लोकराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आठवण महाराष्ट्र दीर्घकाळ ठेवील. खासकरून ज्या आत्मीयतेने त्यांनी आदिवासी पाड्यांचा प्रवास केला आहे, समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकांसाठी काम करणार्या कार्यकर्ता बंधुभगिनींना मायेने जवळ केले, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि त्यांना नि:स्वार्थी भावनेने काम करण्याची प्रेरणा दिली, ही गोष्ट हजारो कार्यकर्ते आणि सेवा कार्याशी निगडित लाखो लोग कदापि विसरणार नाहीत. विशाल कुटुंबातील एका आजोबाची भूमिका त्यांनी पार पाडली. अशा प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष आजोबांस त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपणा सर्वांच्या वतीने हृदयपूर्वक शुभेच्छा!
राजभवन मुंबईत आहे. या राजभवनाचा दरवाजा 2015पूर्वी मी कधी पाहिला नाही. संपादक म्हणून 26 जानेवारीच्या चहापानाची निमंत्रणे येत असत. निमंत्रण स्वीकारून चहापानाच्या कार्यक्रमाला जावे, असेही कधी वाटले नाही. आपल्या जगण्याशी या वास्तूचा काही संबंध आहे, अशी त्या वास्तूची काही प्रतिमा नव्हती. 2015 साली मा. विद्यासागर राव हे राज्यपाल म्हणून राज्यात आले. ते आल्यानंतर सुमारे तीन महिन्यानंतर मी त्यांना भेटण्यास गेलो. तिथून राजभवनात राज्यपालांना दर महिन्याला भेटण्याचा क्रम चालू झाला आणि मा. भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असेपर्यंत हा क्रम चालू राहिला.
या सर्व काळात मी अनेकांना राजभवनात घेऊन गेलो. या अनेकांत बहुसंख्या सामान्य कार्यकर्त्यांची होती. वेगवेगळ्या सेवा कार्यात गुंतलेले हे कार्यकर्ते अत्यंत निष्ठेने आणि समर्पण भावनेने आपआपल्या क्षेत्रात काम करीत असतात. यापैकी कोणीही मला असे म्हटले नाही की ‘आम्हाला राज्यभवनात राज्यपालांच्या भेटीस घेऊन जा.’ मा. विद्यासागर राव आणि भगतसिंह कोश्यारी यांना मी सुचविले की, तळागाळात काम करणारे असे शेकडो कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कार्याचे जर तुम्ही कौतुक केले, तर ती ऊर्जा त्यांना आयुष्यभर पुरेल. दोघांनीही ही गोष्ट आनंदाने मान्य केली.
भगतसिंह कोश्यारी हे संघाचे स्वयंसेवक आहेत. काळी टोपी घालून ते राजभवनात बसत. काळ कसा सूड घेतो! काँग्रेसने पोसलेल्या पुरोगामी लोकांनी ज्या काळ्या टोपीची मनसोक्त टिंगलटवाळी केली, ती काळी टोपी राजभवनात जाऊन बसली. भगतसिंह कोश्यारी आपले स्वयंसेवकत्व कधीही विसरले नाहीत. त्यांचा माझा पूर्वपरिचय होता. पहिल्याच भेटीत ते मला म्हणाले, “रमेशजी! ये राजभवन में मेरा दिल नही लगता। मैं सामान्य स्वयंसेवकों के घर जानेवाला कार्यकर्ता हूँ। उनके साथ गपशप करना, चाय पिना अच्छा लगता है। राज्यपाल उठकर किसेके घर नहीं जा सकते। आपके घर मुझे आना है, पर आ नही सकता।”
ही स्वयंसेवकत्वाची भावना त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात काटेकोरपणे पार पाडली. तसे त्यांचे वय खूप झाले आहे. त्यात कोरोनाचा प्रकोप सुरू झाला. परंतु या काळात त्यांनी राजभवनाचे दरवाजे भेटीस येणार्यास बंद केले नाहीत. वनवासी क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, दलित क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, आरोग्य, शिक्षण, अपंगकल्याण क्षेत्रांत काम करणारे कार्यकर्ते आणि पत्रकार या सर्वांना ते भेटत राहिले. त्यांचा स्वभाव मिश्कील होता. बोलता बोलता ते सहज विनोद करीत असत. त्यामुळे त्यांना भेटायला गेलेल्या कोणालाही ‘आपण राज्यपालांना भेटत आहोत’ याचे कधी दडपण वाटले नाही.
