कृतज्ञ मी.. कृतार्थ मी

15 Feb 2023 18:58:58
त्या दोघांची विद्याशाखा एकच.. मेटॅलर्जी अर्थात धातुशास्त्र. या क्षेत्रातले ते दोघेही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्गज. एक गुरू आणि एक शिष्य. त्यांच्यातलं हे नातं किमान 5 दशकांचं. गुरूने आपल्या कार्यकाळात अध्यापन आणि लेखन यावर अधिक लक्ष केंद्रित केलं, तर शिष्याने अध्यापनाबरोबरच संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. या विषयातील अभ्यासपूर्ण ग्रंथनिर्मितीमुळे आणि अध्यापन कौशल्यामुळेही गुरूची जगभरात कीर्ती झाली आणि त्यांच्या या शिष्याला जग ओळखू लागलं ते सखोल संशोधनामुळे. त्यांच्यातल्या गुरुशिष्याच्या नात्याला आणखी उंचीवर नेणारी घटना नुकतीच घडली, ती म्हणजे आपल्या गुरूच्या नावे शिष्याने जाहीर केलेली शिष्यवृत्ती आणि त्यासाठी शिष्याने आय.आय.टी. भुवनेश्वरला दिलेली एक कोटीची देणगी. या देणगीतून मेटॅलर्जीमध्ये पीएच.डी.च्या स्तराचं संशोधन करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्याला भरीव शिष्यवृत्ती देण्याची तरतूद करण्यात आली आहे. एका शिष्याने गुरूबद्दलच्या कृतज्ञतेपोटी आणि त्यांचं या विषयातलं अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहावं यासाठी त्यांच्या नावे सुरू केलेली ही शिष्यवृत्ती. देशातलं हे आतापर्यंतचं एकमेव उदाहरण असावं. हे दोघे म्हणजे, डॉ. राम तुपकरी आणि डॉ. ब्रह्मदेव शुक्ला.
 
vivek
 

 
मेटॅलर्जी अर्थात धातुशास्त्र या विषयातलं, त्यातही प्रोसेस मेटॅलर्जी या विषयातलं भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदरणीय असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. राम तुपकरी, वय वर्षं 86. आय.आय.टी. भुवनेश्वर येथे मानद प्राध्यापक म्हणून आजही कार्यरत असलेले त्यांचे शिष्य डॉ. ब्रह्मदेव शुक्ला, वय वर्षं 76.
 
 
 
अध्यापनाबरोबरच भारतात आणि परदेशांतही संशोधनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिलेले डॉ. ब्रह्मदेव शुक्ला प्रोसेस मेटॅलर्जी या विद्याशाखेकडे वळले ते डॉ. राम तुपकरी सरांमुळे. साठच्या दशकात परदेशात जाऊन या विषयात एम.टेक., पीएच.डी. करून तुपकरी सर भारतात परतले आणि 1966 सालापासून बनारस हिंदू विद्यापीठामध्ये त्यांनी अध्यापनाला सुरुवात केली. डॉ. ब्रह्मदेव शुक्ला हे त्यांचे तिथले विद्यार्थी. तेव्हा ते खरगपूर आय.आय.टी.मधून मेटॅलर्जीची पदवी घेऊन एम.टेक. करण्यासाठी बनारसला आले होते. त्या वेळी त्यांचा कल फिजिकल मेटॅलर्जीकडे होता. मात्र तुपकरी सरांच्या प्रभावी अध्यापनामुळे त्यांना प्रोसेस मेटॅलर्जी या विषयात विलक्षण गोडी निर्माण झाली. त्याच वेळी याच विषयात संशोधन व अध्यापन करण्याचं त्यांनी ठरवलं. एम.टेक. झाल्यानंतर त्यांचे तुपकरी सरांबरोबर 1-2 शोधनिबंधही प्रकाशित झाले. आणि त्यानंतर दोघांचा ध्यासविषय एकच राहिला, तरी वाटा वेगळ्या झाल्या.
 
 
 
1970च्या दरम्यान तुपकरी सर बनारसहून नागपूरच्या रीजनल इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून रुजू झाले. त्यांनी सगळं लक्ष अध्यापनावर केंद्रित केलं. ज्या वेळी भारतात या विषयाबद्दल फारशी जाणीवजागृती नव्हती, तेव्हा अध्यापनाच्या क्षेत्रात तुपकरी सरांनी दिलेल्या भरीव योगदानामुळेच या विषयात रूची असणारे शेकडो विद्यार्थी तयार झाले ज्यांनी पुढे जाऊन या विषयात काम केलं. अनेक स्टील प्लँट्सच्या अडचणी सोडवतानाच, त्यांनी सुधारणेचे अनेक नवे मार्ग दाखवले. आपल्या अध्यापनातील अनुभवावर आणि प्रत्यक्ष स्टील प्लँट्सशी संबंधित अनुभवांवर आधारित त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं. ‘मॉडर्न स्टील मेकिंग’ हे त्याचं नाव. विशेष म्हणजे हे पुस्तक लिहिलं आणीबाणीच्या काळात तुरुंगात असताना. त्यासाठी त्यांना दर आठवड्याला कॉलेजच्या लायब्ररीत काही तास जाण्याची उच्च न्यायालयाकडून विशेष परवानगी मिळाली होती. चार पोलिसांचा ताफा बरोबर घेऊन ते अभ्यासासाठी लायब्ररीत जात असत. हे पुस्तक प्रकाशित झालं, तेव्हाही सर तुरुंगातच होते. आजही या पुस्तकाला जगभरातून मागणी आहे. हा अभ्यासविषय नवीन स्वरूपात कसा शिकवावा याविषयी मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. त्यानंतर काही काळातच तुपकरी सरांनी ‘मॉडनर्र् आयर्न मेकिंग’ हे पुस्तक लिहून या विषयावरील आणखी एक मोलाचा संदर्भग्रंथ सिद्ध केला. ही दोन्ही पुस्तकं आजही मेटॅलर्जी विषयातील अभ्यासकांसाठी गीता-भागवत आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. निवृत्तीनंतर तुपकरी सरांनी काही स्टील प्लँटसाठी सल्लागार म्हणून काम केलं आणि काही काळाने अभ्यासाचं नवं क्षेत्र त्यांना खुणावू लागलं. आज तुपकरी सर सोशल सायन्सच्या अभ्यासात मग्न आहेत. या विषयातही सखोल अभ्यास करून त्यांनी ‘ऑर्गनायझेशनल इंटेलिजन्स’, ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ प्रोग्रेस’ या पुस्तकांचं लेखन केलं आहे. त्यांच्यातला संशोधक अद्याप कार्यरत असल्याचं पुस्तकांच्या शीर्षकावरूनच लक्षात येईल. अभ्यासूंनी या लेखनाचीही गांभीर्याने नोंद घेतली आहे.
 
