पक्ष गेला, चिन्ह गेले, हाती रडणे-टोमणे आले

18 Feb 2023 15:51:44
 
 
shivsena
 मुख्यमंत्री होण्याचा सल्ला कोणी तरी दिला आणि त्यातून उभी राहिला अधर्माचा एक सिलसिला. त्याची परिणती काय? तर मित्र नाहीत, सहकारी नाहीत, पक्ष नाही नि संघटना नाही अशा अवस्थेतील भयाण एकटेपण. पक्ष गेला, चिन्ह गेले, राज ठाकरे म्हणतात तसे नावही गेले आणि हाती आता फक्त रडणे-टोमणे आले, अशी त्यांची अवस्था झाली. बाळासाहेब ठाकरेंनी अत्यंत मेहनतीने शिवसेना वाढवगली, जनतेमध्ये विश्वास निर्माण केला. घराघरात, मनामनात एक विशिष्ट स्थान निर्माण केले होते. त्याच बाळासाहेबांचा आपण पुत्र आहोत, या आढ्यतेतून उद्धवरावांनी त्या सर्वांवर बोळा फिरविला होता. म्हणूनच "उद्धवरावांनी गहाण टाकलेला धनुष्यबाण आम्ही सोडविला" असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तेव्हा ते केवळ राजकीय वक्तव्य नव्हते. ती ठाम वस्तुस्थिती आहे.
भीमाच्या प्रहारांनी विद्ध झालेला दुर्योधन रणांगणावर पडला होता. त्याचे सर्वांग रक्तबंबाळ झाले होते. काही क्षणांचाच प्रश्न होता, मात्र त्याही स्थिती त त्याने श्रीकृष्णाकडे पाहून तीन बोटे दाखविली. त्याला काही तरी सांगायचे होते, पण ते सांगण्याचेही त्राण त्याच्यात नव्हते. अत्यंत हळू आवाजात तो बोलत होता. त्यामुळे श्रीकृष्णच त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारले, "तुला काय म्हणायचे आहे?" तो म्हणाला, "युद्धात मी तीन चुका केल्या आहेत, त्यामुळेच माझा पराजय झाला आणि ही अवस्था झाली आहे." त्या तीन चुका म्हणजे त्याने स्वतः नारायणांच्या जागी नारायणी सेनेची निवड केली. जर नारायणच (श्रीकृष्ण) कौरवांच्या पक्षात असते, तर परिणाम अगदी वेगळा झाला असता. दुसरी चूक म्हणजे आईने लाख सांगूनही तो तिच्यासमोर वल्कले नेसून गेला. जर तो गांधारीसमोर नग्नावस्थेत गेला असता, तर त्याला कोणीही योद्धा हरवू शकला नसता. तिसरी चूक म्हणजे तो युद्धात अगदी शेवटी गेला. तो सर्वात आधी गेला असता, तर अनेक गोष्टी समजून घेता आल्या असत्या आणि कदाचित त्याच्या भावांचे-मित्रांचे प्राण वाचले असते.
 
 
दुर्योधनाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, "तुझा पराजय झाला, त्याचे मुख्य कारण या तीन चुका नाहीत, तर तुझे अधर्मी आचरण आणि अहंकार हे होते. तू स्वतः आपल्या कर्मांनी स्वतःचे प्रारब्ध लिहिले आहेस."
 
 
महाभारतातील ही कथा आज जशीच्या तशी लावायची म्हटली, तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबाबत लावता येईल. एकेकाळी मुंबईवर एकहाती सत्ता चालविणारा आणि महाराष्ट्रात सत्तेचा भागीदार असलेला हा पक्ष लोळागोळा होऊन पडला आहे. त्यामागची कारणे अनेक आहेत आणि अनेक जण ती सांगत आहेत. अगदी निवडणूक आयोगाच्या ७८ पानांच्या आदेशातील पान न् पान खंगाळून काढून ती कारणे सांगितली जात आहेत. मात्र या अनवस्थेचे मूळ कारण वेगळेच आहे. ते म्हणजे अधर्म आणि अहंकार.
 
