@अभिजित जोग
9822041746दि. 24 ते 26 नोव्हेंबर 2023दरम्यान थायलंडची राजधानी बँकॉक येथे वर्ल्ड हिंदू काँग्रेसचं भव्य आयोजन करण्यात आलं. हिंदू संस्कृतीच्या पदचिन्हांनी आग्नेयेचा संपूर्ण प्रदेश व्यापून टाकला आहे. भाषा आणि संस्कृतीचा प्रवाह भारताकडून जगभरातील अनेक प्रदेशांमध्ये गेला आणि त्या प्रदेशांशी भारतीय संस्कृतीचं नातं कायमचं जोडलं गेलं. याचं एक उदाहरण म्हणजे थायलंड. बँकॉकच्या विमानतळाचं नाव ’सुवर्णभूमी एअरपोर्ट’ आहे आणि तिथला राजा स्वत:ला ’राम’ म्हणवून घेतो, यातच हिंदू संस्कृतीचा तिथे आजही टिकून असलेला प्रभाव दिसून येतो. म्हणूनच हिंदू संस्कृतीच्या पुनर्जागृतीचा शंखनाद करणार्या 2023च्या वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या आयोजनासाठी बँकॉकची निवड ही सर्वार्थाने औचित्यपूर्ण होती.

दर चार वर्षांनी एकदा भरणारी वर्ल्ड हिंदू काँग्रेस, हे हिंदूंना एकमेकांशी जोडणारं, विचारांचं आणि कल्पनांचं आदानप्रदान करण्याची संधी देणारं आणि धर्माच्या पुनरुत्थानासाठी प्रेरणा देणारं जागतिक पातळीवरचं व्यासपीठ आहे. हिंदू समाजाला आपल्या मूल्यांची जपणूक करत, आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व संपर्कक्षेत्रात भरारी घेता यावी, तसंच महिला व तरुण यांच्यासाठी प्रगतीच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी या व्यासपीठावर अनेक कार्यक्रम, योजना आणि प्रकल्प यांची आखणी करण्यात येते. अयोध्येतील भव्य राममंदिराच्या स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आलेला असताना भरणारी 2023ची वर्ल्ड हिंदू काँग्रेस सर्वार्थाने चैतन्यशील आणि उपस्थितांना एका आगळ्या ऊर्जेने भरून टाकणारी होती. ’जयस्थ आयातनं धर्म:’ हे घोषवाक्य असलेल्या या संमेलनाशी संबंधित काही आकड्यांवरून याची व्याप्ती आणि भव्यता लक्षात येते. या संमेलनात 61 देशांमधून आलेल्या 2200 प्रतिनिधींनी भाग घेतला. या तीन दिवसांत 47 विचारप्रवर्तक सत्रं झाली, ज्यात विविध क्षेत्रांतील 200 नामावंत व्याख्यात्यांनी आपलं सादरीकरण केलं. प्रमुख कार्यक्रमाबरोबर एकाच वेळी झालेल्या विविध विषयांवरील सात परिषदांमध्ये हिंदू धर्मासाठी व हिंदू समाजासाठी महत्त्वाच्या अशा विविध विषयांवर व्याख्यानं, चर्चासत्रं व विचारांचं आदानप्रदान झालं. द्वेष, हिंसा आणि विनाश यांच्या चक्रात अडकलेल्या जगाला मार्ग दाखवण्याची क्षमता हिंदू धर्मात आहे, त्यामुळे जगाला हिंदू धर्माकडे वळावंच लागेल; पण त्याआधी भारतातील व जगभरातील काही घातक शक्तींनी सनातन धर्माविरुद्ध उघडलेल्या विद्वेषाच्या आघाडीवर मात करावी लागेल, अशी भावना या सत्रांमध्ये व्यक्त करण्यात आली.
बँकॉकमधील ’इम्पॅक्ट सेंटर’ या भव्य वास्तूत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले, जिची क्षमता इतकी प्रचंड आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी संख्या असूनही कुठेही गर्दी अथवा गडबड झाली नाही. एकाच वेळी 2200 लोकांना जेवायला बसता येईल असा भव्य ’मा अन्नपूर्णा भोजन कक्ष’ हेदेखील संमेलनाचं एक वैशिष्ट्य होतं. विविध विषयांवरील स्टॉल्स, जगभर सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पोस्टर्स यामुळे वातावरणनिर्मिती तर झालीच, त्याचबरोबर महत्त्वाच्या माहितीचं आदानप्रदानही होऊ शकलं. पुण्यातील ’भीष्म’ संस्थेने घेतलेल्या तीन स्टॉल्समुळे महाराष्ट्राचं अस्तित्व प्रामुख्याने जाणवलं. विविध कक्षांना दिलेली नावंही कल्पक व औचित्यपूर्ण होती. प्रमुख सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं होतं, तर विविध परिषदा जिथे भरल्या, त्या कक्षांना दिलेली नावंही मनाला भिडणारी होती - महर्षी दयानंद सरस्वती (हिंदू एज्युकेशन कॉन्फरन्स), लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (हिंदू मीडिया कॉन्फरन्स), श्री अरुमुगा नवलार (हिंदू पॉलिटिकल कॉन्फरन्स), राजमाता जिजाबाई (हिंदू वुमन्स कॉन्फरन्स), धर्मवीर हकीकत राय (हिंदू यूथ कॉन्फरन्स).

