नौदलाचो ह्यो कार्यक्रम हजारो लोकांनी बघतल्यांनी

विवेक मराठी    07-Dec-2023
Total Views |
 
हा कार्यक्रम बघण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे २०० बसेसमधून लोक आले होते. सुरक्षेच्या नियमांमुळे त्यांना कार्यक्रम स्थानापासून सुमारे दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून कार्यक्रम बघावा लागला. त्यांच्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे २००००पेक्षा अधिक लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
vivek
 
दर वर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. १९७१च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात 'ऑपरेशन ट्रायडेंट'अंतर्गत कराची येथे केलेल्या नौदलाच्या पराक्रमाचे स्मरण करणारा हा दिवस आहे.
 
या वर्षी प्रथमच हा कार्यक्रम नौदल तळ असलेली मोठी बंदरे सोडून मालवणसारख्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. भारतीय नौदलाचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या साडेतीनशेव्या पुण्यस्मरण वर्षी आदरांजली देण्यासाठी किल्ले सिंधुदुर्गजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
सुमारे सहा महिने आधीच हा कार्यक्रम निश्चित झाला होता. तसेच या कार्यक्रमाला माननीय पंतप्रधान किंवा माननीय राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्यामुळे मालवण आणि आसपासच्या परिसरात उत्सुकता निर्माण झाली होती. कार्यक्रमाच्या सुमारे पंधरा दिवस आधी मालवण शहरांमध्ये लागलेली ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ असे मोठ्या अक्षरात लिहिलेली व विमानवाहू नौका, पाणबुडी, पॅराशूटने उतरणारे कमांडो यांची चित्रे असलेली मोठी मोठी होर्डिंग लावण्यात आली. या सर्वांमुळे मालवणवासीयांची उत्सुकता खूपच शिगेला पोहोचली. या युद्धनौका प्रत्यक्ष बघायला मिळणार की नुसतीच चित्रे दाखवणार, हे मात्र अजूनही कळत नव्हते. २७ नोव्हेंबरपासून INS ब्रह्मपुत्र, कोची, कोलकाता, विशाखापट्टणम, तबर, सुभद्रा इ. नौदलाची एकेक जहाजे मालवणनजीकच्या समुद्रामध्ये दाखल होऊ लागली. दोन-तीन दिवस आधी विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्यसुद्धा दाखल झाली. नौदलाची प्रात्यक्षिके बघायला रोज संध्याकाळी समुद्रकिनार्‍यांवर गर्दी होऊ लागली. प्रत्यक्ष तीन डिसेंबरला रंगीत तालीम होईपर्यंत असंख्य नागरिकांनी ही प्रात्यक्षिके पाहिली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती राहणार असल्याने मालवण नगरी सजली होती.
 

vivek
 
४ डिसेंबरला मा. पंतप्रधानांच्या हस्ते मालवणमधील राजकोट या सिंधुदुर्गच्या सहकारी किल्ल्यावर नौदलाने उभारलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या २५ फुटी पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर तारकर्ली समुद्रकिनार्‍यावर आयोजित नौदल दिवस समारंभास सुरुवात झाली. अॅ्डमिरल रविकिरण यांच्या लहानशा भाषणात त्यांनी आरमाराच्या गौरवास्पद कामांचा उल्लेख केला. जल, जमीन व आकाश या तिन्ही ठिकाणी नौदलाच्या शक्तीमध्ये वाढ होत असून भारतीयीकरणाचा आग्रह असल्यामुळे रोजगारनिर्मितीसुद्धा होत असल्याचे प्रतिपादन केले. मा. पंतप्रधानांनी नौदलाच्या विकासासाठी केलेल्या योजना, तसेच नौदल दिन कार्यक्रम जनतेसाठी खुला करणे, नौदलाच्या ध्वजामध्ये यापूर्वी असणारा ब्रिटिश राजाचा क्रॉस काढून छत्रपतींची राजमुद्रा समाविष्ट केल्याचे सांगितले. नौदल गणवेशातही यापुढे शिवमुद्रेचा समावेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नौदल अधिकार्‍यांच्या पदांची नावेदेखील यापुढे भारतीय परंपरांना धरून असतील, अशीही त्यांनी घोषणा केली. महिलांना नौदलामध्ये स्थान दिल्यामुळे त्यांचे सक्षमीकरण होत असून नुकतेच कॅप्टन प्रेरणा देवस्थळी या एका युद्धनौकेचे कप्तानपद भूषवणार्‍या पहिल्या महिला अधिकारी बनल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
 