 
तीन दशकांची मैत्री तोडून आपल्या अहंकारासाठी ज्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सवतासुभा केला, त्याच दिवशी त्यांची अनवस्था निश्चित झाली होती. केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील कार्यकर्ते यांची इच्छा नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लावून उद्धवरावांच्या पक्षाशी युती केली. त्या मित्रभावनेची बूज राखणे तर दूरच, उद्धवरावांनी फडणवीसांना दगा देऊन सत्तेचा घाट घातला अन् त्याच दिवशी त्यांचे पतन निश्चित झाले. कारण अधर्माच्या वाटेवरून पुढे जाण्याचे त्यांनी नक्की केले होते आणि अधर्माचा रस्ता केवळ पतनाकडे जातो. ज्या युतीच्या नावाने मते मागून ५०-६० आमदार जमविले होते, त्याच युतीतील भागीदाराला १०५ आमदार घरी बसविले म्हणत खिजविले, त्याच दिवशी ही विकलता निश्चित झाली होती. कारण शकुनीच्या संगतीने सोंगट्याच्या डावात पांडवांना हरविताना जो अहंकार, जी मस्ती दुर्योधनाने दाखविली होती, तोच अहंकार, तीच मस्ती त्या खिजविण्यातही दिसून आली होती. तो अहंकार पदोपदी दिसून आला होता. त्याचे कुरुक्षेत्र कुठे तरी होणारच होते. ते शुक्रवारी झाले. (हाही काय योगायोग म्हणावा?)
 
shivsena
 
कोरोनाच्या काळात जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडा म्हणत भक्तमंडळी आग्रह करत होती, तेव्हा 'देवांनी मैदान सोडले' असे उन्मत्त अग्रलेख लिहिण्यात उद्धवरावांची सेना गर्क होती. केवढी मस्ती, केवढा मद!! ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा जागर केला, त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव 'मी सगळ्या देवांचा बाप आहे' म्हणत दैवतांचा अपमान करणाऱ्यांच्या भजनी लागले होते. त्यांनी स्वतःचा शकुनी शोधूनच काढला होता जणू! मी बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र, मला कोण हात लावणार? हा आविर्भाव बाळगत इंदिरा गांधीच्या थाटात लोकांना चिरडण्यात उद्धवराव रमले होते. त्यामुळे करमुसे प्रकरणापासून केतकी चितळे प्रकरणापर्यंत अत्याचार घडताना त्यांची संवेदना कधी जागली नाही. त्यामुळे आज ही विकलावस्था येणे स्वाभाविक होते. "जिस तरह आज मेरा घर टूटा है, उस तरह एक दिन तेरा घमंड ही टूटेगा" हे कोणी बोलूनच दाखवायला पाहिजे असे नाही. पण ते बोलूनही दाखविण्यात आले आणि तरीही नियतीचा संकेत उद्धवरावांना कळत नव्हता. इसापच्या कथेतील बेडकीच्या पिल्लांनी तिला फुगून फुगून फुटायला लावले, तशीच काहीशी उद्धवरावांची गत झाली. आपण कितीही फुगलो तरी बैल होऊ शकत नाही, हे लक्षात न आलेल्या बेडकीच्या नशिबी फुटणेच लिहिलेले असते.
 
 
शेक्सपिअरच्या मॅक्बेथमध्ये चेटकिणी मॅक्बेथला सांगतात की तो राजा बनणार आहे. राजा बनण्याच्या या वेडातून मॅक्बेथ अनाचार करत सुटतो. त्यातून खुनांची एक मालिका उभी राहते आणि शेवटी काय होते? तर आपल्याच गुन्ह्यांच्या अपराधभावनेने मॅक्बेथ व त्याची बायको दोघेही वेडे होतात. उद्धवरावांना मुख्यमंत्री होण्याचा सल्ला असाच कोणी तरी दिला आणि त्यातून उभी राहिला अधर्माचा एक सिलसिला. त्याची परिणती काय? तर मित्र नाहीत, सहकारी नाहीत, पक्ष नाही नि संघटना नाही अशा अवस्थेतील भयाण एकटेपण. पक्ष गेला, चिन्ह गेले, राज ठाकरे म्हणतात तसे नावही गेले आणि हाती आता फक्त रडणे-टोमणे आले, अशी त्यांची अवस्था झाली.
 
