चपलाहार

विवेक मराठी    03-Nov-2023
Total Views |
@क्षमा शेलार
भिकू पाटलांच्या वाड्याचा आणि त्यांच्या मानमरातबाचा थाट सार्‍या पंचक्रोशीत औरच होता. कशाकशाची म्हणून कमतरता नव्हती. सोन्याच्या भाराने लेकी-सुना वाकत असत, एवढं वैभव. मात्र या सगळ्यात न्यारा दिसत असे, तो पूर्वाजांनी कलकत्त्यावरून खास घडवलेला दहा पदरी चपलाहार. हा चपलाहार म्हणजे वाड्याच्या मोठ्या सुनेचा मान होता. पण नशिबाचे फेरे म्हणावेत तसे पाटलांच्या घराचे वासेही फिरले. चपलाहारावर पडलेल्या वक्रदृष्टीमुळे घर होत्याचं नव्हतं झालं. धाकट्या सुनेनं गाड्यात लपवलेल्या चपलाहारावर बसलेला भुजंग हा एका हाराच्या मोहापायी घडलेल्या पडझडीची आठवण करून देतो..


vivek
कू पाटलांची गावातली ऐट न्यारीच होती. भला मोठा बारदाना त्यांचा. ह्या रस्त्याचा त्या रस्त्याला लागेल असा भव्य वाडा. गोठाही केवढा तरी मोठा. पाचपंचवीस बैलं, तीसएक म्हशी, चाळीस अस्सल गावठी गायी.
 
 
झुंजुरकीला अंगणातली दोन डाली उचलली की चार-दोन डझन कोंबडीची पिल्लं कागदी विमानांप्रमाणे अंगणभर भिरभिरत.
नावात जरी भिकू असलं, तरी निस्ती बाराबंदी झटकल्यावर कलदार नाण्यांचा पाऊस पडेल एवढी कर्तबगारी त्यांच्या मनगटात होती. वयाच्या साठीतही रोजच्या दंडबैठका सूर्याला आव्हान देत. एकशे एक सूर्यनमस्कार घालताना तटतटलेला दंडावरचा ताईत ताणलेल्या प्रत्यंचेसारखा होई.
 
 
वाडवडिलांची शंभर एकर शेतीपोती, कांद्याच्या दोन-चार अरणी. जिरायती जमिनीत जी नाही ती कडधान्यं आणि बागायती जमिनीच्या तुकड्यात भलाथोरला द्राक्षांचा मांडव पसरलेला. जणू अधांतरी टांगलेला हिरवागार गालिचाच.
 
 
गोठा असा आबादानी असल्याने घरात दूध-तूप मायंदाळ. वाघासारखे दोन्ही लेक चरवी चरवी दूध पीत असत. वाटी वाटी तूप एका जेवणात लागत असे. थोरला लेक मामलेदार. त्याच्या पाठीवर झालेल्या पाच पोरी थोरामोठ्यांच्याच घरी दिलेल्या. आणि मग जोडीला जोड असावी म्हणून जन्मलेला धाकटा. जरा जास्तच लाडाकोडाचा. तो वकील झाला होता.
 
 
सुनाही तालेवाराच्या करून आणलेल्या. लग्न करून घरी आणल्या, तेव्हा न्हाणसुद्धा न आलेल्या कवळ्या पोरी. सासर-माहेरच्या सोन्याच्या भाराने वाकून गेलेल्या. सरी म्हणू नका, ठुशी म्हणू नका, चितांग काय, गाठलं काय, तोळबंद्या, नथ, पायात एक-दोन भार चांदीच्या तोडी, घुंगराच्या तोरड्या, अंगावरच्या जडभारी जरतारी शालूमध्येसुद्धा सोन्या-चांदीच्या तारा गुंफलेल्या. वाड्यातली सर्वांनीच सोन्याच्या भाराने वाकलंच पाहिजे असा जणू अलिखित दंंडकच. वारशाने चालत आलेला दहा पदरी लखलखत्या सोन्याचा चपलाहार पाटलाच्या कुठल्याशा पूर्वजाने तो खास कलकत्त्याहून घडवून आणलेला. तो हार म्हणजे वाड्याच्या मोठ्या सुनेचा मान होता. वाड्याचे लागेबांधे प्रतिष्ठितांशी.. लग्नाकार्यात तर्‍हतर्‍हेचे दागदागिने झगमगत, पण याची चमक काही वेगळीच. बाकी काहीसुदीक घातलं नाही आणि तेवढा एक हार घातला की वाड्याची थोरली सून अपरलक्ष्मी दिसे.
 
