ओडिशा भारताचा अल्पस्पर्शित समृद्ध खजिना

02 Dec 2023 11:59:16
@सई चपळगावकर  9823563437
 
 
odisha tourism
ओडिशातील अनेक आख्यायिकांनी वेढलेल्या जगन्नाथ मंदिराचं आकर्षण आम्हाला खुणावत होतंच. त्यामुळे यंदा आम्ही ओडिशात जाण्याचं निश्चित केलं. त्याबरोबरच अनेकांनी वाखाणलेला पुरीचा समुद्रकिनारा, कोणार्कचं सूर्यमंदिर, चिल्का सरोवर, पुरातत्त्व विभागाच्या काही साइट्स, ओडिशाची खाद्यसंस्कृती, ओडिशा आर्ट.. सगळंच थक्क करणारं आहे. ओडिशात हातावर मोजण्याइतकी मोठी शहरं आणि बाकी सर्व ग्रामीण भाग आहे. तेथील लोकांचं आदारातिथ्यही वाखाणण्याजोगं होतं. आपण केलेला प्रत्येक डोळस प्रवास हा आपलं भावविश्व विस्तारत, आपल्याला अनुभवसमृद्ध करत असतो.
या वर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये केरळ की ओडिशा या राज्यांपैकी कुठे जायचं, यावर विचारमंथन सुरू असताना आमचं चौघांचंही ओडिशाला जाण्याबाबत एकमत झालं. अनेक आख्यायिकांनी वेढलेल्या जगन्नाथ मंदिराचं आकर्षण तर होतंच. त्याबरोबरच अनेकांनी वाखाणलेला पुरीचा समुद्रकिनारा, कोणार्कचं सूर्यमंदिर, चिल्का सरोवर, पुरातत्त्व विभागाच्या काही साइट्स, ओडिशाची खाद्यसंस्कृती, ओडिशा आर्ट.. सगळंच अनुभवावं, यासाठी ओडिशाला जायचं नक्की केलं.
 
 
छ. संभाजीनगरहूनच दर्शनासाठी बुकिंग केलेलं असल्यानेे जगन्नाथ मंदिरात दर्शनाला गेलो, सोबत पंडितजी होतेच. इथे मुख्य गाभार्‍यात तीन लाकडी मूर्ती आहेत - सावळा कृष्ण, गौर बलभद्र आणि पीतवर्णी सुभद्रा. दोन भावांमध्ये उभी लाडकी बहीण हे त्रिकूटच इतकं गोड वाटलं की बस! जगविख्यात रथयात्रा ती इथलीच. जगन्नाथ पुरी हे देवाचं भोजनाचं स्थान असल्याने इथे नैवेद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर परिसरात मोठ्ठं अन्नगृह, नैवेद्य दाखवण्यासाठी भोगमंडप आहे. दिवसातून सहा वेळा देवाला वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो. ’छप्पन भोग’ ही आपल्याला माहीत असलेली कल्पना इथलीच.
 

