समरसतेचे विद्यापीठ दादा इदाते

विवेक मराठी    03-Feb-2023   
Total Views |
@डॉ. प्रसन्न पाटील। 9822435539
 
 
vivek
‘समरसता’ हा केवळ पांडित्याचा किंवा प्रबोधनापुरता मर्यादित विषय नसून समरसता हे जीवनमूल्य आहे, तो प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय आहे आणि हे ज्यांच्या संपर्कात आल्याबरोबर जाणवते, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. दादा इदाते. महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा राहिला नसेल, ज्यातील कार्यकर्त्यांना दादांनी समरसता विषय समजावून सांगितलेला नाही! अस्थिरतेचा, मागासलेपणाचा शाप नशिबी आलेल्या भटक्यासमाजातील जमातीत जन्म, पालावरचे, गरिबीच्या विळख्यातील बालपण ते समाजबांधणी- उभारणीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ‘पद्मश्री’ हा जवळजवळ अशक्य वाटणारा दादांचा जीवनप्रवास.
समरसता मंचाच्या सुरुवातीचा प्रसंग. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीनिमित्त संघकार्यकर्त्यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रभर सामाजिक समरसता परिषदा आयोजित केलेल्या होत्या. त्यापैकी सोलापूर येथील परिषदेतील प्रसंग. समरसता मंचासह सोलापुरातील सर्व प्रमुख दलित, सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्तेही परिषदेत सहभागी झालेले. सकाळपासून बंधुत्वाच्या, सामाजिक समतेच्या विविध विषयांवर चर्चा चाललेल्या. दुपारी सर्वांचे एकत्रित भोजन झाले. त्यानंतरच्या सत्राला प्रारंभ होताच काही जण व्यासपीठावर आले. हातात भोजनाचे डबे. “तुम्ही आमच्यासोबत जेवण केले, पण आमचे अन्न कुठे खाल्ले? हे आमच्या डब्यातील अन्न जर तुम्ही खाल्ले, तरच त्याला खरे सहभोजन म्हणता येईल” असे सांगून “हे खायची कुणाकुणाची तयारी आहे?” असा प्रश्न केला व संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व व्यासपीठावरील परिषदेच्या वक्त्यांची नावे घेत डब्यातील ते अन्न खाण्यासाठी आमंत्रित केले. डब्यात मटणासारखा पदार्थ, भाजी, भाकरी असे जेवण होते. त्यांची अपेक्षा होती की त्यांनी आणलेले अन्न तेथील कार्यकर्ते खाणार नाहीत आणि परिषद उधळून लावता येईल. पण झाले उलटेच. अर्थातच सर्वांनी डब्यातील ते अन्न चाखले. तेवढ्यात, आलेल्या कार्यकर्त्यापैकी एकाने जाहीर केले, “मला आज खूप आनंद होत आहे, कारण आता ज्या लोकांनी खाल्ले आहे, ते गोमांस आहे. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला वळण मिळाले, त्याप्रमाणे या गोमांसभक्षणाने इतिहासाला वळण मिळेल!” सर्वत्र खळबळ उडाली. अनेक जण अस्वस्थ झाले, तरी परिषदेतील पुढची सत्रे पार पडली. समारोप सुरू झाला. समरसता मंचाचे संस्थापक सदस्य दादा इदाते समारोप करताना म्हणाले, “आम्ही समाजात अमृतसिंचन करण्यासाठी निघालो आहोत. परंतु अमृतसिद्धीसाठी हलाहल पचविणार्‍या भगवान शंकराची शक्ती अंगी असावी लागते. त्या भगवान शंकराचे आम्ही वंशज आहोत आणि समाजहितासाठी आशा प्रकारचे हलाहल पचविण्याची शक्ती संघविचारातून मिळाली आहे. समरस समजरूपी अमृतासाठी काहीही पचविण्याची आमची तयारी आहे!” परिषदेत टाळ्यांचा कडकडाट झाला. विरोध करायला आलेल्यांचा विरोध मावळला. बंधुत्वाचा जागर करीत समरसता मंचाचे काम पुढे गेले.
 
 
vivek
 
‘समरसता’ हा केवळ पांडित्याचा किंवा प्रबोधनापुरता मर्यादित विषय नसून समरसता हे जीवनमूल्य आहे, तो प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय आहे आणि हे ज्यांच्या संपर्कात आल्याबरोबर जाणवते, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. दादा इदाते. महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा राहिला नसेल, ज्यातील कार्यकर्त्यांना दादांनी समरसता विषय समजावून सांगितलेला नाही! त्यांच्या आयुष्याकडे पाहूनच कार्यकर्त्यांना समरसतेची प्रत्यक्ष ओळख पटते.
 
