मौलाना मदनीद्वारा आयोजित हे संमेलन सर्वधर्म सद्भाव जगविणारे तर मुळीच नव्हते, उलटपक्षी इस्लाम हाच जगातील एकमेव श्रेष्ठ धर्म कसा आणि का आहे हे सांगण्याचा सुनियोजित कार्यक्रम होता. इस्लाममधील धार्मिक कट्टरतेला नियंत्रित करणे तर दूरच, मदनी महाशयांनी या भाषणात त्याची निंदादेखील केली नाही. सर तन से जुदा करून दाखविणार्या कट्टर इस्लामबद्दल एक अवाक्षरदेखील या महाशयांनी उच्चारले नाही. उलट इस्लाम हाच जगातील प्राचीन धर्म आहे ही एकच रेकॉर्ड ते आळवीत राहिले.
जमियत उलेमा ए हिंद या मुस्लीम संघटनेच्या वतीने गेल्या आठवड्यात दिल्लीच्या रामलीला मैदानावर दोन दिवसांच्या ‘सर्वधर्म सद्भावना’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात बोलताना जमियतचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी “ॐ आणि अल्लाह एकच आहेत आणि इस्लाम हा जगातील सर्वात प्राचीन धर्म असून भारतीय पुराण-इतिहासात वर्णन केलेले मनू, श्रीराम आदि सर्व त्या अल्लाहचेच पूजन आणि वंदन करीत होते” असे एक वक्तव्य केले आहे. ते पुढे असेही म्हणाले होते की, “भारतात मुस्लीम धर्मांतरण मुळीच झाले नाही. हिंदूंचा मूळ पुरुष मनू नाही, तर अॅडम आहे, कारण मनू आणि अॅडम एकच आहेत.”
या संमेलनात मौलाना अर्शद मदनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या ’घरवापसी’ संदर्भातील व्यक्तव्यावरून त्यांच्यावरदेखील टीका केली. डॉ. भागवत म्हणाले होते की ’‘मुसलमान त्यांच्या धर्मानुसार आचरण करू शकतात किंवा पूर्वजांच्या धर्मातदेखील वापस येऊ शकतात.” मौलाना मदनी यांनी या मुद्द्यावर डॉ. भागवत यांच्यावर टीका केली आहे.
ते म्हणाले की, “मला आश्चर्य या गोष्टीचे वाटत आहे की एक सुशिक्षित (पढा लिखा) आदमी आरएसएससारख्या संघटनेचा सरसंघचालक असे कसे म्हणू शकतो की, मुसलमान त्यांना वाटले तर इस्लामचे पालन करू शकतात किंवा आपल्या पूर्वजांच्या धर्मात ’घरवापसी’ करू शकतात. अरे बाबा! आमचा सर्वांचा पूर्वज मनू म्हणजेच अॅडम आहे आणि आम्ही त्यांच्या पायावर मस्तक ठेवून आहोत आणि जगालाही हेच सांगत आहोत की यांच्याच चरणावर आपले मस्तक ठेवा. हाच यांचा आणि आमच्या देशाचा इतिहास आहे. आम्ही आमच्या धर्माचे योग्य पालन करीत आहोत.”
मदनी पुढे म्हणाले की, “अल्लाहने या पृथ्वीवर सर्वात प्रथम मनूला - म्हणजे अॅडमला पाठविले. तुम्ही हिंदू त्यांना मनू मानता आणि त्यांची पत्नी शतरूपा यांची सर्व मानवजात संतान आहे असे समजता. तेच आमचे पूर्वज आहे. सर्व नबी, रसूल, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन या सर्वांचेच ते पूर्वज आहेत. आणि हे मनू महाराज त्या अल्लाहची किंवा ॐची पूजा करीत असत. अॅडम किंवा मनू हा अल्लाहने पृथ्वीवर पाठविलेला पहिला नबी होता आणि त्याच्यापासूनच मानवसमूहाची निर्मिती झाली.”
