‘माझी माती, माझा देश’या उक्तीला सार्थ ठरवणारी पितांबरी अ‍ॅग्रीकेअर डिव्हिजन

विवेक मराठी    23-Dec-2023
Total Views |

pitambari
 
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणजे रवींद्र प्रभुदेसाई. त्यांच्या पितांबरी उद्योगाचा ब्रँड सातासमुद्रापार पोहोचला आहे. प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला ‘पितांबरी अ‍ॅग्रीकेअर डिव्हिजन’ हा विभाग कृषी क्षेत्रात ‘माझी माती, माझा देश’ या उक्तीला सार्थ ठरवणारं काम करीत असून एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून नावारूपाला येत आहे. या क्षेत्राविषयी आणि त्यातील अनुभवांविषयी पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांनी ‘कृषी विवेक‘शी साधलेला संवाद.
गेल्या तीन दशकांपासून तुम्ही ‘पितांबरी‘ उद्योगाचं यशस्वी नेतृत्व करत आहात. कृषी उद्योग क्षेत्रातही तुम्ही दमदार पाऊल टाकलं आहे. या प्रवासाविषयी काय सांगाल?
 
1985ची गोष्ट आहे. माझं बी.एस्सी.चं शिक्षण पूर्ण झालं होतं. वडिलांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय होता. मी या व्यवसायात उतरावं, अशी वडिलांची इच्छा होती. पण मला यात रस नव्हता. संशोधनाकडे माझा अधिक कल होता. याच काळात, बुफेच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ गरम राहावेत म्हणून माझे वडील वामनराव प्रभुदेसाई यांनी घरच्या घरी एक ब्ल्यू फ्युएल तयार केलं. त्याला ताज हॉटेलसारखे ग्राहकही मिळाले. वडिलांचे एक मित्र अरविंद गोरे यांच्या सहकार्याने पाणी शुद्ध करणार्‍या हायड्रोक्लोअर नावाच्या पावडरची निर्मिती केली. एयर इंडिया आमच्याकडून ही पावडर घेत असे. मधल्या काळात बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा पूर्ण केला होता. व्यवसायात म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. गाठीला अनुभव होता. डोक्यात नवा विचार होता, तर दुसरीकडे संघाचा स्वयंसेवक या नात्याने मला गावोगावी अनेक घरांमध्ये जाता आलं. त्या वेळी घरांमधल्या तांबे-पितळेच्या भांड्यांना, देवाच्या मूर्तींना गृहिणी चिंच लावून स्वच्छ करत. त्यातून पुढचा रस्ता लख्ख दिसला. तांबे-पितळेची भांडी, मूर्ती स्वच्छ करणारी पावडर तयार करायचं ठरवलं. त्यातूनच पितळ + तांबे (यांना स्वच्छ करणारी) = ‘पितांबरी‘ हे ब्रँडनेम सापडलं. मार्केटिंगची नवनवी तंत्र वापरत पितांबरीचा खप वाढवला. पितांबरी आज महाराष्ट्राची सीमा ओलांडून जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पोहोचली आहे. दिवसेंदिवस तिचा विस्तार वाढत चालला आहे.
 

pitambari 
 
पितांबरी उद्योगाच्या विस्तारातील ‘पितांबरी अ‍ॅग्रीकेअर डिव्हिजन’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कोणत्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू केलात?
 
