आप्पांचं जाणं..

08 Dec 2023 16:51:38
 @सुधीर जोगळेकर
9820016674

vivek
डोंबिवलीचं सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक-आर्थिक आणि क्रीडाविषयक जीवन ज्या त्रयीच्या प्रोत्साहनाने फुललं, विकसित झालं, डोंबिवलीच्या तीन पिढ्यांतील कलाकारांना-गायकांना-वादकांना-नर्तकांना-अभिनेत्यांना आणि क्रीडापटूंना ज्यांचा आशीर्वाद लाभला, अशा प्राचार्य सुरेंद्र बाजपेई, आबासाहेब पटवारी आणि मधुकरराव चक्रदेव या त्रयीतले आप्पा एक होते. 2013 साली सर गेले, 2021 साली आबासाहेब गेले आणि आता 2023मधल्या आप्पांच्या जाण्याने या त्रयीमधला शेवटचा मालुसरा अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. स्मशानात आणि सावित्रीबाई फुले रंगमंदिरात शेकडो डोंबिवलीकरांनी गर्दी केली ती त्या शेवटच्या मालुसर्‍याला मानवंदना देण्यासाठी.
27 नोव्हेंबरच्या सोमवारी सकाळी आप्पा म्हणजे मधुकरराव चक्रदेव गेले. आदल्या दिवशी वेध क्रिएशन्सचा ‘सुंदर ती दुसरी दुनिया‘ हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी ते सावित्रीबाई फुले रंगमंदिरात जवळपास साडेचार-पाच तास उपस्थित होते.. आणि दुसर्‍या दिवशी पहाटे थोडा त्रास होऊन, तासा-दोन तासात गेले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने डोंबिवलीच्या संघवर्तुळातला, सामाजिक-सांस्कृतिक जीवनातला एक खळाळता प्रवाह अचानक थांबला.
 
 
 
आप्पांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्या दिवशी भर दुपारी शेकडो डोंबिवलीकर स्मशानभूमीत जमले आणि शनिवार 2 डिसेंबर रोजी दुपारी सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आप्पांना श्रद्धांजली वाहण्यासाठीदेखील तेवढीच गर्दी जमली.
का केली असावी डोंबिवलीकरांनी एवढी गर्दी? कोण होते आप्पा? काय होतं त्यांचं डोंबिवलीशी नातं?
 
आप्पांचा आणि डोंबिवलीकरांचा संबंध तसा सहा दशकांचा.
 
ठाण्याच्या एका रंग कारखान्यात त्यांना नोकरी लागली आणि ते डोंबिवलीत राहायला आले.. 
 
पेण हे त्यांचंं मूळ गाव. तिथेच शालेय शिक्षण झाल्यानंतर आप्पांनी रंगनिर्मितीचं प्राथमिक शिक्षण घेतलं. ठाण्याच्या एका रंग कारखान्यात त्यांना नोकरी लागली आणि ते डोंबिवलीत राहायला आले. मूळचाच कामसू स्वभाव, त्याला प्रामाणिकतेची जोड यामुळे आप्पा मालकांच्या पसंतीस उतरले, अल्प काळात ते फोरमन झाले.
 
 
संगीताची आवड, नाटकात काम करण्याची हौस यामुळे त्या काळात नाट्यक्षेत्रात सक्रिय असलेल्या मंडळींच्या नजरेत आप्पा भरले नसते तरच नवल होतं!
 
  
नारायणराव घुले आणि नलिनी घुले या दांपत्याच्या नजरेत ते आले आणि घुले दांपत्याच्या ज्येष्ठ कन्येचा - विजयाचा हात नारायणरावांनी मोठ्या विश्वासाने त्यांच्या हातात दिला. मधुकरराव आणि अंजलीताई यांचा संसार यथावकाश फुलायला लागला. जबाबदारी वाढू लागली. तेव्हा नुसती नोकरी पुरणारी नाही, काहीतरी जोड व्यवसाय सुरू करायला हवा, हे आप्पांच्या मनात येत गेलं आणि त्यांंनी रंगकामाची कंत्राटं घ्यायला सुरुवात केली.
 संघाशी आप्पांचा संबंध लहानपणीच आला
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आप्पांचा संबंध लहानपणीच आला होता. डोंबिवलीत तो वाढला, शहरातील सामाजिक कार्याकडे ते आकृष्ट व्हायला लागले. तो काळ होता सत्तरच्या दशकाचा..
 
