वैदिक साहित्य प्रकाशन करणारी जगविख्यात शतायुषी संस्था ‘गीता प्रेस गोरखपूर’वर या वर्षीच्या साप्ताहिक विवेकच्या दिवाळी अंकात सविस्तर लेख प्रकाशित झाला होता. या संस्थेने पुस्तक विक्रीचे अनेक विश्वविक्रम केलेले आहेत. आजवर 92 कोटी पुस्तके व कल्याण मासिकाचे अंक प्रकाशित करणारी ही संस्था बहुआयामी, उपक्रमशील, धार्मिक व सामाजिक व्यासपीठ आहे. भारत सरकारचा 2021चा ‘गांधी शांती पुरस्कार’ या संस्थेस मिळाला आणि गीता प्रेसच्या कामाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले. गीताजयंतीचे औचित्य साधत गीता प्रेसचे द्रष्टे संस्थापक श्रद्धेय जयदयालजी गोयंका, घनश्यामदासजी जालान आणि हनुमानप्रसाद पोद्दार यांच्या कामाचा परिचय या अंकात करून देत आहोत.
उत्तर प्रदेशातील नाथ संप्रदायाचे नामवंत पीठ असलेल्या गोरखपूरमध्ये इ.स. 1923 साली स्थापन झालेल्या ‘गीता प्रेस’च्या उभारणीत व संचालनात अनेकांचे मंगल योगदान आहे, पण ‘संस्थापक त्रिमूर्ती’ म्हणून ब्रह्मलीन जयदयालजी गोयंका उर्फ श्रद्धेय ‘सेठजी’, हरिलीलालीन हनुमानप्रसाद पोद्दार उर्फ सर्वांचे जिवलग ‘भाईजी’ आणि गीताप्रेमी धर्मपरायण घनश्यामदासजी जालान यांना ओळखले जाते. ‘भगवद्गीता’ हा तिघांना एका भक्तिसूत्राने बांधणारा धर्मबंध होता. या तिघांनाही आपण गीताव्रती, गीताप्रेमी, गीता प्रचारक म्हणू शकतो. तीच त्यांची खरी ओळख होय. हे तिघेही राजस्थानच्या धर्मपरायण मारवाडी समाजाचे भूषण होते. त्या तिघांपैकी जयदयालजी गोयंका व हनुमानप्रसाद पोद्दार हे दोघे मावसभाऊ होते आणि घनश्यामदास जालान हे गोयंकांचे जिवश्चकंठश्च मित्र होते.
व्यापारी, उद्योजकांचा गीता पुरुषार्थ
गीता प्रेसचे संस्थापक जयदयालजी गोयंका, घनश्यामदास जालान आणि हनुमानप्रसाद पोद्दार हे तिघेही व्यापारी घराण्यात जन्मलेले यशस्वी व्यापारी होते. तिघेही राजस्थानी मारवाडी अग्रवाल या धर्मपरायण समाजाचे घटक होते. भगवान श्रीकृष्ण ही तिघांची इष्ट आराध्य देवता होती. ‘गीता’ हा तिघांचाही उपासनेचा, चिंतनाचा विषय होता. गीता व सनातन वैदिक हा तिघांनाही आपला वैभवशाली अमृृतठेवा, अभिमानास्पद वारसा आणि या वारशाचे रक्षण हाच आपला वसा वाटत होता, जीवनोद्दिष्ट-व्रत वाटत होते. ही संस्थापक त्रिमूर्ती म्हणजे ‘राम-लक्ष्मण-भरत’सदृश आदर्श व अनुकरणीय त्रयी होती. जयदयाल गोयंका ‘राम’ होते, घनश्यामदास जालान ‘लक्ष्मण’ होते, सदैव साथ, सोबती आणि श्रद्धेय हनुमानप्रसाद पोद्दार ‘भाईजी’ भरत हे श्रीरामाचे बंधूपेक्षा भक्त होते. ब्रह्मलीन जयदयालजी यांचा शब्द भाईजी व जालान खाली पडू देत नसत. भाईजी पोद्दार व घनश्यामदासजी जालान या दोघांच्या दृष्टीने जयदयालजींचा शब्द ईश्वरी आज्ञेसारखाच होता. असा हा धर्मपरायण, गीताप्रचारक, आत्मलोपी व्यक्तिमत्त्वांचा त्रिवेणी संगम ‘गीता प्रेस गोरखपूर’च्या धवल कीर्तिमंदिराचे अधिष्ठान आहे. ही तीन व्यक्तिमत्त्वे जवळून समजून घेतली की, ह्या ईश्वरी कार्यासाठीच ह्या तिघांचा जन्म झाला होता, असे लक्षात येते, नव्हे खात्री होते.
