दुर्घटना घडल्यापासून सरकारला, सरकारी यंत्रणांना, प्रकल्पाला सतत धारेवर धरणार्या टीकाकारांच्या टीकेतली हवा गेली आहे ती त्यामुळेच.. बचावकार्यात मिळालेल्या निर्विवाद यशामुळे, त्यात गुंतलेल्या सगळ्यांमधल्या सुसूत्रतेमुळे आणि त्यांनी नेतृत्वावर दाखविलेल्या अढळ विश्वासामुळेच.
स्वत:मधल्या क्षमतांची, प्रसंगावधानतेच्या पातळीची, स्थिरचित्त ठेवत धीराने किती काळ सामना करता येतो याची कसोटी पाहणारे क्षण जसे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात येतात, तसे ते राष्ट्राच्याही आयुष्यात येतच असतात. तसे एक संकट नुकतेच भारतावर येऊन गेले. त्या संकटावर सामूहिक प्रयत्नांनी, तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा अल्पकाळात यशस्वी मात केली, ही अतिशय दखलपात्र घटना, म्हणूनच जगभरातल्या तज्ज्ञांनी कौतुक केले. अडकलेले सर्व श्रमिक सुखरूप बाहेर आले तेव्हा केवळ त्यांच्या नातेवाइकांनीच नाही, तर सर्व भारतीयांनी आनंद साजरा केला. या संकटकाळाच्या पंधरवड्याने जगाला भारतातील सामूहिक प्रयत्नवादाचे आणि सश्रद्धतेचे दर्शन घडविले.
‘चारधाम परियोजने’अंतर्गत उत्तराखंड-उत्तरकाशी येथे बांधकाम चालू असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा भाग ऐन दिवाळीत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळला आणि त्याच्या ढिगाखाली एक्केचाळीस जणांच्या जिवाची बाजी लागली. श्रमिक वर्गातली ही सर्व माणसे या अनपेक्षित संकटाने अचानक मृत्यूच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली. ऐन दिवाळीच्या मध्यरात्री आलेले हे संकट साधेसुधे नव्हते. ते देशावर आलेले संकट आहे अशी भावना त्याच्याशी दोन हात करणार्या सगळ्यांचीच होती आणि तीच भावना त्यांना लढायचे बळही देत होती. उत्तराखंडचे मुख्यमंत्री घटनास्थळी हजर राहून या सर्व बचावकार्याकडे लक्ष ठेवून होते. या पंधरा दिवसांत अन्य कामे चालू असतानाही पंतप्रधान जातीने बचावकार्याचा आढावा घेत योग्य त्या सूचनाही देत होते. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी स्तरावरील व्यक्ती घटनास्थळी हजर होत्या. याव्यतिरिक्त अपेक्षित अन्य सरकारी यंत्रणांबरोबरच अनेक खाजगी कंपन्या, परदेशी यंत्रणाही बचावकार्यात गुंतल्या होत्या. 41 जणांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य शक्य तितक्या वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे, याचा जाणीव बचावकार्यातील प्रत्येकाला होती. त्यामुळेच एकाच वेळी विविध पातळ्यांवर त्या श्रमिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न चालू होते. मदतीचे असे असंख्य हात एकाच दिशेने काम करत असतानाही त्यांच्यात असलेली कमालीची सुसूत्रता, समन्वय हे वाखाणण्याजोगे होते. बचावकार्यातील एखाद्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यावर कामातील पुढच्या टप्प्यासाठी दुसर्या तंत्रज्ञानाची विनाविलंब मिळणारी मदत सर्वांच्या मनात असलेल्या सहसंवेदनेचे दर्शन घडविणारी होती. या कसोटीच्या काळात, बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेल्या श्रमिकांनीही जे मानसिक कणखरतेचे दर्शन घडविले, ते अतिशय कौतुकास्पद होते.
श्रमिकांच्या सुटकेसाठी सलग 17 दिवस शब्दश: हजारोंचे चाललेले अविरत प्रयत्न पाहताना एका जुन्या, अतिशय गाजलेल्या हिंदी चित्रपटातले एक प्रसिद्ध गीत राहून राहून आठवत होते. ‘नया दौर’ हा तो चित्रपट आणि ‘साथी हाथ बढाना’ हे ते गीत.