odisha tourism 
 
सगळा नैवेद्य गाईच्या तुपात आणि एकावर एक सात हंड्या रचून चुलींवर बनवला जातो. असं म्हणतात की यातल्या सगळ्यात वरच्या हंडीतला पदार्थ सगळ्यात आधी शिजतो आणि सगळ्यात खालचा सर्वात शेवटी. चुलीवर ठेवलेली भांडी गरम होण्याचाही तोच क्रम. सर्व स्वयंपाक सोवळ्यात असल्याने आत इतर कुणालाही प्रवेश नाही. पण पंडितजींमुळे मी त्यातल्या त्यात जवळ जाऊन, भिंतीतल्या झरोक्यातून डोकावून मातीच्या मोठमोठ्या चुली आणि भांडं पाहू शकले. स्वयंपाकासाठी तिथल्याच गंगा कुंडाचं पाणी वापरलं जातं. भोगमंडपात मात्र कुणालाही प्रवेश नाही. दर्शन झाल्यावर पंडितजींनी एका खापरात ठेवलेल्या पत्रावळीवर महाप्रसाद आणून दिला. एक गोड आणि एक साधा भात, डाळी आणि भाज्या एकत्र शिजवून केलेला डालमा आणि इतर तीन प्रकारच्या भाज्या. आधी वेगवेगळी चव पाहिली आणि नंतर त्यांनी सांगितलं तसं सगळे पदार्थ एकत्र करून खाल्ले. खरं सांगते, इतका चविष्ट प्रकार मी तरी आयुष्यात खाल्लेला नाही! त्या सगळ्या पदार्थांच्या पाककृती मिळतीलही, पण त्या प्रसादाला असलेला विशिष्ट स्वाद, शुद्ध तुपाची चव, सर्व रसना जागृत करणारा सुगंध.. ते सगळं एकत्र मिळणं निव्वळ अशक्य. विशेषत: सर्व पदार्थ एकत्र करून जो घास घेतला.. डोळे आपोआप मिटले गेले, मनात ते अन्न मिळाल्याबद्दल कृतज्ञता दाटून आली. ’अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणत असावेत ते याच कारणासाठी! (नैवेद्य या विषयावरून आठवलं, रथयात्रेहून परत येताना पत्नीचा रुसवा काढायला भगवान तिच्यासाठी खास मिठाई म्हणजे रसगुल्ला घेऊन गेले आणि त्यांची दिलजमाई झाली, अशी गोड आख्यायिकादेखील आहे. रसगुल्ला हा मूळचा ओडिशाचा पदार्थ, हे आता कायदेशीररित्या सिद्ध झालंय.)
 
 
भारतीय स्थापत्यशास्त्र किती पुढे गेलं होतं, हे ओडिशाच्या प्रत्येक मंदिरात जाणवतं. मग ते उंच डोंगरांवर असलेलं तारा तारिणी माता मंदिर असो की भुवनेश्वर गावातली लिंगराज, मुक्तेश्वर इत्यादी मंदिरं असो की जगप्रसिद्ध कोणार्क मंदिर. अतिशय कमी संसाधनं, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असताना आपल्या पूर्वजांनी इतकं मोठं काम करून ठेवलेलं आहे की त्यापुढे नतमस्तक व्हावं!
 

odisha tourism 
 
पट्टचित्र ओडिशाची कलासमृद्धी
 
 
ओडिशा अनेक कलांचं माहेरघर समजलं जातं. त्यामुळे तिथे जायचं म्हटल्यावर तिथली कलासमृद्धी जवळून पाहायला मिळावी, ही मनापासून इच्छा होती. पुरीहून चिल्काला जाताना आम्ही ओडिशाच्या जगप्रसिद्ध पट्टचित्र कलेचं सेंटर असलेल्या रघुराजपूरला गेलो. आधुनिकतेचा गंधही न लागलेल्या या छोट्याशा गावी पोहोचलो आणि खरं सांगते, अक्षरश: कलेचा खजिना हाती लागल्यासारखं वाटलं! ओडिशात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी छोट्या गावातल्या छोट्याशा घरांवरही सुरेख चित्रं रंगवलेली दिसतात. दगडांतून, लाकडातून कोरीव मूर्ती तयार केलेल्या दिसतात. इथल्या हातमागाच्या साड्या प्रसिद्ध आहेतच, त्याबरोबरच ’पट्टचित्र’ ही ओडिशात बाराव्या शतकापासून चालत आलेली पारंपरिक हस्तकलाही प्रसिद्ध आहे. यात दोन प्रकार असतात - पामच्या पानांवर अत्यंत बारीक सुईने केलं जाणारं कोरीवकाम आणि विशिष्ट प्रक्रिया केलेल्या कपड्यावर अत्यंत बारीक ब्रशने केलं जाणारं रंगकाम. यात अतिसूक्ष्म डिझाइन्स हाताने इतक्या बारकाईने कोरलेली किंवा रंगवलेली आहेत की डोळ्यांवर विश्वास बसत नाही! अतिशय एकाग्रतेने मान खाली घालून बायका, पुरुष हे काम करत असतात. प्रचंड मेहनतीचं काम आहे हे! एकेक मोठं चित्र पूर्ण करायला दीड ते दोन वर्षं लागतात. या चित्रांत आपल्या पुराणातल्या गोष्टी कोरलेल्या/रंगवलेल्या आहेत. राम, कृष्ण, महाभारताच्या कथा, रासलीला, देवी-देवतांची चित्रं, विष्णू दशावतार, जगन्नाथाची रूपं अशा असंख्य कथा पट्टचित्रात मांडल्या जातात.
 
