@रवि वाळेकर
इजिप्तमधील कार्नाक मंदिर त्याच्या भव्यतेने भारून टाकते. भव्यता हा इजिप्तमधील मंदिरांचा स्थायिभाव आहे. कार्नाक मंदिरही याला अपवाद नाही. इजिप्तमधील छोट्यात छोट्या पुरातन मंदिरांची उंची कमीत कमी सात मजली तरी असतेच! अवाढव्य ’हायपोस्टाइल हॉल’ हे कार्नाक मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. याला ’हॉल’ कसे म्हणावे इतका तो अजस्र आहे. भारतातील कोणार्क मंदिर सूक्ष्म तपशिलांनी आकर्षित करते. दगडामध्ये एवढे सूक्ष्म तपशील कोरणे त्या काळात कसे साध्य केले असेल, याचे आश्चर्य वाटते. एका दृष्टीने कोणार्क मंदिर हे विज्ञान आणि सौंदर्य यांचे बेमालूम मिश्रण आहे. दगडात कोरलेली रथचक्रे हे याचे नितांतसुंदर उदाहरण. अचूक वेळ दाखवणारी रथचक्रे हे कोणार्क मंदिराचे प्रमुख आकर्षण. दोन देशांमधील दोन प्राचीन मंदिरांची उलगडून दाखवलेली वैशिष्ट्ये.

कार्नाक’ हा शब्द फार पूर्वी मी पहिल्यांदा ऐकला, तेव्हा मला तो कर्नाटकी संगीताशी संबंधित वाटला होता. कर्नाटकी संगीतात प्रावीण्य मिळवणार्यास ‘कार्नाक’ म्हणत असावेत, असे उगीचच वाटले होते. कालांतराने इजिप्तला फिरायला जायचे ठरवले आणि इजिप्तचा अभ्यास सुरू केला, तेव्हा हा ‘कार्नाक‘ शब्द पहिल्यांदाच वाचनात आला. या ‘कार्नाक’ शब्दाचा भारतातील कर्नाटकाचा काही संबंध नसून ‘कार्नाक’ हे इजिप्तमधील एका पुरातन मंदिराचे नाव आहे, हे समजल्यावर मला फारच आश्चर्य वाटले होते! हे एक मंदिर आहे असे समजले, तेव्हा शब्दसाधर्म्य असलेल्या भारतातील ‘कोणार्क’ मंदिराची आठवण येणे स्वाभाविकच होते. कोणार्क आणि कार्नाक या दोन मंदिरांच्या नावातील साधर्म्यापेक्षाही आश्चर्य वाटत होते ते इजिप्त या इस्लाम धर्मीय देशात एक पुरातन मंदिर असल्याबद्दल आणि त्याहूनही ते मंदिर एका इस्लामी देशात आजवर टिकून राहिल्याबद्दल! इजिप्त प्रामुख्याने इस्लामी देश. इथली 90 ते 95 टक्के लोकसंख्या धर्माने इस्लामी आहे, तर उरलेले कॉप्टिक ख्रिश्चन. इजिप्तमध्ये हिंदू धर्म नाहीच. इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांचा ‘मंदिर’ या संकल्पनेशी आणि स्थापत्याशी काहीच संबंध नाही. आपल्या देवतेला न मानणार्या धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांचा विध्वंस करणे, इकडेच जास्त कल. अशा परिस्थितीत कार्नाक हे पुरातन मंदिर बांधले कोणी आणि ते ‘पुरातन’ असा उल्लेख होईपर्यंत टिकले कसे, याची उत्सुकता वाटणे साहजिकच होते.
इजिप्त हा अरबस्तानाबाहेर इस्लाम धर्मीय बनलेला जगातील पहिला देश! इतर देश इजिप्तच्या फार नंतर इस्लाम धर्मीय होत गेले. आठव्या-नवव्या शतकात इजिप्तमध्ये इस्लाम धर्माचा प्रवेश झाला. इजिप्तच्या दक्षिणेस असलेल्या टोळ्यांनी तेथे राहत असलेल्या न्युबिया (आजचा सुदान आणि प्राचीन ‘कुश’ हा देश) या देशांतही बळजबरीने धर्मांतरे सुरू झाली. या सर्व नागरिकांचा मूळ धर्म होता - ख्रिश्चन.