ब्रह्मलीन जयदयालजी गोयंका
द्रष्टा गीताचिंतक, प्रचारक
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा अनोखा अद्भुत सुसंगम आपणास ‘गीता प्रेस’चे मुख्य संस्थापक ब्रह्मलीन सेठ जयदयालजी गोयंका यांच्या ठायी मूर्त दिसतो. बांकुरा, कलकत्ता व मुंबई महानगरात ब्रिटिश काळात त्यांची व्यापारी प्रतिष्ठाने होती व एक यशस्वी व्यापारी म्हणून मोठा नावलौकिक होता. तसेच ‘गीता चिंतक’, ‘गीता प्रवचनकार’, ‘गीता प्रचारक’ म्हणूनही सर्वत्र ख्याती होती. ‘अभ्युदय आणि नि:श्रेयस’ अशा उभय तत्त्वांचे समन्वयी दर्शन त्यांच्या जीवनातून घडते. ‘गीता प्रेस गोरखपूर’ त्यांच्या द्रष्ट्या कर्मयोगाचे मूर्त रूप आहे.
गोयंकांचे मूळ घराणे राजस्थानमधील ‘चुरू’चे. कलकत्ता आणि मुंबई येथे त्यांच्या व्यापारी पेढ्या होत्या. कापूस, ज्यूट, तेल, कपडा, भांडी आदी अनेक प्रकारच्या क्षेत्रांत गोयंकांच्या पेढ्या-कंपन्या अग्रेसर होत्या. अशा घरंदाज व्यापारी घराण्यामध्ये इ.स. 1885 साली खुबचंद गोयंका-अग्रवाल आणि माता शिवबाई यांच्या पोटी जयदयालजी यांचा जन्म झाला. त्यांचे लौकिक शिक्षण फारसे झाले नाही. व्यापार-उद्योगासाठी चुरू राजस्थानमधून जयदयालजींना बांकुरा पश्चिम बंगालमध्ये पाठविण्यात आले. बांकुरा व कलकत्त्यामध्ये व्यापारी मित्रांना एकत्र करून जयदयालजी गीता सत्संग करीत असत.
त्या काळातील मारवाडी व्यापारी समाजातील रितीरिवाजानुसार वयाच्या 13व्या वर्षीच जयदयालजींचा विवाह झाला होता. जयदयालजींचे वडील खुबचंद हे आर्यसमाजी होते. त्यांनी लहान वयात जयदयालजी यांना स्वामी दयानंद सरस्वतींचे ‘सत्यार्थ प्रकाश’ वाचावयास दिले आणि तेथूनच जयदयालजी आध्यात्मिक चिंतक झाले. नाथ संप्रदायाचे मंगलनाथ यांच्या चुरूमधील सत्संगाने जयदयालजी साधक झाले. मूळच्या धर्मपरायणतेला ध्यान, साधना, वाचन, चिंतन असे धुमारे फुटले. याच काळात भगवद्गीतेचा परिचय झाला व भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातील 69व्या श्लोकाने प्रभावित होऊन त्यांनी आपले अवघे जीवन गीता प्रचार-प्रसार-प्रबोधन कार्यासाठी समर्पित करण्याचा मनोमन संकल्प केला. गीता प्रचार हे त्यांचे जीवनव्रत झाले.
भगवद्गीतेवर जयदयालजींचे अध्ययन व चिंतन विलक्षण होते. त्यांना ईश्वरी कृपेने काही उपजत ज्ञानाचा ठेवा लाभलेला होता. व्यापारामध्ये सदाचाराने व्यवहार करीत त्यांनी मोठे यश मिळविले होतेच, तसेच या लौकिक पुरुषार्थासमवेतच त्यांना गीता चिंतक-प्रवचनकार म्हणून व्यापारीवर्गात आदराचे स्थान लाभले होते. जेथे जेथे व्यापार-उद्योगानिमित्त जात, तेथे तेथे व्यापार्यांचा सत्संग मेळावा घेऊन गीता प्रवचन करीत. जयदयालजींचा गीता सत्संग व्यापारीवर्गास एक पर्वणीच होती. प्रारंभी व्यापारी पेढीच्या कार्यालयातच सर्वांना सोयीची वेळ म्हणून रात्री जयदयालजी गोयंकांचे गीता सत्संग होत असत. पुढे व्यापारी श्रोत्यांची संख्या वाढत गेली, तेव्हा सत्संग, भजन, ध्यान, नामस्मरण यासाठी कलकत्ता येथे स्वतंत्र जागा भाड्याने घेण्यात आली. त्याला ‘गोविंद भवन’ असे नाव देण्यात आले. यथावकाश सत्संगासाठी स्वत:चे भव्य ‘गोविंद भवन’ बांधण्यात आले. हे ‘गोविंद भवन’ हीच ‘गीता प्रेस गोरखपूर’ची नोंदणीकृत मातृसंस्था आहे. आज कोलकात्यातील महात्मा गांधी रस्त्यावरील ‘गोविंद भवन’ भक्त, भाविक व गीताप्रेमी, वैदिक साहित्य व्यासंगी यांचे माहेर म्हणून प्रसिद्ध आहे. गीता प्रेसचे अत्यंत सुसज्ज मुख्य पुस्तक विक्री केंद्र येथे आहे.
