तथागत सांगून गेले..

21 Feb 2023 16:18:17
 
vivekतथागत गौतम बुद्ध यांनी 2600 वर्षांपूर्वी जे सांगितले, त्याचे मला उद्धव ठाकरे यांची स्थिती पाहता स्मरण झाले. मला झालेले स्मरण वाचकांपर्यंत पोहोचवावे, असे वाटल्याने हा लेख लिहिला आहे, यात कोणाला उपदेश करण्याचा माझा मानस नाही.
  
एकेकाळचे शिवसेना पक्षप्रमुख यांचा 2019नंतरचा प्रवास सहज डोळ्यापुढे येतो. 2019 साली त्यांनी भाजपाशी युती केली, त्याच वर्षी त्यांनी ती युती मोडली. नंतर महाविकास आघाडी निर्माण केली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. नंतर कोरोना आला. ते घरी बसले आणि 2022 साली 40 आमदार आणि 12 खासदार त्यांना सोडून गेले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेना कोणाची? हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. निवडणूक आयोगाने नुकताच निकाल देऊन पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देऊन टाकले. निवडणूक आयोग, भाजपा यांच्यावर उद्धव ठाकरे गेले काही दिवस मनसोक्त तोंडसुख घेत आहेत. याशिवाय ते दुसरे काही करू शकत नाहीत. त्यांना ‘मोकळे’ होण्यास आपण वाव द्यायला काही हरकत नाही.
 
 
 
मी जर असे म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्या या प्रवासावर 2600 वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी भाष्य केले आहे, तर वाचक मला हसतील आणि म्हणतील की, काहीतरीच सांगू नका! तरीदेखील मी तथागतांचे तीन उपदेश येथे देतो. ते वाचून वाचकांनीच आपले मत बनवावे.
 
 
21 February, 2023 | 16:39
 
भिक्खू संघासमोर बोलत असताना तथागत म्हणाले, “या जगात चार प्रकारचे लोक असतात. कोणत्या चार प्रकारचे? पहिल्या प्रकारात अंधारातून अंधाराकडे जाणारे लोक असतात. दुसर्‍या प्रकारात अंधारातून प्रकाशाकडे जाणारे लोक असतात. तिसर्‍या प्रकारात प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे लोक असतात आणि चौथ्या प्रकारात प्रकाशाकडून उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे लोक असतात.”
 
 
तथागत पुढे म्हणतात की, “पहिल्या प्रकारचे लोक शरीराने, वाणीने आणि मनाने चुकीच्या मार्गाने जातात, त्यामुळे मृत्यूनंतर त्यांचा जन्म वाईट परिस्थितीच्या घरात होतो. अशा प्रकारे पहिल्या प्रकारातील माणूस अंधारातून अंधाराकडे जातो.” येथे पुनर्जन्म हा विषय आपण सोडून देऊ. या जन्मात माणूस वेगवेगळी रूपे घेऊन जन्म घेतच असतो. काही जण अंधारातून अधिक अंधाराकडे जातात.
 
 
अंधारातून प्रकाशाकडे जाणारा माणूस शरीराने, मनाने आणि वाणीने चांगले कृत्य करतो, त्यामुळे मृत्यूनंतर त्याचा जन्म सुखी कुटुंबात होतो. अशा प्रकारे हा माणूस अंधारातून प्रकाशाकडे जातो.
 
 
तिसर्‍या प्रकारातील माणूस प्रकाशाकडून अंधाराकडे जातो. तो दिसायला चांगला असतो, उमद्या व्यक्तिमत्त्वाचा असतो, परंतु तो शरीराने, वाणीने आणि मनाने चुकीची कर्मे करतो, त्यामुळे मृत्यूनंतर त्याचा जन्म दु:खी कुटुंबात होतो. या प्रकारे हा मनुष्य प्रकाशाकडून अंधाराकडे जातो. या प्रकारात दिलेला माणूस हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मतो. सर्व काही त्याला आपोआप प्राप्त होते. वैभव प्राप्त करण्यासाठी त्याला कष्ट करावे लागत नाहीत. परंतु गैरवर्तणुकीने तो आपले सर्व वैभव हळूहळू घालवून बसतो, अशा प्रकारे तो प्रकाशातून अंधाराकडे जातो.
 