इजिप्तचा ज्ञात इतिहास जवळपास पाच हजार वर्षे पुरातन आणि ख्रिश्चन धर्माची स्थापना तर पहिल्या शतकातील! मग प्रश्न पडतो की ख्रिश्चन होण्याआधी इजिप्तचा धर्म कोणता होता?
ख्रिश्चन धर्माचा इजिप्तमध्ये प्रवेश होण्यापूर्वी इजिप्शियन पाळत असलेला धर्म मूर्तिपूजक होता, बहुदेवत्व मानणारा होता, निसर्गाची - प्राण्यांची पूजा करणारा होता, प्राण्यांचे शिर आणि मानवाचे शरीर अशा अनेक देवतांची प्रार्थना करणारा होता, देवतांची विधिवत पूजा करणारा होता, देवतांचे वार्षिक उत्सव/सण साजरा करणारा होता, पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारा होता, सूर्याला देवस्वरूप आणि सर्वोच्च स्थान देऊन तोच सृष्टीचा पालनकर्ता आहे अशी श्रद्धा ठेवणारा होता, स्वर्ग-नरकाच्या संकल्पनांवर विश्वास ठेवणारा होता, शेकडो-हजारो देवांना पूजणारा होता, विविध देवतांच्या मूर्ती घडवून घेणारा होता आणि विविध देवतांच्या पूजा-अर्चनेसाठी
वेगवेगळी मंदिरे बांधणारा धर्म होता.
’कार्नाक’ मंदिर प्राचीन इजिप्तमध्ये याच श्रद्धेतून उभारण्यात आले!
दुर्दैवाने या धर्माचे नावही कोणाला माहीत नाही आणि त्याहून दुर्दैव म्हणजे इजिप्तमध्ये आज या महान धर्माचा मागमूसही उरलेला नाही.

आज वेगवेगळ्या साधनांद्वारे प्राचीन इजिप्तचा शून्य काळाच्या आधीचा 3000 वर्षांपासूनचा इतिहास ज्ञात झाला आहे, मात्र यात कुठेही या धर्माचे नाव नोंदविलेले आढळत नाही. पूजापद्धती, देवांच्या कथा, देवांची नावे, मंत्रोच्चार, शेकडो फेरोंची (सम्राटांची) नावे, त्यांचे पराक्रम, देवांची कार्यक्षेत्रे व इतर बरीच माहिती मंदिरांच्या भिंतींवर तसेच गुहांमध्ये चित्रित वा कोरून ठेवलेली आढळतात. कुठेही आढळत नाही - ते या धर्माचे नाव! शून्य काळाअगोदरचा तीन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या या अनामिक धर्माचा पहिला लिखित उल्लेख तिसर्या शतकात आढळतो. या महान धर्माला नाव ज्या काळात ’दिले’ गेले, त्या काळात इजिप्तमधून त्या धर्माचे उच्चाटन करण्याची मोहीम जोरात होती. इजिप्तच्या भूमीवर ख्रिश्चन धर्म वाढावा, यासाठी जोरदार प्रयत्न होत होते. तिसर्या शतकात ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी ग्रीक भाषेत या अनामिक धर्माचा उल्लेख केला तो ‘पेगन’ (झरसरप) या शब्दाने. खरेतर हे या धर्माचे नाव नव्हते आणि नाही. ‘पेगन’ हा उल्लेख तुच्छतापूर्ण होता, कारण पेगन या जुन्या ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थ होता - दुय्यम दर्जाचा. (कालांतराने याच शब्दाचा इंग्लिश भाषेतील वापर ’कोणताही मोठा धर्म न पाळणारा’ अशा अर्थापासून आजकाल ’मूर्तिपूजक’ अशा अर्थाने होतो). नुकताच जन्माला आलेला ’नवा धर्म’ श्रेष्ठ हे जनतेच्या मनावर ठसविण्यासाठी मिशनर्यांनी हा एक सोपा उपाय निवडला होता.