थोर निरूपणकार चिंतक स्वामी रामसुखदासजी यांनी ‘श्रेष्ठजी’ म्हणून जयदयालजी गोयंका यांचे आदरयुक्त नामकरण केले. आधी लोक त्यांना ‘आपजी’ म्हणत होते. ‘श्रेष्ठजी’चे पुढे सेठजी असेच नाव रूढ झाले. जयदयालजींचा आध्यात्मिक अधिकार व गीता आदी वैदिक साहित्यावरचे व्यासंगी प्रभुत्व पाहून सारे संतमहंतही त्यांना विशेष सन्मान देत होते. परमार्थ परायण, दार्शनिक चिंतक, लेखक, सिद्धपुरुष, निष्काम कर्मयोगी, करुणामयी मानवकल्याणकारी सत्पुरुष अशा विविध प्रकारे जयदयालजींचा उल्लेख संतमंडळी करीत होते. पण जयदयालजी या सर्व उपाधींपासून पूर्ण दूर राहून अत्यंत साधेपणाने वागत, बोलत. श्रीमंती व विद्वत्ता या दोन्हीचा त्यांना लवमात्र अहंकार नव्हता. समाजहितैषी परोपकारी वात्सल्यमूर्ती म्हणून सर्वांना ते जवळचे वाटत होते.
‘गीता’ हा त्यांचा चिंतनाचा विषय होता. गीता प्रेसद्वारा प्रकाशित गीतेवरील विविध ग्रंथ जयदयालजी गोयंकांच्या दार्शनिक, साक्षात्कारी, अनुभूतीचे अक्षर प्रकटीकरण आहे. त्यांचा ‘गीता तत्त्व विवेचनी’ हा ग्रंथ गीता अभ्यासक-साधकाचा दीपस्तंभ ठरावा असा आहे. त्याशिवाय जयदयालजींच्या नावावर तब्बल 115 ग्रंथ-पुस्तके आहेत. ही पुस्तके म्हणजे जयदयालजींचा समग्र संस्कृती-वैदिक साहित्याचा चिंतन ठेवा आहे. नित्य गीता सत्संगामध्ये त्यांनी केलेल्या उद्बोधक प्रवचनांचा अक्षरसंग्रह आहे. त्यांनी केलेली संपादने व विविध ग्रंथ संक्षेप असे या 115 पुस्तकांचे स्वरूप आहे. त्यापैकी ‘गीता तत्त्व चिंतामणी’, ‘ज्ञानयोग’, ‘भक्तियोग’, ‘प्रेमभक्ती योग’, ‘मनुष्यजीवन की सफलता’, ‘परम साधन’, ‘परमार्थ पत्रावली’ हे ग्रंथ विशेष वाचकप्रिय ठरलेले आहेत. जयदयालजी गोयंका हे ‘गीता प्रेस’, ‘चुरू वैदिक गुरुकुल विद्यालय’, ‘गोविंद भवन’ (कोलकाता), ‘गीताभवन-स्वर्गाश्रम (हृषीकेश)’, ‘आयुर्वेद संस्थान’ अशा अनेक संस्थांचे द्रष्टे संस्थापक आहेत. पण सार्या कामाच्या श्रेयापासून ते सदैव दूर राहिले. स्वत:चा फोटो काढणे, छापणे त्यांना मान्य नव्हते. कर्तेपणाच्या अहंकाराचा लवलेश त्यांच्या ठायी नव्हता. ‘गझल गीता’ नावाची पद्यरचना ही त्यांची एक अनोखी उद्बोधक भक्तिरचना आहे. त्यांच्या साक्षात्कारी आत्मलोपी साधुत्वामुळे अनेक संत, महंत, मठाधिपती, चिंतक, कथावाचक त्यांच्या सत्संगाचा लाभ घेत. त्यांना पूर्वजन्मजन्मांचे ‘जातीस्मर’ ज्ञान होते. माणूस समोर येताच त्यांचे मनोगत ते जाणत होते. अशा अनेक अतींद्रिय सिद्धी त्यांना प्राप्त होत्या. अशा सिद्धपुरुषाने वैशाख वद्य द्वितीयेच्या दिनी (इंग्रजी दि. 17 एप्रिल 1964) हृषीकेशमध्ये गंगातटी स्वर्गद्वार येथे देह ठेवला आणि आपल्या इहलोकीच्या अवतारकार्याची कृतार्थ मनाने सांगता केली.
