डॉ. व्यंकटराव घोरपडे
। 9325227033
देशी गायीच्या प्रचार-प्रसारासाठी सामुदायिक प्रयत्नांबरोबरच प्रगत तंत्रज्ञानाचा - उदा., आयव्हीएफ, भ्रूणप्रत्यारोपण, लिंगवर्गीकृत रेतमात्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यास आणि एकूणच आजच्या घडीला बदललेल्या समाजाला देशी गायीची उपयुक्तता सिद्ध करून दिल्यास आपोआप देशी गोवंशाचे संवर्धन वाढेल, यात शंका नाही.
इसवीसनपूर्व साधारण तीन हजार वर्षांपूर्वी वैदिक साहित्यात गायीचा उल्लेख आढळतो. समकालीन मोहेंजोदडो आणि हडाप्पा येथील उत्खननांत अनेक अशा मुद्रा सापडल्या, ज्या मुद्रांवर मुख्यत्वे बैल आणि त्याची भरदार शिंगे, त्याचबरोबर पुष्ट असे वृषण दाखवण्यात आले आहेत. बैल हे शिवाचे वाहन आहे, त्यामुळे शिवमंदिरात नंदी असतोच. महाभारतात शिवाला प्रजापतीकडून वृषभ हे वाहन मिळाल्याचा उल्लेख आढळतो. शेतकर्याच्या ज्या इच्छा असतात - उदा., बैल चांगले असावेत, धष्टपुष्ट असावेत, त्यांना सहजतेने नांगर ओढता यावा, वेळेवर पाऊस पडून पिके जोरदार यावीत इ., त्या ऋग्वेदात व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अथर्ववेदात स्वतंत्रपणे वृषभ सूक्त आहे. संस्कृत शब्द ‘बलिवर्ध’ या शब्दापासून बैल हा शब्द वापरात आला आहे.
प्राचीन गो-अर्थशास्त्र
कौटिलीय अर्थशास्त्रात खिलार जनावरांच्या कळपाचा अध्यक्ष तो गोअध्यक्ष, त्याच्या हाताखाली गोपालक, दोहक, मंथक, जनावराचे रक्षण करणारा तो लब्धक असे सेवक होते. त्याचबरोबर नांगरास जुपण्यायोग्य, गाडीला जुपण्यायोग्य, सवारीला जुपण्यायोग्य व प्रजननयोग्य अशी अनुक्रमे दम्य, वहिन, वृष व वळू या नावाने वर्गीकरणदेखील केले आहे. त्याचप्रमाणे खच्चीकरण, जनावरांची ओळख पटवण्यासाठी डागणे, कान कापणे अशा प्रकारचादेखील उल्लेख आढळतो, तसेच वंशावळ ठेवण्याबाबतदेखील उल्लेख आहेत. एकूणच पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकशास्त्र प्रगत होते.
तत्कालीन परिस्थिती कृषी आधारित होती आणि त्यामुळे बैलाच्या संवर्धनाकडे जादा लक्ष दिले गेले असावे, असे म्हणण्याला वाव आहे. संबंधित काळात गोधनाच्या संख्येवर त्या कुटुंबाची श्रीमंती मोजत असत. गर्गसंहितेत गोलोक खंडाच्या चौथ्या अध्यायात गायीच्या संख्येवर गोपालकांना उपाध्या दिल्या जात असत. पाच लाख गायी सांभाळणारा ‘उपनंद’, नऊ लाख गायी सांभाळणारा ‘नंद’, दहा लाख गायी सांभाळणारा ‘वृषभानू’, 50 लाख गायी सांभाळणारा ‘वृषभानुव’ आणि एक कोटी गायी सांभाळणारा तो ‘नंदराज’ असे वर्णन संस्कृत श्लोकात केले आहे. अर्थात त्याच्या जवळपास जरी संख्या असेल, तर निश्चितपणे त्यासाठी पशुवैद्य, पशुउपचार आणि पशुसंवर्धनतज्ज्ञ हे असणारच, पैकी नकुल आणि सहदेव हे पांडव बंधू पशुवैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ होते, अशा नोंदी आहेत.