हजारो वर्षांपासून इजिप्तमध्ये पाळला जाणारा, अजस्र पिरॅमिड्स उभारणारा, खगोलशास्त्रात प्रवीण असणारा, शेकडो अजरामर मंदिरे बांधणारा धर्म, प्राण्यांनाही देवत्व बहाल करणारा, निसर्गाची पूजा करणारा धर्म ’दुय्यम दर्जाचा’ आणि काल-परवा जन्मास आलेला ख्रिश्चन धर्म ’श्रेष्ठ दर्जाचा’, असा हा अजब तर्क होता!
मध्य इजिप्तमधील थिब्ज या राजधानीच्या स्थानी ’कार्नाक’ मंदिर बांधले, तेव्हा मात्र परिस्थिती अत्यंत भिन्न होती. तो अनामिक धर्म संपूर्ण इजिप्तमध्ये लोकप्रिय होता. आपले अस्तित्व आपल्या शेकडो देवांमुळेच आहे, यावर सर्वांची गाढ श्रद्धा होती. सूर्याला त्यांच्या तत्कालीन भाषेत ’रा’ हा शब्द होता. ’रा’मुळेच आपल्याला प्रकाश मिळतो, रा’च्या कृपेनेच नाइल नदीला पाणी येते, त्यामुळेच शेते बहरतात यावर प्रचंड विश्वास होता. वाईट कृत्ये करणार्यास म्हणजे पापी व्यक्तीस ’होरूस’ देव नरकात ओढून नेतो, हे सर्वमान्य होते. आपल्या या श्रद्धा, उपासना पद्धती भविष्यात जाणीवपूर्वक हास्यास्पद ठरविल्या जातील, आपल्या देवतांच्या मूर्ती पायदळी तुडविल्या जातील, आपल्या पूजनीय देवतांची आपण बांधलेली भव्य मंदिरे भग्न केली जातील, असे त्या काळात वाटलेही नसेल. पाच-सहाशे वर्षांत झालेल्या दोन धर्मबदलांनी इजिप्तची हजारो वर्षांपासून वरच्या इजिप्तची राजधानी असलेल्या थिब्ज (थेबेस असाही उच्चार होऊ शकतो) या गावाचे नाव बदलून अरबांनी ‘लक्सोर’ असे केले आणि ते आजही वापरात आहे.
कार्नाक मंदिराचे बांधकाम सुरू झाले ते शून्य काळापूर्वी 1971 ते 1926 या कालखंडात. पुरावे सांगतात त्याप्रमाणे सेनुस्रेत (पहिला) नामक फेरोच्या कालखंडात या मंदिराचे बांधकाम सुरू झाले. सेनुस्रेतने या भूमीवर मंदिर बांधले ते तीन देवांचे - आमून, त्याची पत्नी मुट आणि मुलगा खोन्शू यांचे. मुख्यत: आमून नामक देवांचे. या मंदिराला ’इपेत इसूत’ असे म्हणत. ’इपेत इसूत’ म्हणजे ’पवित्रातील पवित्र जमीन’! ज्या जागेवर मंदिर बांधण्यात आले, ती भूमी अगोदरच पवित्र होती आणि आमून देवाच्या तिथल्या उपस्थितीने ती अधिकच पवित्र झाली, अशा अर्थाने. ही भूमी पवित्र आहे, या भावनेवर इतका प्रचंड पगडा होता की सेनुस्रेतनंतरच्या - काही अपवाद वगळता - प्रत्येक फेरोने या जागेवर मंदिर बांधलेच! यामुळे ’इपेत इसूत’ फक्त एक मंदिर न राहता ’मंदिर समूह’ बनले! आजचे ’कार्नाक’ हे जवळपास 200 एकरात फैलावले आहे ते त्यामुळेच. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कंबोडियातील 500 एकरात बांधलेल्या महाप्रचंड ’अंग्कोर वाट’ या अगोदर विष्णुमंदिर म्हणून बांधलेल्या आणि कालांतराने बौद्धमंदिर झालेल्या मंदिराखालोखाल ’कार्नाक’ हे जगातील दुसर्या क्रमांकाचे प्रार्थनास्थळ आहे!