घनश्यामदासजी जालान
आत्मसमर्पणाची प्रतिमूर्ती
गीता प्रचारासाठी आवश्यक गीता प्रतींची बिनचूक शुद्ध स्वरूपात छपाई करण्यासाठी, कलकत्त्याच्या जयदयाल गोयंका संचलित सत्संगात स्वत:चा छापखाना टाकण्याचा निर्णय झाला, तेव्हा असा प्रिंटिंग प्रेस कलकत्त्यामध्ये सुरू करावा की मुंबईमध्ये अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा त्या सत्संगी मंडळीतील एक घनश्यामदास जालान यांनी प्रेस गोरखपूरमध्ये टाकण्याचा प्रस्ताव जयदयालजींना दिला आणि अखेर गोरखपूर येथे ‘गीता प्रेस’ नावाचा छापखाना सुरू करण्याचा निर्णय झाला. त्या निर्णयाची कार्यवाही करण्याची जबाबदारी घनश्यामदासजींनी घेतली आणि यशस्वीपणे पार पाडली. ब्रह्मलीन जयदयालजी गोयंकाच्या सेवा कार्यासाठी घनश्यामदासजींनी आपले सारे जीवन समर्पित केले होते. श्रद्धेय जयदयालजी यांचा शब्द घनश्यामदासजींसाठी ब्रह्मवाक्याइतका महत्त्वाचा होता.
घनश्यामदासजी जालान यांचा गोरखपूर येथे पिढीजात हातमागाच्या कापडाचा व्यवसाय होता. आपला व्यवसाय सांभाळून मी गरज पडेल तसा सर्व वेळ गीता प्रेससाठी देईन असा घनश्यामदासजींनी श्रद्धेय जयदयालजींना शब्द दिला आणि जीवनाच्या अखेरपर्यंत समर्पित भावाने पाळला. घनश्यामदासजी हेसुद्धा मूळचे राजस्थानचेच, मारवाडी अग्रवाल समाजाचे होते. धर्मपरायणता हा त्यांच्या घराण्याचाच गुण होता. धर्मसेवा करण्यात सदैव तत्पर अशा घनश्यामदासजी यांची इ.स.1911मध्ये राजस्थानमधील चुरू येथील एका सत्संगामध्ये श्रद्धेय जयदयालजी गोयंका यांच्याशी प्रथम भेट झाली आणि जयदयालजींचा लाघवी स्वभाव, गीताज्ञान, परोपकारी वृत्ती, गीता प्रचाराची इच्छा या गुणांनी घनश्यामदासजी इतके प्रभावित झाले की त्यांनी जयदयालजींना ते जे जे कार्य हाती घेतील त्यामध्ये संपूर्ण निष्ठेने सक्रिय सहभाग घेण्याचे वचन दिले.
अशा सेवासमर्पित धर्मपरायण घनश्यामदास जालान यांचा जन्म 1891मध्ये झाला. त्यांना 68 वर्षांचे सेवा आयुष्य लाभले होते. त्यांच्या वडिलांचे नाव पृथ्वीराज जालान होते, तर मातोश्रींचे नाव हरदेवीबाई होते. त्यांचे लौकिक शिक्षण फारसे झाले नव्हते, पण व्यापारी हिशेबात ते निपुण होते. वयाच्या 15व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव बसंतीदेवी होते. त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा अशी अपत्ये होती. घनश्यामदासजी यांची एवढीच जुजबी माहिती उपलब्ध असून याउपर ना अधिक माहिती मिळते, ना छायाचित्रे मिळतात. श्रद्धेय जयदयालजींना फोटो काढणे आवडत नव्हते, त्यामुळे त्यांचे फोटोसुद्धा गीता प्रेसमध्ये नाहीत. घनश्यामदासजी त्यांचे अनुचर होते. तेही कोणाला फोटो काढू देत नव्हते व फोटोग्राफरपासून सदैव चार हात कटाक्षाने दूर राहत होते. आत्मलोपी, प्रसिद्धिपराङ्मुख सेवाभाव हीच घनश्यामदासजींची खरी ओळख आहे. हाच त्यांचा परिचय.