 
लेक पाटलांच्या वाड्यात दिली आणि लेकीचं सोनं झालं असं त्यांच्या सोयर्‍यांना वाटे. खरंच तर होतं ते. चहाची कपबशीसुद्धा सुनांना उचलावी लागत नव्हती. त्याही आदबशीर होत्या. सासरे बैठकखोलीत ज्या गादीवर बसत, त्या गादीला हात लावायचीसुद्धा त्यांची हिंमत नव्हती. नोकरमाणसांचीही परवानगीशिवाय बैठकखोलीत जायची टाप नव्हती. एकूण सगळं कसं आबदार चाललं होतं.
 
 
या सगळ्या वैभवाची, त्या कलकत्त्याहून आणलेल्या पिढीजात चपलाहाराची कीर्त अवघ्या पंचक्रोशीत पसरलेली होती. ही कुबेराची किरपा चोरदरोडेखोरांच्या डोळ्यात सलली नसेल तर नवलच की..
 
 
अमावस्येची रात्र होती. वाडा रात्रीच्या नीरव शांततेत गपगार उभा होता. वाड्यातली मंडळी, नोकरमाणसं थकूनभागून झोपलेली. आजूबाजूला रातकिड्यांची किरकिर.. काळ्याभोर आकाशात चांदण्या टिमटिमत असलेल्या. अधूनमधून येणार्‍या वार्‍याच्या झुळकेने वाड्याच्या पश्चिमेला असणार्‍या उसाच्या शेतात हलकीशी सळसळ सोडली, तर सगळा भवताल जणू एखादं जिवंत चित्र झालेला. त्या सळसळीची नोंद घेण्याइतकी जाग कुणालाच नव्हती. दह्याच्या घट्ट कवडीसारखी झोप लागलेली.
 
 
उत्तररात्रीचा प्रहर होता आणि अचानक वाड्याच्या मागच्या बाजूला खसफस झाली.
 
 
दोन-चार काळ्याकरंद पिळदार पोटर्‍यांचे पाय दबकत दबकत वाड्याच्या दिशेने चालू लागले होते. कडी-कोयंडे उघडण्यात वाकबगार असलेले त्यांचे हात सराईतपणे चालू लागले. कोणाला काही कळायच्या आतच परसदाराकडचा दरवाजा उघडला गेला. माजघरात झोपलेल्या नोकरमाणसांचं तोंड बांधलं होतं. या सगळ्या अघटिताची चाहूल लागून वाड्यातल्या मंडळींना जाग आली आणि वाड्यात दरोडा पडतोय अशी थरकाप उडवणारी जाणीव त्यांचं काळीज कापत गेली.
 
 
बैठकीच्या खोलीत असलेली बंदूक घेण्याइतका वेळ चोरांनी दिला नाही. जीव वाचवायचा, म्हणून सगळ्यांनी वरच्या मजल्याच्या सज्जामधून वाड्याच्या पश्चिम दिशेला असणार्‍या उसात उड्या टाकल्या. माजघरातल्या गाडग्यांच्या उतरंडीत ठेवलेले पैसे, जमिनीत पुरलेल्या दोन रांजणांमधले सगळे दागिने हे सगळं त्यांनी धान्याची पोती रिकामी करून त्यात भरून घेतलं. बैठकखोलीत असणारी दंडम तिजोरी पहारी टिकावाने फोडली आणि हा सगळा मुद्देमाल पोत्यात भरून पोबारा केला. पण थोरल्या सुनेच्या गळ्यातला ख्यातकीर्त चपलाहार मात्र त्यांच्या हाती लागला नाही.
पाटील वाघाच्या काळजाचे...
इतकं सगळं होऊनही ’माझ्या पोरांवरनं ओवाळणी गेली!’ म्हणत ढांगा टाकत निडरपणे वाड्यात शिरले. पाटलीणबाईही त्याच्या मनगटातला जोर ओळखून होत्या. आणि खरोखर काहीच महिन्यांत हिकमती पाटलांनी दरोड्यात गेलेले सुनांचे सगळे दागिने पुन्हा घडवले. वाड्याचा राबता पुन्हा पूर्वीसारखा चालू लागला. पण सगळं पूर्वपदावर आलं असं म्हणण्याची सोय मात्र दुर्दैवाने ठेवलेली नव्हती. त्या रात्री सज्जातून शेतात उडी मारताना मोठ्या सुनेचा पाय मुरगळला होता. तशी इतक्या मोठ्या आक्रितात घडलेली तशी साधीशी गोष्ट, पण ओली बाळंतीण असताना बसलेला हा शारीरिक, मानसिक धक्का तिला पेलवला नाही. पायाच्या दुखण्याने उग्र रूप धारण केलं. अनेक वैदू-हकीम पाहिले, गंडेदोरे केले, पण मोठी सून सावरली नाही. त्या दुखण्यातच तिचा अंत झाला. एक दोन वर्षांचं आणि एक चार महिन्यांचं पोर मागे ठेवून ती निजधामाला गेली. तिच्या गळ्यातला चपलाहार आपसूक धाकटीच्या गळ्यात गेला.
 