या परिसरातील शेवटचे स्थापत्य उभारण्यात आले ते चौथ्या शतकात, शून्य काळानंतर 330 साली! दुसर्या शब्दांत - जवळपास दोन हजार तीनशे वर्षे या मंदिर परिसरात स्थापत्ये बांधली जातच होती. जगात कुठल्याही प्रार्थनास्थळाचे बांधकाम इतकी वर्षे चालू राहिले नाही! सेनुस्रेतपासून सुरू झालेली बांधकामांची ही मालिका मूळ ’फेरोशाही’ संपली, अलेक्झांडरने इजिप्त काबीज केले, त्याचा अकाली मृत्यू झाला, तरी त्याच्या मृत्यूनंतरही चालूच राहिली. नेक्तानेबो नामक (ग्रीक) तोलेमी वंशाच्या राजाच्या कालखंडापर्यंत म्हणजे चौथ्या शतकापर्यंत या परिसरात मंदिरे बांधणे चालू होते!
ग्रीस देशातून आलेला अलेक्झांडर ग्रीक सम्राट हा इजिप्तच्या प्रजेसाठी खरे तर ’परकीय आक्रमक’ होता, परंतु अलेक्झांडर आणि त्यानंतर आलेल्या ग्रीक राजांचे एक वैशिष्ट्य होते की त्यांनी जरी ’फेरोशाही’ संपवली, तरी इथल्या स्थानिक धर्माला हात लावला नाही, उलट ते सगळे इजिप्तमधील या अनामिक धर्मात विरघळून गेले. त्यांनी इथल्या मूळ देवतांची आणि आपल्या देवतांची सांगड घातली. इजिप्तभर त्यांनी इथल्या देवांची मंदिरे बांधली! पडझड होत असलेल्या काही पूर्ण मंदिरांची डागडुजी केली, यासाठी सढळ निधी पुरवला.
भारतावर आक्रमण केलेल्या परकीय आक्रमकांनी याच्या बरोबर उलट केले!
कार्नाक मंदिर जरी मुळात ’आमून’ देवासाठी बांधले, तरी त्यात इतर देवांची भर पडतच गेली. याचे कारण होते, वेगवेगळ्या फेरोंच्या वेगवेगळ्या इष्टदेवता! यातच आणखी एक रोचक कारण म्हणजे फेरोंच्या काही पिढ्या बदलल्या की देवतांची कार्यक्षेत्रेही बदलली जात. चमत्कारीक वाटते, पण सत्य आहे! पृथ्वीची उत्पत्ती ज्याने केली असा समज होता, तो पिताह (झींरह) देवता हजार एक वर्षांनंतर पाताळाचा देव समजला जाऊ लागला! असेच ’आमून’ देवाबद्दल घडले. आमून या देवाचे वर्णन शब्दश: ’लपलेला देव’ म्हणजेच अदृश्य देव! असा देव ज्याचे अस्तित्व जाणवते, पण तो दिसत नाही. थोडक्यात हा त्या कालखंडात वायुदेव असावा (काही वेळा ’शू’ हा वायुदेव होता, असेही उल्लेख आहेत). हा आमून देव काही कालावधीनंतर सर्वशक्तिमान सूर्यदेव ’रा’ यांच्यामध्ये विलीन होतो, आणि नवाच देव तयार होतो - ’आमुन-रा’!
सेनुस्रेतने प्रतिष्ठापना केलेल्या ’आमून’ देवाच्या मूर्तीची त्यांच्यानंतरच्या पिढ्यांनी ’आमुन-रा’ उर्फ ’रा’ उर्फ सूर्य’ म्हणून उपासना सुरू केली. कार्नाक मंदिर समूहात असलेल्या इतर देवतांपेक्षा ’रा’ उर्फ सूर्यदेवाचे या मंदिरातील श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी मग इथे सूर्याचे प्रतीकचिन्ह म्हणून ’ओबेलिस्क’ची उभारणी येणारे फेरो करू लागले!