 
odisha tourism
 
आम्ही पट्टचित्र पहायला म्हणून गेलो ते नेमकं मागा नायक, प्रसन्न नायक यांच्या घरी. मागा नायकजी हे या कलेतील मास्टर समजले जातात. त्यांची चित्रं देश-परदेशात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या घराण्यात हे काम बाराव्या शतकापासून चालत आलेलं आहे आणि प्रत्येक पिढी यात काम करते आहे. मागा नायकजी यांची पट्टचित्रं नीता अंबानी यांच्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (NMACC) लागलेली आहेत. मुख्य म्हणजे त्यांचं नाव ’पद्मश्री’च्या यादीत गेलेलं आहे. प्रसन्न नायक त्यांचे चिरंजीव. त्यांनी त्यांचे अंबानी कुटुंबासमवेत काढलेले फोटो दाखवले. छचअउउमध्ये लावलेल्या पट्टचित्राचा फोटो दाखवला. त्यांच्या बहिणीलाही नुकतंच राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आहे. आम्ही पाहिलेल्या ज्या पेंटिंगवर काम सुरू होतं, ते इतकं मोठं होतं की दोन जणी त्यावर बसून बारीक रेषा रंगवत होत्या. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारांत केलेली अनेक चित्रं, त्यातल्या वैशिष्ट्यांसह समजावून सांगितली. प्रत्येक नवीन चित्र आधीपेक्षा सुंदर दिसत होतं. चित्रांच्या संकल्पना घेण्यासाठी त्यांना पौराणिक कथांबरोबरच आता मॉडर्न आर्टचाही अभ्यास करावा लागत आहे. हे सगळे रंग नैसर्गिक आहेत, झाडांचा डिंक, शिंपले, वेगवेगळ्या रंगाचे स्फटिक यांपासून ते स्वत: बनवतात. पेंटिंगसाठी लागणारे ब्रश, कापड आणि इतर साहित्यही ते स्वत: तयार करतात. त्यांच्या आधीच्या पिढीत तयार झालेलं, शंभराहून अधिक वर्षं जुनं पट्टचित्रं त्यांनी घरात फ्रेम करून लावलंय. पाम लीफवर कोरलेली उडिया भाषेतली एक पोथी त्यांनी दाखवली, जी दोनशे वर्षांपूर्वी त्यांच्या घराण्यात तयार झाली आहे.
 
 
अलीकडे या कलेचं महत्त्व पुन्हा एकदा लोकांच्या नजरेत येत आहे. परदेशात ही पेंटिंग्ज लाखाच्या घरात विकली जाताहेत, तिथे पेंटिंग्ज पाहिल्यानंतर कला संग्राहक, बॉलिवूड सेलिब्रिटीज यांना येऊन भेटताहेत, खरेदी करताहेत, आर्ट-डिझायनिंगचे विद्यार्थी अभ्यास सहलीला येताहेत. एकूण काय, तर मार्केटिंगमुळे साखळीतल्या शेवटच्या कडीपर्यंत, कारागिरांपर्यंत त्याचा फायदा पोहोचतोय. त्यांच्या घराची, त्या गावाची अवस्था प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर या कलेला प्रसिद्धी आणि बाजारपेठ मिळायची किती प्रचंड गरज आहे, हे प्रकर्षाने जाणवलं.
 

odisha tourism 
 
या जगप्रसिद्ध कलावंताची कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसताना, केवळ पट्टचित्र कसं बनवतात हे पाहायला आम्ही वाकडी वाट करून आलो, इतका वेळ थांबलो, सगळं जाणून घेतलं हे पाहून मागाजी खूश झाले. त्यातल्या त्यात आपल्या खिशाला परवडेल अशी कृष्णलीला आणि विष्णू दशावतार अशी दोन चित्रं घेऊन जड अंत:करणाने आम्ही परत निघालो. खरं म्हणजे त्यांच्याकडे संपूर्ण दिवस घालवता आला असता, त्यांनी आग्रह केला, तसं चित्र काढून पाहता आलं असतं तर बरं झालं असतं.. पण फिर कभी! जे पाहिलं, अनुभवलं त्यातच भरून पावलो.
 