 
बनारस येथून बाहेर पडल्यावर डॉ. ब्रह्मदेव शुक्ला आय.आय.टी. कानपूरमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. आपल्या अभ्यासविषयात पीएच.डी. आणि त्याही पलीकडे बरंच संशोधन केलं. जगभरातल्या नावाजलेल्या विद्यापीठांमध्ये अध्यापन, तसंच जगभरातल्या स्टील प्लँट्समध्ये तज्ज्ञ म्हणून काम केलं. वेगवेगळे संशोधन प्रकल्प केले. त्यात उल्लेखनीय यशही मिळवलं. तुपकरी सरांपासून प्रेरणा घेऊन डॉ. ब्रह्मदेव यांनीही आपल्या ज्ञान-अनुभवांवर आधारित, ‘फंडामेटल्स ऑफ स्टील मेकिंग मेटॅलर्जी’ हे पुस्तक लिहिलं, जे जगभरातल्या तज्ज्ञांकडून नावाजलं गेलं.
 
 
 
गेली 5 दशकं दोघेही आपापल्या कार्यक्षेत्रात व्यग्र असल्याने नित्य संपर्क नसला, तरी वेगवेगळ्या परिषदांच्या निमित्ताने वा अन्य कामानिमित्ताने भेटी होत असतात. अर्थात संपर्क कमी झाला, तरी संबंध दृढ आहेत आणि त्यांच्यातलं नातंही. त्याची खूण म्हणजे, तुपकरी सरांची आजही भेट झाली, तरी ब्रह्मदेव सर त्यांना वाकून नमस्कार करून मगच संभाषणाला सुरुवात करतात.
 
 
 
आपल्या इथवरच्या वाटचालीत या गुरूचं योगदान मोठं आहे, याची जाणीव ब्रह्मदेव सरांनी कायम जपली आणि त्याची अभिव्यक्ती या अनोख्या शिष्यवृत्तीच्या रूपात केली. ते म्हणतात, “तुपकरी सरांकडून प्रेरणा घेऊन मी या विषयाकडे वळलो. अतिशय किचकट विषयही सुलभ करून सांगण्याच्या त्यांच्या विलक्षण हातोटीमुळे मला या विषयात गोडी निर्माण झाली, ती आजतागायत टिकून आहे. माझ्यातल्या संशोधकाला त्यांनी दिलेली दृष्टी आणि त्यातून माझ्या करिअरला मिळालेली दिशा मला इथवर घेऊन आली, म्हणूनच माझ्या मनात त्यांच्याविषयी अखंड कृतज्ञता आहे. गुरुदक्षिणा देऊन त्यातून थोडं उतराई होण्यासाठी मी हा मार्ग निवडला. सर्व उद्योगांसाठी स्टील हा मूलभूत घटक आहे आणि त्यामुळेच अर्थव्यवस्थेतही त्याला महत्त्वाचं स्थान आहे. तो जीडीपीचा आधार समजला जातो. अशा विषयातल्या संशोधनाला गती मिळावी, शिष्यवृत्तीमुळे संशोधकांना उत्तम काम करता यावं आणि त्यातून अंतिमत: आपल्या देशाला फायदा व्हावा, ही इच्छा आहे. ओडीशा हे राज्य खनिजसमृद्ध आहे. अशा ठिकाणी असलेल्या आय.आय.टी.मध्ये या संशोधनाला प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला, तर हे राज्य पुढच्या दशकभरात देशाचं स्टील निर्मितीतलं मुख्य केंद्र होईल. ही शिष्यवृत्ती देण्यामागची माझी भावना चांगली आहे, तेव्हा त्याचे परिणामही चांगलेच होतील. यातून आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावणारे चांगले संशोधक मिळतील याची खात्री वाटते.”
 
 
 
“अभियांत्रिकीच्या क्षेत्रात भविष्यकालीन पिढीचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा विचार करणारे डॉ. ब्रह्मदेव शुक्ला यांच्यासारखे विद्यार्थी लाभणं ही माझी सर्वात मोठी कमाई आहे. त्याने मला देऊ केलेल्या या सन्मानाने मी शिक्षक म्हणून कृतार्थता अनुभवतो आहे” या शब्दांत तुपकरी सरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
 
या दोघांचं उदाहरण अनेकांसाठी वस्तुपाठ ठरावं, म्हणून हा लेखनप्रपंच. या गुरुशिष्याच्या अनोख्या जोडीला सादर वंदन.
Powered By Sangraha 9.0