समर्थस्थापित अकरा मारुती दर्शन

विवेक मराठी    13-Feb-2023
Total Views |
@अलका जोशी

vivek 
हनुमंताच्या कृपेने बलोपासना दृढ व्हावी, कणखर माणसे घडावीत यासाठी समर्थांनी ठिकठिकाणी मारुती स्थापन केले असावेत. समर्थांनी मारुतीच्या उपासनेतून सुदृढ शरीर, स्थिर मन आणि तीक्ष्ण बुद्धी यांचे माहात्म्य लोकांपर्यंत नेले. सातारा-कराड परिसरात समर्थस्थापित अकरा मारुतीस्थाने अवघ्या एक दिवसात पाहणे सहजशक्य आहे. याचे कारण ही सगळी स्थाने अगदी कमी अंतरावर आहेत.
अद्भुत गर्जना केली, मेघची चेवले भूमी
 
फुटले गिरीचे गाभे, तुटले सिंधू आटीले,
 
अद्भुत वेश आवेशे, कोपला रणकर्कशु
 
धर्मस्थापनेसाठी, दास तो उठीला बले।
 
 
समर्थ रामदास स्वामीरचित एका अप्रचलित मारुतीस्तोत्रामधल्या या शेवटच्या चार पंक्ती आहेत. ‘चापबाणधरोयुवा’ रूपामधील प्रभू श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. या रणसुसज्ज श्रीरामाची अनन्य दासभक्ती करणारे हनुमंत हे समर्थांच्या रामदासी कुळाचे मुख्य दैवत, असे प्रत्यक्ष समर्थांनीच सांगितले आहे.
 
 
सोळाव्या शतकाच्या ज्या कालखंडात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात जाणतेपणी शस्त्र धरले, एकेक गाव - एकेक मावळा जोडत महाराष्ट्रधर्म वाढविला, त्याच कालखंडात समर्थ गावोगावच्या तरुणांना शक्ती-बुद्धी-युक्तीची उपासना हनुमंताच्या माध्यमातून शिकवीत होते. हा केवळ योगायोग नव्हता. महाराजांमध्ये समर्थांना श्रीराम दिसत होते, तर त्यांच्या जिवाला जीव देणारे मावळे प्रत्यक्ष मारुतीचे रूप. शिवाज्ञा शिरोधार्य मानून अन्यायाविरुद्ध तुटून पडणारे सारे मावळे हे हनुमंतस्वरूप. हनुमंताच्या कृपेने बलोपासना दृढ व्हावी, कणखर माणसे घडावीत यासाठी समर्थांनी ठिकठिकाणी मारुती स्थापन केले असावेत. समर्थांनी मारुतीच्या उपासनेतून सुदृढ शरीर, स्थिर मन आणि तीक्ष्ण बुद्धी यांचे माहात्म्य लोकांपर्यंत नेले. म्हणूनच सुरुवातीच्या चार ओळींवर नजर टाकली, तर समर्थांनी भीमरूपी महारुद्र वज्रहनुमान मारुतीला धर्मसंस्थापनेसाठी किती कळकळीची साद घातली आहे, हे लक्षात येते.
 
 
 
समर्थांनी टाकळी इथे गोदाकाठी बारा वर्षे पुरश्चरण केले, त्या वेळी गोमय मारुतीची प्रतिष्ठापना केली होती. भोवतालची देशकालपरिस्थिती पाहत पाहत त्यांची अध्यात्मतपश्चर्या घडत होती. अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे तुटून गेलेली, मेलेली मने आणि विझलेला समाजपुरुषार्थ जागा व्हावा, अशी आच त्यांना भारतभर केलेल्या भ्रमणातून लागली होती. या विचारामधून त्यांनी रामदासी संप्रदायाचे सुमारे अकराशे मठ संपूर्ण भारतभर उभे केले.
 