ओबेलिस्क म्हणजे एकसंध दगडाचे - चार बाजू असलेले - प्रचंड उंचीचे स्तंभ. वरवर निमुळत्या होत जाणार्या या स्तंभाच्या शिखरांवर पिरॅमिडसदृश आकार असे. हा पिरॅमिड सोन्याच्या पत्र्याने मढवलेला जाई. उंचच उंच आकारामुळे सकाळी सूर्याची किरणे या सोन्याच्या पत्र्यावर पडत आणि ती पडली की तो पिरॅमिड झळाळून उठे. पृथ्वीवर सुर्यदेवाच्या आगमनाची नांदी असे ती!
एकेकाळी कार्नाक मंदिर परिसरात एकसंध ग्रॅनाइटचे असे 12 ओबेलिस्क होते. आता फक्त दोनच उरलेत. हॅटशूपसूत नामक एका महिला फेरोने आजपासून साडे तीन हजार वर्षांपूर्वी उभारलेला एक ओबेलिस्क आजही कार्नाक परिसरात दिमाखात उभा आहे. त्याची उंची आहे जवळपास 30 मीटर आणि वजन आहे तब्बल 320 टन!
ओडिशातील कोणार्क मंदिरासमोरही एकेकाळी असाच एक स्तंभ होता. उंचीने कमी, पण कोरीवकामाच्या दृष्टीने श्रेष्ठ!
हा अरुण स्तंभ अठराव्या शतकाच्या अखेरीस कोणार्कहून पुरीला हलवण्यात आला आणि तेव्हापासून तो पुरीच्या जगन्नाथाच्या मंदिरासमोर उभा करण्यात आलेला आहे. अठरा बाजू असलेला आणि अखंड क्लोराइट दगडात कोरण्यात आलेल्या हा स्तंभ जवळपास 10 मीटर उंच आहे. शिखरावर खाली बसून सूर्याला नमस्कार करणार्या अरुण या सूर्याच्या सारथ्याची सुरेख मूर्ती आहे. हा एक स्तंभच तत्कालीन भारतीय कलाकारांच्या कौशल्याची साक्ष देण्यास पुरेसा आहे. एकेकाळी कोणार्क मंदिराच्या बाहेर हा स्तंभ मंदिराच्या आत काय किती अफाट कोरीवकाम केले आहे, याची सूचनाच देत असेल.
इजिप्तमधील कार्नाक मंदिर त्याच्या भव्यतेने भारून टाकते, तर भारतातील कोणार्क मंदिर सूक्ष्म तपशिलांनी! दगडामध्ये एवढे सूक्ष्म तपशील कोरणे त्या काळात कसे साध्य केले असतील, याचे आश्चर्य वाटते. एका दृष्टीने कोणार्क मंदिर हे विज्ञान आणि सौंदर्य यांचे बेमालूम मिश्रण आहे. दगडात कोरलेली रथचक्रे हे याचे नितांतसुंदर उदाहरण. आजपासून 773 वर्षांपूर्वी घडवलेली ही रथचक्रे त्यांच्यावर पडणार्या सावलीच्या साहाय्याने आजही अचूक वेळ सांगतात!

भव्यता हा इजिप्तमधील मंदिरांचा स्थायिभाव आहे. कार्नाक मंदिरही याला अपवाद नाही. इजिप्तमधील छोट्यात छोट्या पुरातन मंदिरांची उंची कमीत कमी सात मजली तर असतेच! तिथल्या मंदिरांची रचना आपल्या भारतीय मंदिरांच्या रचनेपेक्षा फार वेगळी असते. तिथे मंदिरांना कळस नसतो. आमुन-रा, मुट आणि खोन्शूच्या मंदिरांच्या वरती चक्क आडवे छत आहे. मंदिरांची उंची ठरते ती ’पायलॉन’च्या उंचीवर. ’पायलॉन’ म्हणजे मंदिर परिसरात प्रवेश करण्याच्या जागेवर दोन्ही बाजूंना उभारलेल्या अजस्र भिंती! मंदिरांना वेगळी प्रवेशद्वार नसे. दोन अजस्र भिंतींमधील जागा हेच प्रवेशद्वार! कार्नाक मंदिरात आपण प्रवेश करतो, तिथल्या उत्तर दिशेच्या पायलॉनची उंची आहे 22 मीटर, तर दक्षिणेकडील पायलॉनची उंची आहे 32 मीटर - म्हणजे जवळपास 11 मजली!