 
माझा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबातला. मी शहरात वाढलो, शिकलो, उद्योग उभारला, तो यशस्वी केला असला, तरी कोकणाशी माझी नाळ कायम जोडलेली आहे. राजापूर तालुक्यातील पाचल तळवडे हे माझं छोटंसं गाव. गावात आम्हाला ‘कोठारवाले‘ (भात व नाचणीचं मोठं उत्पन्न घेणारे व साठवण करणारे) म्हणून ओळखत होते. गावात आमचं कौलारू घर होतं. लहानपणी गावाशेजारी खळाळत वाहणार्‍या अर्जुना नदीत भावंडांसहित मी पोहायचो, घरातील व गावातील प्रेमळ माणसांत अन् दत्तजयंती उत्सवात मी दंग असायचो. काळ बदलला, मुंबईत राहायला आलो, पितांबरीच्या कामात गुंतून गेलो. पुढे दर वर्षी फक्त दत्तजयंतीनिमित्त आणि मे महिन्यात गावी जाणं होत होतं. गावी आल्यानंतर काकूने (श्रीमती निर्मला यांनी) गावाच्या प्रगतीसाठी, इथल्या शेती-मातीसाठी माझ्या उद्योजकतेचा, ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी काहीतरी स्तुत्य कार्य करण्याचा आग्रह धरला. काकूचा आग्रह व गावाकडची ओढ लक्षात घेऊन मी शेतीकडे वळलो. गावात कुटुंबाची 50 एकर सामूहिक शेती होती. पण वडिलांनी त्यावर हक्क न सांगण्याचा निर्णय दिला. त्यामुळे गावामध्येच मी सात एकर जमीन विकत घेतली. शेतीचं शास्त्र समजून घेऊ लागलो. शेतात नवी देशी झाडं लावली, तिळाची लागवड केली. कोकणात पहिल्यांदा उसाचा पहिला प्रयोग यशस्वी करून दाखवला. ‘साखरेपेक्षा गूळ भारी’ ही संकल्पना पुढे आणून गुर्‍हाळघराची उभारणी केली. त्यातून सेंद्रिय गुळाचं उत्पादन घेतलं. त्याचं मूल्यवर्धन करून ‘पितांबरी रुचियाना’ गूळ पावडर स्वरूपात बाजारात आणला. आज ही गूळ पावडर आशिया खंडासह युरोपात, आखाती देशात पोहोचली आहे. या प्रयोगामुळे पाचल तळवडे, करक परिसरात उसाचं क्षेत्र वाढलं आहे. कोकणातील ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस पितांबरीला देतात. पितांबरीकडून ऊस पिकाचं हे छोटंसं मॉडेल कोकणाच्या शेतीविकासाचं आश्वासक पाऊल आहे. यानंतर ‘पितांबरी अ‍ॅग्रीकेअर डिव्हिजन’ची सुरुवात होऊन ती नावारूपास आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून पीक लागवड, गूळनिर्मिती, गोशाळा व गोमयनिर्मिती, पितांबरी अ‍ॅग्रो टूरिझमअंतर्गत आयुर्तेज उद्यान, बांबू पार्क, नर्सरी यासह नानाविध उपक्रम सुरू आहेत. असंख्य लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. अशा प्रकारे ‘पितांबरी अ‍ॅग्रीकेअर डिव्हिजन’ कृषी मूल्यसाखळीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
 

pitambari 
 
पितांबरीच्या वैशिष्ट्यपूर्ण कृषी उत्पादनांनी बाजारपेठ काबीज केली आहे. या उत्पादनांची वैशिष्ट्यं कोणती?
 