 
सहकारी बँकांची चळवळ राज्यात जोम धरू लागली होती. कल्याण-डोंबिवलीत एक सहकारी बँक बुडाल्याने अनेकांचे पैसे बुडाले होते. त्या पार्श्वभूमीवर ठेवीदारांना आपले पैसे सुरक्षित राहतील याची खात्री वाटावी, भागधारकांचा विश्वास संपादित व्हावा, त्यांना बँक आपली वाटावी, गरजू माणसांच्या अडल्यानडल्या प्रसंगी बँकेची मदत व्हावी हे उद्दिष्ट समोर धरून ज्या मोजक्या मंडळींनी सहकारी बँक नव्याने स्थापन करण्याचा संकल्प सोडला, त्यात आप्पा एक होते. डोंबिवली नागरी सहकारी बँक या पार्श्वभूमीवर स्थापन झाली आणि आप्पा तिचे एक संस्थापक संचालक बनले.
 
 
बँकेत ठेवला जाणारा पैसा जनतेचा आहे, आपण त्याचे निव्वळ संरक्षक आहोत, त्यातल्या नव्या पैशालाही हात लावायचा अधिकार आपल्याला नाही, ही भूमिका प्रारंभापासून ठेवून आप्पांसह सर्वच संचालकांनी काम केल्याने बँक वाढली, एका शाखेवरून सत्तर शाखांपर्यंत बँकेने मजल मारली. बँक मल्टीस्टेट शेड्यूल्ड को-ऑपरेटिव्ह बँक बनली. बँकेचा रौप्यमहोत्सव झाला, सुवर्णमहोत्सवही. यथावकाश संचालक मंडळात नवे चेहरे आले. आप्पांसह अनेक संस्थापक संचालकांनी विश्रांती घेतली. पण आप्पा या सगळ्या प्रवासाचे सक्रिय साक्षीदार राहिले. इतकंच नव्हे, तर अगदी आजदेखील संचालक नसताना आप्पांचे सर्व कर्मचार्‍यांबरोबरचे आपुलकीचे संबंध कायम होते.
 
 
सत्तरच्याच दशकात डोंबिवलीत शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या, घुले दांपत्याचंही आदर्श विद्यालय सुरू झालं. जी भूमिका बँकेत काम करताना, तीच भूमिका विद्यालय चालवताना ठेवत अंजलीताई एक रुपया मानधनावर शाळेची जबाबदारी पाहू लागल्या.
 
डोंबिवली जिमखाना प्रकल्पाचे आप्पा संस्थापक संचालक बनले. 
 
याच काळात डोंबिवलीत वारे वाहू लागले होते उभरत्या क्रीडापटूंसाठी क्रीडा संस्था उभी करण्याचे. आप्पा मागे कसे राहावेत! समविचारी मित्रांना बरोबर घेत स्थापन झालेल्या डोंबिवली जिमखाना प्रकल्पाचे आप्पा संस्थापक संचालक बनले. एखाद्या नव्या संस्थेची धुरा उचलायची असं एकदा का त्यांनी मनाशी ठरवलं की ते सर्वशक्तीनिशी त्यासाठी झोकून देतात, हाच अनुभव इथेही आला. 1979-80मध्ये जिमखान्याची जुळवाजुळव सुरू झाली. 1981मध्ये स्थापन झालाही आणि आता 42व्या वर्षात जिमखान्याने डोंबिवलीच्याच नव्हे, तर ठाणे जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या आणि क्वचित प्रसंगी भारताच्या क्रीडा नकाशावर आपली नाममुद्रा कोरली आहे.
 
 
आप्पांनी संस्था नुसत्या सुरू नाही केल्या, ज्या ज्या संस्थेच्या स्थापनेत ते सक्रिय सहभागी झाले, त्या त्या संस्थेला आप्पांनी आपला ‘प्राणस्वर‘ बनवलं.
 
 
आप्प्पा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्हा संघचालक झाले. नियमित संघशाखेबरोबरच अन्य शाखांचा प्रवास, स्वयंसेवकांच्या घरी भेटी, प्रचारक-विस्तारकांचं पालकत्व, परिवारातील संस्थांच्या वाटचालीकडे लक्ष अशा असंख्य पैलूंनी त्यांची संघचालक कारकिर्द संस्मरणीय ठरली. वयाची पंचाहत्तरी येताच आप्पांनी संघचालकपदातूनच नव्हे, तर अन्य सार्वजनिक कार्यातूनही निवृत्ती घेण्याचा मनोदय जाहीर केला.
 
