‘लाल कंधारी’ गोवंश संवर्धक

23 Dec 2023 12:18:15
@विकास पांढरे 9970452767
लाल कंधारी हा मराठवाड्यातील महत्त्वाचा देशी गोवंश. शेती मशागतीसाठी हा गोवंश उपयुक्त समजला जातो. या गोवंशाच्या संवर्धन कार्यात लातूर जिल्ह्यातील मावलगाव (ता. अहमदपूर) येथील शेतकरी शरद पाटील हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. लाल कंधारी गोवंश पशुपालकांना एकत्रित आणून पाटील यांनी मावलगाव येथे 2003 साली लाल कंधारी पैदास केंद्राची स्थापना केली आहे. ‘घर तेथे गाय’ या त्यांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
cow
 
शरद पाटील हे विज्ञानाचे (बीएससी) पदवीधर. मावलगाव (ता. अहमदपूर) येथे त्यांची साडेआठ एकर शेती आहे. नोकरीकडे न वळता ते 1985 सालापासून शेतीत काम करू लागले. या काळात त्यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग केले. वडिलोपार्जित गोठ्यामध्ये स्थानिक जातीच्या लाल कंधारी गायी होत्या. या गायीचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. प्रारंभी त्यांनी ’लक्ष्मी’ नावाची लाल कंधारी गाय सांभाळली. या गायीचे योग्य संगोपन केले. या गायीला राष्ट्रीय पशू प्रदर्शनात चार वेळा सर्वोत्कृष्ट गायीचा सन्मान मिळाला. या लक्ष्मीमुळे (गाय) शरदरावांचे आणि मावलगावाचे नाव देशपातळीवर पोहोचले. यानंतर त्यांनी लाल कंधारी वंशाचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार केला आहे. एक गाय वर्षांला साठ हजार रुपये उत्पन्न देऊ शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
 
लाल कंधारी ब्रीडला मान्यता
 
नांदेड जिल्ह्यातील कंधार हे लाल कंधारी जातीचे मूळ स्थान आहे. मुखेड, लोहा, देगलूर, अहमदपूर, जळकोट या तालुक्यांत लाल कंधारी मोठ्या प्रमाणात आढळतात. काटक, मध्यम बांध्याची आणि रंगाने लाल अशी ही गाय वैशिष्ट्यपूर्ण आहे. उत्कृष्ट रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या या गायीचे बैल शेतीसाठी उपयुक्त समजले जातात. दिवसाकाठी 4 ते 5 लीटर दूध देण्याची क्षमता या गायीत आहे. 1990 सालापर्यंत ’लाल कंधारी’ ही कमी दूध देणारी, भाकड गाय असल्याचा समज होता. हा समज दूर करण्यासाठी व लाल कंधारी ब्रीडला मान्यता मिळविण्यासाठी शरद पाटील व त्यांचे सहकारी 1985पासून शासकीय पातळीवर प्रयत्न करीत होते. शेवटी 1990 साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात लाल कंधारी ब्रीडला मान्यता मिळाली.
 

cow 
लाल कंधारीला देशात पहिला क्रमांक
 
लाल कंधारी ही गाय देशातील अन्य जातीच्या तुलनेत कुठेही कमी नाही, यासाठी पाटील यांचे प्रयत्न सुरू होते. पशुवैद्यक अधिकारी नितीन मार्कंडेय, सुगणराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय पशू प्रदर्शनात ते सहभागी होऊ लागले. 1998मध्ये दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पशू प्रदर्शनात शरद पाटील यांच्या ’लक्ष्मी’ गायीला देशात पहिला क्रमांक मिळाला. 2001 साली बेंगळुरू येथे, तर 2006 साली लातूर येथील पशू प्रदर्शनात त्यांच्या गायीचा प्रथम क्रमांक आला. 2006 साली पाटील यांचे गोसंगोपनातील काम पाहून त्यांना सर्वोत्कृष्ट पशुपालनाचा ‘बाबू जगजीवनराम किसान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
 
 
गो-आधारित उत्पादन निर्मिती प्रशिक्षण
 
 
पाटील यांनी नागपूर जिल्ह्यातील देवळापार येथील गो-आधारित उत्पादन निर्मिती प्रशिक्षण केंद्रात जाऊन गोमूत्र अर्क, जीवामृत, साबण, धूप, मंजन, कीटकनियंत्रण, गोबर गॅस, गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. सध्या त्यांच्याकडे दहा लाल कंधारी गायी व एक वळू आहे. एक गोबरगॅस प्रकल्प असून ते कंपोस्ट खत, गोमूत्र अर्क, साबण, धूप आदी उत्पादने घेतात. आपली आठ एकर शेती ते गोआधारित पद्धतीने करतात.
 
 
’घर तेथे गाय’ उपक्रम
 
पाटील यांनी मावलगावात ‘घर तेथे गाय’ हा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे गावात लाल कंधारी जातीच्या गायीची संख्या 350 झाली आहे. गायीला लागणार्‍या चार्‍यासाठी सामुदायिक कडबा कुट्टी मशीन घेतले आहे. त्यामुळे पशुपालकांचा मोठा फायदा झाला असून चार्‍याची 50 टक्के बचत झाली आहे.
 
लाल कंधारी पैदास केंद्राची स्थापना
 
लाल कंधारी गोवंशाच्या संवर्धनासाठी पाटील यांनी पशुपालकांना एकत्रित करून मावलगाव येथे 2003 साली लाल कंधारी पैदास केंद्राची स्थापना केली आहे. केंद्राच्या वतीने पशुपालकांना जातिवंत पैदाशीबाबत मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर उत्तम पैदाशीसाठी शुद्ध वळू निर्मितीवर भर दिला जातो. शेतकर्‍यांना गोआधारित शेती करता यावी, यासाठी पोटूळ (जि. छ.संभाजीनगर) व कणेरी मठ (जि. कोल्हापूर) येथे शेतकर्‍यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. पाटील यांनी आतापर्यंत 2 हजारांहून जास्त शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले आहे.
 
येत्या काळात ते गाय दान करणार्‍या दानशूरांना संघटित करून ’गो बँक’ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या माध्यमातून अल्पभूधारक शेतकर्‍यास लाल कंधारी गाय दत्तक देऊन त्यास स्वयंपूर्ण करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. शरद पाटील यांचा लाल कंधारी गोवंश संवर्धन, संगोपन, संघटन आणि विकास हा कार्यक्रम ’देशी गोवंश’ चळवळीला निश्चितच दिशा देणारा आहे.
 
 
संपर्क :
 शरद बाबूराव पाटील
लाल कंधारी पैदास केंद्र,
मावलगाव
ता. अहमदपूर, जि. लातूर
9423350747
Powered By Sangraha 9.0