माझा अनुभव असा आहे की, माझ्याबरोबर असणार्या प्रत्येकाची ते ओळख करून घेत. मुलगी असेल तर तिला विचारीत, “बेटा क्या करती हो? आगे क्या सोचा है? काम में आनंद लगता है ना? रमेश जी के साथ काम करती हो, तो पगार मिलता है ना?” अशा हलक्याफुलक्या वाक्यांनी सगळे दडपण तेव्हाच विरून जात असे. आस्थेने चौकशी करीत, चहापान, नाश्ता झाला ना, नाहीतर इथे बसा आणि करा.
विरारजवळील भालिवली येथे अनुसूचित जमातीच्या महिलांना बांबू प्रशिक्षण देण्याचा सेवा विवेकचा उपक्रम चालतो. या सर्व महिला आदिवासी समाजातील आहेत. एकदा मी त्यांना म्हटले की, “या प्रकल्पाला तुम्ही भेट द्यावी, अशी सर्वांची इच्छा आहे.” ते एकदा नाही, तर दोनदा आले. राज्यपालांचा कार्यक्रम एक तासापेक्षा जास्त नाही, अशी मर्यादा असतानाही ते प्रकल्पावर दोन तास राहिले. बारीकसारीक विषयांची माहिती करून घेतली. अर्थकारण कसे चालवितात हे त्यांनी अधिक खोलात जाऊन विचारले आणि नंतर प्रकल्पासाठी भरीव आर्थिक मदत पाठवून दिली. ‘ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती’ या संतवचनाची तेव्हा मला आठवण झाली.
उत्तरांचलातील पहाडी प्रदेशात राहाणारा हा संघस्वयंसेवक स्पष्टवक्ता होता. जी वस्तुस्थिती आहे, ती लोकांपुढे तो मांडत असे. उत्तरांचलाचे राजकारण आणि महाराष्ट्राचे राजकारण फार वेगळे आहे. महाराष्ट्र हा पुरोगाम्यांचा अड्डा.. तोच पुरोगामी जो हिंदुद्वेषी आहे, सनातन मूल्यद्वेषी आहे आणि ज्याची सदैव काकदृष्टी असते. कावळा जसा आपल्या दृष्टीने कचर्याच्या ढिगार्यात कुठे घाण आहे हे बघत असतो, तशी ही सर्व गँग आहे. भगतसिंह कोश्यारी सत्य बोलत गेले आणि या लोकांनी त्याचा विपर्यास सुरू केला. तोंडाला येईल ते बोलणारे पोपट महाराष्ट्रात भरपूर आहेत. एकाची सकाळी नऊला बांग सुरू होते, दुसर्याची बारामतीतून कधी सुरू होईल सांगता येत नाही, तिसरा मुंब्य्रातून फणा काढून कधी फुस करेल सांगता येत नाही आणि चौथा फिरता स्पीकर आहे, तो महाराष्ट्रात कुठे काय बडबडेल हे सांगता येत नाही. माध्यमांना ते सगळे हवे असतात. ‘माणूस कुत्र्याला चावला की त्याची बातमी होते’ या सूत्राला धरून भगतसिंह कोश्यारी यांच्या बदनामीची मोहीम चालविली. या सर्वांना भगतसिंह कोश्यारी गेल्याचा आनंद झालेला आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आणि शिष्टाचार वयस्करांचा सन्मान करण्याची आणि तो निवृत्त होत असताना त्याच्याविषयी चांगले उद्गार काढण्याची आहे. ही परपंरा या लोकांनी धुळीला मिळविली. ‘भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधाने केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले - संजय राऊत.’, ‘भगतसिंह कोश्यारी यांना भाजपाने दिलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं काम पूर्ण झालं म्हणून राज्यपालांचा राजीनामा मंजूर केला गेला - नाना पटोले’ ‘महाराष्ट्राची सुटका झाली - शरदराव पवार’, ‘मराठा क्रांती मोर्चा आणि राष्ट्रवादीतर्फे पेढे वाटण्यात आले’, ‘सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण - संभाजीराजे’ या वक्तव्यांवर वेगळे भाष्य करायला पाहिजे का? सुजाण वाचक त्यामागे दडलेली विकृत मनोवृत्ती नक्कीच पाहतील, याची मला खात्री आहे.
भगतसिंह कोश्यारी हे हाडाचे स्वयंसेवक. स्वयंसेवकाच्या मनावर एक संस्कार कोरलेला असतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत आणि हे केवळ बोलायचे नाही, तर आपल्याला महाराजांच्या जमेल तेवढ्या गुणांचे अनुसरण करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पूर्तता अखिल भारतात करायची आहे. संघ कोणत्याही व्यक्तीला गुरू मानीत नाही. कोणत्याही व्यक्तीचे शब्दप्रामाण्य स्वीकारीत नाही. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी सांगितले की, भगवा ध्वज आपला आदर्श आहे, आपला गुरू आहे. पण कोणाला जर एक व्यक्ती डोळ्यासमोर आणायची असेल, तर त्यांनी शिवाजी महाराजांना आदर्श मानावे.