 
04 February, 2023 | 11:25

अस्थिरतेचा, मागासलेपणाचा शाप नशिबी आलेल्या भटक्या समाजातील जमातीत जन्म, पालावरचे, गरिबीच्या विळख्यातील बालपण ते समाजबांधणी-उभारणीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ‘पद्मश्री’ हा जवळजवळ अशक्य वाटणारा दादांचा जीवनप्रवास. कळत्या वयापासून ठरवून हाती घेतलेला देश-समाजसेवेचा वसा. ‘की न घेतले आम्ही हे व्रत अंधतेने’ या स्वा. सावरकरांच्या ओळींची आठवण व्हावी असे संघर्षांनी भरलेले जीवन आणि त्यातून सामाजिक समरसतेचा उत्तरोत्तर परिपुष्ट होणारा प्रवाह. दादांच्या कार्यकर्तृत्वाचे वर्णन एका लेखात करणे कठीण आहे. पण दोन शब्दांत सांगायचे, तर दादा इदाते हे ‘समरसतेचे विद्यापीठ’ आहे!
 
 
आपल्या अखंड, अविरत प्रवासांतून महाराष्ट्र व संपूर्ण देश पिंजून काढून समरसतेचा विषय सामाजिक विषयसूचीवर प्राधान्याने आणण्याचे कठीण काम दादा गेली अनेक वर्षे करीत आहेत. समरसता हा तर थेट माणसांच्या हृदयपरिवर्तनाचाच विषय! हे परिवर्तन सर्वांत कठीण! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परीसस्पर्शाने दादांचे जीवन उजळून निघाले आणि समरसतेचा जीवनविचार देत-देत अनेक कार्यकर्त्यांचे जीवन दादांनी उजळले आहे.
 
 
vivek
 
समाजसुधारकांनी मांडलेली मते आपल्याला पाहिजे तशी ‘वाकवून’ मांडणारे अनेक ‘वाकबगार’ महाराष्ट्रात विचारमाफियांच्या स्वरूपात वावरताना आपण पाहतो. स्वत:च्या जातीच्या, पंथाच्या, विचारप्रवाहाच्या संकुचित स्वार्थासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करून, पुन्हा धर्मनिरपेक्षतेचा टाहो फोडणार्‍या या तथाकथित पुरोगामी बुद्धिवंतांच्या चिंतनाच्या पार्श्वभूमीवर दादांचे चिंतन व लिखाण अधिक उठून दिसते. कारण त्यांनी ‘समाज तोडण्यासाठी नव्हे, तर समाज जोडण्यासाठी असतो’ या भूमिकेतून महापुरुषांच्या विचारांचे अध्ययन केले आहे. ‘सर्वच महापुरुषांनी आईच्या मायेने समाजाचा विचार केलेला आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही समाज जोडण्याचे काम करू!’ हा आश्वासक, सकारात्मक विचार दादांमुळे महाराष्ट्रातील समाजपरिवर्तनात सक्रिय होऊ इच्छिणार्‍या अनेक कार्यकर्त्यांना कामाची दिशा देऊन गेला आहे.
 
 
एखादा विषय ठरविताना समग्र विचार करणे, सुयोग्य कार्यकर्ता त्याला जोडणे, ठरविलेले ध्येय साध्य करण्यासाठी शांतपणे परंतु निग्रहपूर्वक प्रयत्न करणे हे गुणविशेष आपल्या आवतीभोवतीच्या सामान्य कार्यकर्त्यांतही उतरावेत यासाठी दादांचे प्रयत्न असतात. आपल्या आत्मीयतापूर्ण व अकृत्रिम व्यवहाराने त्यांनी हजारो कार्यकर्त्यांना कार्यप्रवण केले आहे.
 
 
सामाजिक चळवळींमध्ये, सामाजिक परिवर्तनाच्या विषयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उच्चारही निषिद्ध समजणार्‍या ‘पुरोगामी’ टोळ्यांचे राज्य महाराष्ट्राच्या ‘वैचारिक’ पटलावर कित्येक दशके राहिले. या काळात अनेक अवमान, उपेक्षा सहन करून दादा हिंदुत्वाचा सामाजिक आशय मांडत राहिले. साहित्य क्षेत्र, सेवा कार्ये, सामाजिक न्याय या क्षेत्रांत आज संघाचे व समरसता मंचाचे योगदान या तथाकथित पुरोगामी मंडळींनाही दुर्लक्षिता येत नाही, ते दादांसारखे दीपस्तंभ या क्षेत्रात उभे राहिले, म्हणूनच!
 