 
महाराष्ट्राच्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी अकरा मारुती स्थापन केले, जे अतिशय प्रसिद्ध आहेत. चाफळ इथे स्थापन केलेल्या दास आणि प्रताप मारुतीच्या स्थानापासून नजीक अंतरावर ही मारुती मंदिरांची मालिका आहे. इतक्या कमी अंतरावर इतकी देवालये, तीही मारुतीची, यामागे समर्थांची काही विशिष्ट योजना असली पाहिजे, असे हा परिसर फिरताना एकसारखे मनात आल्यावाचून राहत नाही. आजही पाहिले, तर कोल्हापूर, सांगली, सातारा भागात पहिलवानी आखाडे आणि बलोपासना रसरशीत जिवंत आहे. इतकी उत्तम पायाभरणी समर्थांनी त्या काळी केली आहे. समर्थभक्त समीरजी लिमये म्हणतात, त्याप्रमाणे चाफळ इथल्या मुख्य मठामधून पंचक्रोशीतल्या नऊ मारुती मंदिरांचे भक्कम जाळे एखाद्या सुविहित कॉर्पोरेट व्यवस्थेप्रमाणे समर्थानी संचालित केले होते. लोकजागृती हा त्यामागचा उद्देश होता.
 
 
ही अकरा मारुती स्थाने अशी आहेत -
 
 
चाफळक्षेत्रीचे दोन मारुती - प्रभू श्रीराम यांनी समर्थांना दिलेल्या दृष्टान्तानुसार त्यांना अंगापूरच्या डोहातून प्रभू रामचंद्राची मूर्ती मिळाली. सन 1648 साली चाफळ इथे श्रीराम मंदिर उभे राहिले. पुढे कोयनेच्या भूकंपात या राम मंदिराची पडझड झाली होती. परंतु त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली. चाफळ इथे समर्थांनी श्रीरामांच्या सन्मुख दास मारुतीची स्थापना केली आहे. दास्यभक्ती म्हणजे देवाच्या सख्यत्वासाठी, पडो जिवलगांशी तुटी. भक्तीच्या या आविष्कारात कुठेही गुलामीचा हीन भाव नसून भक्ताचा आराध्य दैवतावर संपूर्ण विश्वास आणि मनात सर्वशरणभाव असणे अभिप्रेत आहे. समर्थ हे स्वत: रामभक्त हनुमंतरूप होते आणि श्रीरामचरणी ते दास्यभक्तीनेच लीन झाले होते.
 
 
 
चाफळ मंदिराच्या मागच्या बाजूला दुसरा मारुती म्हणजे प्रताप मारुती स्थित आहे. मारुतीस्तोत्रात वर्णन केल्यानुसार हा मारुती नेटका सडपातळू आणि उंच आहे. त्याचे पुच्छ वरच्या बाजूस मुर्डिले आहे आणि त्याने किरीटकुंडलेही धारण केली आहेत. या वीर मूर्तीने पायाखाली दैत्याचे निर्दालन केले आहे.
 
 
3. शिंगणवाडी - या मारुतीला खडीचा मारुती/चपेट मारुती असे संबोधन आहे. समर्थांनी 1650 साली याची स्थापना केली. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ यांची भेट घडली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिंगणवाडीपासून सुमारे पंधरा कि.मी. अंतरावर एका उंच टेकडीवर रामघळ आहे. समर्थांनी रामघळीत बराच काळ आध्यात्मिक चिंतन-मनन केले. याच ठिकाणी शिवरायांची तहान भागविण्यासाठी त्यांनी कुबडी उलथून खालचे पाणी प्रवाहित केले, असे सांगतात. ही जागा कुबडीतीर्थ म्हणून ओळखली जाते.
 
 
vivek
 
चाफळचा मठ स्थापन होण्यापूर्वी शिंगणवाडी इथला मठ स्थापन झाला होता. इथल्या मूर्तीचा एक हात उगारलेल्या म्हणजे चर्पट मुद्रेत आहे, तर दुसर्‍या हातात ध्वज आहे. शिंगणवाडी ते चाफळ हे अंतर जेमतेन दोन कि.मी. असून या मारुतीला चाफळचा तिसरा मारुती असेही म्हटले जाते.
 