vivek
 
माननीय पंतप्रधानांच्या भाषणानंतर नौदलाच्या प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. सर्वप्रथम जमिनीपासून सुमारे आठ हजार फूट उंच उडत असलेल्या हेलिकॉप्टरमधून सहा कमांडोनी पॅराशूटच्या साहाय्याने खाली झेप घेतली. सर्व जण व्यासपीठाच्या जवळपासच अत्यंत अचूक पद्धतीने उतरले. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून समुद्रात उतरलेल्या मार्कोस कमांडोजनी समुद्रात येऊन तेथील शत्रूची एक चौकी उद्ध्वस्त केली व तेथील ओलिसाला सोडवण्यात यश मिळवले. त्यानंतर सर्व कमांडोज पुन्हा हेलिकॉप्टरमधून सोडलेल्या दोरीवर स्वार होऊन पुन्हा आपापल्या स्थानी परतले. पाण्याखालून गेलेल्या कमांडोने शत्रूच्या तेल विहिरीजवळ स्फोटके पेरून ती नष्ट केली. हेलिकॉप्टर हवेत एकाच जागी स्थिर ठेवण्याचे, तसेच बोटीपासून अगदी कमी अंतरावर हवेत स्थिर ठेवण्याचे व बोटीवर उतरवण्याचेही प्रात्यक्षिक करण्यात आले. नौदलाची विविध हेलिकॉप्टर्स क्रमाक्रमाने प्रेक्षकांसमोरून गेली व त्यांची माहिती देण्यात आली. त्यानंतर विविध विमानांची प्रात्यक्षिके झाली. भारतीय बनावटीच्या छोट्या तेजस विमानाने, तसेच विमानवाहू विक्रमादित्यवरून फॉर्मेशन करत झेपावलेल्या पाच मिग २९ विमानांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. मिग २९ विमान सुरुवातीला इंग्रजी आठच्या आकारात फिरून नंतर त्याने जवळपास काटकोनात थेट आकाशाच्या दिशेने झेप घेतली. त्यानंतर नौदल बँडचे प्रात्यक्षिक झाले. सी कॅडेट कोअर या संस्थेच्या मुलींनी बँडवर केलेले कवायत नृत्य खूपच सुंदर होते. दोन्ही बाजूंनी मशाली धरलेले सैनिक उभे असताना व ते आपापल्या हातातील पेटलेल्या मशालींची अदलाबदल करत असताना त्यांच्यामधून निर्धास्तपणे संचलन करत जाणार्‍या अधिकार्‍याचीदेखील सर्वांनीच प्रशंसा केली आपल्या जवानांवरील विश्वास व धैर्य या दोन्ही गोष्टी यातून प्रकट होत होत्या. सूर्यास्ताच्या वेळी राष्ट्रगीत होऊन त्यानंतर दूरवर उभ्या असलेल्या विक्रमादित्य आणि उर्वरित सर्व युद्धनौका एकाच वेळी प्रकाशित झाल्या. त्यानंतर किल्ले सिंधुदुर्गवर लाइट अँड साउंड शो, तसेच आतशबाजी करण्यात आली. नौदलावर एक टेली फिल्मदेखील दाखवण्यात आली.
 
हा कार्यक्रम बघण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे २०० बसेसमधून लोक आले होते. सुरक्षेच्या नियमांमुळे त्यांना कार्यक्रम स्थानापासून सुमारे दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून कार्यक्रम बघावा लागला. त्यांच्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे २००००पेक्षा अधिक लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
 
- पंकज दिघे