महिला दिन : समानतेकडून परस्परपूरकतेकडे

13 Mar 2023 17:24:51

vivek
परिस्थितीनुसार कित्येक स्त्रिया कणखरतेचा आणि कित्येक पुरुष संवेदनशीलतेचा प्रत्यय देतात. स्वत:मधील हे दोन्ही गुण ओळखून त्याचा हवा तेव्हा हवा तसा वापर करण्यासाठी अनुकूल स्थिती जो समाज देऊ शकतो, त्याच समाजात ‘स्त्री-पुरुष समानता आहे’ असं म्हणता येईल. तरच लिंगभाव समानतेकडून परस्परपूरकतेकडे स्त्री-पुरुष वाटचाल करू शकणार आहेत. खर्‍या अर्थाने महिला दिन साजरा होण्याची ही वाटचाल ठरेल.
ललनांनो,
 
नका येत जाऊ तुम्ही सत्कार सोहळ्याला
 
शाल, श्रीफळाचं तबक घेऊन..
 
दीप प्रज्वलन करतेवेळी
 
नका उभ्या राहत जाऊ
 
समईपाशी काडेपेटी धरून..
 
नका वाचत जाऊ मानपत्र..
 
विचारा स्वत:ला आपलं सोहळ्यातलं स्थान
 
तो प्रेक्षणीय होण्यापुरतंच?
 
मग नका सामील होऊ त्यात.
 
सुंदर मुलींनो,
 
एवढं करून तर पाहा
 
आणि बघा
 
 
हे जग बदलून जाताना..
 
 
 
कवी नीलेश रघुवंशी यांच्या हिंदी कवितेचा मी केलेला हा मराठी अनुवाद. नुकत्याच होऊन गेलेल्या महिला दिनाच्या निमित्ताने ही कविता आठवली. दरम्यान एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे मात्र ही सगळी कामं मुलगे आणि मुली मिळून करत होते. पाहून छान वाटलं. इथे कित्येकांना वाटेल, बघा, आता कुठे राहिलंय असं काही. द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती आहेत. या देशातली सर्वात लहान सरपंच 21 वर्षांची तरुणी आहे. खेळ, सेनादल, संशोधन, कॉर्पोरेट, सेवा क्षेत्र सर्वत्र महिलांचा वावर आहे. त्यांचेही सत्कार होतात. त्या वक्ता म्हणून येतात, आयोजक असतात. अपवादात्मक असल्या, तरी काही महिला तर बाईपणाचा फायदादेखील घेतात. आता आणखी काय समानता हवी आहे! कशाला हवाय महिला दिन!
 
तरीही ही कविता कालबाह्य झालेली नाही, कारण ती सोहळ्यापलीकडचंही काही सांगू पाहते आहे. दिखाऊपणाच्या आहारी गेलेल्या शोभेच्या बाहुल्यांचे कान धरते आहे. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातल्या स्त्रियांच्या स्थानाबद्दल व स्थितीबद्दलही बोलते आहे.
 
पेटीएमने वेगवेगळ्या वयोगटातील तीस सुशिक्षित स्त्री-पुरुषांसह एक अनोखा प्रयोग केला. ’टचिंग हार्ट्स’ने प्रदर्शित केलेला हा व्हिडिओ सध्या चर्चिला जातो आहे. एका रेषेत उभं करून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. उत्तर ’हो’ असेल तर एक पाऊल पुढे जायचं आणि ’नाही’ असेल तर एक पाऊल मागे यायचं, असं सहभागींना अगोदरच सांगण्यात आलं होतं. प्रश्न सुरू झाले.
वयाच्या दहाव्या वर्षापूर्वी तुम्ही सायकल चालवायला शिकला होतात का?
 
 
तुम्ही शाळेत संगीत शिकला होतात का?
 
तुम्ही एखाद्या तरी खेळाचं प्रशिक्षण घेतलं आहे का?
 
तुम्हाला तुमचे कपडे इस्त्री करता येतात का?
 