अशा छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी कोणताही स्वयंसेवक अनुद्गार काढू शकत नाही. ते त्याच्या स्वभावात नाही, वृत्तीत नाही आणि मानसिकतेतदेखील नाही. भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांची बदनामी केली असे जे म्हणतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांशी काही देणे-घेणे नाही, त्यांना मराठ्यांची व्होट बँक तयार करायची आहे. त्यांच्यापुरता महाराजांचा तेवढाच उपयोग. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले, औरंगजेबाने त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले, असे संभाजी महाराज धर्मवीर नाहीत, असे राष्ट्रवादीचा नेताच म्हणू शकतो. तोच म्हणू शकतो की, औरंगजेब दयाळू होता, कारण त्यांना मुसलमानांची मते पाहिजेत. मुस्लीम अधिक मराठा अधिक अन्य जाती म्हणजे सत्ता हे त्यांचे समीकरण आहे. म्हणून ते संधी शोधत राहतात. भगतसिंह कोश्यारी यांना त्यांनी लक्ष्य केले.
छत्रपती शिवाजी महाराज जसे तत्त्वांचे आदर्श आहेत, गुणांचे आदर्श आहेत, राजव्यवहाराचे आदर्श आहेत, तसेच आजच्या काळातील काही नेते त्यांचे गुण घेऊन वाटचाल करताना दिसत असतील, तर त्यांना आदर्श का मानायचे नाही? यात महाराजांचा कसला अपमान झाला? छत्रपतींची बरोबरी करील असे कोणी नाही, याचा अर्थ त्यांच्या गुणांचे अनुसरण करू नये असा थोडाच होतो?
‘धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारीता मारीता घ्यावे, राज्य आपुले’ अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. या राज्यात सर्वांचा सन्मान होईल, स्त्रिया आणि वयस्कर यांचा विशेष सन्मान होईल. भगतसिंह कोश्यारी यांनी खर्या अर्थाने राजभवन हे लोकभवन केले, याचे थोडेतरी स्मरण करायला पाहिजे. या पुरोगामी जगतातील अनेक जण राज्यपालांची वक्तव्ये आली की, किंवा त्यांच्याशी जो महाविकास आघाडीने संघर्ष केला, तेव्हा राज्यघटनेचे स्मरण करतात. राज्यपालांनी संविधानाच्या चौकटीत काम केले पाहिजे, असा उपदेश करतात. ही संविधानाची चौकट म्हणजे काय? हे मात्र ते गुलदस्त्यात ठेवतात.
जेव्हा या लोकांनी राज्यपालांवर गलिच्छ भाषेत टीका केली, तेव्हा कोणत्या संविधानाचे पालन झाले? कोणत्या सांविधानिक नीतीचे पालन झाले? कोणत्या सांविधानिक कलमांचे पालन झाले? असे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजेत. आपल्याला सोयीचे असेल ते संविधान आणि गैसोयीचे असेल ते असंविधान ही मतलबी टीका झाली. गलिच्छ आणि ओंघळ भाषेचे प्रदर्शन करून या सर्व लोकांनी महाराष्ट्राचा उज्ज्वल सांस्कृतिक वारसा मलिन केला आहे, त्याबद्दल त्यांनी समाजाची माफी मागितली पाहिजे. ते मागणार नाहीत, कारण ते उर्मट आहेत. या सर्वांचा माज उतरविण्याची शक्ती संविधानाने तुम्हा-आम्हाला दिली आहे, योग्य वेळ येताच तिचा वापर केला पाहिजे.
लोकराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आठवण महाराष्ट्र दीर्घकाळ ठेवील. खासकरून ज्या आत्मीयतेने त्यांनी आदिवासी पाड्यांचा प्रवास केला आहे, समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकांसाठी काम करणार्या कार्यकर्ता बंधुभगिनींना मायेने जवळ केले, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि त्यांना नि:स्वार्थी भावनेने काम करण्याची प्रेरणा दिली, ही गोष्ट हजारो कार्यकर्ते आणि सेवा कार्याशी निगडित लाखो लोग कदापि विसरणार नाहीत. विशाल कुटुंबातील एका आजोबाची भूमिका त्यांनी पार पाडली. अशा प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष आजोबांस त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपणा सर्वांच्या वतीने हृदयपूर्वक शुभेच्छा!