हिंदुत्व वॉच - भारताविरोधातल्या नव्या युद्धाची सुरुवात

09 Dec 2023 14:21:38

hindu
पूर्वीचा काळ हा शत्रूशी रणांगणात युद्ध करण्याचा होता, काळ बदलला तसा युद्धाची शस्त्रे आणि पद्धती बदलल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक काळात तंत्रज्ञान आधारित युद्धांचे जाळे पसरत जाईल. त्यातीलच म्हणता येईल असे हिंदुत्व वॉच हे संस्थळ. हे संस्थळ हिंदूंनी केलेल्या मुस्लिमांच्या विरोधातील हेट स्पीच दाखवतात. ही द्वेषपूर्ण भाषणे एकतर्फी दाखवली जातात. एकूण रंग बघता, भारतविरोधी मत तयार करून समाज आणि पर्यायाने देश फोडण्याचा हा प्रयत्न आहे. यातून भारतीय समाजात विविध प्रकारची अस्थिरता माजवण्याचा उद्देश यामागे आहे.
सप्टेंबर 2023मध्ये ‘हिंदुत्व वॉच’ या एका जालीय प्रकल्पाने केलेल्या तथाकथित सर्वेक्षणानुसार देशातील द्वेषपूर्ण भाषणांचे (हेट स्पीचचे) प्रमाण वाढलेले आहे. महाराष्ट्रात 2023मध्ये सर्वाधिक हेट स्पीच दिसलेले आहेत, असे हे सर्वेक्षण सांगते. 2023 किंवा 2024पर्यंत विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार्‍या राज्यांत 70 टक्के ‘हेट स्पीच’ नोंदवण्यात आल्याचा निष्कर्ष या संस्थेने काढला आहे. हा जालीय प्रकल्प फक्त हिंदूंनी मुस्लीम समाजाच्या अथवा व्यक्तीच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचेच संकलन करतो. त्यामुळे हे निष्कर्ष फक्त हिंदूंनी मुस्लिमांच्या विरोधात केलेली द्वेषपूर्ण भाषणे दाखवतात. भारतीय प्रसारमाध्यमांनीदेखील त्यांच्या वाचकवर्गासमोर ह्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणलेले आहेत.
 
 
हेट स्पीच हे कोणीही कुणाच्याही विरोधात केले तरी ते वाईटच असते. त्याचे समर्थन अथवा बचाव करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामागे जमावाला एखाद्या समाजाविरोधात अथवा व्यक्तीविरोधात चिथावून हिंसा करण्याचा अथवा आयुष्यातून उठवण्याचा वाईट हेतूदेखील असू शकतो. 80च्या दशकापासून अशा हिंसेच्या सावटात राहणार्‍या आणि साधारण दोन वर्षांपूर्वी हिंसेला सामोरे जाऊन स्वत:चा एक डोळा गमावणार्‍या सलमान रश्दींपासून ते नूपुर शर्मा आणि अगदी अलीकडे तयार केलेल्या खोट्या बातमीमुळे स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात आलेला श्रीनगरच्या एनआयटीमधील प्रथमेश शिंदे अशी अनेक उदाहरणे असू शकतात. पण अर्थात ती मुस्लीम समाजाच्या विरोधातील नसल्याने हिंदुत्व वॉच ह्या संस्थेने ती सर्वेक्षणात घेतलेली नाहीत. (इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की सलमान रश्दी हे जरी जन्माने इस्लाम धर्मीय असले, तरी ते निधर्मी आहेत आणि त्यांच्याविरोधात जाणारे हे मुस्लीम समाजाचे घटक असल्याने ते मुस्लीम विरोधातील हेट स्पीच ठरत नाही.)
 
हेट स्पीच कशाला म्हणतात?
 
हेट स्पीच या शब्दाचा व्यावहारिक आणि कायदेशीर अर्थ देशानुरूप बदलतो. अमेरिकेत घटनेने पूर्ण भाषणस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य दिले असल्याने राष्ट्रीय पातळीवर हेट स्पीचसंदर्भात प्रत्यक्ष कायदे नाहीत.
 
