“मा. मोरोपंत पिंगळे आज नाहीत, याची खंत आहे.” - भय्याजी जोशी

विवेक मराठी    01-Dec-2023
Total Views |
 
vivek
 
मुंबई - “मोरोपंत केवळ तार्किक मांडणी न करता कृतिशील व्यवहार करणारे होते. सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे आचरण, व्यवहार, दृष्टी, कशी असली पाहिजे याचे आदर्श उदाहरण म्हणजे मोरोपंत पिंगळे. मोरोपंत एक उत्तम संक्रमक होते - आपल्या मनातील एखादा विचार दुसर्‍याच्या मनात उतरवण्याचे, रुजवण्याचे, आणि तो विचार कृतीमध्ये परावर्तित करण्याचे बळ निर्माण करण्याचे सामर्थ्य मोरोपंतांमध्ये होते. रामजन्मभूमी आंदोलनाची संकल्पना आज सत्यात उतरत असताना ते आपल्यात नाहीत याचे दु:ख आहे आणि त्यांच्याविषयी सार्थ अभिमानदेखील आहे” असे सांगून मोरोपंतांच्या विचारांची रुजवात आणि कृतिरूपात प्रकटीकरण होत असल्याचे समाधानही भय्याजी जोशी यांनी ‘योजक संघमहर्षी’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
 
योजक संघमहर्षी : मोतोपंत पिंगळे पुस्तक खरेदी करण्यासाठी रामजन्म भूमी मुक्ती आंदोलनाचे सूत्रधार, हिंदू भाव जागरणाचे शिल्पकार,अनेक सामाजिक संस्थाचे संस्थापक मा. मोरोपंत पिंगळे यांचा जीवन कार्याचा वेध घेणारा चरित्र ग्रंथ…
योजक संघमहर्षी : मोतोपंत पिंगळे
सवलत मूल्य – ३५०/- रु. 

https://www.vivekprakashan.in/books/moropant-pingley-biography/

 
 
रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे सूत्रधार, हिंदुभावजागृतीचे शिल्पकार, संघस्वयंसेवकांचे प्रेरणास्थान, अनेक सामाजिक संस्थांचे संस्थापक मा. मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारे, रवींद्र गोळे लिखित, सा. विवेक प्रकाशित ‘योजक संघमहर्षी’ या ग्रंथाचे प्रकाशन सोमवार, दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुंबईतील विलेपार्ले (पू.) येथील पाटीदार मंडळ सभागृहात रा.स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या शुभहस्ते झाले. या वेळी रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक बिमल केडिया, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया, पुस्तकाचे लेखक रवींद्र गोळे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, विचारवंत रतन शारदा, रा.स्व. संघ अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी, पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट, वि.हिं.प.चे मोहन सालेकर, संघपरिवारातील अनेक बंधुभगिनी, तसेच सा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर, कार्यकारी प्रमुख राहुल पाठारे व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
भय्याजी पुढे म्हणाले, “तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देऊ दिशा दाहि दाही॥’ या संघगीतातील ओळींना मोरोपंतांनी पूर्ण न्याय दिला आहे. डॉ. हेडगेवारांनी जे स्वप्न पाहिले, ते समजून घेऊन ते साकार करण्यासाठी आपले प्राण पणाला लावले, ते मोरोपंत. मोरोपंतांची शैली विनोदी होती. संघकाम गंभीर असले, तरी हे काम गंभीर होऊन करण्याचे कारण नाही. महत्त्वाचे हे आहे की, खेळीमेळीच्या वातावरणात काम गंभीरपणे करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या याच शैलीमुळे वैचारिक मांडणीही सहज समजून येत असे. लहान-लहान गोष्टींतून मर्म सांगण्याची कला त्यांना अवगत होती” अशी मोरोपंतांची कार्यशैली भय्याजींनी विशद केली.
 