‘श्रद्धेय जयदयालजींची सावली’, ‘जयदयाल सेठजींचे सचिव, साथी, सखा’ म्हणूनच सर्वत्र घनश्यामदासजींना ओळखले जाते होते. गीता प्रेसचे पडद्यामागचे सर्वेसर्वा अशी त्यांची भूमिका होती. घनश्यामदासजी यांनी गोरखपूरमध्ये 1923 साली 10 रुपये भाड्याने जागा घेऊन 600 रुपयांच्या एका जुन्या ट्रेडल छपाई मशीनवर ‘गीता प्रेस’चा श्रीगणेशा केला. तेव्हा तेथे ना जयदयालजी होते, ना हनुमानप्रसाद पोद्दारजी होते. ते दोघेही तेव्हा मुंबईमध्ये कार्यरत होते. गीता प्रेस गोरखपूर प्रकाशित अनेक ग्रंथावर मुद्रक-प्रकाशक म्हणून घनश्यामदासजी यांचे नाव आहे. तेच त्यांच्या सेवा कार्याचे चिरंतन स्मारक आहे. गीता प्रेसचा सारा खरेदी-विक्री व्यवहार व हिशेब ठेवण्याचे दायित्व घनश्यामदासजींवर होते. गीता प्रेसच्या यशामध्ये त्यांच्या या हिशेबीपणाचा मोठा वाटा आहे. कागद, त्यांची प्रतवारी, कोणत्या ग्रंथास किती कागद लागेल याचे सारे गणित व आकडे घनश्यामदासजींचे तोंडपाठ असत. एक पैचा कागद वाया जाऊ देत नसत. स्वस्तामध्ये पुस्तक विक्री करायची म्हणून कधीही हलका, कमी दर्जाचा कागद वापरण्याची तडजोड त्यांनी कधीच केली नाही. आपण पुस्तके छापत नसून श्रीकृष्णाची ईश्वराची वाणी छापत आहोत, ती उत्तमोत्तम कागदावर छापली पाहिजे असा त्यांचा विचार होता.
गीता प्रेसची, सेठ जयदयालजींसारख्या दिव्य विभूतीची सेवा करीत असतानाच मला मरण यावे अशी त्यांची अंतिम इच्छा होती. त्यांच्या भक्तिसेवेच्या सामर्थ्याने ती त्यांची इच्छा पूर्ण झाली. 1958 साली सेठ जयदयालजींसमवेत घनश्यामदासजी हृषीकेश येथील गंगातटावरील गीताभवन स्वर्गाश्रममध्ये एका धार्मिक आयोजनानिमित्त गेले असता, जयदयालजींच्या मांडीवर डोके ठेवून त्यांना मृत्यू आला. इच्छामरणी विभूती म्हणून भक्तभाविकांना त्यांचा हेवा वाटतो. मृत्यू हेसुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनाचे दर्शन असते. घनश्यामदासजींचा मृत्यू त्यांच्या समर्पित सेवाभावी धन्य धन्य अशा जीवनाचे दर्शन आहे.
हनुमानप्रसाद पोद्दार ‘भाईजी’
‘कल्याण’ मासिकाचे आद्य संपादक
गीता प्रेसच्या प्रवर्तक त्रयीमधील श्रद्धेय भाईजी या नावाने सर्वपरिचित हनुमानप्रसाद पोद्दार एक व्यक्ती नव्हे, तर एक संस्था होती. इतके बहुमुखी, विविध गुणसंपदेने संपन्न आणि इतके लाघवी, विनम्र विमल व्यक्तिजीवन पाहून आपण स्तिमित होऊन जातो. भाईजी भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञ, भक्त, योगी, ज्ञानी, पुरुषोत्तम, सर्वसाक्षी या सार्या संकल्पनांची एक सगुण मूर्ती होते, म्हणूनच त्यांनी ‘भारतरत्न’ पुरस्कारही नाकारला होता.
थोर संपादक, व्यासंगी विद्वान, तत्त्वज्ञ विचारवंत, सव्यसाची लेखक, भजनानंदी रमणारा भाविकभक्त, अनुभूतीसंपन्न साक्षात्कारी सिद्धपुरुष आणि अलौकिक सेवासमर्पित गीता प्रचारक, प्रवचनकार, सत्संगी म्हणून भारताच्या विविध आखाड्यांचे-मठांचे महंत, संतसत्पुरुष, विविध संप्रदायाचे, मतावलंबी कथाकार, चिंतक भाईजींना वंदनीय मानत होते व त्यांच्या सत्संगाद्वारे धन्य समजत होते. भारतीय साधू समाज, आचार्य, संतांचा अवाढव्य स्नेहसंपर्क व संग्रह भाईजींची पुंजी होती.
‘भारतरत्न’ नाकारणारे भाईजी
ब्रिटिश काळात गोरखपूर जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या (इ.स. 1936) व दुष्काळाच्या संकटात (राजस्थान - इ.स. 1938) श्रद्धेय भाईजींनी ‘गीता प्रेस सेवा दल’ स्थापून संकटग्रस्तांना मदतीचा हात व आधार दिला. या कार्याने संतुष्ट होऊन ब्रिटिश सरकारच्या वतीने तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर मि.पेडले, कमिशनर मि. होबार्ट यांनी भाईजींची भेट घेऊन त्यांना ‘रावबहादुर’ असा किताब देण्याची इच्छा व्यक्त केली. पण आत्मलोपी भाईजींनी त्यास नम्रतापूर्वक ठाम नकार दिला. संकटग्रस्त देशबांधवांची सेवा माझे कर्तव्य आहे आणि आम्ही ‘गीता प्रेस सेवा दला’च्या द्वारे जे मदतकार्य केले, ते अशाच कर्तव्यबोधातून केले; निष्काम सेवाभावातून ते कार्य घडले आहे, कोणतेही कर्तव्य व कोणतीही सेवा ही पुरस्कारासाठी नसते, असे भाईजी म्हणत असत व तसेच त्यांचे आचरण होते.