 
युरोपीय महासंघामध्ये, तसेच भारतात हेट स्पीचसंदर्भात काही कायदे आहेत. प्रामुख्याने जर एखाद्याच्या वक्तव्यातून समाजात एखाद्या विशिष्ट गटाविरोधात द्वेष पसरवण्याचा अथवा हिंसाचार घडवून आणायचा उद्देश दिसला, तर ते हेट स्पीच गुन्ह्याअंतर्गत येते. भारतात 153 (अ) अंतर्गत, तसेच 295 (अ) अंतर्गत, हेट स्पीच संदर्भातील गुन्ह्यासाठी तीन ते पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.
 


hindu 
 
हिंदुत्व वॉच संस्थळाच्या संशोधनाचा(?) पाया आणि त्रुटी
 
हेट स्पीच संदर्भातील हे कथित संशोधन जालीय माहिती deta scrapping पद्धतीने वापरते. त्यांना ज्या वृत्तपत्र संस्था दखलपात्र वाटतात, त्यांचा आधार घेण्यात आला आहे. याचा अर्थ त्यांना जे योग्य वाटले अथवा सोयीस्कर वाटले, ते संदर्भ घेण्यात आले आहेत.
 
 
या तथाकथित संशोधनात भारतीय कायद्यानुसार असलेली व्याख्या न वापरता, संयुक्त राष्ट्रसंघाची हेट स्पीचची जी व्याख्या आहे ती वापरतात. म्हणजे जे कदाचित भारतीय घटनेनुसार गुन्हे ठरणार नाहीत, ते कुठल्यातरी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या व्याख्येनुसार ठरतील. थोडक्यात, यांना भारतीय कायदे पूर्ण मान्य करायचे नाहीत.
 
 
हा अहवाल पुढे लव्ह जिहाद, लँड जिहाद, इकॉनॉमिक जिहाद वगैरे शब्दांत वर्गीकरण करत असले शब्द ज्या भाषणात आले असतील, त्याला प्रत्येकाला हेट स्पीच म्हणतो. मग ते कायद्यानुसार हेट स्पीच असो अथवा नसो.
 
 
या अहवालात, प्रत्यक्ष हिंसाचाराला अथवा हिंसेला परावृत्त करणारी भाषणेसुद्धा घेतली आहेत, ती हेट स्पीच नक्कीच ठरू शकतात. परंतु याला एकीकडे संशोधन म्हणायचे, आणि एक समुदाय दुसर्‍या समुदायातील व्यक्तीच्या वक्तव्यामुळे बळी गेला आहे हे सिद्ध करताना त्या संपूर्ण समुदायासच (इथे हिंदूंना) दोषी ठरवायचे. ते करताना जे काही संशोधन केले आहे, त्याचा ना धड विदा (डेटा) जाहीर केला आहे, ना कुठल्या वृत्तसंस्थांची मदत घेतली आहे ते सांगितले आहे. म्हणजे ह्या संशोधकांनी जे लिहिले, ते कुठलेही प्रश्न न विचारता खरे मानायचे.
 
 
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सर्व एकतर्फी ठरवलेले हेट स्पीच आहे - म्हणजे हिंदूंच्या अथवा मुस्लिमेतर धर्मीयांच्या विरोधात जी काही हेट स्पीचेस झाली, ती किती आहेत? ती करणारे कोण आहे? वगैरे तौलनिक निरीक्षण नाही.
 
 
मग प्रश्न पडतो की असे का चालू असावे? त्यासाठी हा प्रकल्प आणि त्याच्याशी कोण संबंधित आहे, हे पाहावे लागेल.
 
 
ह्या संशोधनात पॅरिसमधून आरुषी श्रीवास्तव नावाची नव्याने पत्रकार असलेली एक पत्रकार, तसेच अभ्युदय त्यागी हा कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी. करणारा विद्यार्थी सहभागी होते. त्या सर्वांच्या तसेच संशोधनाच्या खर्चासाठी नक्की कोणी अनुदान केले, हे जाहीर केलेले नाही. थोडक्यात, त्यात काही conflict of interest आहे का, हे गुप्त ठेवण्यात आले आहे.
 

hindu 
 
हिंदुत्व वॉच-नक्की कोणाचा प्रकल्प?
 
