पुणे बांबू फेस्टिव्हल २०२३ - एक पर्यावरणपूरक अनोखी जत्रा

विवेक मराठी    21-Dec-2023
Total Views |
धनश्री बेडेकर
८३०८८४१२७१
बंगळुरूच्या 'बांबू सोसायटी ऑफ इंडिया' संस्थेतर्फे २२, २३, २४ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा केंद्रामध्ये अनोख्या 'पुणे बांबू फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शेतकरी, उत्पादक, बँकर्स, खरेदीदार, ग्राहक असे सारेच एका छताखाली एकत्र येणार आहेत. त्यांच्यात दुवा साधण्याचे काम या बांबू फेस्टिव्हलद्वारे होणार आहे.
 

Pune-Bamboo-festival
 
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रतिक्रियांना मी सामोरी जातेय. यातील काही प्रतिक्रिया तुमच्याही असू शकतील.
“पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंदिरमध्ये पुणे बांबू फेस्टिवल २०२३ होतोय, याचा अर्थ खूप मोठा कार्यक्रम असणार. मला गेलं पाहिजे.”
 
 
“पण माझा आणि बांबूचा काय संबंध? मी आयटी क्षेत्रात पुण्यात काम करतो.”
 
“आई, आमच्या शाळेत पोस्टर लावलं आहे, पुण्यात बांबू फेस्टिव्हल आहे. आपण जायचं ना? खूप भारी गोष्टी विकत मिळणार आहेत.”
 
“माझ्या होणार्या बायकोला मी बांबूचे दागिने देणार आहे, मला पुणे बांबू फेस्टिव्हलला यायलाच हवं. एवढं exclusive गिफ्ट कुठे मिळणार अजून?”
 
“ऐकलस का गं, आमच्या ऑफिसच्या मेलवर पुणे बांबू फेस्टिव्हलला जायचं आहे असं अपील आलं आहे, आपण जायचं ना गं? पोरांना घेऊन या, असं म्हणत आहेत.”
 
 
का अनेक पुणेकर एकदम बांबू नावाच्या गोष्टीच्या मागे लागले आहेत? असं काय आहे बांबूमध्ये, ज्यामुळे पुण्यात २२, २३ आणि २४ डिसेंबर २०२३ या दिवसांत पुणेकर गणेश कला-क्रीडामध्ये भरणार्याू शॉपिंगला जाण्याची तयारी करत आहेत?
सांगते..
 
 
याआधी २०२० साली याच ठिकाणी 'पुणे बांबू फेस्टिव्हल'चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलमध्ये बांबूपासून बनविण्यात येणार्यां विविध उत्पादनांचे ४५ स्टॉल्स होते. या स्टॉल्समध्ये बांबूपासून बनविण्यात येणार्याण वस्तूंमध्ये बांबूचा टूथब्रश, बांबूची बाटली, सॉक्स, शर्टस, पुस्तके, लँम्प्स, फर्निचर, बांबूच्या झोपड्या, घड्याळे, कीचेन, झोपड्या, इतकेच काय तर बांबूचे दागिने अशा वैविध्यपूर्ण व कलात्मक अशा सुमारे ३०० वस्तूंचा समावेश होता. अशी सर्व अनोखी उत्पादने पाहून पुणेकर भारावून गेले होते आणि त्यांनी बांबूच्या या उत्पादनांना भरभरून प्रतिसाद दिला होता. यंदाही गतवेळपेक्षा अधिक भव्यदिव्य 'बांबू फेस्टिव्हल' आयोजित करण्यात आला आहे, म्हणून पुणेकरांच्या मनात प्रचंड उत्सुकता तयार झाली आहे.
 