 
4. माजगावचा मारुती - चाफळपासून तीन कि.मी. अंतरावर माजगावचा मारुती आहे. माजगावच्या वेशीवर पूर्वी घोड्याच्या आकाराचा एक गावरक्षक धोंडा ठेवलेला असे. त्याची पूजाही होत असे. गावकरी लोकांनी समर्थांना या देवतेची विधिपूर्वक प्रतिष्ठापना करण्याची विनंती केली, तेव्हा या धोंड्यावर आकार कोरून त्याला समर्थ रामदास यांनी मारुतीचे रूप दिले. हा मारुतीदेखील चाफळसंमुख असून मारुतीचे व्यवस्थापनही चाफळ येथूनच केले जाते. माजगावचे आज दिसणारे मंदिर श्रीधरस्वामी यांनी उभारलेले आहे. मंदिराच्या भिंतीवर उड्डाण करणार्‍या मारुतीचे उत्तम चित्र रेखाटले आहे.
 
 
 
5. उंब्रज - समर्थांना उंब्रज गावची काही जमीन देणगीदाखल मिळाली होती. गावातल्या कृष्णा नदीच्या काठी असलेल्या डोहात नित्य स्नान करण्याकरिता समर्थ दररोज चाफळपासून तिथे जात असत. एक दिवस स्नान करताना समर्थ बुडू लागले आणि त्यांनी हनुमंताचा धावा सुरू केला, त्या वेळी मारुतीरायाने त्यांना सुखरूप बाहेर काढले, अशी कथा प्रसिद्ध आहे. या वेळी घाटावर श्रीहनुमंताचे पाऊल उमटले, अशी श्रद्धा आहे. आज ती पाऊलखूण पुसट झाली असली, तरी सश्रद्ध गावकरी ती जागा अभिमानाने दाखवतात.
 
 
सन 1650मध्ये रामदासांनी इथे मठाची आणि मारुतीची स्थापना केली. त्यानंतर उंब्रजच्या मठात त्यांनी 13 दिवस कीर्तन केले. इथला मारुती हा वीर मारुती असून त्याच्या पायातळी दानव चेपलेला आहे. वाळू, चुना आणि ताग वापरून इथली मूर्ती घडविलेली आहे.
 
 
 
6. बाहे बोरगाव - वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या रामलिंग बेटावर वसलेले मारुतीचे क्षेत्र म्हणजे बाहे बोरगाव हे निसर्गरम्य ठिकाण आहे. इथला मारुती दोन बाहू पसरून उभा आहे, हे इथले वैशिष्ट्य. असे म्हणतात की रावणाचा वध करून श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईसह या स्थानी आले असताना दोन्ही बंधू कृष्णास्नान करायला गेले. त्यानंतर शिवपिंडीची पूजा करताना कृष्णा नदीचे पाणी पुष्कळ वाढले. सीतामाईला याचा त्रास होऊ नये, म्हणून मारुतीने आपले दोन्हीही बाहू विस्तारले आणि नदीचा प्रवाह अडविला. त्या वेळी नदी विभागली आणि मध्ये बेट तयार झाले, तेच हे रामलिंग बेट. साहजिकच इथे शिवाचे आणि रामाचेही स्थान आहे. मारुतीची मूर्ती पाच फूट उंच असून बाहू पसरलेला मारुती म्हणून याला ‘बाहेचा मारुती’ असे नाव प्राप्त झाले आहे. सन 1652 साली समर्थांनी या मारुतीची स्थापना केली, त्या वेळी गावकरी मंडळींनी सांगितलेली श्रीरामाची आख्यायिका ऐकून समर्थांना विश्वास वाटला की नदीच्या डोहात शोध घेतला, तर आपल्याला नक्कीच मारुतीरायांची मूर्ती सापडेल. अनन्यभक्तीने त्यांनी नदीच्या तळाशी बुडी मारली आणि मारुतीची मूर्ती शोधू लागले. जलात मारुतीराया शोधताना व्याकूळ भावाने त्यांनी केलेली एक सुंदर रचना अशी -
 
हनुमंत पाहावयालागी आलो,
 
दिसेना सखा थोर विस्मीत जालो।
 
तयावीण देवालये ती उदासे,
 
जळातूनी बोभाइला दास दासे
 
मूर्ती तर सापडली, परंतु तोपर्यंत गावकरी काही पूजासाहित्य घेऊन पोहोचू शकले नाहीत. मारुती ताटकळणार कसे? म्हणून ते गुप्त झाले. पुढे मारुतीचे दैवी रूप आठवून समर्थांनी एक नवीन मूर्ती घडविली आणि बाहे इथे रामलिंग बेटावर तिची स्थापना केली.
 