 
हिंदुत्व वॉचच्या संस्थळावर दिलेल्या माहितीनुसार,
 
Hindutva Watch is an independent research initiative to monitor the reports of attacks on the members of minority and marginalised communities for their faith by the radicalised Hindus and the Hindutva militia groups in India. We aim to expose ideology, institutions and people responsible for acts of violence and injustice.
 
We gather content and information from our network of journalists, activists and the credible publicly available sources including reputable news organisations. Hindutva Watch strictly adheres to the principles of ethical journalism that strives to ensure the free exchange of information that is accurate, fair and thorough.
 
थोडक्यात, हिंदुत्व वॉच ही कुठलीही अधिकृत संस्था नाही. त्यांच्या प्रकल्पामध्ये हे गृहीत धरलेले आहे की हिंदू आणि हिंदुत्ववादी अतिरेकी विचारांचे आहेत. या संस्थेच्या नावात हिंदू आणि हिंदुत्व हे शब्द जणू काही शिवी असल्यासारखे वापरलेले दिसतात. त्यात ु काढण्यासाठी हिंदूंना पवित्र असलेला त्रिशूल उपहासाने वापरला आहे.
 
 
जसजशा 2024च्या लोकसभा निवडणुका जवळ येतील, तसतसे असे धूळफेक करणारे प्रकल्प अधिकाधिक दिसू लागतील. जालीय माहिती युद्धाच्या काळात समाजात जशा गैरसमज पसरवणार्‍या संघटना, योजना वाढीस लागल्या, तशाच त्यांच्याबद्दलची माहिती काढून वास्तव जगापुढे आणणार्‍या संघटना, योजनाही तयार झाल्या आहेत, ज्यांचा उद्देश कुठलेही गैरसमज कमी करणे, दुही टाळणे आणि समाजाला वास्तवातील हितशत्रू कोण आहेत हे दाखवून देणे असा असतो.
 
 
ट्विटर या (आता एक्स नावाने ओळखल्या जाणार्‍या) समाजमाध्यमात ‘डिसइन्फॉर्मेशन लॅब’ या नावाने असाच एक प्रकल्प आहे, जे विविध प्रकारच्या चुकीच्या माहितीवर प्रकाश टाकतात आणि त्यांचे बोलविते धनी कोण आहेत हे दाखवून देतात.
 
डिसइन्फॉर्मेशन लॅबने, हिंदुत्व वॉच प्रकल्पाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी संशोधन केले. त्यासाठी त्यांनी विविध वृत्तपत्रात आणि समाजमाध्यमात (सोशल मीडियात) आलेली माहिती, त्यातून दिसलेले संदर्भ वगैरे एकत्र केले आणि एखाद्या कोड्याचे तुकडे एकत्र आणून ते सोडवावे तसे आणले. त्यातून तयार झालेले चित्र खालील माहिती दाखवते - (संदर्भ - https://x.com/DisinfoLab/status/1708108425669001718?s=20)
 
 
थोडक्यात सांगायचे झाले तर, रकीब नाईक हा म्होरक्या असलेल्या हिंदुत्व वॉचची तांत्रिक बाजू पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तानी मुस्लीम लीगशी संबंधित असलेल्या सरदार आदिल कयानी हे बघतात. केवळ पाकिस्तानी राजकीय पक्ष मुस्लीम लीगशी संबंधित असणे इतकीच कयानी यांची माहिती नाही, तर ते भारतविरोधी अपप्रचार आणि काश्मीरमधील फुटीरतेला खतपाणी घालण्यासाठीचे माहितीतंत्र वापरण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. काश्मीर स्वतंत्र करण्यावरून त्यांनी ट्विटरवरही जाहीर वक्तव्ये केली आहेत. त्याव्यतिरिक्त ईशान्य भागातील राज्यांच्या संदर्भात आणि अगदी मध्य प्रदेशालाही स्वतंत्र करा, अशी या महाशयांची वक्तव्ये आहेत. थोडक्यात, हेसुद्धा ‘टुकडे टुकडे’ पठडीतले आहेत.
 