साथी हाथ बढाना
एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना
गीतातल्या या ओळी सिलक्यारा इथल्या बचावकार्यात जिवंत झाल्या होत्या. ‘ऑगर’ या अत्याधुनिक मशीनच्या मर्यादा स्पष्ट झाल्यावर, शेवटच्या टप्प्यावर ‘रॅट मायनर्स’ या खोदकामाच्या पारंपरिक तंत्रात अवगत असलेल्यांनी आपले कौशल्य दाखविले आणि 41 जणांना पुन्हा एकदा बाहेरचे जग दिसले.
चारधाम या भारतीयांच्या मनात विशेष स्थान असणार्या परिसरात घडलेली ही दुर्घटना. तिथे येणार्या लाखो भाविकांसाठी आणि तिथल्या सर्वसामान्यांचे रोजचे जगणे सुकर व्हावे, यासाठी चालू असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याला अशा विघ्नाचे गालबोट लागू नये, हीच सर्वांची भावना होती. त्यामागे अडकलेल्यांचे जीव तर महत्त्वाचे होतेच, शिवाय या देवभूमीविषयी अपरंपार श्रद्धा प्रयत्न करणार्या सगळ्यांच्या मनात होती. म्हणूनच या बचावकार्याच्या सामूहिक प्रयत्नांना बळ होते ते सश्रद्धतेचे. आलेल्या परदेशी तज्ज्ञांनाही याचे दर्शन घडले आणि त्यांनी ते निर्विवाद मान्यही केले. इथल्या काही विघ्नसंतोषी लोकांनी या भावनेची कितीही कुत्सितपणे टवाळी केली, तरी प्रयत्नाला दिलेली श्रद्धेची जोड संकटाशी झुंजण्याचे बळ देते आणि त्यातून सुखरूप बाहेरही पडता येते, हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. यात कोणताही चमत्कार नाही. मनाची ताकद किती अफाट असते याचे ते प्रतीक आहे. तरीही ते नाकारायचे आणि त्याला अंधश्रद्धा म्हणत टवाळी करण्यात आनंद मानायचा, हा इथल्या छिद्रान्वेषी वृत्तीच्या लोकांना लागलेला रोग आहे आणि त्यावर कोणताही इलाज नाही.
श्रमिकांना बाहेर काढले, तिथे हे बचावकार्य संपलेले नाही. यापुढे काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले जाईल. बोगद्यात असतानाही त्यांचे मानसिक संतुलन टिकून राहावे, यासाठी त्यांना योगासने करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मन:स्वास्थ्य टिकावे यासाठी पाइपातून अन्नपाण्याबरोबरच काही बैठे खेळही पाठविण्यात आले होते. शिवाय हे कामगारही स्वत:होऊन आपल्या मन:स्वास्थ्याची काळजी घेत होते. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली घालत होते. देशाच्या विविध राज्यांतून आलेले हे श्रमिक होते. संकटात अडकल्यावरही त्यांच्यात टिकून राहिलेली एकीची भावनाही त्यांच्यातली जगण्याची उमेद टिकवून होती. “आम्ही सर्व जण भावंडांप्रमाणे राहिलो” असे त्यांच्यापैकी एकाने सुटकेनंतर पंतप्रधानांशी दूरभाषवरून संवाद साधताना सांगितले. हे त्यांच्यातल्या बंधुभावाचे - भारतीयत्वाचे प्रतीक. जसा हा भाव त्यांना मानसिक ताकद देत होता, तसा त्यांचा देशाच्या नेतृत्वावर असलेला विश्वासही त्यांचा धीर खचू देत नव्हता. आपली काळजी घेणारे कोणी तरी या देशात नक्की आहे, ही भावना एका श्रमिकाने व्यक्त केली ती त्यामुळेच. “तुम्ही युद्धासारख्या परिस्थितीत परदेशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न करता, हे मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही आमची सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल, याबाबत मला खात्री होती” असे तो पंतप्रधानांना उद्देशून म्हणाला. सगळे काही आलबेल असताना कोणी कौतुकोद्गार काढणे हे समजू शकते; मात्र जिवावर बेतलेले संकट समोर असतानाही जेव्हा सर्वसामान्यांना असा विश्वास वाटतो, तेव्हा त्याची नोंद घ्यावी लागते.
ही दुर्घटना घडल्यापासून सरकारला, सरकारी यंत्रणांना, प्रकल्पाला सतत धारेवर धरणार्या टीकाकारांच्या टीकेतली हवा गेली आहे ती त्यामुळेच.. बचावकार्यात मिळालेल्या निर्विवाद यशामुळे, त्यात गुंतलेल्या सगळ्यांमधल्या सुसूत्रतेमुळे आणि त्यांनी नेतृत्वावर दाखविलेल्या अढळ विश्वासामुळेच.