 
7. मनपाडळे - समर्थांनी पन्हाळगड आणि ज्योतिबाचा डोंगर यांच्या अगदी नजीक येथील मारुतीची स्थापना केली. त्यामागे गडाचे राजकीय आणि लढाईतले महत्त्वाचे स्थान त्यांनी विचारात घेतले होते. येथील मारुतीची मूर्ती साधी आणि उत्तराभिमुख आहे.
 
 
8. शहापूर - इथला मारुती सन 1645 साली स्थापित झाला. ही मूर्ती चुन्याची आहे, म्हणून तिला चुन्याचा मारुती असेही म्हणतात. या मारुतीच्या मस्तकी गोंड्याची टोपी आहे. रूप उग्र आहे. मारुतीची कथा मोठी रंजक आहे. शहापूर गावालागत चंद्रगिरी डोंगरावर समर्थ मुक्कामाला असताना या गावच्या बाजीपंत कुलकर्णी यांच्या घरीही ते भिक्षा मागायला जात असत. परंतु बाजीपंतांच्या पत्नी सतीबाई समर्थांना कधीही भिक्षा वाढत नसत आणि वर गोसावडा म्हणून हेटाळणी करत असत. एकदा कुळकर्णी यांना तिथल्या मुसलमान अंमलदाराने हिशोब चुकल्याचे कारण सांगून अन्यायाने अटक केली आणि शिपाई त्यांना घेऊन विजापूरला निघाले. त्या वेळी समर्थांनी शहापुरात चुन्याचे मारुतीराय घडविले आणि या संकटातून सोडविण्यासाठी हनुमंताचा धावा आरंभला. कुळकर्णी सुटून परत आले. परिणामी कृतज्ञभावाने कुलकर्णी कुटुंब व गावकरी मारुतीचे निस्सीम भक्त झाले.
 
 
9. मसूर - इथे सन 1645 साली समर्थांनी चुन्याची मारुतीची मूर्ती प्रतिष्ठापित केली. ही मूर्ती 11 मूर्तींमध्ये सर्वाधिक देखणी आहे, असे म्हणतात.
 
 
समर्थांनी कृष्णा खोर्‍यात रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन दिवशी मोठ्या प्रमाणात उत्सव सुरू केले. इथल्या मातीत आणि माणसांमध्ये आदिलशाही व मोगलाईविरोधात झुंजण्याची प्रेरणा मूळ धरू लागली. समाजपुरुषाच्या क्षात्रतेजावर बसलेली धूळ उडाली आणि समर्थांनी तिथे अस्मितेचे स्फुल्लिंग चेतविले. मसूरला हे दोन्ही उत्सव आजही जोशात साजरे होतात.
 
 
 
10. बत्तीस शिराळे - हे गाव नागपंचमीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. समर्थांनी स्थापिलेल्या मारुतीस्थानासाठीदेखील हे स्थान प्रसिद्ध आहे. रामदासस्वामींचे एक शिष्य महादजी देशपांडे यांच्या आग्रहावरून शिराळे इथे समर्थांनी 1655 साली उत्तराभिमुख वीर मारुतीची स्थापना केली. आजही देशपांडे कुलाकडे इथली व्यवस्था आहे. वीर मारुतीची मूर्ती सात फूट उंच आहे. या मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या अंगाला झरोके आहेत. रोज सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी मूर्तीवर झरोक्यामधून सूर्याची किरणे पाझरतात. हे अतिशय मनोहर दृश्य पाहण्यासारखे असते.
 