 
चिल्का सरोवर पक्ष्यांचं नंदनवन रघुराजपूरला भेट देऊन आम्ही पोहोचलो ते भूगोलात उल्लेख असलेल्या चिल्का सरोवराला भेट देण्यासाठी. चिल्का हे खार्‍या पाण्याचं भारतातलं सर्वात मोठं सरोवर म्हटलं जातं, पण तिथलं सगळं पाणी खारं नाही. समुद्राजवळ सरोवराचं पाणी खारं आहे आणि दूरच्या प्रदेशात गोड. चिल्का सरोवर मोठं म्हणजे किती, तर त्यात दोन मुंबई आणि दहा छत्रपती संभाजीनगर बसतील इतकं मोठं! पाण्याचा हा अफाट पसारा तीन जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. त्यावर वेगवेगळी पर्यटन स्थळं आहेत. त्यातल्या दोन ठिकाणांना आम्ही भेट दिली. एक होतं सातपाडा गाव, जिथे डॉल्फिन सफारी होतात आणि दुसरं होतं मंगलजोडी पक्षी अभयारण्य. त्यापैकी सातपाडामधली डॉल्फिन सफर आम्हाला जरा कंटाळवाणीच झाली. पण आम्हाला खरी उत्सुकता होती पक्षिनिरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मंगलजोडी पक्षी अभयारण्याला भेट देण्याची!
 
 
मंगलजोडी पक्षी अभयारण्य हा दलदलीचा प्रदेश आहे. या भागात चिल्काचं पाणी गोड, उथळ आणि मातकट आहे. त्यात लांबवर गवत आणि पाणवनस्पती पसरलेल्या आहेत. त्यातले किडे आणि पाण्यातले छोटे मासे हे इथे येणार्‍या पक्ष्यांचं मुख्य खाद्य आहे. नोव्हेंबर ते मार्च या चार-पाच महिन्यांत इथे सैबेरिया, बाल्टिक समुद्र, कॅस्पिअन समुद्र अशा दूरच्या प्रदेशांतून लाखोंनी स्थलांतरित पक्षी येतात. स्थलांतरित पक्ष्यांच्या जवळपास 250-300 वेगवेगळ्या प्रजातींची येथे नोंद झाली आहे. या हंगामामध्ये खूप पक्षी अभ्यासक, पक्षिप्रेमी इथे तळ ठोकून असतात. मंगलजोडी पक्षी अभयारण्याला पक्षिसंवर्धनाचं आंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणून मान्यता मिळालेली आहे. हळूहळू तिथलं पक्षिपर्यटन देशी-परदेशी पर्यटकांना आकर्षित करत आहे.
 


odisha tourism 
 
आम्ही मंगलजोडीला पोहोचलो, तेव्हा जवळपास साडेचार वाजले होते. त्यामुळे आमच्या हातात पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी थोडाच वेळ होता. छोटी लाकडी नाव, एक नावाडी, एक गाइड आणि एका दुर्बिणीसह आम्ही चौघं अभयारण्य पाहायला निघालो. पाण्याचा अरुंद प्रवाह, आजूबाजूला उंच, दाट गवत आणि त्या गवतातून येणार्‍या पक्ष्यांच्या प्रचंड कलकलाटाबरोबर आमची नाव सुरू झाली. अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आम्ही गेलेलो नाही, पण ते थोडंफार असंच असेल असं वाटलं. काही अंतरावर ती गवताची भिंत संपली आणि चिल्का सरोवराचा अफाट पसारा दिसायला लागला. नजर जाईल तिथपर्यंत पाणगवत, त्यात अधूनमधून दिसणार्‍या छोट्याशा पाणवाटा आणि गवतावर चालणारे, पाण्यात सूर मारून मासे पकडणारे, थवा करून उडणारे, दूरवर मोठ्या वृक्षांभोवती घिरट्या मारणारे, नुसतेच इकडे तिकडे पळणारे.. पक्षीच पक्षी!
 
