अमोघ पोंक्षे
9518323547
आजचे युग हे ‘माहितीचे’ युग म्हणून ओळखले जाते. ज्याच्याकडे ‘डेटा’ अधिक तो राजा, असा हा काळ आहे. मात्र या ‘डेटा’ आणि ‘इन्फो’मागे किंवा त्याच्या मुळाशी एक विचार असणेही तितकेच गरजेचे असते. विचारांची घुसळण झाल्याशिवाय नुसत्या माहितीला अर्थ प्राप्त होत नाही. विचारांच्या अधिष्ठानाशिवाय दिलेली माहिती मग केवळ आकडेवारीपुरती मर्यादित राहते. वैचारिक बैठकीचे हेच महत्त्व ओळखत नाशिकमध्ये ‘गोदावरी संवाद’ या नावाने वैचारिक मंथनाचा एक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नावाजलेल्या वक्त्यांनी सहभाग घेत उपस्थित श्रोतृवर्गाशी विविध विषयांवर संवाद साधला. या कार्यक्रमाविषयी.
आज एकविसाव्या शतकात, भारत एक राष्ट्र म्हणून आपली बलस्थाने कोणती? आपल्यापुढे आव्हाने कुठली आहेत? नजीकच्या भविष्याचे चित्र नक्की कसे असेल? अशा व्यापक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन ’गोदावरी संवाद’ या कार्यक्रमातून नुकतेच विचारमंथन करण्यात आले. नाशिक शहरात आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता जे. साई दीपक, ‘डावी वाळवी’ या पुस्तकाचे लेखक अभिजित जोग, अॅड. विष्णू शंकर जैन यांच्यासह भरत आमदापुरे, तुषार दामगुडे, शेफाली वैद्य हे दिग्गज वक्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अधिवक्ता जे. साई दीपक यांना शेफाली वैद्य यांनी ’भारत - एक सोच’ या विषयावर बोलते केले. भारतीय संस्कृती, परंपरा यांचे महत्त्व अधोरेखित करताना जे. साई दीपक यांनी समकालीन उदाहरणे देऊन श्रोत्यांना अंतर्मुख केले. सध्या सर्वत्र चर्चिल्या जाणार्या ’भारत की इंडिया?’ या वादावरही जे. साई दीपक यांनी आपले म्हणणे मांडले. “भारत या नावातून राष्ट्र म्हणून आपली खरी ओळख काय आहे यावर प्रकाश पडतो, तर त्याउलट इंडिया हा शब्द भौगोलिक सीमांनी बांधलेला आहे” असे म्हणत जे. साई दीपक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मूलत: भारतीय संस्कृतीतील चालीरिती आणि परंपरा या विशुद्धच होत्या. प्रत्येक कृतीला विचारांची जोड होती. मात्र कालपरत्वे आपल्या सोयीनुसार अर्थ बदलून लोकांनी त्याचे चुकीचे अर्थ लावून त्या राबवल्या” असेही ते म्हणाले. त्यामुळे सरसकट परंपरांना आणि चालीरितींना कालबाह्य ठरवण्यापेक्षा त्यामागचा खरा विचार लोकांनी आज समजून घेणे आवश्यक आहे, असे ते या सत्राचा समारोप करताना म्हणाले.
दुसर्या सत्रात ’मंदिरांचा विध्वंस आणि जीर्णोद्धार’ या विषयावर शेफाली वैद्य यांनी अॅड. विष्णू शंकर जैन यांना बोलते केले. विष्णूजी आणि त्यांच्या वडिलांनी अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमीचा वाद, ज्ञानवापीच्या जागेचा वाद आणि मथुरा येथील कृष्ण जन्मभूमीचा वाद यासंबंधित याचिकांमध्ये हिंदूंची बाजू गेली अनेक वर्षे न्यायालयामध्ये अत्यंत भक्कमपणे मांडली आहे. त्यातील श्रीरामजन्मभूमीचा वाद निकाली निघालेला असून इतर दोन याचिकांसंदर्भात लढतानाचे त्यांचे प्रत्यक्ष अनुभव त्यांनी या वेळी उपस्थित श्रोत्यांसमक्ष मांडले. हिंदू समाज म्हणून आपण एकत्र येणे किती गरजेचे आहे, यावरही त्यांनी विस्तृत भाष्य केले. अशा मुद्द्यांवर ज्यांना प्रत्यक्ष पुढे येत लोकशाही मार्गाने लढणे शक्य आहे, त्यांनी मोठ्या संख्येने पुढे यावे; पण ज्यांना शक्य नाही, त्यांनी किमान लढणार्या लोकांच्या पाठीमागे उभे राहावे, अशी अपेक्षा विष्णू जैन यांनी व्यक्त केली.