बघता बघता दोन वर्षं सरली.
 
दोन वर्षांपूर्वीपर्यंत सुखेनैव चाललेल्या पाटलांच्या संसाराच्या घुंगुरगाडीत कणसूर उमटायला लागले.
 
धाकटी सून ललिता देशमुखाची. पाच गावाची देशमुखी माहेरात चालत आलेली. शेतीपोती होती, पण मातीशी नाळ तुटलेली. त्याला जोडून आलेली हव्यासाची, वर्चस्व गाजवण्याच्या वृत्तीची जोड. इतके दिवस मोठ्या जावेच्या पोरांना पंखाखाली घेणारी ललिता स्वत: पोटुशी राहिल्यानंतर मात्र वेगळी वागू लागली होती.
 
 
मोठ्या सुनेसोबत एका जिवाट्यानं राहणारी ती हीच का? असा प्रश्न पाटलांना पडू लागला. माजघरात घडणारं हे विपरीत थोरल्याच्या कानावर येत होतं आणि नव्हतंही. तो जसा थोरलेपणाच्या ओझ्याने वाकलेला, तसा बायकोच्या अकाली जाण्याने हबकलेला होता.
 
 
वाड्यात दुसर्‍या लग्नाची रीत नव्हती, पण नातवंडांचे हाल पाहून हळूहळू पाटलांच्या मनात थोरल्याचं दुसरं लग्न लावून द्यावं असा विचार घोंगावू लागला. पाटलीणबाईंनीही या सगळ्या अघटिताचा धोसरा घेतला होता. त्यांच्या तब्येतीची कुरबुर वाढली होती.
 
 
आता ललिता सगळ्याच कारभारात लक्ष घालू लागली. सासूच्या कनवटीला असलेला तिजोरीच्या चाव्यांचा जुडगा अलगद कधी तिच्या ताब्यात गेला, ते कुणाला कळलंसुद्धा नाही. पाटलांची दूरदृष्टी त्याला सांगत होती, धाकटी सून स्वत:चं पोर झालं की मोठीच्या पोरांवर पाखर घालणार नाही. तिच्या डोक्यात मोठीची पोरं आजोळी धाडून देऊन फक्त तिचाच पोरगा इस्टेटीला वारस लागावा, असं घाटतंय नक्कीच.
 
 
त्यांच्या डोक्यात विचार भिरभिरू लागले.
 
एक दिवस काही कामासाठी पाटील तालुक्याला गेले. तिथल्या हापिसात काही कामासाठी आलेले गणपत पाटील त्यांना अचानक दिसले. चेहरा ओळखीचा वाटला, म्हणून दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. थोड्या वेळाने ओळख पटली.
 
“अरे गणा, तू?” असं म्हणत पाटलांनी गणपतच्या पाठीवर थाप मारली. “अरे काय लेका!! किती दिवसांनी गाठ पडलीये? वळखलंच नाही मी आधी.”
 
“म्या वळखलं व्हतं, पन म्हनलं.. तुम्ही आता मोठा माणूस झाल्यात.. वळख देताल का नाही?”
 
 
“अरं काय लेका! फायनल होईपर्यंत येका वर्गात व्हतो आपन. अशी वळख कशी काय विसरनार? काय म्हंतो? बरंय का पाऊसपानी?”
 