भाईजींची आत्मलोपी वृत्ती ही जीवनाच्या आदर्श संस्कारातून प्रसवलेली निसर्गदत्त वृत्ती होती. कमालीचा निष्काम कर्मयोग भाईजींचा स्थायिभाव होता. भाईजींनी ब्रिटिश किताब नाकारला, तसा स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारचा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मानही विनयपूर्वक ठामपणे नाकारला. भारताचे केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत, कन्हैयालाल मुन्शी हे ‘भारतरत्न’ प्रस्ताव घेऊन (इ.स. 1959-60) अनुमतीसाठी-स्वीकृतीसाठी गोरखपूरला जाऊन गीता वाटिकामध्ये श्रद्धेय भाईजी हनुमानप्रसाद पोद्दार यांना समक्ष भेटले होते. तेव्हा भाईजी म्हणाले, “मी जे कार्य केले असे तुम्ही सर्व जण माझे मानता, ते खरे तर ईश्वरी कार्य असून ईश्वरानेच माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या हातून ते करून घेतलेले आहे. या कार्याबद्दल माझा सन्मान होणे, मी पुरस्कार घेणे हे अनुचित आहे. ईश्वरी कार्याचा सन्मान फक्त ईश्वरच करू शकतो.‘’ केवढी नि:स्पृहता! केवढा आत्मलोपी विरक्त भाव! ब्रह्मलीन जयदयालजी, भाई हनुमानप्रसादजी आणि घनश्यामदास जालानजी तिघेही असेच निष्काम, आत्मलोपी, विरक्त, खरे गीताप्रचारक होते. ते गीता जगले होते. ‘न मे कर्मफले स्पृहा।’ हा त्यांचा जीवनमंत्र होता.
म. गांधी, लोकमान्य टिळक, मदनमोहन मालवीय यांच्यासह अनेक क्रांतिकारकांशी भाईजींचा स्नेह व संवाद होता. स्वातंत्र्यचळवळीत म. गांधींसमवेत भाग घेतानाच दुसरीकडे अनेक क्रांतिकारकांना त्यांनी गुप्तपणे केलेली मदत, हिंदू महासभेच्या कार्यात सहभाग असा भाईजींचा सर्वच क्षेत्रांत सक्रिय भाग होता. ब्रिटिश रोषातून त्यांना तुरुंगवासही घडला होता. गोरक्षा आंदोलन आदीमध्ये तर भाईजी अग्रेसर होते. दुष्काळ, महापूर आदी आपत्तिकाळात धावून जाणारी करुणामूर्ती भाईजी हे गीता केवळ प्रवचनात सांगतच नव्हते, तर गीतेचा कर्मयोग ते प्रत्यक्ष जगत होते. गोरखपूरमधील गीता प्रेसनिकटची ‘गीता वाटिका’ हे पुण्यपावन स्थळ भाईजींच्या कार्याचे चिरंतन स्मारकच आहे.
भाईजी हेच गीता प्रेसच्या पुस्तक निर्मितीचे व कल्याण मासिकाचे मुख्य स्तंभ होते. कल्याण मासिकाचे संपादक म्हणून भाईजींचे कार्य ऐतिहासिक आहे. ‘कल्याण म्हणजे भाईजी आणि भाईजी म्हणजे कल्याण मासिक’ अशी त्यांची एकरूपता, अद्वैत होते. कल्याण मासिकाला भाईजींनी आध्यात्मिक लेखक-चिंतक-वाचकवर्गात परमोच्च स्थान प्राप्त करून दिले. भारतवर्षातील समस्त पंथ-संप्रदायांत, विविध पद्धतीच्या भिन्न भिन्न उपासकांत ‘कल्याण मासिक’ सर्वमान्य होते. ही सर्वमान्यता हीच भाईजींची अलौकिक कामगिरी होय!
भाईजींचा परमार्थरूप जीवनपट
धर्मपरायण, परोपकारी मारवाडी अग्रवाल समाजात श्रीमान भीमराज पोद्दार व माता रिखीबाई यांच्या पोटी, ईशान्य भारतातील मेघालय राज्याच्या राजधानी ‘शिलाँग’ शहरात आश्विन कृष्ण प्रदोष (द्वादशी) दि. 17 सप्टेंबर 1892 रोजी भाईजी उर्फ हनुमानप्रसादजींचा जन्म झाला. (काहींच्या मते 6 ऑक्टोबर रोजी झाला.) शिलाँगमध्ये त्यांच्या घराण्याचा पिढीजात व्यापार होता. त्यांच्या लहानपणीच आईंचे निधन झाले. आजी रामकौरदेवी व सावत्र आई रामदेईबाई यांनी त्यांचे संगोपन केले. 1897 साली शिलाँगमध्ये मोठा भूकंप झाला. अनेक जण मृत्युमुखी पडले. पण अंगावर घर पडून जमिनीत गाडले गेले, तरी हनुमानप्रसाद जिवंत राहिले. पुढे कळत्या वयात त्यांनी आपला हा पुनर्जन्म आहे असे समजून सर्व आयुष्य पारमार्थिक कार्यासाठी समर्पित केले.