 
vivek
 
दलितांचे, भटके-विमुक्तांचे प्रश्न हे केवळ त्या त्या जातिगटांचे प्रश्न नसून समग्र हिंदू समाजाचेच प्रश्न आहेत. त्यामुळे हे प्रश्न गतीने सोडवीत असताना बंधुत्वावर आधारित समाजनिर्मिती व्हावी व सर्वांना शिक्षण, आरोग्य, आर्थिक उन्नयन या गोष्टी मिळाव्यात या विचारांतून सर्व समाजाचे सहकार्य मिळवीत अनेक सेवा प्रकल्प यशस्वीपणे चालविण्याचे काम दादांनी केले आहे. विषमतेविरुद्ध लढताना सदैव विद्रोही भूमिका घेण्यापेक्षा बंधुत्वाची जागृती करीत सर्व समाजाला बरोबर घेण्याची भूमिका त्यांनी मांडली. मात्र सामाजिक अन्यायाविरोधात आवश्यक तेथे रस्त्यावरचा संघर्षही दादांनी कधी टाळला नाही. अशा अनेक संघर्षांत जिद्दीने लढणार्‍या कार्यकर्त्याला दादांनी सर्व अर्थांनी ताकद दिलेली आहे.
 
 
 
दादांचे ओघवते वक्तृत्व श्रोत्यांसाठी वैचारिक मेजवानी तर असतेच, त्याहीपेक्षा महत्त्वाची असते ती त्यामागची सामाजिक परिवर्तनाची तळमळ! अनेक जाहीर सभांमधून दादांच्या भाषणानंतर अंतर्मुख झालेले श्रोते मी पाहिले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकांतून व प्रबोधन सत्रांतून दादांच्या विषय मांडणीनंतर नवीन काहीतरी सापडल्याचे समाधान प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर दिसते. समरसता चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्याने विचाराच्या लढाईतही मागे राहता कामा नये, यावर त्यांचा भर असतो. त्यासाठी आपल्या अफाट व्यासंगातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी नेमकेपणाने विषयाचे सर्व पैलू पुढे आणणे, ही दादांची खास हातोटी! त्याचबरोबर पुढच्या फळीतील कार्यकर्त्यांना विषय मांडण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना आत्मीयतेने सुधारणा सुचविणे व न विसरता त्यांचे कौतुक करणे हीदेखील दादांची वैशिष्ट्ये! महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात घडणार्‍या समरसतेला अनुकूल अथवा प्रतिकूल घटनांकडे दादांचे बारकाईने लक्ष असते. बर्‍याच वेळा, त्या भागातील कार्यकर्त्यांच्या आधी दादांनीच अशा घटनांची दखल घेतलेली असते. अशा घटनांवर आपल्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, याची चौकशी व त्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शनही ते करीत असतात.
 
 
 
दादांनी महाराष्ट्रभर उभ्या केलेल्या सेवा कार्यांच्या मांदियाळीतून आज शेकडो जीवने समर्थपणे उभी आहेत. संस्था उभारणे एक वेळ सोपे, पण त्या सांभाळणे कठीण! दादांनी कष्टपूर्वक उभारलेल्या सगळ्या संस्था आज निकोप व प्रभावशाली संस्थाजीवनाचा वस्तुपाठ समाजात घालून देत आहेत. या संस्थांचे विचार व व्यवहार यांवर दादांचे बारीक लक्ष असते. त्यात काम करणार्‍या प्रत्येकाच्या विकासाकडे त्यांचे लक्ष असते. महाराष्ट्र सरकारने भटके-विमुक्त समाजाच्या दु:स्थितीवर अभ्यास करून उपाययोजना शोधण्यासाठी नेमलेल्या ‘इदाते आयोगाचे’ काम असेल किंवा केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत आणि नीती आयोगासह केलेले काम असेल.. स्वातंत्र्योत्तर आपल्या देशातील सामाजिक न्याय क्षेत्रातील सांविधानिक सुधारणांचा इतिहास लिहिला, तर दादांचे काम त्यात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. केंद्र सरकारच्या सांविधानिक पदांवर असताना त्यांना केंद्रीय मंत्र्याचा दर्जा होता. तो सगळा डामडौल दादांनी कधीच मिरविला नाही. लाल दिव्याची गाडी न वापरता सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी मुक्कामाला जाणार्‍या दादांनी त्यांच्यातील स्वयंसेवक कार्यकर्ता सदैव जागृत ठेवला, म्हणून अगदी नवीन कार्यकर्त्यालाही त्याचा लहानात लहान प्रश्न घेऊन दादांकडे जायला संकोच वाटत नाही. त्यांच्या सर्वार्थाने ‘मोठे’ असण्याचे दडपणही जाणवत नाही. वलयांकित असूनही इतरांना त्याची जाणीवही न होऊ देणे यात दादांचे मोठेपण आहे.
 