 
चौथ्या प्रकारातील माणूस प्रकाशाकडून प्रकाशाकडे जातो. त्याचाही जन्म उच्च आणि श्रीमंत कुळात झालेला असतो. त्याच्याकडे अफाट संपत्ती असते. व्यक्तिमत्त्वदेखील देखणे असते. तो शरीराने, मनाने आणि वाणीने चांगलीच कर्मे करतो. या कर्मांचे फळ म्हणून त्याचा पुनर्जन्मदेखील फार श्रेष्ठ कुळात होतो. भगवंत आपल्या शिष्यांना सांगतात की, अशा प्रकारे चार प्रकारचे लोक जगात असतात. आपल्या शिष्यांना त्यांचे सांगणे असे आहे की यातील कुठल्या प्रकारात आपण जायचे, हे आपण ठरवायचे आहे.
भगवंतांचा आणखी एक उपदेश असा आहे. ते म्हणतात, ‘भिक्खू हो, समजा, डोंगराच्या जंगलात राहणारी एक गाय आहे. ही गाय मूर्ख, अकुशल, अनुभवहीन आणि डोंगराचा रस्ता पार करण्याची अजिबात सवय नसलेली आहे. तिला एकदा असे वाटले की, आपण हा डोंगर चढून गेले पाहिजे, दगड-धोंड्यांची, खाचा-खळग्यांची वाट पार करून वर असलेले ताजे गवत खाल्ले पाहिजे. असा विचार करून तिने एक पाऊल टाकले. ते पाऊल पुरेसे स्थिर होण्याआधीच तिने दुसरे पाऊल उचलले. पायाखालचे दगड-गोटे निसटले आणि ती आडवी झाली. तिला जखमा झाल्या आणि जखमी होऊन ती पुन्हा आपल्या मूळ स्थानी आली. भिक्खूगण, असे का झाले? असे झाले, कारण त्या गायीला डोंगर चढण्याचा काही अनुभव नव्हता, ती अकुशल होती आणि मूर्ख होती.”
 
 
vivek
 
भगवंतांना हे सांगायचे आहे की, ‘उंच जागी जाण्याची महत्त्वाकांक्षा जरूर असावी, परंतु त्यासाठी आधी आपली लायकी निर्माण केली पाहिजे. जेथे जायचे त्या जागेचा थोडाबहुत अनुभव घ्यायला पाहिजे. त्या स्थानी जाण्याची वाट सरळ आहे की वाकडीतिकडी आहे, खाचा-खळग्यांची आहे, याची माहिती करून घेतली पाहिजे. जाण्यापूर्वी शक्य तेवढी वाट मोकळी केली पाहिजे यापैकी काहीही केले नाही, तर आपटी खायला होते आणि जखमा होतात.’
 
 
एके दिवशी भगवंतांचा प्रिय शिष्य आनंद भगवंतांजवळ जाऊन त्यांना नमस्कार करून एका बाजूला बसला. तो भगवंतांना म्हणाला, “हे गुरुवर्य, मला असे वाटते की, चांगली मैत्री, चांगल्या लोकांची संगत आणि चांगल्या लोकांचा सहवास यामुळे अर्धे जीवन पवित्र होते.”
 
 
यावर भगवान बुद्ध म्हणाले, “असे नाही. चांगली मैत्री, चांगल्या लोकांची संगत आणि चांगल्या लोकांचा सहवास, सहचर याने अर्धे जीवन पवित्र होते असे नसून संपूर्ण जीवनच पवित्र होते. जेव्हा भिक्खूला वरीलप्रमाणे चांगली संगत लागते, तेव्हा त्याचा आत्मिक विकास अतिशय झपाट्याने होतोे.”
 