दि. 24 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड हिंदू फाउंडेशनचे संस्थापक व आयोजन समितीचे प्रमुख स्वामी विज्ञानानंद यांनी केलेल्या रोमांचक शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. थायलंडस्थित भारतीय उद्योगपती सुशील कुमार सराफ यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. या प्रसंगी हिंदू धर्मासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणार्या भारत सेवाश्रम संघ, हिंदुइझम टुडे आणि माता अमृतानंदमयी मठ यांचा गौरव करण्यात आला. माता अमृतानंदमयी यांची उपस्थिती हा या उद्घाटन समारंभाचा व संपूर्ण संमेलनाचा एक महत्त्वाचा पैलू होता. भारताच्या उज्ज्वल धार्मिक परंपरेविषयी बोलताना अम्मांनी सांगितलं की, “भारतभूमीच्या कणाकणात वेदमंत्रांच्या उच्चाराचं आणि ऋषिमुनींच्या अस्तित्वाचं स्पंदन आजही जाणवतं. हीच भारताची आध्यात्मिक शक्ती आहे. गेल्या पन्नास वर्षांत शैक्षणिक क्षेत्राची खूप प्रगती झाली आहे, पण त्यात माणूस मागे पडला आहे, कारण संवेदनशीलता आणि नैतिकता हरवली आहे” अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय सुरेशजी सोनी यांनी व्यक्त केली.

परमपूजनीय सरसंचालक डॉ. मोहनजी भागवत यांची उपस्थिती कुठल्याही समारंभाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. त्यांचं अभ्यासपूर्ण, विद्वत्तापूर्ण व विषयाच्या गाभ्याला स्पर्श करणारं व्याख्यान ऐकणं हा तर बुद्धी आणि अंत:करण दोन्हींना आनंद देणारा आणि उन्नत करणारा अनुभव असतो. वर्ल्ड हिंदू काँग्रेसचा उद्घाटन सोहळाही त्याला अपवाद नव्हता. पू. मोहनजींनी या संमेलनाचं घोषवाक्य ’जयस्य आयातनं धर्म:’ याचा अर्थ उलगडून दाखवणारं विवेचन केलं. विजयाकडे मार्गक्रमण करताना धर्माची कास धरणं कसं महत्त्वाचं आहे, हे त्यांनी विशद केलं. ’जय’ या संकल्पनेचं विस्ताराने विवेचन करताना त्यांनी सांगितलं की “जय म्हणजे इतरांना पराभूत करणं नसून सगळ्यांनी एकत्र येणं हा त्याचा अर्थ आहे.” विजयाच्या तीन प्रकारांबद्दल बोलताना ते म्हणाले की “500 वर्षं भारताने तामसी प्रवृत्तीच्या ’राक्षस विजयाचा’ अनुभव घेतला, ज्यात विध्वंसासाठी विध्वंस केला जातो. अशा विजयातून फक्त असुरी आनंदची प्राप्ती होते. त्यानंतर 150-200 वर्षं आपण ’धन विजयाचा’ अनुभव घेतला, ज्यात भारताच्या संपत्तीची व समृद्धीची प्रचंड प्रमाणात लूट झाली. पण आपली विजयाची संकल्पना आहे ’धर्म विजय’ - जो धर्माच्या आधारावर आणि धर्माच्या नियमांप्रमाणे मिळवला जातो. आज रशिया-युक्रेन, इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धामुळे, तसंच चीनच्या विस्तारवादामुळे गोंधळलेल्या जगाला सत्य आणि संतुलन यांचा मार्ग दाखवण्याचं कार्य भारतच करू शकतो” असंही त्यांनी सांगितलं. “गेली दोन हजार वर्षं जगाने जडवाद, साम्यवाद, भांडवलशाही यांचा अनुभव घेतला, ज्यातून भौतिक प्रगती झाली, पण समाधान लाभलं नाही. आता जगाला हे जाणवू लागलं आहे की शांतीचा व समाधानाचा मार्ग भारतच दाखवू शकेल” असं पू. सरसंघचालकांनी विवेचन केलं.
थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी आपल्या संदेशात सांगितलं की “सत्य, अहिंसा, सहिष्णुता आणि सुसंवाद या हिंदू मूल्यांमुळेच जागतिक शांतीची प्रस्थापना होऊ शकेल.” भारताच्या एकात्मतेच्या तत्त्वज्ञानामुळे स्त्रियांना विशेष स्थान लाभलं आहे, असं मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका वंदनीय शांताक्का यांनी व्यक्त केलं.