vivek 
 
“मोरोपंतांची खासियत अशी की, छोट्या छोट्या उपक्रमांमध्ये समाजाला जोडून घेणे आणि त्याआधारे तो विषय व्यापक करून वातावरणनिर्मिती करणे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकात्मता रथयात्रा होय. मोरोपंतांच्या अशा अनेक उपक्रमांतून हिंदू स्वभाव बदलला, हिंदू समाजाचा आत्मविश्वास दुणावला, हिंदू समाजाला योग्य दिशेने नेण्याकरिता त्यांनी असे अनेक मार्ग प्रशस्त केले. मोरोपंतांनी आखून दिलेल्या प्रशस्त मार्गावर वाटचाल करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे आणि तो मार्ग अधिक प्रशस्त करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, हीच मोरोपंतांना आदरांजली ठरेल.
 
 
समाजामध्ये प्रश्न विचारणारे लोक खूप आहेत. या प्रश्नांवर उत्तरे शोधणारे लोक संघाला अभिप्रेत आहेत. संघात अशी उत्तरे शोधणार्‍यांच्या नावात, पहिला क्रमांक मोरोपंतांचा लागतो. सरस्वतीचा उगम - सिंधू संस्कृती ही याच भूमीतील संस्कृती आहे, गोरक्षा-गोसेवा, हिंदुभावजागृती, रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे मोरोपंतांनी शोधली आहेत” असे भय्याजी जोशी यांनी प्रतिपादन केले.
 
 
“मोरोपंतांकडे कार्यकर्ता जोडण्याची विलक्षण कला होती. याच त्यांच्या विशेषत्वामुळे त्यांचे संघटनकौशल्य कमालीचे अतूट होते. मोरोपंतांनी अशा अनेक कार्यकर्त्यांना संघकामाशी समर्पित वृत्तीने जोडण्याचे अनन्यसाधारण कार्य केले आहे. मोरोपंतांचे बौद्धिक ऐकणे ही एक वैचारिक मेजावनी असे. एखादा गंभीर विषयही त्यांच्या विनोदी शैलीमुळे कायम स्मरणात राही आणि कार्यकर्त्यांच्या मनावर त्याचे खोलवरचे संस्कार होत असत. मोरोपंतांनी केलेला कोणताही विनोद सहज नसे, त्यामागे काहीतरी संदर्भमूल्य असे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांना सुचवू इच्छितो की, मोरोपंतांच्या खुमासदार शैलीतील अनेक किश्श्यांचा संग्रह करून सा. विवेकने एक पुस्तक प्रकाशित करावे” असे रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक बिमल केडिया यांनी सांगितले.
“सा. विवेकने मोरोपंतांचे चरित्र लिहावे, असे मा. भय्याजींनी सुचवले. सा. विवेकने ते मान्य केले आणि त्या कामाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. आज जरी मोरोपंतांचे चरित्र लेखक म्हणून माझ्या नावावर असले, तरी त्यांचे चरित्र लिहिणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. कारण संघकामात असलो, तरी मोरोपंतांचे नाव ऐकून होतो, पण त्यांना मी कधी पाहिलेले, ऐकलेले आणि बघितलेले नव्हते. मोरोपंतांच्या अभिव्यक्तीतून संघ कसा प्रकट झाला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. मोरोपंतांनी भारताच्या पराभवाचा इतिहास मिटवून गौरवशाली इतिहास निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. मोरोपंतांनी लोकाग्रहाचे आणि मुख्य धारेतील अनेक विषय केले. मोरोपंतांची कल्पकता, योजकता, संघ म्हणून केलेली अभिव्यक्ती हे सर्व मला जसे उमगत गेले, समजत गेले, ते माझ्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे” अशी पुस्तकाचे लेखक रवींद्र गोळे यांनी प्रामाणिक कबूली दिली. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी अमृतमहोत्सवी सा. विवेकच्या वाटचालीची मांडणी केली आणि सा. विवेकच्या वाचकांना कृतज्ञतापूर्वक सा. विवेकच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय दिले. निवेदिता मोहिते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर जाहिरात विभाग सहप्रमुख राकेश सोनार यांनी आभारप्रदर्शन केले. मंजिरी फाटक यांनी संघगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली, तर त्यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.