बाळासाहेब ठाकरेंनी अत्यंत मेहनतीने शिवसेना वाढवगली, जनतेमध्ये विश्वास निर्माण केला. घराघरात, मनामनात एक विशिष्ट स्थान निर्माण केले होते. त्याच बाळासाहेबांचा आपण पुत्र आहोत, या आढ्यतेतून उद्धवरावांनी त्या सर्वांवर बोळा फिरविला होता. म्हणूनच "उद्धवरावांनी गहाण टाकलेला धनुष्यबाण आम्ही सोडविला" असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तेव्हा ते केवळ राजकीय वक्तव्य नव्हते. ती ठाम वस्तुस्थिती आहे. असो.
 
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्य-बाण’ हे पक्षचिन्ह हे दोन्ही वापरण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला (गटाला नव्हे) दिलाय. बाळासाहेबांचा पक्ष त्यांच्या अस्सल आणि योग्य वारसदाराकडे गेलाय. शिवेसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले. या दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती. या सुनावणीतसुद्धा उद्धवरावांच्या गटाने काय कमी आढ्यता दाखविली? काय कमी अहंकार दाखविला? पण ती ठरली घटनात्मक संस्था. तिथे हा गर्व चालला नाही. इतकेच नाही, तर शिवसेना पक्षाची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षणही निवडणूक आयोगाने नोंदविले आहे.
 
हे सगळे झाल्यावर कर्णाला जसे समोर काळ दिसू लागल्यावर धर्म आठवला, तसा आपण पूर्ण उद्ध्वस्त झाल्यानंतर उद्धवरावांना लोकशाही आठवायला लागली. मी माझ्या वडिलांना वचन दिलंय, हा कधी कोणाला माहीत नसलेला दावा करतानाही कुठे होती लोकशाही? त्या दाव्याच्या पूर्तीसाठी का होईना, जेव्हा अगतिक देवेंद्र फोन करत होते, तेव्हा तो फोन घेण्याची तसदीही जे घेत नव्हते, ते आता लोकशाहीचे गाऱ्हाणे मांडत आहेत.
 
 
खैर! आता जे व्हायचे ते होऊन गेले आहे. आता पुढचा टप्पा सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाचा असणार आहे. त्यातही हीच नामुश्की उद्धवरावांच्या नशिबी येणार आहे. कदाचित त्यासाठी त्यांच्या मनाची तयारीही एव्हाना झाली असणार. केवळ भाषण, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक आवाहन करून पक्ष चालत नाही. नेतृत्व करण्याची क्षमता, संघटनकौशल्य आणि विशेष म्हणजे सामान्य व्यक्ती बनून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे हेही आवश्यक असते, हे त्यांच्या लक्षात येण्याची अपेक्षा नाही. पण आले, तर त्यांच्या दृष्टीने बरे.
 
 
महाविकास आघाडी नावाचा प्रयोग केल्यानंतर उद्धवरावांना जे नवीन मित्र मिळाले, त्यांनी त्यांना जनाब उद्धव ठाकरे केलेच होते. त्याच मित्रांच्या भाषेत उद्धवरावांचे माध्यमनिर्मित चाणक्य संजय राऊत शेरोशायरी करून सत्तेच्या माजाला अलंकारिक साजही चढवीत होते. त्याच भाषेत एक शेर आहे, त्याच्या ओळी आज उद्धवरावांच्या पक्षाला जशास तशा बसतात -
 
 
ख़ुदा और नाख़ुदा मिल कर डुबो दें ये तो मुमकिन है|
 
 
मेरी वज्ह-ए-तबाही सिर्फ़ तूफ़ाँ हो नहीं सकता|
 
 
अर्थात – ईश्वर आणि नावाडी या दोघांनी मिळून (नौका) बुडविली असेल, हेच शक्य आहे. माझ्या उद्ध्वस्त होण्याला केवळ वादळ कारणीभूत असू शकत नाही. यातील ईश्वर म्हणजेच नारायण धर्माच्या बाजूने उभा राहतो. पण नावाडी कोण, हे वेगळे सांगायला हवं का?
Powered By Sangraha 9.0