पशुवैद्यक व पशुसंवर्धनशास्त्र जाणणारे, त्याची माहिती सांगणारे अनेक ग्रंथ त्या काळात उपलब्ध होते. महाभारतकालीन नकुल यांनी लिहिलेले अश्वचिकित्सित, रुद्रदेवाचे शौनिक शास्त्र असे ग्रंथ त्या काळात होते. आर्य चाणक्याच्या प्रसिद्ध अर्थशास्त्रीय ग्रंथातही पशुपालन हा व्यवसाय तत्कालीन समाजाच्या उदरनिर्वाहाचे साधन होते, शेती व व्यापार त्यावर अवलंबून होता याबाबत ऊहापोह केला आहे. पशुपालनाने पशुसंपत्तीचा लाभ होतो, हे नमूद करून वैशिष्ट्यपूर्णरित्या पशुपालनामुळे ’श्रमजीवी वर्गाच्या श्रमाचा लाभ होतो’ या बाबतीत आर्य चाणक्याने आपले विशेष मत नोंदवले आहे. त्याचबरोबर पशुपालनामुळे समाजाचेच फक्त पालनपोषण होत नाही, तर राज्यकोषातील धनधान्याची वृद्धी होऊन राज्ययंत्रणा सबळ होते; थोडक्यात, राज्य व देश पातळीवर आर्थिक बळकटी येण्यासाठी पशुपालनाचे फार मोठे योगदान आहे, हे चाणक्य यांनी त्या काळात नमूद केले होते. साधारणपणे आज जे पशुपालनाचे योगदान आहे, तेच योगदान त्या काळातही होते. त्याचबरोबर पशुपालकांची उत्पन्नवाढ आणि आर्थिक समृद्धी केंद्रस्थानी होती.
गोवंशाची वृद्धी
देशातील अनेक गोवंश हा शेतकर्यांच्या अनेक पिढ्यांनी खस्ता खाऊन जपलेला ठेवा आहे. देशातील सर्व गोवंशांचा बारकाईने अभ्यास केला, तर लक्षात येईल की त्या त्या भागातील हवामान, शेती, राहणीमान, आवडीनिवडी यासह आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार मिळतेजुळते गुण असणारे गोवंश त्यांनी निर्माण केले व जपले. उपयोगानुसार व त्यांच्या गुणानुसार त्यांना नावे देऊन त्यांचे संगोपन केले. त्याच वेळी त्याचा लक्षपूर्वक प्रचार व प्रसार करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्यांना मदत केली. परिणामी अशा चांगल्या गोवंशाची वृद्धी झाली. देशांतर्गत त्याचा प्रचार आणि प्रसार वाढला. चांगला बाजारभाव मिळाल्याने पशुपालक त्याकडे वळले. कररूपाने शासनाची मिळकत वाढली. हजारोच्या संख्येने देशी गोवंशाचे कळप निर्माण झाले. मुख्य शेती समृद्धीसाठी बैल, शेणखत याबरोबरच सैन्यदलातील अवजड वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. गायींच्या मोठ्या संख्येमुळेच त्याच्याशी संबंधित असा पंचगव्य उत्पादनावर अभ्यास केला व त्या काळात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. तुलनेने कमी असलेल्या इतर प्राण्यांच्या बाबतीत त्यांच्या दूध, शेण, तूप, दही, मूत्र याचा तुलनात्मक अभ्यास केला गेला नसेल, केला असेल तर तो त्या समकक्ष नसल्यामुळे विचारात घेतला गेला नसेल.
यांत्रिकीकरणाचा फटका
ब्रिटिश भारतात आल्यानंतर, सुधारणेच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू झाले. लोकसंख्या वाढीस लागली. कुटुंबातील जमिनीचे तुकडे पडत चालले. जंगलतोड सुरू झाली. चराऊ क्षेत्र कमी होत गेले. यांत्रिकीकरणास सुरुवात झाल्यामुळे नाही म्हटले तरी पशुधनाकडे थोडे दुर्लक्ष झाले. परिणामी त्यांचे दूध उत्पादन घटले. देशातील सहिवाल, गीर, लाल सिंधी, थारपारकर, राठी, कांकरेज, नागोरी या काही जाती ज्यादा दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. इतर सर्व देशी गोवंश तुलनेने अत्यंत कमी दूध देणारा आहे, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातील गवळाऊ, देवणी, खिलार, डांगी, लाल कंधारी, कोकणकपिला या सर्व प्रजातींचे 24 तासातील सरासरी दूध उत्पादन पाच ते चार लीटर आहे. वाढलेले शेतीतील यांत्रिकीकरण, मजुरांची कमतरता, कमी होत चाललेली कष्टाची सवय यामुळे बैलावर आधारित शेतीचे प्रमाण कमी होत आहे. परिणामी बैलासाठी देशी गोवंश आता सांभाळणे परवडत नाही. त्याचबरोबर दूध उत्पादनाचा विचार केला, तर तोही व्यावहारिकदृष्ट्या कमी आहे. सेंद्रिय शेती, पर्यावरण, पंचगव्य उत्पादने व विक्री या सर्व बाबी जरी कागदावर आकर्षक दिसत असल्या, तरी प्रत्यक्षात अल्प, अत्यल्प भूधारक पशुपालकांना परवडतीलच असे नाही. किंबहुना या सर्व बाबींसाठी पशुपालक देशी गायीच्या संगोपनासाठी पुढे येताना दिसत नाहीत.
