22 जानेवारी 2024 या ऐतिहासिक दिवशी श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण होऊन ते भाविकांसाठी खुले होणार आहे. पाचशे वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर खर्या अर्थाने हिंदू समाज दिवाळी साजरी करणार आहे. साजर्या होणार्या या दिवाळीची तयारी सर्व हिंदू समाज आपापल्या पद्धतीने करीत आहे. तरुण पिढीही यात मागे नाही. Moods of Bharat ही यूट्यूब चॅनल चालविणारी तरुण मुलगी अदिती दधिचने समवयस्कांसह यानिमित्त ’राम मंदिर से रामराज्य तक‘ ही एक हिंदी वेब सिरीज तयार केली आहे. याविषयी तिच्याशी साधलेला संवाद
भारतासाठी आणि परदेशस्थित भारतीयांसाठी येणारे 2024 वर्ष हे उत्साहाचे व उल्हासाचे असणार आहे. कारण रामराज्याची पहाट या वर्षाच्या शुभारंभीच होणार आहे - अर्थात 22 जानेवारी 2024 या ऐतिहासिक दिवशी श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण होऊन ते भाविकांसाठी खुले होणार आहे. या देशातील कोट्यवधी हिंदूंनी पाहिलेले स्वप्न अखेर साकार होणार आहे. पाचशे वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर खर्या अर्थाने हिंदू समाज दिवाळी साजरी करणार आहे. अयोध्येतील श्रीरामाच्या भव्य मंदिराची आतुरता आणि साजर्या होणार्या दिवाळीची तयारी सर्व हिंदू समाज आपापल्या पद्धतीने करीत आहे.
कोणी भव्य श्रीराम मंदिराची झलक पाहायला जात आहे, कोणी श्रीरामाच्या पूजनासाठी अक्षतावाटप करून निमंत्रण देत आहे, कोणी आपापल्या परिसरातील मंदिराची डागडुजी व रोशणाई करून घेत आहे, कोणी श्रीरामासाठी गीत-आरती रचीत आहे, कोणी नृत्यनाटिका सादरीकरणाची तयारी करीत आहे.. असे प्रत्येक जण आपापल्या परीने हा दिवस साजरा करण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहे. तरुण पिढीही यात मागे नाही. Moods of Bharat ही यूट्यूब चॅनल चालविणारी तरुण मुलगी अदिती दधिचने समवयस्कांसह यानिमित्त ’राम मंदिर से रामराज्य तक‘ ही एक हिंदी वेब सिरीज तयार केली आहे.
Moods of Bharat (यूट्यूब) आणि ’राम मंदिर से रामराज्य तक‘ (वेब सिरीज) यांच्या निर्मितीमागील उद्देश अदितीशी संवाद साधताना उलगडत गेला. पूर्वीपासून भारताची वैभवशाली परंपरा राहिली आहे. याच वैभवाची भुरळ सर्व जगाला पडली होती. एका पारड्यात तुला करायची ठरविली, तर भारत एका बाजूला आहे आणि बाकी सारे जग दुसर्या बाजूला. भारताची शक्ती आपल्या अध्यात्मात आहे, म्हणूनच हजारो शतकांपासून आक्रमणे होऊनसुद्धा भारत टिकून आहे आणि पुन्हा नव्याने भरारी घेण्यास सज्ज आहे. हीच भारताची धूसर झालेली ओळख नव्या तेजाने करून देण्यासाठी Moods of Bharat या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वगुणांमुळे या शक्तीचे तेज आता दाही दिशांना उजळत आहे. या तेजाच्या वाटचालीत आमची यूट्यूब चॅनल एका पणतीचे काम करीत राहील, असा विश्वास अदितीने व्यक्त केला.
आज ओटीटीचे जाळ जगभर पसरले आहे. भारतही या जाळ्यातून सुटला नाही. या प्लॅटफॉर्मवर येणारा कंटेंट कुठल्या दिशेने जात आहे, त्यातून युवा पिढी कशी भरकटत जात आहे, हे आपण पाहतो. समाजात वाढता हिंसाचार, तरुण पिढीच्या तोंडी रूढ होणारी विकृत भाषा, विकृत लैंगिक गुन्हे, चोरी-खून करण्याचे नवनवीन मार्ग यांचे प्रमाण पाहता या सगळ्यांमागे अमर्याद आणि अप्रमाणित ओटीटी कंटेंट. शिवाय धार्मिक तेढ वाढविणार्या वेब सिरीज, इतिहासाची मोडतोड करून हिंदूंच्या शौर्यगाथांचा भाग नेमका गाळून हिंदू कसा हतबल होता हे दाखविण्याचा प्रयत्न.. अशा कंटेंटच्या सततच्या प्रभावी सादरीकरणामुळे स्वधर्माचा-स्वदेशाचा तिटकारा येईल अशी वातावरणनिर्मिती करणे हा विकृत हेतू असतो. आजची तरुण पिढी धर्माभिमानी-राष्ट्रभिमानी व्हावी, यासाठी भारताच्या वैभवशाली, गौरवशाली इतिहास, शौर्यगाथांचा इतिहास तरुण पिढीसमोर यावा, या उद्देशाने Moods of Bharat ही यूट्यूब चॅनल सुरू केली आहे.