वयाच्या 6व्या वर्षी हनुमानप्रसादजींना शिलाँगमधून राजस्थानमधील मूळ गावी - रतनगड येथे आजी रामकौरदेवी यांच्याकडे पाठविण्यात आले. तेथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. आजीच्या धर्मपरायण स्वभावामुळे त्यांच्या घरी अनेक साधूंचे आगमन होत असे. त्यांचा सत्संग छोट्या भाईजींना (हनुमानप्रसाद) लाभत होता. संत बखंननाथजी, संत बृजदासजी यांच्या सत्संगाने भाईजींच्या मनात धर्मग्रंथ अध्ययनाचे बीज फलित झाले. निम्बार्क संप्रदायी संत बृजदासजी यांच्याकडून त्यांनी वैष्णव दीक्षा घेतली व त्याच वेळी त्यांचा आजीने मोठ्या हौसेने, थाटामाटाने उपनयन संस्कार विधी केला. गायत्री, गीता, गोविंद चिंतनाचा भाईजींना छंद जडला. नवरात्रात त्यांनी सप्तशती पाठ केला. नामस्मरण, ध्यान, चिंतन यामध्ये भाईजी लीन झाले. इ.स. 1901मध्ये भाईजी राजस्थानमधून कलकत्त्याला वडिलांना व्यापारामध्ये मदत करण्यासाठी आले. भाईजी वडिलांच्या व्यापारात मदत करीत होते. पण त्यांचे मन गीता चिंतन, परमार्थ साधन यामध्येच होते. रोज रात्री दुकान बंद होताच त्यांचे वडील व्यापारी मित्रांसह ‘सत्संग’ करीत असत. या धर्मपरायण व्यापारी मित्रांना भाईजींनी गीतेची गोडी लावली. भाईजींचे गीता प्रवचन-भजन व्यापार्यांना एक सत्संग पर्वणीच वाटू लागले. येथे त्यांची व जयदयाल गोयंका यांची ‘गीताप्रेमी’ सत्संगी म्हणून जोडी जमली जमली. सहवास वाढत गेला. एकाच राज्यातील, एकाच समाजातील, एकाच विचाराचे धर्मपरायण; एवढेच नव्हे, तर सख्खे मावसभाऊ, त्यामुळे भेटताच सूर जुळले आणि यावर अधिक मधुर आध्यात्मिक रेशीम धागे-बंध म्हणजे दोघेही ‘गीताप्रेमी’, गीता चिंतक व गीता प्रचारक होते. पुढे त्यांच्या सत्संगातून ‘गीता प्रेस’ गोरखपूर आणि ‘कल्याण’ मासिकाचा जन्म झाला.
‘कल्याण’ मासिकाचे आद्य संपादक
1923 साली गीता प्रेसची स्थापना झाली. 1927 साली भाईजी हनुमानप्रसाद मुंबई सोडून कायमस्वरूपी गोरखपूरला आले. 1926मध्ये श्रद्धेय जयदयालजी व हनुमानप्रसादजींनी मुंबईतून ‘कल्याण’ मासिकाचे प्रकाशन सुरू केले. हनुमानप्रसाद पोद्दारजींनी संपादनाचे दायित्व स्वीकारले आणि सेवा समजून इ.स. 1971 मृत्यूपर्यंत भक्तियुक्त निष्ठेने ते कार्य केले. 1926 साली (श्रावण शुक्ल सप्तमी) श्रद्धेय हनुमानप्रसादजींनी ‘कल्याण’ मासिकाचा पहिला अंक मुंबईतून प्रकाशित केला. त्यामध्ये पहिला लेख महात्मा गांधींचा होता व श्रद्धेय जयदयालजी गोयंकांचे दोन लेख होते. ‘कल्याण’चा प्रत्येक अंक संग्राह्य आहे.
‘कल्याण’चे मुखपृष्ठ व आतील पानावर प्रकाशित होणारी पौराणिक देवदेवतांची व प्रसंगांची रंगीत चित्रे इतकी मोहक-चित्ताकर्षक होती की आजही देशभर भाविक लोकांच्या घराघरात त्या चित्रांच्या फोटोफ्रेम दिसतात. चित्रकारांना खास आमंत्रित करून त्यांच्याकडून सुंदर चित्रे काढून घेणे हे भाईजींचे आणि कल्याण मासिकाचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य ठरले. संपादक कसा असावा याचा भाईजी अनुकरणीय आदर्श होते. ते 16 तास कार्य करीत होते आणि गीता प्रेसमधून एक पैदेखील पारिश्रमिक मानधन घेत नव्हते. स्वत:चा राहण्याचा-खाण्याचा व अन्य खर्च स्वत:च्या उत्पन्नातून करीत होते.