मौलाना अर्शद मदनी हे जमियत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष आहेत. यांची ही संघटना आधीच दोन संघटनांत विभागली गेली आहे. त्यांचा पुतण्या मौलाना महमूद मदनी एका संघटनेचे नेतृत्व करतो. त्याचेही भाषण या वेळी झाले. त्यात त्याने तर असे विधान केले की “इस्लाम हा जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे आणि भारत हीच इस्लामची जन्मभूमी आहे. हा देश जितका नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांचा आहे, तितकाच तो महमूद मदनीचाही आहे.” हा महमूद मदनी राज्यसभेचा माजी सदस्य आहे. 2006 साली जमियतचे तत्कालीन प्रमुख आणि महमूद मदनीचे वडील मौलाना असद अहमद मदनी यांचे देहावसान झाले. त्या वेळी त्याचे काका मौलाना अर्शद मदनीशी नेतृत्वाच्या मुद्द्यावरून वाद झाल्यामुळे जमियतची दोन शकले झाली.
उपस्थित जैन मुनी आचार्य लोकेश मुनी यांनी लगेच हरकत घेतली आणि तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. “इस्लाम हा अलीकडचा धर्म आहे आणि ॐ आणि अल्लाह एकच आहे ही विधान खोडसळपणाचे आणि दुही माजविणारे आहे” असे मत व्यसपीठावरून व्यक्त करीत त्यांनी आणि इतर धर्मगुरूंनी सभात्याग केला.
मौलाना अर्शद मदनीच्या या वक्तव्यावर सद्भावना संमेलनात उपस्थित जैन मुनी आचार्य लोकेश मुनी यांनी लगेच हरकत घेतली आणि तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. “इस्लाम हा अलीकडचा धर्म आहे आणि ॐ आणि अल्लाह एकच आहे ही विधान खोडसळपणाचे आणि दुही माजविणारे आहे” असे मत व्यसपीठावरून व्यक्त करीत त्यांनी आणि इतर धर्मगुरूंनी सभात्याग केला. त्यांनी तिथेच मदनी महशयांना खडे बोल सुनावले आणि म्हणाले की, “तुम्ही जे बोललात ते आम्हाला कुणालाही मान्य नाही. हे सर्वधर्म सद्भावना संमेलन आहे की इस्लामचे श्रेष्ठत्व स्थापित करण्याचे सुनियोजित कारस्थान आहे? सर्वांनी एकत्र, शांतेतने आणि मिळून-मिसळून राहावे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.” आचार्य लोकेश मुनींनी मौलाना मदनी यांना ’शास्त्रार्थ’ करण्यासाठी आमंत्रणदेखील दिले.
विश्व हिंदू परिषदेनेदेखील मौलाना अर्शद मदनी यांच्या वक्तव्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. ‘ॐ आणि अल्लाह एकच आहेत आणि मनू त्यांचीच पूजा करीत असत ही त्यांचे वक्तव्ये मौलाना मदनी यांचा ’खरा चेहरा’ उघडे करणारी आहेत’ असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी एक व्हिडिओ जारी करून, हे सद्भावना संमेलन होते की जमियातच्या धर्मांध गटाचे एकत्रीकरण होते? असा प्रश्न विचारला आहे. ज्या प्रकारे मौलाना मदनी यांनी हिंदू आणि अन्य धर्मगुरूंच्या उपस्थितीत इस्लामचे श्रेष्ठत्व स्थापित करण्याचा प्रयत्न केला, त्यावरून त्यांचा ’वास्तविक हेतू आणि मानसिकताच प्रकट’ झाली आहे. जमियतचे हे कारस्थान मोडून काढले पाहिजे, असे बन्सल यांनी म्हटले आहे.
मौलाना मदनीद्वारा आयोजित हे संमेलन सर्वधर्म सद्भाव जगविणारे तर मुळीच नव्हते, उलटपक्षी इस्लाम हाच जगातील एकमेव श्रेष्ठ धर्म कसा आणि का आहे हे सांगण्याचा सुनियोजित कार्यक्रम होता. इस्लाममधील धार्मिक कट्टरतेला नियंत्रित करणे तर दूरच, मदनी महाशयांनी या भाषणात त्याची निंदादेखील केली नाही. सर तन से जुदा करून दाखविणार्या कट्टर इस्लामबद्दल एक अवाक्षरदेखील या महाशयांनी उच्चारले नाही. उलट इस्लाम हाच जगातील प्राचीन धर्म आहे ही एकच रेकॉर्ड ते आळवीत राहिले.