तांत्रिक अडचणी
राज्यातील, देशातील माध्यमसुलभतेमुळे अनेक मंडळी काही देशी गोवंश पालकांच्या यशोगाथा पाहून, बाहेरील राज्यातून गीर, सहिवाल, राठी, थारपारकर या प्रजातीच्या देशी गायी मोठ्या प्रमाणात आणून व्यवसाय सुरू करतात. ते फक्त आरंभशूर ठरताना दिसतात. कारण मुळातच हा सर्व जादा दूध देणारा गोवंश त्या त्या भागातील हवामानाशी, वातावरणाशी निगडित असा असतो, तेथील पशुपालकांनी तो जाणीवपूर्वक विकसित केलेला आहे. तथापि तो आपण ज्या वेळी आणून व्यवसाय म्हणून सुरुवात करतो, त्या वेळी आपल्याकडे त्याच्या वीर्यमात्रा आहेत का? वळू परवडेल का? राज्यातील पशुसंवर्धन विभागाची शिफारस आहे का? त्यासाठी अनुकूल व्यवस्थापन, तांत्रिक अडचणी याचा अभ्यास नसल्याने मग दूध उत्पादन घटले की दुर्लक्ष सुरू होते. योग्य असे त्याच जातीच्या जादा दूध उत्पादन देणार्या गायीपोटी जन्मलेल्या वळूच्या वीर्यमात्रा न मिळाल्याने शेवटी उपलब्ध वीर्यमात्रा वापरून गर्भधारणा करण्याकडे कल वाढतो. त्यामुळे पुन्हा देशी गोवंश संगोपनाचा उद्देश असफल होतो. याच प्रयोगातून निर्माण झालेल्या चौथ्या-पाचव्या पिढीतील पशुधन या भागात रुळते, हवामानाशी, वातावरणाशी जुळवून घेते व जाणीवपूर्वक आनुवंशिक सुधारणा केल्यास जादा दूध उत्पादनदेखील मिळू शकते. त्यासाठी धीर व शास्त्रीय दृष्टीकोन यांचा मेळ घालावा लागेल.
बलस्थानांचा वापर आवश्यक
देशी गोवंश संगोपन करत असताना निव्वळ संकरित गायीवर टीका करून देशी गोवंश संगोपन फायदेशीर होणार नाही. त्यासाठी देशी गोवंशाच्या बलस्थानांचा खुबीने वापर करावा लागेल. अनेक मंडळी संकरित गायींना गाय समजत नाहीत, ए-वन, ए-टू दुधाचा सिद्धान्त सरसकट लागू करतात, बैल म्हणून नर वासराचा वापर करताना प्रश्नचिन्ह उभे करतात.. अशा एक ना अनेक बाबींवर माध्यमात चर्चा करतात. त्याऐवजी देशी गायीच्या दूध उत्पादन वाढीबरोबर त्याच्या बलस्थानांचा विचार करून आरोग्यदायक स्पर्धा केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो. टंचाईच्या काळात देशी गायी तग धरतात, व्यवस्थापन दर्जा चांगला असल्यास गर्भधारणा वेळेवर होते, जादा असणारा स्निग्धांश, घामाच्या ग्रंथीमुळे जादा तापमान ग्रहण करू शकणे, निकृष्ट प्रतीच्या चार्यावर उत्तम प्रतीचे दूध उत्पादन, मातृभावनेमुळे कमी असणारी वासरांची मरतूक, वाढते तापमान सहन करण्याची क्षमता, विताना कमी अडथळे, खूर खूप दणकट असल्यामुळे खुरांचे आजार कमी होतात अशा बलस्थानांचा वापर करून देशी गोवंश संवर्धन करणे शक्य आहे. संकरित गायीदेखील गेल्या 55 ते 60 वर्षांपासून आपल्या भागात रुळलेल्या आहेत. जवळजवळ 98% संकरित गायीचे दूधदेखील ए-टू प्रकारात मोडते. त्यांच्या चांगल्या दूध उत्पादनामुळे राज्यातील किंबहुना देशातील कोट्यवधी कुटुंबांचा तो एक मुख्य व्यवसाय बनला आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्यामुळे संकरित गोवंशाबद्दल लोकांच्या मनात विनाकारण संभ्रम निर्माण केल्यास अत्यंत कष्टाने प्रयत्नपूर्वक संकरित गोपालन करणार्या पशुपालकांच्या रोजीरोटीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संकरित गोपालकांनी आता एकत्र येऊन निरनिराळ्या संघटनांमार्फत जादा दूध देणार्या संकरित गायींची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे.