 
गणपत पाटील बोलावं की न बोलावं असे चुळबुळत राहिले.
 
 
“काय झालं? बरं आहे ना?”
 
 
“समदं तसं बरं चाललं व्हतं रं देवाच्या दयानं. पन मंडळीला हृदयाच्या त्रास व्हता आधीपासून, तो जरा वाढला. येक येक करत समदं विकावं लागलं. शेती जास्त नव्हतीच, पन तिच्या तब्येतीपुढे त्या तुकड्याचाबी मी विचार केला नाही. माझ्या पोरीनी बरीच सेवा केली. पुष्कळ धावलो या दवाखान्यातून त्या दवाखान्यात. पन मंडळी वाचली नाही. काय देवाची इच्छा!
 
 
..पन आता पोरीची काळजी लागली बघा. समदे म्हनत्यात, या वर्षी पोरीचं लग्न करून टाकलं पाहिजेल. नाहीतर तीन वर्षं लगीन करता यायचं नाही. वानीकिनीची येकच पोरगी पोटाला. तिचं असं घाईघाईत कसं उरकावं? हुंड्याशिवाय काय खरं आहे का? लहानपणापासून आईच्या आजारपणामुळे पोरीची हौसमौज झाली नाही. आता लग्नात तिच्या मनासारखे चार डाग तर मला घालता यायला पाहिजे ना? पन तिचा बाप असा कमनशिबी. काय करावं? डोकं चालत नाही..
 
 
असं वाटातं द्यावी गळ्यात धोंडा बांधून बारवेत लोटून. आन मीबी घ्यावा फास लावून. काय या जिनगानीला अर्थय?”
 
 
गणपत पाटलांनी भडभडा आपली कहाणी सांगितली. ती ऐकल्यापासून भिकू पाटलांच्या डोक्यात एक विचार जोरकसपणे रुंजी घालू लागला.
 
 
तालुक्याच्या गावावरून आल्यापासून मालक काहीतरी विचारात आहेत असं पाटलीणबाईला जाणवलं होतं. पण स्वत:होऊन काही विचारण्याचा त्यांच्यात शिरस्ता नव्हता.
 
कधीतरी एक दिवस पाटील पाटलीणबाईला मनातलं बोलले. पाटलीणबाई आबगी नव्हती. पुढचा मागचा विचार करून बोलणार्‍यातली होती. ती म्हणाली,
 
 
“बारीकपनापासूनच तुमचा मैतर.. आज त्याच्यावर वेळ आली. मग आपून मदत करायला नको का? उद्या त्यानं घेतलं जिवाचं काही बरंवाईट करून, मग काय करायचं? गरज आपल्यालाबी आहेच की..”
 
“तसं नाही! पन कितीबी झालं तरी येकुलती येक पोर बिजवराला कशी देईल गणपत्या?
 
त्याच्यामुळेच अवघड वाटतंय विचारायला. शिवाय माझा मैतर जरी असला, तरी तोलामोलाचा नाही. सोयरेमंडळी काय म्हणतील?”
 
पाटलीणबाई पुढे म्हणाली,
 
“माझ्या मनाला वाटतंय बाई. येकडाव शब्द टाकून तर बघू. नाही तरी वाडवडील सांगून गेलेत ना.. लेक द्यावी मोठ्या घरी आणि सून करावी गरीबाघरची. आता हे देशमुखाकडचं चित्तार कसं वागतंय ते पाहतोयच ना आपून? देवाचे जे मनात असंल तसं व्हैल. आपलं पोरगं रांगेला लागंल. पोरीचंबी कल्यान व्हैल. ’हो’ म्हटलाच तर ठीक, ’नाही’ म्हटला तर राहिलं!”
 
गणपत भेटला की नक्कीच हा विषय काढून बघायचं, असं भिकू पाटलांनी ठरवलं. बाकबुक करत करतच विषय निघाला आणि सगळं सटुबाईने लिहून ठेवल्याप्रमाणे घडून आलं. गणपत पाटलांची एकुलती एक लेक ’लक्ष्मी’ थोरल्याची बायको म्हणून घरात आली.
 
