कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन सरकार जे काम करू शकत नाही, ते काम आज धर्माधिकारी कुटुंबीयांनी आपल्या अमोघ वाणीने, नि:स्वार्थी वृत्तीने केले आहे. त्यासाठी पू. नानासाहेब, आप्पासाहेब यांनी आपला देह चंदनासारखा झिजवला आहे. सामान्यांचे दुख समजून घेतले, त्यांना जवळ करून मायेने त्यांच्या दु:खाचे मूळ समजावले.. आणि एवढे सर्व करूनही एका समान्य व्यक्तीप्रमाणेच आपले वर्तन ठेवले. ही खरेच असामान्य गोष्ट फार कमी लोकांमध्ये पाहण्यास मिळते. ती धर्माधिकारी कुटुंबीयांमध्ये आहे. त्यांनी बैठकीच्या माध्यमातून समर्थांचे विचार घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम केले.
“शेठ, आज दुपारनंतर आम्ही निघणार आहोत.”
“का? काय झालं? दोन दिवसांत शेत लावले पाहिजे.”
“नाही, पण आज दुपारनंतर आम्ही बाहेर जातोय. उद्या वाटल्यास लवकर येऊन सायंकाळी उशिरापर्यंत काम करून पूर्ण करू. पण आज जावे लागेल.”
शेवटी शेठने रागाने विचारले की, “अरे, पण तुम्ही जाता कुठे?”
“आज आप्पास्वारी तालुक्याच्या गावाला येणार आहेत. त्यांच्या दर्शनाला जायचे आहे.”
शेठ काही बोलला नाही, कारण त्याला श्री सदस्यांची आपल्या कार्याप्रतीची निष्ठा माहीत होती. नानासाहेब धर्माधिकारी यांचे बैठक संप्रदायाचे कार्य किती सामान्य लोकांपर्यंत पोहोचले आहे, याची या प्रसंगावरून प्रचिती येते. आपली अर्ध्या दिवसाची मजुरी सोडून अशा लाखो महिला आठवड्यातील एका वारी बैठकीला जातात, तेथे मनाच्या श्लोकांचे पारायण करतात, दासबोधातील ओव्यांवरील निरूपण तल्लीन होऊन ऐकतात.. आणि हे विचार जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतात.. ही सामान्य गोष्ट नाही.
-----
मुरुड जंजिरा या निसर्गरम्य तालुक्यातील वेळास्ते, खोपरी, वडघर, सुपेगाव ही डोंगरामध्ये वसलेली गावे. तीन दशकांपूर्वी या गावांत वीजही नव्हती. आता गावातील विद्यार्थी शाळेत जावेत म्हणून या गावात फक्त सकाळी आणि सायंकाळी एसटी जाते. 10 वर्षांपूर्वी दळणवळणाचे तेही साधन नव्हते. तेथील रस्ते अगदी कच्चे.. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास किंवा अन्य काही झाल्यास गावात रिक्षा जाते, तीही रिक्षावाल्यांच्या हातपाया पडल्यानंतर.. कारण रस्त्यांची झालेली दुर्दशा, त्यात पडलेले मोठे मोठे खड्डे. त्यामुळे रिक्षा किंवा तत्सम वाहन मध्येच बंद पडण्याचीही शक्यता जास्त. अशा दुर्गम गावात 40 वर्षांपेक्षा अधिक वर्षे बैठक चालते. कोणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. महाराष्ट्रात अशी असंख्य गावे आहेत, जेथील लोक बैठकीला जात आहेत. समर्थांचे विचार केंद्रस्थानी ठेवून आपला जीवन विकास करीत आहेत.
-------
वरील दोन्ही प्रसंगांवरून लक्षात आले असेल की, पू. नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943मध्ये सुरू केलेल्या बैठक संप्रदायाचे काम किती तळगळातील व्यक्तीपर्यंत नि:स्वार्थीपणे पोहोचले आहे. ना कोणती प्रसिद्धी, ना कोणत्या पेपरमध्ये जाहिरात.. ना वर्गणी, ना आजच्या प्रचाराचे सोशल मीडिया साधन.. तरीही लाखो लोक जोडले गेले आहेत. हे बदल एका रात्रीत घडले नाहीत, तर यासाठी धर्माधिकारी कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला त्यांनी धर्म-अर्थ-काम-मोक्ष ह्या अशा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख करून दिली. त्यामुळे लाखो संसार उद्ध्वस्त होता होता वाचले आहेत. ज्या तरुणांच्या हातात दारू आणि पत्ते दिसायचे, त्या युवकांच्या हातात गुरुचरित्र आणि दासबोध दिसू लागले आहेत. गावागावात परिवर्तन होत आहे. आज रायगड जिल्ह्यात रेवदंडा येथे लावलेल्या रोपट्याचा महावृक्ष झाला आहे. परदेशातही बैठका चालू लागल्या आहेत. आजही निष्काम कर्मयोग्याप्रमाणे त्यांचे सुपुत्र पद्मश्री डॉ.श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व नातू सचिनदादा धर्माधिकारी हे कार्य यशस्वीरित्या पुढे घेऊन जात आहेत.