राम मंदिर निर्माणाच्या अनुषंगाने माध्यम म्हणून काहीतरी करायला पाहिजे, अशी चर्चा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी करीत होतो. तेव्हा लक्षात आले की, श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचा इतिहास तुकड्या-तुकड्यात वाचायला-ऐकायला मिळतो. शिवाय जानेवारीत होणार्या श्रीराम मंदिराच्या स्वागतासाठी संपूर्ण देश राममय झाल्याचे आताची युवा पिढी पाहत आहे, देशभर असलेले उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण पाहत आहे आणि अचंबित होत आहे - एवढे काय आहे, केवळ एका मंदिराचे लोकार्पण तर होणार आहे ना! स्वाभाविकच आहे म्हणा, कारण त्यांना आक्रमकांचा इतिहास, श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनाचा इतिहास, रामभक्तांचा त्याग, समर्पण, बलिदान याची एकसुरी माहितीच कुणी सांगत नाही किंवा कुठे उपलब्ध नाही. हीच पोकळी भरून काढण्यासाठी ‘राम मंदिर से रामराज्य तक’ या वेब सिरीजची निर्मिती केली आहे.
‘राम मंदिर से रामराज्य तक’ ही वेब सिरीज तीन भागांत केली आहे - 1) कारसेवा - कारसेवकांचे अनुभव, 2) मुक्ती संघर्ष - न्यायालयीन कामकाज - विष्णू जैन, आंदोलने - महंत धर्मदास, भारतीय पुरातत्त्व खात्याचे काम - के.के. मोहम्मद. 3) समर्पण - या भागात असे अनेक हिंदू आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष आंदोलनात अथवा न्यायालयीन कामकाजात भाग घेतला नाही, परंतु पडक्या चबुतर्यावर व प्लॅस्टिकच्या छपराखालील श्रीरामलल्लाला त्याचे गतवैभव प्राप्त व्हावे, म्हणून ते मनापासून प्रार्थना करीत होते, प्रतीक्षा करीत होते. अशा या दीर्घ प्रतीक्षेनंतर, आंदोलन, न्यायालयीन डावपेच, बलिदानानंतर श्रीरामाचे भव्य मंदिर होत असताना त्याला श्रीरामाच्या एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न आम्ही या वेब सिरीजने केला आहे. हा संघर्षाचा इतिहास नक्कीच आनंददायक नव्हता, तर तो अत्यंत संवेदनशील व भावुक असा आहे, म्हणूनच या वेब सिरीजचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर असा विचार केला गेला की, हा इतिहास जरी त्रासदायक असला, तरी ही त्यागाची व समर्पणाची शौर्यगाथा आहे आणि या शौर्यगाथेशी युवा पिढीला जोडण्यासाठी त्यांच्याच लयीने त्यांना जोडून घेणे गरजेचे आहे. वेब सिरीजच्या तिन्ही भागांत प्रसंगानुरूप एका गाण्याची धून सतत वाजत राहिली पाहिजे, जेणेकरून श्रीरामाची ऊर्जा युवा पिढीला प्रभावित करील. म्हणून आधुनिक वाद्यांचा वापर करून Hunkaar - The Anthem Of Karseva (हुंकार - कारसेवेचे राष्ट्रगीत) हे एक गीत तयार केले.
या गीताचे वैशिष्ट्य सांगताना अदिती म्हणाली की, “या गाण्याच्या निर्मितीतील सगळे जण 20 ते 30 वयोगटातील तरुण आहेत आणि ते राष्ट्रवादाने भारलेले आहेत. त्यामुळे मला विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. गीतकार - मिलिंद पनवार, गायक - सम्राट अवस्थी.” मंगळवार 19 डिसेंबर 2023 रोजी वेद कुंभ थिएटर, अंधेरी येथे भाजपा दिल्ली प्रदेश उपाध्यक्ष कपिल शर्मा यांच्या शुभहस्ते या गीताचे लाँचिंग करण्यात आले. हे गीत आक्रमकांचा इतिहास सांगतेच, तसेच ही संघर्षयात्रा, शौर्यगाथा कशी आहे याचे वास्तव दर्शविते. हे गाणे इतके स्फूर्तिदायक आहे की, आजची पिढी हे गाण नक्कीच गुणगुणेल आणि त्यावर थिरकेलही, असा विश्वास कपिल शर्मा यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास मान्यवरांसह, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजा राम हे अवतार होते, असे मानले जाते.
मनुष्ययोनीतील सर्व भोगांतून नीतिमूल्यांचे आचरण करून त्यांनी मनुष्यजीवनाचा आदर्श निर्माण केला आणि ‘मर्यादापुरुषोत्तम श्रीराम’चे दर्शन झाले. आजच्या काळातही धर्मपालनासाठी श्रीराम मार्गदर्शक ठरतात. अशा श्रीरामांचे अयोध्येतील जन्मभूमीवर भव्य मंदिर उभे राहणे ही रामराज्याची पहाट ठरेल. मानवतेला प्रेरणा देणारे हे राम मंदिर संस्कृतीचे प्रतीक ठरेल. आसेतुहिमालय भारत आज राममय झाला आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या वेळी काढलेले त्यांच्या भाषणातील गौरवोद्गार आज प्रत्यक्षात संपूर्ण देशभर दिसत आहेत.