ललिताने स्वप्नातही कल्पना केली नव्हती की घराण्यात दुसर्‍या लग्नाची चाल नसताना सासरा मोठ्या दिराचं लग्न करून कोण कुठली पोरगी थोरली जाऊ म्हणून आपल्या उरावर बसवेल!! वरकरणी हसत खेळत असणारी ललिता मनातून चांगलीच हबकली होती. एकदा का मोठीची दोन्ही पोरं आजोळी घालवली की, तिचं पोरगं पाटलाच्या घराण्याचं एकुलता एक वारस होणार होतं. पण आता हे असं घडणार नाही याची तिला बोचरी जाणीव झाली.
 
मोठीची मुलं आता इथेच राहणार हे निश्चित झालं. शिवाय नवीन आलेल्या जाऊबाईलाही पोरं झाली की, जेवढी पोरं तेवढ्या वाटण्या, असे विचार तिच्या सुपीक डोक्यात घोंगावू लागले. तिच्या चांगुलपणाचा मुखवटा थोडासा तडकलेला असला, तरीही तिच्या डोक्यात याच्याही पुढचं काही येईल असं कुणालाच वाटलं नाही. कारण ती उत्साहाने लग्नात राबत होती. आपला खोटा मुखवटा कसोशीने सांभाळत होती.
 
 
पण जेव्हा घराण्याचा पिढीजात चपलाहार तिच्या गळ्यातून काढून थोरल्या जावेच्या गळ्यात टाकण्याची वेळ आली, तेव्हा मात्र तिचा चेहरा अगदीच पडला. इतके दिवस वापरून त्या चपलाहारावर तिचं मन गेलं होतं. चार माणसात झालेला हा विरस तिच्या मनाला लागला होता. वारंवार डंख करत होता. जेव्हा जेव्हा लक्ष्मी तिच्यासमोर येई, तेव्हा तेव्हा हा डंख जागृत होत होता. लक्ष्मी वयाने ललितापेक्षा लहान होती, शिवाय गरीबघरची. त्यामुळे मानाने ती मोठी जाऊ असली, तरीही ललितासमोर ती वरमून, दाबून राही. ललिता तिच्या गरीब वागण्याचा गैरफायदा घेऊ लागली होती. पाटलीणबाईंपेक्षा ती स्वत:च थोरल्या जावेवर रुबाब गाजवी. लक्ष्मीचा स्वभाव मवाळ असल्यामुळे तिने ते सगळं तोलून धरलं होतं. ललिताचे टक्केटोणपे पचवूनही ती आनंदी राहत होती. कुठे बोट ठेवायला जागा म्हणून ठेवत नव्हती. तिचा सोशिक स्वभाव पाहता पाटील आणि पाटलीणबाई निर्धास्त झाले होते. आनंदाने देव देव करू लागले होते. देवळीराऊळी जाऊ लागले होते.
 
 
सासू-सासरे घरात नसताना ललिताचं चळीतार जास्तच बिघडे. लक्ष्मीवर येता जाता खार खाणं, तिला घालून पाडून बोलणं, तिच्या माहेरच्या गरिबीचा उद्धार करणं आणि सरतेशेवटी ती चपलाहार घालण्यासाठी कशी लायक नाही हे स्पष्ट बोलून दाखवणं. पण लक्ष्मीला लहानपणापासून इतक्या प्रतिकूल परिस्थितीची सवय होती की, तिने हे सगळं अंगवळणी पडून घेतलं होतं. ना कधी तक्रार, ना कधी उदासी.
 
कधी तिने नवर्‍यालाही या गोष्टी सांगितल्या नाहीत. एकतर नवरा बीजवर म्हटल्यावर त्यांच्या वयात बरच अंतर होतं आणि त्याच्या मामलेदार असण्याचं दडपण तिला अजूनतरी झुगारता आलं नव्हतं. त्याच्याशी कामाव्यतिरिक्त ती फार काही बोलत नसे.
 
 
थोरला अजूनही पहिल्या बायकोच्या दु:खातून बाहेर आला नव्हता. रात्री लक्ष्मी दोन्ही लहानग्यांना घेऊन माजघरात झोपे, हे घरातलं उघड गुपित होतं. पण हळूहळू वळणाचं पाणी वळणाला जाणारच अशी अटकळ बांधून बाकीचे निर्धास्त होते. खुद्द लक्ष्मीलाही त्याचं काही वाटत नव्हतं. डोक्यावर प्रतिष्ठित छप्पर आहे, बापाची काळजी मिटली आहे, दोन वेळेला भरपूर चवीढवीचं खाणं, लेणं मिळतं आहे यात ती खूश होती.
 