पद्मश्री डॉ.श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे कोणीही पाहिले, तर एक समान्य व्यक्ती असाच त्यांचा देहभाव, देहबोली वाटते. कोणातही अभिनिवेश नाही, कोणत्याही जाहीर कार्यक्रामात आक्रोशाने बोलणे नाही, राजकीय, सामाजिक वादात पडणे नाही किंवा आपल्या निरूपणात कोणत्याही धर्माची, पंथाची किंवा व्यक्तीची निंदानालस्ती करणार नाही. त्यामुळे जेव्हा त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तेव्हा ‘आप्पासाहेब कोण आहेत?’ अशी अनेकांकडून विचारणा होऊ लागली होती. हेच तर केंद्र सरकारचे यश होते. समाजात The Silent Social Revolution काम करणार्या अशा अलक्षित महापुरुषांना पद्मश्री देण्याचे काम भाजपाची सत्ता आल्यानंतर केले गेले. साहजिकच गेल्या चार पिढ्या अव्याहतपणे महाराष्ट्रात काम करत असलेल्या धर्माधिकारी कुटुंबीयांकडे सरकारची नजर गेली आणि अप्पासाहेब यांना पद्मश्री दिली गेली. आता महाराष्ट्र सरकारने अप्पासाहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला, याबद्दल सरकारचेही आभार मानले पाहिजेत, कारण अशा रत्नांकडे सरकारचे नेहमीच दुर्लक्ष होत असते. सरकारने दखल घ्यावी यासाठी ते त्यांचे काम करत नसतात. पण तरीही सरकारने स्वत:होऊन त्यांचा सन्मान केला, तर तो त्यांना अधिक प्रोत्साहित करणारा असतो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून हेच दिसून आले. रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्व. ए.आर. अंतुले यांनी पू. नानासाहेब धर्माधिकारी यांचा अनेक वेळा सत्कार केला. पण केंद्र शासनाकडे त्यांच्या कार्याची माहिती पोहोचवू शकले नाहीत, हे आज खेदाने नमूद करावेसे वाटते.
कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन सरकार जे काम करू शकत नाही, ते काम आज धर्माधिकारी कुटुंबीयांनी आपल्या अमोघ वाणीने, नि:स्वार्थी वृत्तीने केले आहे. त्यासाठी पू. नानासाहेब, आप्पासाहेब यांनी आपला देह चंदनासारखा झिजवला आहे. सामान्यांचे दुख समजून घेतले, त्यांना जवळ करून मायेने त्यांच्या दु:खाचे मूळ समजावले.. आणि एवढे सर्व करूनही एका समान्य व्यक्तीप्रमाणेच आपले वर्तन ठेवले. ही खरेच असामान्य गोष्ट फार कमी लोकांमध्ये पाहण्यास मिळते. ती धर्माधिकारी कुटुंबीयांमध्ये आहे. त्यांनी बैठकीच्या माध्यमातून समर्थांचे विचार घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम केले. प्रत्येकाने शिकले पाहिजे, प्रत्येकाला लिहिता-वाचता आले पाहिजे यासाठी प्रौढ साक्षरता वर्ग घेतले. यातून अनेक लोक साक्षर झाले. 70 ते 80च्या दशकात गावागावात अंधश्रद्धा बोकळली होती. काही झाले तरी भगत, मांत्रिक, बुवा-बाबांचे चमत्कार यांना शरण जात असत. पण या काळात नानासाहेबांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले. लोकांना त्यांच्या दांभिकतेच्या जाळ्यातून बाहेर काढले. पर्यावरणाचा होणारा र्हास व त्यामुळे होणारे गंभीर परिणाम ओळखून पर्यावरण रक्षणाचे काम हाती घेतले. यासाठी त्यांनी प्रथम बैठकीतून पर्यावरणाचा जागर केला. पर्यावरणाच्या र्हास रोखायचा असेल, तर आपण सुरुवात केली पाहिजे हे त्यांना पटवून दिले. त्यामुळे आज लाखो श्रीसदस्य गणेशोत्सवाच्या काळात घरात मातीच्या गणपती मूर्तीचे पूजन करतात. त्याचबरोबर वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. आज ठाणे, रायगड, नाशिक येथील ओसाड जमिनीवर व्रत घेऊन वृक्षारोपण केले. तसेच स्वच्छता मोहिमेसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवून देशात सामाजिक क्रांती होत आहे. धर्माधिकारी कुटुंबीयांचे अध्यात्मिक, सामाजिक कार्य उशिरा का होईना, सरकारपर्यंत पोहोचले. महाराष्ट्रात असेच अनेक सामाजिक कार्यकर्ते नि:स्वार्थी वृत्तीने समाजात बदल घडवत आहेत. सरकारने त्यांच्याही कार्याची दखल घेऊन त्यांनाही प्रोत्साहित करावे, हीच माफक अपेक्षा!
- अभय पालवणकर