 
नव्वदच्या दशकानंतर तर आप्पांच्या सार्वजनिक व्यग्रतेला आणखीनच धुमारे फुटले. त्यातला एक धुमारा होता ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या अमृतमहोत्सवाचा, दुसरा होता चतुरंग प्रतिष्ठानच्या दिवाळी पहाटचा आणि रंगसंमेलनाचा, तिसरा धुमारा होता नववर्ष स्वागत यात्रेचा, चौथा होता अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा, पाचवा धुमारा होता स्वामी शिवानंद संगीत प्रतिष्ठानच्या संगीत महोत्सवांचा, सहावा होता डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून चालवलेल्या सांस्कृतिक उपक्रमांचा. या अशा धुमार्‍यांची संख्या आणखी कितीतरी मोठी.
 
 
त्यातला एक धुमारा होता राजकीय कार्याचा.
 
 आप्पांच्या व्यक्तिमत्त्वाला असलेली लोकप्रियता, समाजमान्यता पाहून आप्पांनी पक्षातर्फे विधानसभेची जागा लढवावी असा पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आग्रह धरला.
 
संघाने राजकीय पक्षाचं काम करायला सुचवलं आणि आप्पा भारतीय जनसंघाचं काम करू लागले, पण ते काही काळापुरतंच.
आप्पांच्या व्यक्तिमत्त्वाला असलेली लोकप्रियता, समाजमान्यता पाहून आप्पांनी पक्षातर्फे विधानसभेची जागा लढवावी असा पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आग्रह धरला. पण त्यांनी तो नम्रपणे बाजूला सारला आणि योग्य वेळ पाहून सक्रिय राजकारणातून अंग काढून घेतलं. पण राजकारणातील समविचारीच नव्हे, अन्यविचारी कार्यकर्त्यांशीही आप्प्पांचे संबंध मित्रत्वाचे राहिले. त्यामुळे काँग्रेसचे नकुल पाटील असोत किंवा शिवसेनेचे शशिकांत ठोसर असोत, उद्योगभरारी मारणारे शंकरकाका भोईर असोत किंवा आगरी यूथ फोरमचे गुलाब वझे असोत.. आप्पांच्या मैत्रवर्तुळात ही माणसं कायमचीच राहिली.
 
 
व्यवसायाच्या आघाडीवर आप्पांची व्यग्रता वाढत होती. रंगकंत्राटं कमी होऊन प्रत्यक्ष रंगनिर्मितीला प्रारंभ झाला होता. नामवंत कंपन्या आपल्या रंगांची प्रत्यक्ष निर्मिती आप्पांवर सोपवून मोकळे होऊ लागल्या होत्या. डोंबिवली औद्योगिक वसाहतीत ‘अंजली पेंट्स’ नावाने आप्पांचा पहिला कारखाना सुरू झाला आणि काम जसजसं पसंत पडत गेलं, तसतशी काम देणार्‍या कारखान्यांची संख्या वाढत गेली..
 
 ऐंशीनंतरच्या वयात आप्पांनी उज्जैनमध्ये पाचवा कारखाना सुरू केला..
 
वापीमध्ये दुसरा कारखाना सुरू झाला, बंगळुरूमध्ये तिसरा कारखाना सुरू झाला, चौथा कारखाना महाराष्ट्रातच सातार्‍यात सुरू झाला आणि साधारण निवृत्तीचा विचार करावा अशा ऐंशीनंतरच्या वयात आप्पांनी उज्जैनमध्ये पाचवा कारखाना सुरू केला.. हे सगळंच सुरळीत पार पडलं असं घडलं नाही, अडचणी आल्या, पण आप्पांनी त्यावर मात करत व्यवसायाचा विस्ताररथ पुढे नेत ठेवला. आप्पांच्या मदतीला राजाभाऊ आला. मुलगा अतुल आला, मुलगी नीलिमा आली.
 
 
पण एका ग्राहकाने आप्प्पांच्या नरमाईचा गैरफायदा घेत एक कोटी रुपये थकवले. सगळे प्रयत्न करूनही पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर आप्पांनी आणि कुटुंबीयांनी हिम्मत धरून प्रचंड काम करत काही वर्षांतच बँकेचं सारं कर्ज व्याजासकट फेडून टाकलं. इतकं होऊनही आप्पांनी त्याची बोटभर वाच्यता कधी केली नाही आणि पैसा नाही म्हणून रडत बसत कर्मचार्‍यांचे पगार थकवले नाहीत. त्यांचे पगारही सुरू राहिले, दिवाळीचा बोनसही सुरू राहिला. कामगारांनीही सहकार्य केलं आणि आप्पांचा उद्योगरथ वेगाने दौडणं सुरू राहिलं..
 