 
भावंड नसल्यामुळे तिने थोरल्याच्या मुलांना खूप जीव लावला. ती दोन्ही लहानगी तिच्या आगेमागे दिवसभर हुंदडत असत. तेच काय, नणंदांची मुलंही मामी मामी करत लक्ष्मीच्याच मागे लागत. या सगळ्या मुलांना बघणं, नवर्‍याचं, दिरांचं, आल्यागेल्याचं सगळं बघणं, नोकरमाणसांकडून जास्तीची कामं करवून घेणं यात तिचा दिवस सहज निघून जाई. तिच्या त्या शांतपणे सगळं करण्याच्या वृत्तीला पाहून ललिताचा अधिकाधिक जळफळाट होत होता. लक्ष्मीची हळूहळू वाढत जाणारी प्रतिष्ठा तिला दिवसेंदिवस बोचू लागली होती. दिवसेंदिवस तिरपागड्या होत जाणार्‍या तिच्या स्वभावामुळे नोकरमाणसंही लक्ष्मीलाच विचारून घरातल्या गोष्टी करू लागली होती. ललिताला हे सगळं सगळं सलत होतं.
 
त्यात एके दिवशी थोरला लक्ष्मीशी बोलताना पाहून ललिताचं डोकंच फिरलं. बोलायला तर लागले आहेत, आता पुढच्या गोष्टी व्हायला काय वेळ लागणार? त्याच्याआधीच काहीतरी केलं पाहिजे, या हिशोबाने तिच्या डोक्यात यंत्रणा सुरू झाली.
 
 
पंचमीचा सण जवळ आला होता. पंचमीच्या सणाला सगळ्या सवाष्णी माहेरी जात, झोके घेत, लाह्या-बत्तूसे वाहून नागाच्या वारुळाची पूजा करत. ललिताने तोच मुहूर्त साधायचा ठरवलं. वाड्यातले कुलाचार सुरू असताना माहेरी जाणं योग्य नाही, असं लक्ष्मीच्या मनात होतं. पण ललिताने गोड बोलण्याचं नाटक करून लक्ष्मीला सांगितलं, की “जाऊबाई! तुमचं नवीन लग्न आहे. वडिलांना काय वाटेल? ते एकटेच आहेत. निसूर मनाने माहेरी जा. मला काय भरपूर वर्सं झालीत इथं. मी पुढच्या सणाला माहेरी गेले तरी चालंल. मी सांभाळून घेईन तिथपतूर सगळं..”
 
 
लक्ष्मीलाही नाही म्हटलं तरी माहेरची आठवण येतच होती. तिनं हुरहुरत्या मनानं नवर्‍याची, सासू-सासर्‍याची परवानगी विचारली. पाटलीणबाई मोठ्या मनाने म्हटल्या,
 
 
“पोरी! जा खरंच चार दिस इस्वाट्याला.. तू किती राबत असती मी पाहिलंय. शेवटी सासरी झोपाळा जरी टांगलेला असला तरी सासर ते सासरच. जा बिनघोर..”
 
 
“पन ललिताताईंनी समद्या नोकरमानसांनाबी सुट्टी दिलीये. फक्त सखुबाई आहे इथं. मग समदं कसं आवतायचं?”
 
 
“घेऊ आम्ही सासू सुना सांभाळून. तुला वाटलं, सासू आता थकली. पन मला आता बरं वाटतंय. आन पोरांना, नवर्‍याला करून घालायला कोन्या बाईला जड जाईल गं? शिवाय ललिता, सखुबाई आहेच. काय दोन-चार दिवसाचा प्रश्न.. तुझ्या नवर्‍याला सांगते मी. तसा थोडा तापट आहे, पन मनात तुझ्याविषयी माया असनारच त्याला. माझे केस काय उन्हानं पांढरे नाही झालेत. पंचमीला जाऊन आली की पोरांना माझ्या शेजारी झोपव आन तू माडीवरच्या खोलीत झोपायला जात जा. बस झाला आता हा संन्याशाचा संसार! विस्तवाशेजारी लोनी ठेवल्यावर पाघळायला काय वेळ लागनार? जा, ये जाऊन दोन दिवस. मग नाही लवकर पाठवायची बरं. पंचमीच्या दिवशी सकाळीच गाडी जुपायला सांगते.”
 