 
 
सामाजिक कामात नैराश्याचे प्रसंगही येतात. संघटनात्मक वाटचालीतही कधी कधी काही खुपत राहते. अशा वेळी दादांबरोबर एखादी बैठक, प्रवास, अगदी फोनवरील संभाषणही कार्यकर्त्याची मरगळ दूर करते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाप्रमाणे पूर्णवेळ समाजासाठी समर्पण करूनही दादांनी प्रचारक नसलेल्या कार्यकर्त्यांसाठी घर व सामाजिक काम, दोहोंची जबाबदारी उत्तमपणे सांभाळण्याचा आदर्श उभा केलेला आहे.
 
 
 
संघाच्या कामासाठी अशक्य वाटणारे प्रवास करताना स्वत:च्या प्रकृतीच्या तक्रारींचा कधीही बाऊ न करणारे, पण त्याचबरोबर डॉक्टरांनी आरोग्यासाठी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळणारे दादा.. शहरात, महानगरात एखाद्या मोठ्या कार्यक्रमांत गौरवमूर्ती म्हणून वावरताना भटक्या-विमुक्तांच्या छोट्या वस्तीवरील एखाद्या कार्यकर्त्यांच्या व्यवस्थेसाठी स्वत: लक्ष घालणारे दादा.. धारिष्ट्य करून ‘लहान तोंडी मोठा घास’ अशी एखादी गोष्टही सुचविली तर ती गांभीर्याने घेऊन, त्यावर योग्य त्या स्तरांवर विचारमंथन घडवून बदल घडवून आणणारे दादा.. घरातील सर्वांची आपुलकीने चौकशी करणारे दादा.. भारतरत्न डॉ. आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील समरसतेचे प्रसंग आपल्या ओघवत्या वाणीने मांडणारे दादा.. कार्यकर्त्याला जपणारे दादा.. चिंचवडच्या अधिवेशनात टेक्सास गायकवाडांच्या अनपेक्षित विचित्र भाषणानंतर अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या एकाच अविस्मरणीय भाषणाने पुन्हा सगळ्यांना सकारात्मक मानसिकतेत आणणारे दादा.. अशा एक ना अनेक प्रसंगांतून दादांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मनावर कोरले गेलेले आहे.
मा. दादांना ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्याची घोषणा होताच महाराष्ट्रातील समरसता आणि सामाजिक न्याय क्षेत्रातील माझ्यासारख्या हजारो सामान्य कार्यकर्त्यांना आपलाच सन्मान झाल्याची भावना निर्माण झाली.
 
 
 
साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हे ओळखून वीस-पंचवीस वर्षांपूर्वी दादांनी समविचारी मंडळींसह समरसता साहित्य परिषदेची स्थापना केली. समरसता हे जीवनमूल्य आणि साहित्यमूल्यदेखील आहे, या बांधिलकीने लिहिणारे अनेक ख्यातकीर्त साहित्यिक जोडले. अनेकांना लिहिते केले.
 
 
 
समरसता साहित्य परिषदेचे संस्थापक कार्याध्यक्ष असणारे दादा, परिषदेचे आणखी एक अध्वर्यू मा. रमेश पतंगे आणि लोकसाहित्याचे अभ्यासक आणि समरसता साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. प्रभाकर मांडे या तीन ऋषितुल्य व्यक्तींचा एकाच वर्षी पद्मश्रीने गौरव होत आहे. समरसता साहित्य परिषदेसाठी हा अत्यंत भाग्याचा क्षण आहे. हा आनंद साजरा करीत असतानाच, या मान्यवरांनी घालून दिलेल्या आदर्शांच्या वाटेवरून चालत ही चळवळ अधिक परिपुष्ट करण्याचे स्मरण करणे हे समरसता साहित्य परिषदेचा विद्यमान कार्यवाह म्हणून माझे कर्तव्य आहे.
 
 
मुक्तसंगोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वित:।
सिध्यसिद्धयोनिर्विकार: कर्ता सात्विक उच्यते॥
 
 
‘सात्त्विक कर्त्या’ गटातील व्यक्ती सर्वत्र वंदनीय असतात. मा. दादांच्या रूपाने महाराष्ट्राला असाच एक सात्त्विक कर्ता लाभलेला आहे. सर्व कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या दादांना दीर्घायुष्य लाभावे आणि भारतमातेच्या या थोर सुपुत्राकडून ‘समतायुक्त, शोषणमुक्त, एकात्म, एकरस’ समाजनिर्मितीसाठीची चळवळ आणखी मजबूत व्हावी, ही परमेश्वरचरणी प्रार्थना!
 
 
(‘कर्मवीर दादासाहेब इदाते गौरव ग्रंथ 2011’ यातील पूर्वप्रसिद्ध लेखाचा संपादीत अंश)

डॉ. प्रसन्न पाटील

डॉ. प्रसन्न पाटील हे औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात डॉक्टर आहेत.