पहिल्या दिवशी झालेल्या चर्चेत हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी जगभरातील हिंदू संघटनांना अधिक बळ देण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला. या चर्चेत न्यूझीलंड येथील प्रा. गुण मंगेशन, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, बंगळुरूच्या इस्कॉनचे तसेच अक्षय पात्र फाउंडेशनचे प्रमुख मधू पंडित दास, चिन्मय मिशनचे स्वामी मित्रानंद यांनी भाग घेतला. दत्तात्रय होसबाळे यांनी सांगितलं की “जगभर हिंदू धर्मातील विविध जाती, पंथ, संप्रदाय, भाषा यांच्यावर आधारित संघटना कार्यरत आहेत. या वैविध्यातून आपसात बेकी निर्माण होऊ नये व हिंदू पुनरुत्थानाच्या मूळ उद्दिष्टाचं विस्मरण होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. माहितीची देवाणघेवाण, सुसूत्रता, सहकार्य यांच्यात वाढ होत गेली पाहिजे. धर्मांतर हे मानवी हक्कांचं दमन आहे याकडे जगाचं लक्ष वेधलं पाहिजे व जगातील अनेक विद्यापीठांमध्ये ’डिपार्टमेंट ऑफ हिंदू स्टडीज’ अस्तित्वात नाही, यात बदल घडवला पाहिजे.”
दुसर्या दिवशी दि. 25 नोव्हेंबरला झालेल्या "Accelerating Bharat's World Standing : The Power of Education, Economy and Technology' या चर्चेत बनारस हिंदू विद्यापीठाचे नचिकेता तिवारी, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंग, झोहो कॉर्पोरेशनचे श्रीधर वेम्बू व सुप्रसिद्ध उद्योगपती मोहनदास पै यांनी भाग घेतला.
समारोपाच्या सत्रात मा अमृतानंदमयी यांनी प्रेम, नि:स्वार्थी सेवा व नैतिकता यांच्यावर आधारित जागतिक व्यवस्थेचं महत्त्व विशद केलं. माणूस आणि निसर्ग यांच्यातील दुवा जपणारा, सर्वसमावेशक हिंदू धर्मच जगाला मार्ग दाखवू शकेल असंही त्यांनी सांगितलं.
61 देशांमधून आलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वर्ल्ड हिंदू काँग्रेसचा जाहीरनामा स्वीकृत केला गेला. यात हिंदुत्व आणि सनातन धर्मावर विनाकारण टीका करण्याच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. 150 वर्षांपासून ’हिंदुइझम’ च्या नावाखाली धर्माला एका ’इझम’पर्यंत सीमित करण्याच्या कारस्थानावरही आक्षेप घेण्यात आला. हिंदूंनी ’हिंदुइझम’ऐवजी ’हिंदुत्व’ शब्दाचा वापर करावा असा ठरावही करण्यात आला. हिंदुइझम हा शब्द पहिल्यांदा 1877 साली वापरण्यात आला, जेव्हा सोसायटी फॉर प्रमोटिंग ख्रिश्चन नॉलेज यांनी मोनियर विल्यम्स लिखित ’हिंदुइझम’ ही पुस्तिका प्रकाशित केली. हिंदू धर्मविरोधी प्रचार करण्यासाठी 150 वर्षांपासून याचा वापर होत आहे. प्रमुख कार्यक्रमांबरोबरच झालेल्या विविध परिषदांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांचा परामर्श घेण्यात आला. यामध्ये विक्रम संपत, आनंद रंगनाथन, सुशील पंडित, विवेक अग्निहोत्री, प्राच्यम स्टुडिओचे क्षितिज राय, अॅड. मोनिका अरोरा, रश्मी सामंत, आनंद नरसिंहन, अॅड. अश्विनी उपाध्याय यांच्यासारख्या अनेक नामवंत व विद्वान वक्त्यांचा समावेश होता.
स्वामी विज्ञानानंद यांच्या नेतृत्वाखाली आयोजन समितीने केलेलं चोख नियोजन व घेतलेले अपार कष्ट यामुळे संमेलनाचा संपूर्ण अनुभव अत्यंत आनंददायक होता. कुठल्याही प्रकारची अडचण अथवा गैरसोय अजिबात जाणवली नाही. प्रत्येक प्रतिनिधीला स्वागत किटमध्ये दोन लाडू देण्यात आले, ज्यांची चर्चा संपूर्ण संमेलनात रंगली होती. एक लाडू छोटा व नरम होता, जो हिंदू समाजाच्या सद्य:स्थितीचं प्रतिनिधित्व करत होता, जिथे आपल्या समाजाचे तुकडे करणं सहज शक्य होतं आणि त्याला सहज गिळंकृतही करता येतं; तर मोठा कडक लाडू भविष्यातील एकसंध, बलशाली हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करत होता, ज्याचे तुकडे करणं शक्यच होणार नाही.
जगभरातून आलेल्या हिंदूंना भेटणं, त्यांची ओळख करून घेणं, त्यांच्याशी मैत्रीचे बंध जुळवणं ही एक अपूर्व पर्वणी होती असंच म्हटलं पाहिजे. विशेषत: पाकिस्तान व बांगला देशहून आलेल्या हिंदूंची भेट कायम लक्षात राहील अशीच होती. जागतिक हिंदू समाजाची शक्ती, क्षमता, ऊर्जा आणि चैतन्य यांचं झालेलं दर्शन मनाला आनंद आणि उभारी देणारं होतं, हे निश्चित.