 
लक्ष्मी सगळं खालमानेने ऐकत पदराशी चाळा करत होती. तिने कळत-नकळत मान हलवली. तिचा जीव संसारातही पांगला होता आणि म्हातार्‍या बापाकडेही लागला होता.
 
 
कोंबडा आरवण्याच्या टायमाला गडी आला. त्याने छकडागाडी जुंपली. लक्ष्मीला माहेरी जाण्यासाठी म्हणून ललिताने वाड्याच्या रितीप्रमाणे शिदोरी तयार केली. ललिताच्या लगबगीला बघून पाटलीणबाईंना समाधान वाटलं.
 
 
‘’शेवटी लक्ष्मीनं मुसळाला मोड आणले म्हणायचे. आता एकदा पोरीचा संसार जनरितीपरमानं सुरू झाला म्हणजे गंगेत घोडं न्हालं. पाटलाच्या वंशाला गोमटी फळं येऊ दे रे बाबा..”
 
 
पण इकडे ललिताच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं. माजघरात दोघीच असताना तिने सांगितलं,
 
 
“लक्ष्मीबाई! प्रवास लांबचा.. चोराबिरांची भीती. एकुटवाना रस्ता आहे. मधी चिंचेचं आईरान. अंगावरचे डाग जपता येतील का?
चपलाहार तर ठसठशीत नजरेत भरतोय. तो माझ्याकडंच द्या ठेवायला. हलके डागच राहुद्या अंगावर. आन पदर चांगला गुंडाळून घ्या गळ्याभवतीनं. म्हन्जे कोनाला कळायचं नाही काय डाग घातलेत अन् किती घातलेत.. मी सांगते तसं सासूबाईंना.”
 
 
लक्ष्मीला जरासुद्धा शंका आली नाही. तिने सरळ मनाने तो चपलाहार ललिताकडे सोपवला. सगळ्यांच्या पायावर वाकून सगळ्यांचा निरोप घेऊन लक्ष्मी माहेरी गेली. बिनाआईच्या माहेरात चार दिवस राहिली. बापाला काय काय चवीढवीचं करून खाऊ घातलं, पाटलाची सून म्हणून शेजारपाजारी मिरवली, मैत्रिणींमध्ये सासरचं कौतुक करवून घेतलं. त्यांच्या आंबटचिंबट थट्टामस्करीला सगळं बैजवार असल्याप्रमाणे उत्तर दिलं. मनात नवर्‍याची कुठली आठवण अजून रुजलीच नव्हती. मनाची माती अजून कुंवारच राहिलेली.. पण म्हातार्‍या बापाच्या डोळ्यातलं समाधान पाहून तिला तेवढ्या गोष्टीचं काही वाईट वाटत नव्हतं. वाट पाहण्याची तयारी तिनं ठेवली होती. मुलांची मात्र तिला आठवण येत होती. त्यांचा थोड्या दिवसातच तिला लळा लागला होता.
 
 
सासरची तुळस वाट पाहतेय याची जाणीव ठेवून लक्ष्मी भरल्या मनानं ठरल्याप्रमाणे चार दिवसांत सासुरवाडीला आली. इथे काय वाढून ठेवलं होतं, याची तिला सुतराम कल्पना नव्हती.
 
 
अवघ्या चार दिवसांत वाड्यातलं सगळं चित्र पालटलं होतं. दिंडी दरवाजावर भाकरतुकडा ओवाळायलाही कुणी आलं नाही.
लक्ष्मी शंकित मनाने आत शिरली. सगळे तिच्याशी बोलेनासे झाले होते. ललिता एका बाजूला रडत बसली होती. पाटील सचिंत बसले होते. पाटलीणबाईंनी अंथरूण धरलं होतं. लक्ष्मीच्या मनात पाल चुकचुकली.
 
 
असं काय झालं असावं की घरातलं येकबी मानूस बोलत नाही?
 
लक्ष्मीच्या अंगाला सूक्ष्म थरकाप सुटला.
 
बाकी काही न सुचून तिने पाटलांचे पाय धरले.
 