भाईजींनी 1926 ते 1971 असे 45 वर्षे संपादक म्हणून ‘कल्याण’ मासिकाचे व गीता प्रेसच्या पुस्तकाचे संपादन-लेखन केले. कल्याण मासिक हा गीता प्रेस गोरखपूरचा आत्मा आहे. अडीच लाखाहून अधिक प्रती खपणारे धार्मिक मासिक म्हणून ‘कल्याण’ केवळ मासिक नसून एक सनातन वैदिक विचार आहे. भाईजींच्या संपादनाची सूक्ष्म दृष्टी, अचूकता, वेळेवर ठरल्याप्रमाणे सार्या गोष्टी होण्याचा कटाक्ष, प्रचंड व्यासंग, लेखक-चिंतकाची मांदियाळी सारेच विलक्षण होते. त्यांच्या संपादन कौशल्यावर व उपक्रमशीलतेवर एखादा स्वतंत्र ग्रंथच होऊ शकतो. त्यांनी 600 ग्रंथांचे संपादन केलेले आहे.
अविस्मरणीय राष्ट्रीय कार्य
इ.स. 1906च्या वंगभंग आंदोलनात सह भागापासून भाईंचा देशकार्यात सक्रिय सहभाग होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग, बंगालमधील क्रांतिकारकांना मदतकार्य, तुरुंगवास, तुरुंगात होमिओपॅथीचे ज्ञान संपादन करून गरीब, गरजूंना वैद्यकीय मदत, काशी हिंदू विश्वविद्यालयासाठी मदनमोहन मालवीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यात सहयोग, वंगभंग आंदोलनात सत्याग्रही म्हणून भाग, देशभरातील साधुसंतांना एकत्र आणून दिल्लीत गोरक्षा आंदोलनाचे नेतृत्व, अयोध्या रामजन्मभूमी लढ्यामध्ये गोरक्षपीठाचे संत आदिनाथ यांच्या नेतृत्वाखाली समित्यांमध्ये सक्रिय कार्य, ‘कल्याण’ मासिकातून रामजन्मभूमी लढ्याविषयी जनजागृती, देशातील दुष्काळग्रस्तांसाठी व पूरग्रस्तांसाठी सेवक दलाची स्थापना करून नियोजनबद्ध मदतकार्य इतके वैविध्यपूर्ण कार्य त्यांनी केले.
‘गीता वाटिका’ - भाईजींचे कर्मस्थळ
भाईजी हे बहुमुखी भक्तभागवत होते. भक्तीमध्ये जसे नवविध भक्ती प्रकार आहेत, तसेच भाईजींच्या बहुमुखी कार्याचे अनेकविध आयाम आहेत. भाईजी उत्कृष्ट प्रवचनकार, रसाळ कथावाचक आणि कीर्तनकार होते. त्यांना विविध कीर्तनप्रकार अवगत होते. व्यास वाल्मिक परंपरा, देवर्षी नारद परंपरा आणि रामभक्त हनुमान परंपरा अशा संकीर्तनाच्या तिन्ही पद्धतीने भाईजी कीर्तन करीत, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ‘गीता वाटिका’मध्ये रोज सकाळी भाईजींचे प्रवचन होत असे. गीता वाटिका हेच भाईजींचे परमपावन कर्मस्थळ होते. या गीता वाटिकातच भाईजींचे निवासस्थान होते. दि. 22 मार्च 1971 रोजी वयाच्या 80व्या वर्षी भाईजींचे देहावसन झाले. त्यांची कर्मभूमी असलेल्या ‘गीता वाटिका’मध्ये त्यांची समाधी आहे. तेथे सदैव अखंड हरिनामजप संकीर्तन चालू असते. ‘भाईजी स्मृती भवन’ आहे तेही एक प्रेरक स्थान आहे. इ.स. 1972मध्ये भारत सरकारच्या टपाल खात्याने श्रद्धेय भाईजी हनुमानप्रसाद पोद्दार यांच्या कार्य स्मरणार्थ विशेष डाक तिकीट प्रकाशित करून भाईजींच्या चिरंतन कार्याला श्रद्धांजली वाहिली होती.
श्रद्धेय जयदयाजली काय, श्रद्धेय भाईजी काय आणि श्रद्धेय घनश्यामदास जालान काय.. त्यांची जीवने म्हणजे निष्काम कर्मयोगी गीतावाग्यज्ञच होता. या जाज्वल्य राष्ट्रभक्ती, वैदिक साहित्याभिमानी, गीता प्रचारक त्रिमूर्तीस साभिमान सादर नमन!
लेखक संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.