 
इतके पक्षी एका जागी मी पहिल्यांदाच पाहिले. एखादा नवा पक्षी दिसला की आमचा गाइड पुस्तकातून त्याचं नाव आणि सवयी सांगत होता, पण ते लक्षात ठेवणं अशक्य होतं. नावं, माहिती ऐकण्यात आम्हाला फारसा रस नाही, हे हळूहळू त्याच्या लक्षात आलं आणि त्याने ती सांगणं सोडून दिलं. नंतर तो फक्त बोट दाखवायचा. आधी आम्ही आपसात बोलत होतो, पण नंतर त्याचीही गरज वाटेनाशी झाली. लयीत चालणार्‍या वल्ह्याच्या आणि पक्ष्यांच्या आवाजांशिवाय अख्ख्या आसमंतात कोणताच आवाज नव्हता. आपल्या एखाद्या शब्दाचाही गोंगाट व्हावा इतकी शांतता! काय भन्नाट अनुभव होता तो! मध्येच एक छोटासा मासा बोटीच्या सोबतीने पाण्यातून उड्या मारत पोहत होता. पाणकाडी बगळा (पर्पल हेरॉन) आपली लांब मान मागे-पुढे करत चालत होते. एक कोंबडीच्या आकाराचा काळसर मोरपंखी रंगाचा पक्षी सारखा इकडून तिकडे उडत होता. बगळे तर असंख्य संख्येने होते. काही छोटी पिल्लं हेलपाटत उडायला शिकत होती. काही थवे आकाशात वेगवेगळ्या रचना साकारत होते. संध्याकाळची वेळ असल्याने बहुधा त्यांची घरट्यात परत जायची लगबग सुरू होती. त्यांचं एक वेगळंच जग होतं आणि आम्ही त्याचे मूक साक्षीदार होतो!
 
 
ओडिशा भारताच्या पूर्व किनार्‍यावर असल्याने इथे खूप लवकर सूर्योदय, साडेचार-पाचला संध्याकाळ आणि सहा वाजता मिट्ट काळोख होतो. थोड्याच वेळात अंधार दाटून आला होता. जाताना दिसलेल्या पाणवाटांवर आता गूढतेचा साज चढला होता. दूरवर कुठल्या तरी मंदिरात स्पीकरवर उडिया भाषेतलं भजन लागलं. त्या वातावरणात तो आवाज फार फार विलक्षण अनुभूती देऊन गेला. ती अनाम शांतता मनात भरून घेत आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. आमच्या मुक्कामात आम्ही गोपालपूर या समुद्रकिनारी वसलेल्या अतिशय सुंदर गावात राहिलो. काजूच्या बागा, स्वच्छ किनारे आणि बंगाल उपसागराच्या हिरवट, निळसर पाण्यात होणार्‍या सूर्योदयाकरिता हे गाव प्रसिद्ध आहे. आम्ही उतरलो होतो त्या रिसॉर्टमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, पी.व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, इंग्लंडची राणी, सत्यजित रे अशी अनेक मोठी मंडळी राहून गेलेली होती. तिथली प्रत्येक वस्तू अभिरुचिपूर्ण आणि कलात्मक होती. गोपालपूरच्या सोनेरी वाळूत आम्हाला निवांत क्षण घालवता आले.
 
 
odisha tourism
 
भुवनेश्वरला पोहोचल्यावर आम्ही दोन संग्रहालयांना भेट दिली. एक ओडिशा स्टेट म्युझियम आणि दुसरं ओडिशा ट्रायबल म्युझियम. ओडिशा राज्यातल्या खूप मोठ्या भागांत वेगवेगळ्या जनजातींचं वास्तव्य आहे. भुवनेश्वरला आम्ही त्यांचं संग्रहालय पाहिलं. भुवनेश्वर शहरात असलेल्या उदयगिरी, खंडगिरी गुहा, सहाव्या-अकराव्या शतकातील मंदिरं, त्याबरोबरच प्रसिद्ध असं नंदनकानन अभयारण्य आणि प्राणिसंग्रहालयाला भेट देता आली.
 