 
आदिल कयानी महाशय हे सायरस कयानी या नावाने भारतविरोधी पाकिस्तानी संस्थळ Global Village Space
 
 
हिंदुत्व वॉच संस्थळाचा प्रमुख असलेला रकीब नाईक हा आधी आणखी एका भारतविरोधी संस्थळ twocircles.net  संलग्न होता. या संस्थळाचा संस्थापक कशीफ अल हुदा ह्याचे लेखन, ट्वीट्स भारतविरोधी असतातच. त्याव्यतिरिक्त झाकीर नाईक, सिमी संघटनेशी हुदाचा संबंध असल्याचेही लक्षात येऊ शकते.twocircles.netसंस्थळांचे लेखन आदिवासी, दलित, भारतीय मुस्लीम, स्त्रीवर्ग अशा समाजात विभागले गेले आहे. ह्याच संस्थळाचा संपादक इरफान मेहराज हा दहशतवादी कारवायांमुळे UAPAच्या अंतर्गत अटकेत आहे. एकूण रंग बघता, भारतविरोधी मत तयार करून समाज आणि पर्यायाने देश फोडण्याचा प्रयत्न दिसतो. डिसइन्फॉर्मेशन लॅबने तयार केलेल्या तक्ता यावर अधिक प्रकाश टाकतो. (संदर्भ - https://x.com/DisinfoLab/status/1708108459651236280?s=20)
 
 
थोडक्यात हिंदुत्व वॉच हे संस्थळ रकीब नाईक एकतर प्रत्यक्ष जाहीरपणे भारतविरोधी असलेल्या पाकिस्तानी व्यक्तींच्या अथवा भारतातील भारतविरोधी विचारांच्या व्यक्तींच्या सक्रिय सहभागाने चालवत आहे. रकीबने 2020नंतर भारतातून पलायन करून अमेरिकेत राहणे पसंत केले आहे. भारतात आणि एकूणच हिंदूंकडून धोका आहे, असा कांगावा तो करत असतो.
 
 
बोलविता धनी
 
ह्यामध्ये हिंदुविरोध, भारतविरोध, मोदी-भाजपा विरोध असे कुठलेही कारण असू शकते. असे वाटायचे कारण म्हणजे ह्या अहवालाला मिळालेली आंतरराष्ट्रीय माध्यमातील प्रसिद्धी. त्यात न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, ब्लूमबर्ग, रॉयटर्स, बीबीसी आदी अनेक माध्यमे आहेत. अशा माध्यमात येणार्‍या गोष्टी अनेकदा अमेरिकेतील आणि जगातील अनेक राजकरणी, उद्योजक आदी गांभीर्याने घेतात. जरी अशा एकाच बातमीने काही बदलणार नसले, तरी अशा हळूहळू नकारात्मक बातम्या सातत्याने पेरत राहिले, तर परिणाम होऊ शकतो. असा डाव असू शकतो.
 
 
एक नक्की - येनकेनप्रकारेण गैरसमज पसरवत भारतात विविध प्रकारची अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न चालू ठेवायचा, हाच उद्देश असू शकतो. थोडक्यात असा प्रकारचा अशास्त्रीय अहवाल हाच हिंदूंच्या विरोधात, भारताच्या विरोधात आणि मोदी-भाजपाच्या विरोधात एक हेट क्राइम आहे, असे म्हणावे लागते.
 
पाश्चात्त्य माध्यमांनी असे काही छापून आणले की त्यावर सारासार विचार न करता जर भारतीय व्यक्ती, संस्था, माध्यमे विचार करत असतील आणि पसरवत असतील, तर याचा अर्थ एकतर तेदेखील आंतरराष्ट्रीय राज्यकारणातले प्यादे झालेत अथवा काळाच्या ओघात विश्लेषण न करता नुसत्या कॉपी आणि पेस्ट करून बातम्या देऊ लागले आहेत, असे म्हणावे लागेल.
-विवेक सत्यवादी
Powered By Sangraha 9.0