अचूक वेळ दाखवणारी रथचक्रे हे कोणार्क मंदिराचे प्रमुख आकर्षण, तर अवाढव्य ’हायपोस्टाइल हॉल’ हे कार्नाक मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. याला ’हॉल’ कसे म्हणावे इतका तो अजस्र आहे. 5000 चौ.मीटर (54,000 चौ.फूट) क्षेत्रफळ असलेल्या या ’खोली’त दहा/चौदा मीटर परीघ असलेले तब्बल 134 दगडी स्तंभ आहेत. उंचीसुद्धा ताडमाड.. 24 मीटर उंच! निव्वळ या ’हायपोस्टाइल हॉल’मुळे कार्नाक मंदिर हे पिरॅमिड्सच्या खालोखालचे इजिप्तमधील दुसर्या क्रमांकाचे पर्यटन स्थळ बनले आहे.
हे दगडी स्तंभ ओबेलिस्कसारखे एकसंध दगडातून कोरलेले नाहीत. दगडावर दगड रचून हे अजस्र स्तंभ घडवण्यात आले होते. हे स्तंभ नुसतेच दगडावर दगड रचून ‘हायपोस्टाइल हॉल’मध्ये उभे केले, असे झालेले नाही. त्या स्तंभांवर 4 ते 5 सेंटिमीटर जाडीचे चुन्याचे प्लास्टर केलेले आहे. या प्लास्टरवर विविध शिल्पे कोरली आहेत आणि त्यात रंग भरले आहेत. शून्य काळापूर्वी 1290 ते 1224च्या दरम्यानची कारागिरी आहे ही. इजिप्तच्या तत्कालीन फेरोंचे पराक्रम, त्यांची देवभक्ती, त्यांची युद्धे यांची अगदी तपशीलवार वर्णने या स्तंभांवर आणि बाजूच्या भिंतींवर रंगवली आहेत.केवढा प्रचंड कॅनव्हास मिळाला होता त्या काळच्या कलाकारांना! त्यांनीही त्याचा पुरेपूर वापर करून घेतलाय. अक्षरश: एकही चौरस सेंटिमीटर नसेल, जिथे कोरलेले वा रंगवलेले नाही. तीन हजार वर्षांपेक्षा जास्त जुनी चित्रकारी आहे ही, पण अजूनही रंग ताजे वाटतात. कोणे एके काळी हा हॉल बंदिस्त होता, पण इतक्या वर्षांत छत बर्याच ठिकाणी ढासळले आहे. सतत ऊन खाऊन बर्याच ठिकाणची चित्रे जरा फिकट झालीत, पण सतत सावलीत असणारी चित्रे अजूनही बहारदार आहेत!
इकडे कोणार्कच्या सूर्यमंदिरातील शिल्पकृतींना व्यक्त व्हायला रंगांची गरज भासत नाही. अक्षरश: हजारो शिल्पे आहेत इथे आणि सर्व बोलकी! कलाकारांनी इथल्या प्रत्येक शिल्पात जीव ओतलाय. असे सांगतात की हे मंदिर घडवणार्या बिशू महाराणा आणि त्याच्या सहकार्यांना इथल्या राजा नरसिंह देवाने मंदिर पूर्ण करण्यासाठी फक्त 12 वर्षांचा कालावधी दिला होता. बारा वर्षांत त्यांना सूर्यदेवाचा भव्य दिव्य दगडी रथ साकारायचा होता, फक्त 12 वर्षांत त्यांना या 26 एकर परिसरात नटमंडप, जगमोहन, मुख्य मंदिर, भोगमंडप, मायादेवी मंदिर, चार बाजूची चार प्रवेशद्वारे आणि अरुण स्तंभ एवढी सगळी स्थापत्ये घडवायची होती. नुसती स्थापत्ये उभारणे सोपे, पण ही सगळी स्थापत्ये त्यांना कोरीवकामाने नखशिखांत नटवायची होती. नुसती नटवायची नव्हती, तर त्यांना वैज्ञानिक आधार देऊन उभारायचे होते, विज्ञान आणि सौंदर्य यांची अनोखी सांगड घालायची होती!