 
ओडिशाचे जनजीवन
 
 
आमच्या संपूर्ण सहलीमध्ये आम्हाला तिथल्या लोकांच्या जीवनाची झलक पाहता आली. छोट्या छोट्या गावांतून जाताना घराघरांवर काढलेली सुंदर चित्रं दिसली. त्यातली जास्तीत जास्त चित्रं जगन्नाथाचीच होती. कुणाकडे लग्न असलं की नवरा-नवरीची नावं घरावर लिहायची, की झालं गावाला आमंत्रण! इथले लोक अतिशय धार्मिक, पापभिरू, सरळ साधे आहेत. प्रत्येक छोट्या गावात एक मंदिर, छोटंसं तळं आहे. इथली लोकसंख्या कमी, गुन्हे प्रमाण कमी आणि गुन्हेगार लवकर पकडले जातात असं आमचा चालक म्हणाला. ओडिशात हाताच्याबोटांवर मोजण्याइतकी मोठी शहरं आणि बाकी सर्व ग्रामीण भाग आहे. आम्ही फिरलो तो पाणथळ प्रदेश असल्याने मासे, भातशेती हे इथल्या लोकांचं मुख्य अन्न आणि उत्पन्नाचं साधन आहे. रस्त्याच्या दुतर्फा दूरदूरपर्यंत पोपटी रंगाची भातशेती पसरलेली दिसते. ओडिशाच्या काही भागात दगडी कोळशाच्या खाणी आहेत. तिथे फारसे उद्योगधंदे नसल्याने छोट्या गावांतून खाणकामाला जाणार्‍या मजुरांची संख्या अधिक आहे. भुवनेश्वर ही राजधानी असल्यामुळे, कटक जुनं शहर उच्च न्यायालय असल्यामुळे, पुरीसारखं शहर धार्मिक पर्यटनामुळे वाढत आहे. पण ग्रामीण भागांपर्यंत हा विकास अद्याप पोहोचायचा आहे.
 
 
इथल्या बर्‍याच जमाती अजूनही जंगलात राहतात. या जनजाती बघायला, त्यांचं राहणीमान, त्यांचे नाच, जेवण जवळून अनुभवायला फार मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येतात. असं असूनही त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी फार मोठा पल्ला गाठावा लागणार आहे! अर्थात, कुठल्याही राज्याचं समाजकारण ही इतक्या कमी दिवसांत समजून येणारी गोष्ट नाही. आपण पर्यटक म्हणून फिरताना एखाद्या प्रदेशाची, एखाद्या समूहाची, तिथल्या जीवनपद्धतीची फक्त झलक बघत असतो.
आपण केलेला प्रत्येक डोळस प्रवास हा आपलं भावविश्व विस्तारत, समृद्ध करत असतोच, कधीकधी अनपेक्षित ठिकाणं आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतील असे अनुभव देऊन जातात. आजवर आम्हा चौघांचे देश-विदेशात अनेक प्रवास झाले असले, तरीही आई-बाबांबरोबर छोट्याशा नावेत बसून चिल्काच्या पाणवाटांवर प्रगाढ शांततेत केलेला तो प्रवास मुलांच्या आठवणीत कायमचा कोरला जाईल, याची खात्री आहे!
 
 
ओडिशाच्या प्रवासात जे पाहिलं, अनुभवलं, त्यातून ओडिशा टूरिझमच्या जाहिरातीत म्हणतात तसं ’ओडिशा, इंडियाज बेस्ट केप्ट सिक्रेट - अद्यापही अल्पस्पर्शित राहिलेला समृद्ध खजिना’ आहे हे मात्र खरोखर पटलं!
Powered By Sangraha 9.0