पशुसंवर्धन संस्थांनी एकत्र येण्याची गरज
नवनवीन प्रयोग करून दूध उत्पादन वाढ, यांत्रिकीकरण, रोगनियंत्रण, पशुखाद्य वैरणीच्या प्रजाती त्यासाठी संशोधनाचा वापर केला, त्या पद्धतीने देशी गोवंश संगोपनात या सर्व बाबींचा वापर दूध उत्पादन वाढीसह आत्ताच्या घडीला वातावरणातील बदल, तापमान वाढ, रसायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा पोत, अशा परिस्थितीतील चारा-पशुखाद्य खाऊन उत्पादित पंचगव्य उत्पादनाच्या दर्जावर संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. जर संशोधन झाले असेल, तर ते सप्रमाण मांडले गेले पाहिजे. तसेच संकरित गायीच्या पंचगव्य उत्पादनाबाबतदेखील चर्चा व्हायला हरकत नाही. सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करताना शेणखताच्या बाबतीत आपण आग्रही राहतो व तेच शेण आपण धूपकांड्या, गोकास्ट, रंग अशा अनेक कारणासाठी वापर करण्याचा आग्रह करताना त्यातील विरोधाभास समोर आल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी मान्यताप्राप्त संस्थांनी, प्रयोगशाळांनी, शास्त्रज्ञांनी अशी अनेक संशोधने करून जनतेसमोर मांडली पाहिजेत. त्यासाठी प्रादेशिक कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन विभाग, पशुविज्ञान विद्यापीठे, पशुसंवर्धन खाते, पशुपालक संघटना, एनडीआरआय, आयव्हीआरआय, स्वयंसेवी संस्था, पांजरपोळ यांच्यासारख्या पशुसंवर्धन संस्थांनी एकत्र आले पाहिजे, त्यांनी पुढाकार घेऊन अधिकारवाणीने बोलले पाहिजे, तरच देशात-राज्यात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल, जे देशी गोवंश संवर्धनासाठी पूरक ठरेल.
देशी गोवंश संवर्धनाचे येणार्या काळातील महत्त्व व त्याची गरज अनेक अंगांनी आहे. त्यासाठी त्याची योग्य पद्धतीने नोंदणी, उत्पादकता, प्रजनन यासंबंधी माहिती व त्याची नोंद असायला हवी. आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमात जादा दूध देणार्या राज्यातील गोवंशाच्या नोंदणी व्हायला हवी. त्यांना योग्य पद्धतीच्या रेतमात्रादेखील मिळायला हव्यात. निकृष्ट वळूचे खच्चीकरण करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. चांगल्या गायीचा माज दाखवणे, कृत्रिम रेतनाची तारीख, गर्भधारणा तपासणी, विण्याची संभाव्य तारीख याविषयी गाव पातळीवर योग्य संगणकीय प्रणालीचा वापर व्हायला हवा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदा (डाटा) तयार होईल. त्याच्या विश्लेषणातून अनेक नेमक्या बाबींचे नियोजन करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रजातिनिहाय पशू पैदासकार संघटना निर्माण झाल्या पाहिजेत. त्यांना शासनाचे पाठबळ व तांत्रिक साहाय्यदेखील मिळाले पाहिजे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
लेखक सांगली येथील पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त साहाय्यक आयुक्त आहेत.