सुमारे 773 वर्षांपासून सूर्याच्या साहाय्याने अचूक वेळ दाखवणारी रथचक्रे हे एक आश्चर्य कोणार्क सूर्यमंदिरात आहेच, आश्चर्य कसले, चमत्कारच तो. परंतु, याहून अधिक अविश्वसनीय चमत्कार या मंदिराच्या गाभार्यात होता. भारतीयांच्या शास्त्र-विज्ञान विषयातील नैपुण्याचा निखळ आविष्कार!
कोणार्क मंदिरातील सूर्यदेवाची मूर्ती चक्क तरंगती होती! अधांतरी!
असे सांगतात की या मंदिरातील सूर्याची मूर्ती धातूची होती आणि ते जमिनीवर स्थानापन्न न करता वैज्ञानिक कौशल्याने अधांतरी तरंगत ठेवली होती. आता मात्र ती मूर्ती तिथे नाही. इजिप्तमधील कार्नाक मंदिरासारखेच कोणार्क हेसुद्धा देवाविना देऊळ आहे. या दोन्ही मंदिरांत सध्या पूजाअर्चना होत नाहीत. ही दोन्ही मंदिरे आता जिवंत मंदिरे न राहता नुसतीच प्रेक्षणीय स्थळे म्हणून उरलीत! ज्या गाभार्यात तरंगत्या मूर्तीचा चमत्कार घडवून आणला होता, तो गाभारासुद्धा आता उरलेला नाही. पूर्ण ढासळलाय. आपण ज्या वास्तूला कोणार्क मंदिर म्हणून ओळखतो, ती वास्तू म्हणजे मुळात कोणार्क मंदिरच नाही! छायाचित्रांमध्ये दिसते ती वास्तू आहे सूर्यरथाच्या पुढच्या भागाची - गाभार्याला जोडून असलेल्या सभामंडपाची. ओडिशात या सभामंडपाला ‘जगमोहन’ असे संबोधले जाते. तब्बल चाळीस मीटर उंच असलेला हा जगमोहनच आजकाल कोणार्क मंदिर म्हणून ओळखला जातो. गाभारा आणि हा जगमोहन मिळून कल्पिला होता एक भव्य सूर्यरथ! समोर सात अश्व आणि दोन्ही बाजूला 12 + 12 अशी एकूण 24 रथचक्रे. या रथचक्रांची उंचीच (व्यास) आहे जवळपास पावणेतीन मीटर. यावरून एकूण रथाच्या भव्यतेची कल्पना येईल. ज्या चौथर्यावर (झश्रळपींह) हे अफाट मंदिर बांधलेय, तो चौथराच चार मीटर उंच आहे!

धातूच्या मूर्तीला हवेत तरंगत ठेवण्यासाठी त्या काळात ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला, ते थक्क करणारे आहे. मूर्ती अधांतरी राहण्यासाठी कळसात 52 टन वजन असलेला लोहचुंबक बसवला होता! त्या शक्तिशाली चुंबकामुळे मूर्ती छताकडे ओढल्या जाऊ नये, यासाठी गाभार्यातील तळाकडे, दगडी पृष्ठभागाखालीसुद्धा चुंबक लावले होते. इप्सित असे चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी मंदिराच्या भिंतींमध्ये प्रचंड मोठे अनेक लोखंडी स्तंभ बेमालूमपणे बसवलेले होते! (आजही ते स्तंभ मंदिराच्या आवारात ठेवलेले आहेत.)
शिखराच्या लावलेला तो नैसगिक लोहचुंबक (Lodestone) इतका शक्तिशाली होता, की त्याचा प्रचंड प्रभाव आजूबाजूच्या परिसरात लांबपर्यंत पडत असे. जवळच असलेला समुद्रही त्याला अपवाद नव्हता. कोणार्क मंदिरातील चुंबकामुळे समुद्रातून जाणार्या जहाजांच्या, गलबतांच्या होकायंत्रांवर परिणाम व्हायचा. ते चुकीच्या दिशा दाखवू लागले. समुद्रात जहाजे भरकटू लागली. यामुळेच चिडून काही पोर्तुगीज खलाशांनी मंदिराचा कळसच काढून नेला!