मौलाना मदनी यांना काही प्रमुख मुस्लीम धर्मगुरूंनीच खरा इतिहास ’सुनावला’ आहे. ऑल इंडिया मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी म्हणाले की, “इस्लाम हा भारतातील नवीन धर्म आहे. इस्लामपूर्वी भारतात बौद्ध, जैन, आर्य असे अनेक धर्म अस्तित्वात होते. इस्लाम भारताचा सर्वात प्राचीन धर्म आहे हे मौलाना मदनी यांचे सांगणे इतिहासाची पायमल्ली करणारे आणि भ्रामक आहे.”
मौलाना बरेलवी पुढे म्हणाले की “इस्लामच्या इतिहासदेखील हेच सांगतो की इस्लाम हा भारतात आलेला नवीन धर्म आहे. मुस्लीम शासकांच्या काळात आणि सूफी संतांमुळे इस्लामचा या देशात प्रचार झाला. सूफी संतांच्या बंधुभावाच्या संदेशामुळे या देशात इस्लामचा प्रसार आणि प्रचार झाला. अजमेरचे मोईनुद्दीन चिश्ती, दिल्लीचे निजामुद्दीन चिश्ती, बंगालचे सूफी हकपंडवी, उत्तर प्रदेशातील सूफी मसुद गाजी यासारख्या सूफी संतांनी इस्लामचा भारतात प्रचार केला” असे मौलाना बरेलवी म्हणाले.
ॐ आणि अल्लाह एक आहेत या मौलाना मदनीच्या वक्तव्यावर टीका करीत मौलाना बरेलवी म्हणाले की, “ॐ आणि अल्लाह एकच आहे ही मान्यतादेखील वास्तवाला सोडून आहे. ॐ हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित प्रकटीकरण आहे; या तीन देवतांचा अवतार आहे. जो सर्व नात्यांच्या पलीकडे आहे, पवित्र आहे आणि ’बेनइयाज’ आहे त्याला इस्लामचे अनुयायी अल्लाह मानतात. अल्लाह हा अरबी शब्द आहे, फारसी भाषेत त्यालाच लोक खुदा म्हणतात. पण या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत आणि त्यांचे अनुयायीदेखील वेगवेगळ्या धर्मांचे आहेत. या दोघांना एकत्रितपणे जोडणे ही मोठीच चूक ठरेल.”
पंडोंखर पीठाधीश गुरू शरण यांनी मौलाना मदनी यांच्या व्यक्तव्याला आक्षेप घेत म्हटले आहे की, “ॐ सर्वात श्रेष्ठ आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. आणि इस्लाम हा जगातील प्राचीन धर्म आहे हे म्हणणे हास्यास्पद आहे.” एक वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की “ॐ सर्वशक्तिमान आहे, पृथ्वीचे संतुलन आहे आणि त्यांना (मौलाना मदनी) जर ॐमध्ये अल्लाहचे दर्शन होत असेल, तर यासारखे चांगले काहीच नाही. त्यांना ’सदबुद्धी’ प्राप्त झाली आहे असेच म्हणता येईल.”
मौलाना अर्शद मदनी आणि त्यांचे पुतणे मौलाना महमूद मदनी यांची जमियत उलेमाच्या 34व्या राष्ट्रीय संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेली ही वक्तव्ये आणि त्यावरील प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. दोन्ही मौलाना हे ओळखून आहेत की मुस्लीम समाजाची मानसिकता बदलत आहे आणि आतापर्यंत ज्या भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल त्यांच्या मनात विष कालविले गेले होते, त्याचा प्रभाव आता ओसरतो आहे आणि हा समाज या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. वेळीच या घसरणीला आवर घातला नाही, तर आपली मक्तेदारी पार मोडून निघेल याची त्यांना भीती वाटते आहे. त्या भीतीपोटी मौलाना मदनी यांनी हा सर्वधर्म सद्भावाच्या बुरख्याआड इस्लामचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला आहे.
