे तो माहितीचा संचय करतो आणि ती माहिती संकलकाकडे घेऊन येतो. थोडा खतरनाक प्रकारच आहे वेब क्रॉव्हलर. त्याचे अनेक दुष्परिणामही आहेत, तितकेच इंटरनेट अर्काइव्हसारख्या व्यवस्थेसाठी फायदेसुद्धा आहेत. इंटरनेट अर्काइव्हने स्वत:साठी हॅरीट्रिक्स नावाचा असा आंतरजालीय कोळी तयार केला आणि त्याच्या मुक्त पण सजग संचारातून अर्काइव्हने खूप मोठी मजल मारली. कोणतेही तंत्रज्ञान निष्पक्ष असल्याने त्याचे बरे-वाईट परिणाम वापरणार्या माणसाच्या इच्छेवर आणि बुद्धीवर अवलंबून असतात. हा कोळी आणि त्याची गणितीय रचना इंटरनेट अर्काइव्हने सर्वांसाठी खुली केली, त्यामुळे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या लोकांच्या हातात ही प्रणाली गेली. मग जगभरातील उत्तमोत्तम ग्रंथालये, संशोधक, अभ्यासक, सजग नागरिक यांच्यापासून ते अगदी पायरसी करणार्या व्यक्ती आणि टोळ्या, अतिरेकी संघटना, फ्रॉड करणार्या व्यक्ती आणि गट अशा सर्वांनीच त्याचा पुरेपूर वापर केला. अर्काइव्हला त्याचे दुष्परिणामही भोगावे लागले. कित्येक देशांनी, न्यायव्यवस्थांनी ताशेरे ओढले, शिक्षा केल्या, बंदी घातली; पण मुळात अर्काइव्हचा मानस, कमी काळातील यश आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याची त्याची ताकद पाहून या बंदी उठवल्या गेल्या किंवा शिथिल केल्या गेल्या. आज जगभरात विविध देशांत मिळून अर्काइव्हची एकूण 33 स्कॅनिंग केंद्रे आहेत, आणि येत्या दोन ते तीन वर्षांत ती दुपटीने वाढतील, असे संचालक ब्रूस्टर याचे म्हणणे आहे. माणसाने आजतागायत निर्माण केलेल्या सर्व ज्ञानाचे खुले प्रकारे सार्वत्रिकीकरण आणि जागतिकीकरण हे अर्काइव्हचे ध्येय आहे.
कोविड काळात जेव्हा इतर ग्रंथालये आणि संस्था बंद होत्या, तेव्हा अभ्यास साहित्य पुरवण्यापासून ते विविध कोर्सेस संकलित करून खुल्या प्रकारे चालवण्यापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेट अर्काइव्हने केल्या.
याच सुमारास, 2020 साली अमेरिकेच्या फेडरल कोर्टमध्ये कॉपीराइट कायदा भंग केल्याचा आरोप करून, जगातील अतिशय मोठ्या अशा चार प्रकाशन संस्थांनी इंटरनेट अर्काइव्हला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. अर्काइव्हने आपल्या ओपन लायब्ररीमधील सर्व पुस्तके नष्ट करावीत आणि प्रकाशक व लेखकांना सर्व नुकसानभरपाई द्यावी. अर्काइव्हसाठी पहिली वेळ नाही, पण याचे महत्त्व अशासाठी की यामुळे आता जगभरातील कॉपीराइट कायद्यात आमूलाग्र बदल होईल, असे वर्तवले जात आहे. पेंग्विन, विली अँड सन्स, हार्पर कॉलिन्स आणि हॅकेट अशा आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थांनी केस दाखल केली आहे आणि 20 मार्च व 21 मार्च, 2023 असे दोन दिवस सुनावणी सुरू होती.
प्रकाशकांचे म्हणणे असे आहे की अनेक पुस्तके खुल्या डिजिटल स्वरूपात लोकांना उपलब्ध करून दिल्याने लेखक आणि प्रकाशक यांचे खूप नुकसान झाले आहे. मार्केट इक्विलिब्रियम (प्रकाशन व्यवसायातील बाजाराचा समतोल) ढासळला आहे. पण इंटरनेट अर्काइव्हने उऊङ - म्हणजे कंट्रोल्ड डिजिटल लेंडिंग किंवा मर्यादित स्वरूपात लोकांना एखाद्या भौतिक ग्रंथालयाप्रमाणे पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. ग्रंथालयातून ज्या प्रकारे आपण पुस्तके इश्यू करतो, तशाच प्रकारे एक तास ते चौदा दिवस इतक्या कालावधीसाठी एखादे पुस्तक अर्काइव्हवरून डिजिटल स्वरूपात आपण वाचायला घेऊ शकतो. त्या कालावधीनंतर पुस्तक आपोआप आपल्या संगणकातून किंवा तत्सम उपकरणामधून निघून जाते. किंवा वाचून झाल्यावर आपण ते पुस्तक परत करू शकतो. एखादे पुस्तक इश्यू झालेले असेल, तर ते दुसर्या व्यक्तीला मिळत नाही, त्याला जास्तीत जास्त चौदा दिवस वाट बघावी लागते. फेडरल न्यायव्यवस्थेने ही सर्व व्यवस्था पाहून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत - फेअर युसेज तत्त्वानुसार सार्वजनिक आणि ना नफा ना तोटा ग्रंथालये आपल्याकडील माहिती आणि ज्ञान सर्वांना खुले करू शकत नाही का? असे ज्ञान लोकांपर्यंत नेताना कोणत्या माध्यमातून न्यावे यावर बंधने असावीत की नसावीत? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शैक्षणिक नसलेल्या पण लोकाभिमुख संस्थांना लोकहितासाठी ज्ञानप्रसार करण्याचा हक्क आहे की नाही? आणि असे करताना आपण प्रकाशक व लेखक यांचे हक्क व आर्थिक स्रोत कशा प्रकारे अबाधित ठेवू शकतो? डिजिटल युगात प्रकाशक विरुद्ध ग्रंथालय या परिस्थितीतून प्रकाशक आणि ग्रंथालये या स्थितीत आपण कसे जाऊ शकतो?
ब्रूस्टर केह्लने याविषयी बोलताना म्हटले आहे की, ’‘कोणतेही नवे तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित व्यवस्था लोकांपर्यंत जाऊ लागल्यावर त्यातून नवे प्रश्न आणि समस्या निर्माण होतातच. अशा समस्या आणि प्रश्न सोडवूनच आपण उत्तम लोकाभिमुख तंत्रज्ञान आणि व्यवस्था तयार करू शकतो. रेल्वेमध्ये चोर्या होतात म्हणून रेल्वे बंद केली जात नाही, तर त्यात व्यावस्थात्मक सुधारणा केल्या जातात.” या संपूर्ण चळवळीमध्ये जगभरातील ग्रंथालयांनी, विद्यापीठांनी आणि संशोधन संस्थांनी अर्काइव्हसोबत उभे राहावे, अशी हाक अर्काइव्हने दिली आहे. यासाठी आता जगभरातील ग्रंथालये, विद्यापीठे, संशोधन संस्था अर्काइव्हबरोबर विचारविनिमय करण्यासाठी एकत्र येत आहेत. डिजिटल जगतातील ज्ञानक्षेत्रात जे व्यवस्थात्मक बदल होणार आहेत, त्यांची एक सुरुवात इथून होऊ शकते, असा विश्वास ब्रूस्टर केह्लने व्यक्त केला आहे.