 
प्रश्न इथवर आले, तेव्हा स्त्री-पुरुष एक-दोन पावलं मागे-पुढे उभे होते.
 
तुम्ही इतरांसाठी चहा, नाश्ता तयार करता का?
 
या प्रश्नानंतर मागच्या काही स्त्रिया एक पाऊल पुढे व पुढचे काही पुरुष एक पाऊल मागे गेले. तरी अजूनही त्यांच्यात फार अंतर नव्हतं.
 
 
पुढचे प्रश्न सुरू झाले.
 
घरातली बिलं तुम्ही भरता का?
 
सोन्याचा आजचा भाव तुम्हाला माहीत आहे का?
 
तुम्हाला तुमच्या पगाराचं ब्रेक-अप माहीत आहे का?
 
तुम्ही सही करता, त्या अर्थविषयक प्रत्येक कागदपत्राबाबत तुम्हाला नीट माहिती असते का?
 
कुणाचाही सल्ला व मदत न घेता तुम्ही तुमच्या नावावर एखादं वाहन खरेदी केलं आहे का?
 
तुम्ही कुणाच्याही मदतीशिवाय एखादी विमा पॉलिसी घेतली आहे का?
 
तुम्ही शासकीय अंदाजपत्रक समजून घेता का?
 
तुम्ही तुमच्या कमाईचं आर्थिक नियोजन एकट्याने करता का?
 
म्युच्युअल फंड आणि एसआयपी यामधला फरक तुम्हाला सांगता येईल का?
 
तुम्ही तुमचे किंवा कुटुंबाचे आर्थिक निर्णय स्वत: घेऊ शकता का?
 
 
प्रश्न संपले, तेव्हा अपवाद वगळता बहुतेक पुरुष बरीच पावलं पुढे गेले होते व स्त्रिया बरीच पावलं मागे आल्या होत्या. त्यांच्यात प्रेक्षकांचे डोळे उघडतील एवढं अंतर पडलं होतं.
 
 
हे खरं आहे की काही स्त्रियांना अर्थशास्त्र आवडत नाही. परंतु बहुसंख्य स्त्रिया ते काम आपलं नसून पुरुषांचं आहे असं मानतात. निर्णयाचे अधिकार बहुतांशी पुरुषांकडे असल्याने पुरुष आपल्या कमाईबरोबरच घरातील सगळी - अगदी कमावत्या स्त्रीच्या आर्थिक व्यवहारांचीही जबाबदारी घेतात. बहुतेक बायका ’हे’ सांगतील तिथे सही करतात. इथे विश्वास असणं वेगळं आणि आणि एक सक्षम, स्वतंत्र व्यक्ती म्हणून आर्थिक व्यवहाराकडे डोळसपणे पाहणं वेगळं. आता स्वत:ला पुन्हा प्रश्न विचारू या - कुठे आहे स्त्री-पुरुष समानता?
 
 
काही पुरुष ’आमच्याकडे आहे की समानता, घरातल्या बायकांना आम्ही सगळं स्वातंत्र्य दिलंय’ असं म्हणतात. मुळात स्वातंत्र्य देणारे हे कोण बुवा? ते जसे पुरुष जन्माला येताना घेऊन आले आहेत, तसेच बायकादेखील. ’माझा मुलगा-सून दोघं नोकरी करतात, पण मुलगा सुनेला घरकामात बरीच ’मदत’ करतो’ असं कुणी कौतुकाने सांगत असलं की ऐकायला छान वाटतं. पण घरकाम हे मुळात सुनेचं काम आहे हे इथे गृहीत धरलेलं असतं. यातील तर्कदुष्टता अनेकांच्या लक्षातही येत नाही.
 