पण यामुळे पुढचा अनर्थ झाला!
कळसाचा चुंबक काढून नेल्याने वजनदार धातूची मूर्ती खाली कोसळली, तळाकडे असलेल्या चुंबकांकडे भिंतीतील लोखंडी स्तंभ आकर्षित झाले, ते कोसळले आणि एकेकाळी 70 मीटर उंच असलेले कोणार्कच्या गाभार्याचे स्थापत्यच बेचिराख झाले. मुख्य गाभार्याच्या इमारतीचा अगदी थोडा भाग आता उरलाय.
बेचिराख व्ह्यायचे असेच दुर्दैव, इजिप्तमधील कार्नाक मंदिराच्याही नशिबी आले, पण ते वेगळ्या कारणाने. जवळपास 2300 वर्षे सतत बांधकाम होत असल्याने, बर्याच फेरोंनी आपल्या अगोदरच्या फेरोंनी बांधलेली मंदिरे पडून, तीच सामग्री वापरून आपल्या नावाचे मंदिर बांधले. यामुळेच कार्नाक मंदिर परिसरात विस्थापित झालेल्या दगडांचा खच पडलाय. तिथे इतके दगड विखरून पडलेत की ते परत रचले, तर आज जेवढी मंदिरे आपल्याला कार्नाक परिसरात बघायला मिळतात, त्याच्या चौपट संख्येची मंदिरे या परिसरात उभी राहतील.
कोणार्कची परिस्थिती वेगळी नाही. मुख्य मंदिर पूर्ण ढासळले आहे, दगडांचा खच इथेही बघायला मिळतो. नटमंदिराचे छत पडले आहे, भोगमंडपाची (प्रसाद बनवण्याची इमारत) आता फक्त जागाच दिसते, मंदिराच्या मागच्या बाजूला असलेले सूर्यदेवाची पत्नी मायादेवी हिच्या मंदिराचा फार थोडा भाग आता उरलाय.
मात्र या दोन्ही ठिकाणच्या भग्नावशेषांमध्ये एक साम्य आहे. दोन्ही ठिकाणचे भग्नावशेष आपल्याला त्यांच्या रम्य भूतकाळाविषयी सांगतात. घडवणार्या हातांचे कौतुक सांगतात, त्यांच्या कौशल्याची जाणीव करून देतात. कठीण ग्रॅनाइटमध्ये अखंड घडवलेले 40-40 मीटर उंच ओबेलिस्क 400 किलोमीटर दूरच्या खाणीतून आणून कार्नाकमध्ये उभारणे असो वा सर्व कोण अचूक साधून कोणार्कमधील दगडांच्या रथचक्रांनी अचूक वेळ सांगणे असो.. फक्त दगड-माती वापरून उभारलेल्या आणि चार हजार वर्षे टिकलेल्या कोणार्कमधील अजस्र भिंती (पायलॉन) असो, धातूची मूर्ती तरंगत ठेवण्याचा कोणार्कमधील चमत्कार असो, दोन्ही ठिकाणी हे असले काही घडवताना प्रचंड अभ्यास लागला असेल. विज्ञान आणि सौंदर्य यांचा व्यवस्थित ताळमेळ दोन्हीकडे दिसून येतो.
नावात साधर्म्य असलेली ही दोन्ही मंदिरे सूर्याची असावी, या निव्वळ योगायोग आहे; पण भारतीय संस्कृतीत आणि प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत हजारो देवतांचे पूजन होत असणे, दोन्ही धर्म मूर्तिपूजक असणे, दोन्ही धर्मांत उत्सव साजरे करण्याच्या सारख्याच पद्धती असणे, दोन्ही धर्मांनी निसर्गात परमेश्वराचे रूप बघणे - हे सारे साधर्म्य असणे हे मात्र योगायोग नक्कीच नाहीत!