 
भगवंतांचे हे सांगणे आहे की, नेहमी चांगले मित्र जोडावे. चांगला मित्र कोणाला म्हणायचे, याच्यादेखील त्यांनी काही कसोट्या सांगितल्या आहेत - ‘जो संकटात बरोबर असतो, जो समृद्धीतही बरोबर असतो, जो उत्तम सल्ला देतो, ज्याच्या मनात एक आणि बाहेर एक असे काही नसते, जो आपल्या हिताचीच काळजी करतो, त्याला चांगला मित्र समजले पाहिजे. मित्राचे सोंग आणून मैत्री करणारे खूप असतात. त्यांचे लपलेले स्वार्थ असतात. स्वार्थ साधण्यासाठी ते खूप स्तुती करतात. तोंडावर गोड बोलतात, वरवर दिसणारा, पण दीर्घकाळाचा विचार करता धोकादायक सल्ला देतात, असे मित्र टाळले पाहिजेत’ असे भगवंतांचे सांगणे आहे. जी शहाणी माणसे याप्रमाणे वागतात, त्यांना पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही. ‘मी फसवला गेलो’, ‘माझा विश्वासघात झाला’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येत नाही.
 
 
 
तथागत भगवान गौतम बुद्ध अतिशय सुंदर दृष्टान्त देऊन आपले म्हणणे मांडताना दिसतात. भिक्खूंपुढील या उपदेशात त्यांनी ढगांचा दृष्टान्त मांडलेला आहे, ते म्हणतात, ‘भिक्खू हो, चार प्रकारचे ढग असतात. कोणते चार प्रकार? पहिल्या प्रकारातील ढग केवळ गर्जना करतात, पण पाऊस पाडत नाहीत. दुसर्‍या प्रकारातील ढग गडगडाट करीत नाहीत, पण पाऊस पाडतात. तिसर्‍या प्रकारातील ढग आवाजही करीत नाहीत आणि पाऊसही पाडत नाहीत आणि चौथ्या प्रकारातील ढग गडगडाटही करतात आणि पाऊसही पाडतात. या ढगांप्रमाणे चार प्रकारचे लोक समाजात असतात.’
 
 
 
नुसताच आवाज करणारा आणि पाऊस न पाडणारा ढग जसा असतो, तसे समाजात काही लोक असतात, जे फक्त बडबड करीत असतात, त्यांच्याकडून कसलीही कृती होत नाही. दुसर्‍या प्रकारातील ढगाप्रमाणे समाजातील काही लोक काम करीत राहतात, कामाचा डंका पिटत बसत नाहीत. आवाजाशिवाय पाऊस पाडणार्‍या ढगासारखे हे लोक असतात. तिसर्‍या प्रकारात असे लोक येतात, जे काही बोलतही नाहीत आणि काही कामही करीत नाहीत आणि चौथ्या प्रकारात असे लोक येतात, जे बोलल्याप्रमाणे काम करतात. त्यांचे बोलणे आणि कृती एकसारखी असते.
 
 
 
ज्याला समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर नेतृत्व करण्याची ऊर्मी आहे, त्याने या चार प्रकारच्या माणसांचा विचार केला पाहिजे, बोलघेवडे अनंत मिळतात, कृतिवीर कमी असतात. टाळ्या वाजविणारे अनेक हात असतात आणि जिंदाबादच्या घोषणा देणारे अनेक कंठ असतात, त्यातील गरजणारे आणि बरसणारे किती, हे शोधावे लागतात. नाहीतर फसगत होते. ढगाने आकाश भरले म्हणून शहाणा शेतकरी पेरणी करायला लागत नाही. तो बघतो की यातील नुसते गडगडणारे किती आहेत आणि बरसणारे किती आहेत, हे पाहून तो पेरणी करतो. या शहाण्या शेतकर्‍याचे पीक चांगले येते. नुसतेच आवाज करणारे ढग खूप असतात आणि ते वेगवेगळ्या व्यासपीठांवरून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढीत असतात. परंतु ते कधीही पाऊस पाडू शकत नाहीत. अगदी राजकीय भाषेत सांगायचे तर, मतांचा पाऊस पाडू शकत नाहीत, हे लक्षात घ्यावे लागते.
 
 
तथागत गौतम बुद्ध यांनी 2600 वर्षांपूर्वी जे सांगितले, त्याचे मला उद्धव ठाकरे यांची स्थिती पाहता स्मरण झाले. मला झालेले स्मरण वाचकांपर्यंत पोहोचवावे, असे वाटल्याने हा लेख लिहिला आहे, यात कोणाला उपदेश करण्याचा माझा मानस नाही. मी फक्त भारवाही हमालाचे काम केलेले आहे.
Powered By Sangraha 9.0