स्नेहभोजनानंतर झालेल्या तिसर्या सत्रात चार वक्त्यांचे एक मोठे पॅनल श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठावर होते. अभिजित जोग, भरत आमदापुरे, तुषार दामगुडे, शेफाली वैद्य या चौघांनी या चर्चेमध्ये उपस्थितांशी संवाद साधला. यामध्ये संवादक म्हणून ओम्कार दाभाडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लेखक अभिजित जोग यांच्या ’जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाच्या विषयापासून गप्पांना सुरुवात झाली. मार्क्सवादाचा इतिहास, डाव्या विचारांचा वाढणारा प्रभाव आणि त्याचे भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीवर होणारे परिणाम यासारख्या अनेक विषयांवर उपस्थित वक्त्यांनी भाष्य केले. आपल्या रोजच्या जगण्यातली उदाहरणे देऊन त्यांनी आपले म्हणणे अधिक प्रभावीपणे श्रोत्यांसमोर मांडले. देशातील नक्षलवाद चळवळ, डाव्या विचारसरणीचा वाळवीसारखा फोफावणारा देशविघातक विचार असे अनेक विषयही चर्चिले गेले. श्रोत्यांबरोबरच्या प्रश्नोत्तराच्या तासाने या सत्राचा शेवट झाला.
यानंतरच्या चौथ्या सत्रात पुन्हा अॅड. विष्णू शंकर जैन यांनी वक्फ बोर्ड कायदा 1995मागील काँग्रेस पक्षाने केलेले एका विशिष्ट धर्माचे लांगूलचालन याबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन केले. 1995आधी हा कायदा पहिल्यांदा कधी आला? तेव्हा त्याचे स्वरूप कसे होते? याबद्दलही त्यांनी भाष्य केले. 1995नंतर सुधारित कायदा संमत झाल्यानंतर कशा पद्धतीने बहुसंख्य हिंदू समाजही भरडला जातो आहे, याची त्यांनी विविध उदाहरणे दिली. वक्फ बोर्ड कायदा 1995मधील जाचक कलमातून मुक्तता मिळवण्यासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची गरजही त्यांनी सत्राच्या शेवटी बोलून दाखवली. शेवटच्या पाचव्या सत्रात सायंकाळी ले.ज. (नि.) डॉ. दत्तात्रय शेकटकर यांना पहिला स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर डॉ. विनय चाटी यांनी पुरस्कारार्थी ले.ज. शेकटकर यांची प्रकट मुलखत घेतली. ले.ज. शेकटकर यांनी आपल्या सैनिकी सेवेदरम्यानचे अनेक रोमांचक अनुभव कथन केले. सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांची आणि सावरकरांची झालेली भेट, सावरकरांनी त्यांना दिलेला मौलिक सल्ला याबाबतची गोष्ट त्यांनी श्रोत्यांसमोर कथन केली.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या भरगच्च कार्यक्रमातून वैचारिक मंथन तर झालेच, त्याचबरोबर हिंदूंमधील परस्पर संवाद वाहता राहणे किती गरजेचे आहे, यावरही शिक्कामोर्तब झाले. पहिल्या गोदावरी संवाद कार्यक्रमाला मिळालेला श्रोत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेऊन ’विचार’गंगेची ही परंपरा अशीच पुढे सुरू ठेवणार असल्याची घोषणा शेवटी आयोजकांमार्फत करण्यात आली.