 
शेतीतून येणार्‍या उत्पादनासोबत शेतीपूरक उद्योगाला चालना मिळावी, या हेतूने आम्ही पीक लागवड ते प्रक्रिया उद्योग अशी एक साखळी विकसित केली आहे. इंद्रायणी, वाडा कोलम भातावर प्रक्रिया करून त्यापासून तयार झालेला रुचियाना तांदूळ आज गृहिणींच्या पसंतीस उतरला आहे. बाजारात उपलब्ध नसलेलं आरोग्यवर्धक गाजर व लसणाचं पहिलं लोणचं ‘रुचियाना कॅरट-गार्लिक पिकल’ची निर्मिती केली, याशिवाय शेवग्याच्या शेगांवर प्रक्रिया करून ‘मोरिंगा सूप’ हे आरोग्यवर्धक उत्पादन बाजारात आणलं. पारंपरिक मिष्टान्नाला स्वादिष्ट पर्याय म्हणून देशी गीर गायीच्या चिकापासून ‘रुचियाना खरवस प्रीमिक्स पावडर’ या नवीन उत्पादनाला बाजारात मोठी मागणी आहे. भाताच्या कोंड्यापासून तयार केलेलं पितांबरीचं ‘अरिशक्ती राइस ब्रॅन ऑइल’ हे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यतेल उत्पादन अल्पावधीतच नावारूपाला आलं आहे. याखेरीज ‘दीपशक्ती दिव्याचं तेल’ या उत्पादनास बाजारात मोठी मागणी आहे. ही सर्व उत्पादनं किराणा दुकानापासून ते डी मार्ट, रिलायन्स मॉल, अ‍ॅमेझॉन व पितांबरी वेबसाइटपर्यंत उपलब्ध असून ग्राहकांसाठी सुलभ विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने साखळोली (ता. दापोली) येथे सुरू असलेला ‘पितांबरी नर्सरी फ्रँचायसी’ हा एक अभिनव प्रकल्प आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली जातिवंत मातृवृक्षापासून प्रमाणित फळंफुलं, रोपं, कलमं तयार केली जातात. स्थानिक शेतकर्‍यांना व तरुणांना खात्रीशीर उत्पन्न मिळावं, यासाठी आम्ही ‘पितांबरी नर्सरी फ्रँचायसी’ ही योजनासुद्धा आणली आहे. ग्रामीण तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. साखळोली व तळवडे येथील ‘पितांबरी अ‍ॅग्रो टूरिझम’ हा आणखी एक पथदर्शक प्रकल्प आहे. ग्रामीण भागात पर्यटनातून रोजगारनिर्मिती व्हावी या हेतूने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तसंच पितांबरी ‘गोमय’ हे देशी गीर गायीचं सेंद्रिय खत शासनमान्य परवानाप्राप्त आहे. झाडांसाठीे, शेतीसाठी हे शेणखत उपयुक्त असून या खतास महाराष्ट्रभर भरपूर मागणी आहे.
 



pitambari 
 
‘आयुर्तेज उद्यान’ हे नेमकं काय आहे? या उद्यानाचं स्वरूप व वैशिष्ट्यं याविषयी काय सांगाल?
 
 
निसर्गसौंदर्याने नटलेल्या, नानाविध वनस्पतींनी व फळाफुलांनी बहरलेल्या कोकणात वनौषधी वनस्पतींचं भांडार आहे. अशा विविध आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केलेलं पितांबरीचं ’आयुर्तेज उद्यान’ दापोलीतील साखळोली गावात विकसित करण्यात आलं आहे. हे येथील पहिलं व एकमेव आयुर्वेदिक उद्यान आहे. हे उद्यान तीन एकर परिसरात वसलं आहे. या ठिकाणी सुमारे 300 प्रकारची औषधी झुडपं, 148 प्रकारचे वृक्ष, 100 प्रकारच्या क्षुप प्रजातीय वनस्पती अशा 600हून अधिक औषधी वनस्पती प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. आयुर्तेज उद्यानात वन्य झाडं व अनोखं बांबू पार्कसुद्धा साकारण्यात आलं आहे. याच उद्यानात लागवड केलेल्या सुगंधित वनस्पतींच्या अर्काचा वापर करून पितांबरीच्या अस्सल फुलांच्या सुगंधाने युक्त ‘देवभक्ती अगरबत्ती’ची निर्मिती करण्यात येते.
 
 
आपल्या कृषी उद्योगासमोर कोणती आव्हानं आहेत आणि यावर कशा प्रकारे मात कराल?
 