 
bamboo
 
गेली कित्येक वर्षे आपण शाश्वत विकास या विषयावर भारतात वेगवेगळ्या स्तरांवर काम करत आहोत. या सगळ्याचा आपल्या जगण्याशी थेट संबंध आहे आणि बांबू ही त्यातीलच एक महत्त्वाची बाब आहे. मलाही आश्चर्य वाटले होते, जेव्हा मला समजले होते की बांबू हे गवत आहे. मला तर वाटले होते, हे लाकडासारखे असते. मजबूत असते. बांबू किती मजबूत असतो, हे माझ्या ऑफिसमधील देखणी बांबूची सहा टेबल्स केली, तेव्हा मला कळले! या गोष्टीला आता जवळजवळ १० वर्षे होऊन गेली. त्या वेळच्या लाकडाच्या किमतीपेक्षा कमी पैशात झालेली ही टेबल्स बघून आजही आमच्या ऑफिसमध्ये येणारे सगळे लोक हरखून जातात. नंतर आमच्या घरात बांबूच्या अनेक वस्तू यायला लागल्या. आता माझ्या ऑफिसमध्ये बांबूची टेबल्स आहेत, सोफा आहे, पेन stand आहे, घड्याळ आहे, माझ्या घराच्या आणि ऑफिसच्या किल्ल्यांच्या कीचेनमध्ये बांबू आहे. एवढेच काय, माझ्या visiting कार्डचा फोल्डरदेखील बांबूचा आहे.
 
 
गेल्या काही वर्षांत माझ्यासारख्या असंख्य भारतीय लोकांमध्ये या बांबूविषयी आत्मीयता निर्माण झाली, कारण त्याचे पर्यावरणपूरक स्वरूप. तसे बघायला गेले, तर लाकडाला बर्याआच अंशी पर्याय असलेला हा बांबू भारतात अनादी काळापासून उपस्थित आहे. जन्म झालेल्या बाळाच्या पाळण्यापासून ते माणूस मेल्यावर नेतात त्या तिरडीपर्यंत आपण बांबू वापरत होतो. बांबूच्या वस्तूंमध्ये कारागिरी आहे. सरसकट कुणालाही ते तयार करता येत नाही, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवताना आपल्याला बांबूचा विसर पडला.
 
 
बांबू महत्त्वाचा, कारण तो लाकडाचा वापर कमी करतो, एवढेच नाही. जरा शेतकर्या च्या बाजूने विचार करू या. हवामान बदलाच्या जागतिक संकटाला सामोरे जाताना आपले शेतकरी खूप मोठी झुंज देत आहेत. त्यांचे उत्पन्न कधी अतिपावसामुळे, तर कधी कोरड्या दुष्काळामुळे अस्थिर आहे. त्यांना बांबूची गरज आहे. कारण बांबूची मुळे माती धरून ठेवतात. भूमी संधारण तर होतेच, तसेच शेतकर्या ला उत्पन्नाचा एक शाश्वत स्रोत मिळतो. खूप कमी देखभाल आवश्यक असलेले हे पीक शेतकर्याहला मोठा हात देते. शेतकरी जगला तरच आपण जगू, हे आताशा आपल्याला कळायला लागले आहे.
 
 
आज भारत सरकारने बांबू या पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी खूप मोठ्या योजना आखल्या आहेत. या सगळ्याचे कारण हेच आहे. दैनंदिन जीवनात बांबूसारख्या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर झाला, तर आपण शाश्वत विकास जीवनशैली अंगीकारू शकतो. आपला आणि शाश्वत विकासाचा थेट संबंध आहे, कारण ती आपल्यासाठी चाललेली गोष्ट आहे. निसर्गातील सगळे घटक जर आनंदाने जगले, तर ही पृथ्वी आनंदमय होणार आहे.
 
 
आपण नेहमीच ब्रँडेड वस्तू घेतो, आता आपल्या पुढच्या पिढ्यांना आवश्यक अशा बांबूच्या वस्तू घेऊन बघू.
लक्षात ठेवा, पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिरात २२,२३ आणि २४ डिसेंबर २०२३ला पुणे बांबू फेस्टिव्हल आहे. बांबू सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे याचे आयोजन केले आहे. आपल्या मुलांना, शेजारी लोकांना आणि घरी आलेल्या पाहुण्यांनाही घेऊन या.. कारण शश्वत विकास आपल्या सर्वांचा आहे.
 
 
लेखिका पुणे येथील बीज कम्युनिकेशन कन्सल्टन्सीच्या विश्वस्त आहेत.