भारत हीच इस्लामची जन्मभूमी आहे असे विधान करून मौलाना महाशयांनी आपले इस्लामबद्दलचे (अ)ज्ञानच प्रकट केले आहे. सौदी अरेबियात इस्लामचा जन्म झाला ही गोष्ट एखादा शाळकरी पोरगादेखील सहजपणे सांगू शकेल. तसेच भारतात इस्लाममध्ये धर्मांतर झालेच नाही हे म्हणणेसुद्धा इस्लामी आक्रमकांच्या रक्तरंजित, हिंसक, बलात्कारी आणि अत्याचारी इतिहासकडे अत्यंत निर्लज्जपणे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. इस्लामी शासकांनी येथील हिंदूंना कशा आणि किती क्रौर्याने बाटविले, याचे दाखले इतिहासात भरभरून मिळतात. “भारतातील सर्व लोकांचा डीएनए एक आहे, सर्वांचे पूर्वज एक आहेत आणि संस्कृती एक आहे हे समजून ज्यांना आपल्या नव्या स्वीकृत धर्मप्रमाणे आचरण करावयाचे आहे त्यांनी करावे, ज्यांना पूर्वजांच्या धर्मात वापस यायचे आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत” असे जर सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी आवाहन केले, तर त्यात या मौलाना महाशयांना मिरच्या का झोंबल्या?
वस्तुस्थिति अशी आहे की गेल्या काही वर्षांत भाजपा सत्तेत आल्यापासून कल्याणकारक योजनांचे फायदे जसे हिंदूंना मिळत आहेत, तसेच मुस्लीम समाजालादेखील मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेत बदल होताना दिसून येत आहे. अलीकडे गुजरात, उत्तर प्रदेश यासारख्या मोठ्या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत या मानसिक परिवर्तनाची एक चुणूक दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर भाजपा कार्यकर्त्यांना पासमांदा मुसलमान आणि बोहरा मुसलमान या दोन समुदयांशी संपर्क वाढविण्याचे आवाहन केले आहे. त्याचादेखील सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अलीकडेच स्वत: पंतप्रधान मोदी मुंबईत बोहरा समाजाच्या एका कार्यक्रमात हजर होते. यापूर्वीसुद्धा दिल्लीत ते बोहरा धर्मगुरूंच्या कार्यक्रमात उपस्थित झाले होते.
मुस्लीम राष्ट्रीय मंच या संघटनेच्या माध्यमातूनसुद्धा राष्ट्रीय विचारांच्या मुस्लीम बुद्धिजीवीकडून आणि कार्यकर्त्यांकडून गेली दोन दशके मुस्लीम समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे जे प्रयत्न काही सुरू आहेत, त्याचाही चांगला परिणाम आता दिसून येत आहे. या सर्वांचा विचार केला, तर 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला आणि नरेंद्र मोदींच्या कल्याणकारक धोरणांना मुस्लीम समाजाचा मोठा पाठिंबा मिळू शकतो, याची हे कट्टरपंथी मौलाना आणि त्यांचे कॉँग्रेस, कम्युनिस्ट, लिबरल समर्थक यांना जाणीव झाली आहे. मौलाना अर्शद मदनी आणि मौलाना महमूद मदनी यांची रामलीला मैदानावर सर्वधर्म सद्भाव संमेलनात इस्लाम तसेच ॐ आणि अल्लाह यांच्याबद्दल उधळलेली मुक्ताफळे याच सत्याच्या जाणिवेपोटी उपजली आहेत. हे एक चांगले झाले की जैन आचार्य लोकेश मुनी यांनी त्यांना त्यांच्याच मंचावरून परखड प्रत्युत्तर दिले आणि संमेलनातून बहिर्गमन करून निषेध नोंदविला. बदलत्या भारताचा परिचय देणारी ही एक घटना मानावी लागेल.