 
समानतेच्या व्याख्येबाबत गोंधळ झाल्याने काही जण भरकटताना दिसतात. एका विवाहात वराने वधूकडून मंगळसूत्र घालून घेतलं. लिंगभाव समानतेचा संदेश देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या एका महाविद्यालयातील तीन विद्यार्थी ’टाय आणि साडी डे’ला साडी नेसून आले. यातून त्यांना अभिप्रेत असलेला संदेश गेला का? अजिबात नाही. तसं असतं, तर सुटसुटीत वाटतं म्हणून गेली अनेक वर्षं मुली पुरुषी म्हटले जाणारे पोशाख घालत आहेत, मग तर समानता केव्हाच यायला हवी होती. समानता कपड्याच्या लांबीवर अवलंबून नसते हे न समजलेल्या मुलींबरोबरच, मुक्त वागण्याच्या नावाखाली सिगारेट, दारू पिणार्‍या मुलींची संख्याही वाढत चाललेली आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. परंतु हे तितकंच चिंताजनक आहे, जेवढं एखाद्या मुलाने किंवा पुरुषाने सिगारेट किंवा दारू पिणं. समजा, यामुळे कॅन्सर होणार असेल, तर तो मुलगा-मुलगी असा भेदभाव करून शिरकाव करत नाही. मुलींच्या वागणुकीमुळे संस्कृती बुडणार असेल तर पुरुष कसेही वागल्यानेही ती तरणार नाही. परंतु समाजाला स्त्रीच्या चारित्र्याची जेवढी काळजी आहे, तेवढी पुरुषाच्या चारित्र्याची नाही. का? त्याला मूल होत नाही, म्हणून! समाजाच्या प्रत्येक घटकाचं चारित्र्यनिर्माण सारखंच महत्त्वाचं आहे, या जाणिवेला समानता म्हणता येईल.
 
 
खरं म्हणजे संवेदनशीलता, कणखरता हे मानवी गुण आहेत. निसर्गाने स्त्री-पुरुषांच्या शरीररचनेत फरक केला आहे. काही अंशी शारीरिक क्षमतांबाबतही. परंतु माणूस म्हणून कोणताही भेद ठेवलेला नाही. त्यामुळे बाकीचे फरक समाजनिर्मित आहेत. पिढ्यानपिढ्या संवेदनशीलता जपावी लागल्याने, अपत्यसंगोपनामुळे स्त्रियांमधला तो गुण वाढीस लागला. घरचं ’सगळं’ नीट सांभाळून तू हवं ते कर, अशी परवानगी(!) हल्ली स्त्रियांना दिली जाते. साहजिकच ती जेव्हा अर्थार्जनासाठी घराबाहेर पडते, तेव्हा ‘आपलं घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना?’ असा तिच्या मनात अपराधभाव असतो. याउलट पुरुषाला पिढ्यानपिढ्या ’रडतोस काय मुलीसारखा’ म्हणत स्वत:तील संवेदनशीलतेला आवर घालण्याचं बंधन घालण्यात येतं. मर्द असण्याचं, यशस्वी होण्याचं त्याच्यावर सतत दडपण असतं. परिणामी त्याच्यातील कणखरभाव वाढीस लागतो.
 
 
परिस्थितीनुसार कित्येक स्त्रिया कणखरतेचा आणि कित्येक पुरुष संवेदनशीलतेचा प्रत्यय देतात. तेव्हा हे गुण येतात कुठून? ते त्यांच्यातच असतात, पण सुप्तावस्थेमध्ये. स्वत:मधील हे दोन्ही गुण ओळखून त्याचा हवा तेव्हा हवा तसा वापर करण्यासाठी अनुकूल स्थिती जो समाज देऊ शकतो, त्याच समाजाला आमच्याकडे ’स्त्री-पुरुष समानता आहे’ असं म्हणण्याचा अधिकार आहे. तरच लिंगभाव समानतेकडून परस्परपूरकतेकडे स्त्री-पुरुष वाटचाल करू शकणार आहेत.
 
 
अर्धनारीनटेश्वराचं प्रतीक पूजणार्‍या आपल्या समाजाला याची आठवण राहावी, हेच महिला दिनाचं खरं प्रयोजन.
Powered By Sangraha 9.0