 
आप्पा या सार्‍या काळात इतके व्यग्र होते की खरं पाहता त्यांच्या जागी दुसरा कुणी असता, तर त्याने व्यवसायाला-कुटुंबाला प्राधान्य देत समाजाचा विचार थोडा बाजूला ठेवला असता..
 
 
पण आप्पांची मूस काही वेगळीच होती.
 
 
डोंबिवलीचं सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक-आर्थिक आणि क्रीडाविषयक जीवन ज्या त्रयीच्या प्रोत्साहनाने फुललं, विकसित झालं, डोंबिवलीच्या तीन पिढ्यांतील कलाकारांना-गायकांना-वादकांना-नर्तकांना-अभिनेत्यांना आणि क्रीडापटूंना ज्यांचा आशीर्वाद लाभला, अशा प्राचार्य सुरेंद्र बाजपेई, आबासाहेब पटवारी आणि मधुकरराव चक्रदेव या त्रयीतले आप्पा एक होते.
मधुकररावांच्या जोडीने ज्या अनेकांनी डोंबिवलीच्या विकासाला, संघकार्याला हातभार लावला, बँक उभी केली, जिमखाना निर्माण केला अशांंपैकी आप्पा दातार आधीच गेले, दादा कल्लोळकर गेले, गोपाळराव देव गेले, दाजी दातार गेले, हरिश्चंद्र पाटील गेले, नकुल पाटील गेले, डॉक्टर राव गेले, मधुकरराव भागवत गेले, मनोहर म्हैसकर गेले, प्रमोद हर्डीकर गेले.. ही यादी याहीपेक्षा कितीतरी मोठी आहे.
 
 
मधुकरराव जिल्हा संघचालक होतेच, तसंच ते यशस्वी उद्योजक होते, बँकेचे संस्थापक संचालक होते, जिमखान्याचे संस्थापक संचालक होते, अध्यक्ष होते, कोषाध्यक्ष होते, उत्सव समितीचे अध्यक्ष होते आणि गरज पडेल तेव्हा तिकीट खिडकीवर बसून रोजचा पै-पैचा हिशेब पूर्ण झाल्याखेरीज घरी न जाणारे जबाबदार पदाधिकारीही होते.
 
 
आप्पा लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरमन होते, केशवसृष्टीचे अध्यक्ष होते, सहकार भारतीचे प्रारंभीच्या काळातील पदाधिकारी होते, सुधीर फडके अमृतमहोत्सव समितीचे निमंत्रक होते, स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीचे संस्थापक होते, लायन्स क्लबच्या वतीने गेली तीन दशकं आयोजित केल्या जाणार्‍या सांस्कृतिक स्पर्धांचे समन्वयक होते. डोंबिवलीची जडणघडण ज्यांच्यामुळे झाली, अशा प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या डोंबिवलीकरांचा यथोचित सन्मान करणार्‍या नागरी अभिवादन न्यासाचे आप्पा संस्थापक अध्यक्ष होते. आप्पांच्या श्रद्धांजली सभेला येणार ना, असे विचारण्यासाठी पेणचे मूर्तिकार आनंद देवधर यांना फोन केला, तेव्हा त्यांनी बर्‍याच आठवणींना उजाळा देताना उच्चारलेलं एक वाक्य आजही लक्षात आहे. ते म्हणाले, “आप्पांनी सर्वसामान्य माणसाचा निर्भेळ सन्मान केला. खरं तर आप्पांना असा सन्मान करण्याची शिफारस कुणी केलेली नव्हती आणि करायची गरजही नव्हती. ते त्यांच्या रक्तातच होतं. एकेका माणसावर प्रेम करताना ना त्यांनी कधी त्याच्या धनसंपत्तीची, बँकबॅलन्सची, मोटरगाड्यांची दखल घेतली, ना त्याच्या डिग्री-डिप्लोमाची पर्वा केली. त्यांनी प्रेम केलं ते त्यांना जीवमात्रात दिसलेल्या शिवतत्त्वावर.”
 
 
माजी आमदार अशोकराव मोडक यांनीही अशाच भावना एका ओळीत व्यक्त करताना म्हटलं, “आप्पा म्हणजे ‘मीपण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो’ असं व्यक्तिमत्त्व होतं.”
 
 
त्यामुळेच सर्वार्थाने समाजमय झालेले, डोंबिवलीमय झालेले आप्पा गेले म्हणजे काय झालं, हे शब्दात मांडता येणं अवघडच आहे. पुढची अनेक वर्षं डोंबिवलीच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाला त्यांची उणीव भासत राहणार आहे.
 
 
आप्पांच्या स्मृतीस विनम्र प्रणाम.
Powered By Sangraha 9.0