 
11. पारगावचा मारुती - हा कराड-कोल्हापूर मार्गावर आहे. वाठार येथून वारणानगरच्या कारखान्याकडे रस्ता जातो, ते नवे पारगाव. नव्या पारगावजवळ दोनेक मैलावर जुने पारगाव आहे, तिथे हा मारुती आहे. ही मूर्ती लहान म्हणजे दीड फूट इतकीच आहे. एका शिळेवरती हा मारुती कोरलेला असून तो वेगाने धावत निघालेला आहे असा आभास होतो. समर्थशिष्या वेण्णास्वामी यांनी या अकरा मारुतींवरचा एक अभंग रचलेला आहे, तो असा -
 
 
 
चाफळामाजी दोन, उंब्रजेसी येक। पारगावी देख चौथा तो हा॥


पांचवा मसूरी, शहापुरी सहावा। जाण तो सातवा शिराळ्यांत॥


सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा। दहावा जाणावा माजगावी॥


बाह्यात अकरावा येणेरीती गावा। सर्व मनोरथा पुरवील॥


वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥
 
 
 
सातारा किंवा कराड परिसरातून पहाटे लवकर निघाल्यास खाजगी वाहनाने अकरा मारुतीस्थाने अवघ्या एक दिवसात पाहणे सहजशक्य आहे. याचे कारण ही सगळी स्थाने अगदी कमी अंतरावर आहेत. मुख्य म्हणजे रस्त्यांची स्थिती चांगली आहे. वाटेत ठिकठिकाणी उपाहारगृहे आहेत, जिथे बर्‍यापैकी स्वच्छ रीींंरलहशव प्रसाधनसुविधा पर्यटकांना उपलब्ध आहेत. वेळेअभावी झटपट पद्धतीने ज्यांना अकरा मारुती दर्शन करणे भाग आहे, त्यांच्यासाठी या मार्गाने यात्रा केल्यास ते सोयीचे होईल. प्रथम चाफळ आणि शिंगणवाडी करून माजगावला जावे. तिथून उंब्रज आणि नंतर मसूरला जावे. उंब्रजवरून कराडच्या दिशेने गेले की वळून मांड नदीवरचा पूल ओलांडला की एक रस्ता डावीकडे जातो. या रस्त्याने मसूरचा मारुती व शहापूर करावे. तिथून कराडला जावे. तासगाव रस्त्याने रेठरेमार्गे कोळे नरसिंगपूर व बाहे मारुती पाहता येईल. तिथून इस्लामपूरमार्गे शिराळ्याचा, वारणानगरमार्गे मनपाडळे व पारगावचा मारुती पाहावा.
 
 
पश्चिम महाराष्ट्राच्या या रम्य भागात सज्जनगडही आहे, जिथे समर्थांची समाधी आहे. श्रीधरस्वामी यांनी इथेच वास्तव्य केलेले आहे. बालविधवा असलेल्या शिष्या वेण्णास्वामी यांना तब्बल 500 वर्षांपूर्वी समर्थांनी मठाधिपती नेमले होते, त्यांचीही वृंदावन समाधी गडावर आहे. समर्थांनी स्थापन केलेले आणखीन दोन मारुती गडावर आहेत. अकरा मारुती दर्शनानंतर त्यांचे निस्सीम उपासक असलेल्या समर्थाच्या समाधीवर माथा टेकल्याशिवाय जिवाला समाधान मिळत नाही. अर्थात तो अनुभव हा स्वयंप्रचितीचा विषय आहे.
 
 
सातारा परिसरातच अजिंक्यतारा आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेली बारा मोटीची विहीर आणि राजकीय गुप्त खलबते करण्यासाठी विहिरीत बांधलेला लहानसा महाल आहे. कृष्णा-वेण्णा माहुलीसंगम आहे आणि थोडे पुढे गेल्यास गोंदवलेकर महाराजांचे समाधी दर्शनदेखील याच सहलीदरम्यान घडणे सहजसाध्य आहे. त्यामुळे हा लेख वाचल्यानंतर अकरा मारुतींच्या दर्शनार्थ तुम्ही नक्की जाणार आणि सोबत पर्यटनसुभग सातार्‍याची तर्‍हादेखील नक्की अनुभवणार, याची पूर्ण खात्री आहे.