एखादं उत्पादन उत्पादित करण्यासाठी व मार्केटमध्ये आणण्यासाठी त्याची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा, यासाठी पितांबरीचा कृषी विभाग शेतकर्‍यांशी थेट संलग्न असतो. या शेतमालावर योग्य प्रक्रिया करण्यावर भर देऊन पितांबरी मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती करीत आहे. यामध्ये उत्पादनाची अचूक निवडप्रक्रिया, योग्य पुरवठा, उत्पादन प्रक्रिया याबरोबरच जाहिरात, डिमांड-सप्लाय, उत्पादन व विक्री या सर्व आव्हानांवर मात करून आम्ही रुचियाना गूळ पावडर, रुचियाना लाइम सॉस, रुचियाना कॅरट गार्लिक पिकल अशी विविध दर्जेदार प्रक्रियायुक्त उत्पादनं बाजारात आणली असून या उत्पादनांना मोठी मागणी आहे. यापुढेही अशाच प्रकारची ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी दर्जेदार कृषी उत्पादनं आम्ही बाजारात आणत राहू. आज ’पितांबरी’ हा ब्रँड जगभर पोहोचला आहे. त्याशिवाय पितांबरी ब्रँडच्या उत्पादनाची नक्कल व नाव वापरून निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारात विकली जात आहेत. अशांवर अकुंश ठेवण्यासाठी आम्ही एक वेगळी यंत्रणा उभी करत आहोत.
 
 
कोकणातील शेतकर्‍यांना कोणता सल्ला द्याल?
 
 
‘पर्यटन’ हे कोकणाचं मुख्य बलस्थान आहे. कोकणातील रस्ते विकासामुळे पर्यटनाच्या, शेतीच्या क्षेत्रात हवे ते बदल आणि संधी निर्माण होण्यास मोठा वाव आहे. याशिवाय कोकणवासीयांचा शाश्वत विकास घडवून आणायचा असेल, तर आपली बलस्थानं ओळखून मार्गक्रमणा केली पाहिजे. आज जगभर खाद्यतेलाचा प्रचंड तुटवडा आहे. कोकणात पूर्वी सूर्यफुलाची, तिळाची आणि भुईमुगाची शेती पाहायला मिळायची. काळाच्या ओघात ही शेती दुर्मीळ झाली आहे. बाजारात खाद्यतेलाची गरज लक्षात घेता कोकणातील शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा या पारंपरिक पिकांकडे वळलं पाहिजे. शिवाय ’लेमन ग्रास’ हे शाश्वत उत्पन्न मिळणारं गवतवर्गीय पीक आहे. या लागवडीतून, तसंच माणगा, तुल्डा बांबूंच्या या जातींना भविष्यात मोठी मागणी निर्माण होणार आहे. त्यामुळे कोकणात बांबू लागवड करून कोकणातील शेतकरी आर्थिक उन्नती साधू शकतो.
 
 
 
भविष्यातील व्हिजन कशा प्रकारचं आहे?
 
 
येत्या काळात आम्ही काही नवीन प्रकल्प हाती घेत आहोत. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय चंदनाला मोठी मागणी आहे. ही गरज लक्षात घेता कृषी विद्यापीठांच्या व इतर संस्थांच्या सहकार्याने तळवडे येथे तीन हजार चंदन रोपांची लागवड करणार आहोत. चंदनापासून तेल, सुगंधी अत्तरं इत्यादींची निर्मिती करणार आहोत. याशिवाय अगरबत्ती तयार करण्यासाठी आम्हाला वर्षाकाठी 25 टन बांबू काड्यांची गरज भासते. त्यासाठी 100 टन बांबूची आवश्यकता आहे. ही तूट भरून काढण्यासाठी 100 एकरांवर 42 प्रकारच्या बांबू लागवडीचा उपक्रमही लवकरच हाती घेणार आहोत. यासह असे विविध प्रकल्प आपणास पाहायला मिळतील.
 
शब्दांकन - विकास पांढरे
 
 
प्रतिक्रिया देण्यासाठी
या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

भ्रमणध्वनी : 9867112714
 
वेबसाइट - www.pitambari.com