“काय झालं मामा? माझ्याकडून काही आगळीक झाली का?”
 
तिने सगळीकडे पाहिलं. ललिताने तोंड वाकडं करत तिसरीकडेच पाहून घेतलं. सखुबाई खाली मान घालून उभी होती. पाटील मोठ्या वादळात वृद्ध वड थरथरावा तसे उभ्या जागी थरथरत होते. लक्ष्मीचा नवरा बैठकखोलीतल्या खांबाला टेकून उभा होता. त्याच्या डोळ्यात कुठलीच ओळख नव्हती. घरातली मुलं कुठे दिसत नव्हती.
 
लक्ष्मी पुन्हा एकदा म्हणाली,
 
“माझं काय चुकलं ते तरी सांगा.. कोनीच का बोलत नाही माझ्याशी?”
 
अखेर ललिता कडाडली,
 
 
“हे चांगलं जमतंय तुम्हाला! चोर तर चोर वर साव! तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं या वाड्याला. शेवटी लायकी दाखवलीच ना?”
 
लक्ष्मी थरथरत उभी राहिली. हात जोडून म्हणाली,
 
“ताई! बाप रे, असं विपरीत नका ना बोलू.. दोन थोबाडीत मारा लागल्यास, पन..”
 
आणि तिला पुढे बोलायला काही न सुचून ती ढसढसा रडू लागली.
 
“बास झाली ही रडायची नाटकं. माझे डाग काढून द्या आधी.”
 
“डाग? तुमचे? उलट मीच माझे डाग तुमच्याकडं दिले होते ताई.. वाटलं तर तेबी तुम्हाकडंच राहू द्या. मला काळा सर आन दोन मनी बास झाले. पन असा वंगाळ आळ नका घेऊ माझ्यावर.”
 
तिचं बोलणं ऐकल्यानंतर ललिताने कानावर हातच ठेवले आणि थयथयाट सुरू केला.
 
“पाहताय का मामा? माझे डाग लंपास केले तर केले, आन् तुम्ही मोठ्या कौतिकानं गळ्यात घातलेला चपलाहारबी माहेरी दवडून आली..”
 
 
चपलाहार हरवला या बातमीने पाटील आणि पाटलीणबाईंना हादरायला झालं. पाटलीणबाई लग्न करून आल्या, तेव्हा त्यांच्या आजेसासूने तो हार त्यांच्या गळ्यात घातला होता. पिढीजात चालत आलेली ठेव माझ्या घरातून हरपली, याचं पाटलीणबाईंना दडपण आलं. पाटलांनाही वाईट वाटलं, पण तरीही पाटील संयमानंच परिस्थिती हाताळत होते. ते ललिताकडे पाहून म्हणाले,
 
 
“सूनबाई, त्या तुमच्यानंतर आलेल्या असल्या तरी मानानी मोठ्या जाऊबाई आहेत. त्यांच्यावर ठपका नका लागू देऊ. काय पुरावा चपलाहार त्यांनी माहेरी दडवल्याचा?”
 
 
ललिताने आधीच योजना बनवून ठेवली होती. सखुबाईला तिनं पढवून ठेवलं होतं. खरं तर सखुबाई इमानी. अनेक वर्षांपासून पाटलाच्या घरी काम करणारी. पण तिच्या दोघी पोरी ललिताच्या माहेरी, देशमुखांच्या हद्दीत नांदायला होत्या. पोरींना काही तकलीफ व्हायला नको म्हणून ती अशी बेइमानी करायला तयार झाली होती. ललिताने पढवल्याप्रमाणे ती पुढे आली आणि म्हणाली,
 
 
“माफी असावी सरकार! पन मी लक्ष्मीताईंना समदे डाग पिशवीत दडवतांना सोत्ताच्या डोळ्यांनी पाह्यलंय.. मी त्यांना इचारल्यावर त्या मला म्हनल्या,
 
 
तू नोकरमानूस! तुला काय करायचंय? तू तुझ्या पायरीनी वाग. मी थोरली सून हाये घरची. मला तू कोन इचारनार? मग म्या काय म्हननार?”
 
 
सखुबाईचं बोलणं ऐकल्यानंतर लक्ष्मी तिच्याकडे स्तिमित होऊन बघत राहिली.
 
 
घर फिरलं की घराचे वासही फिरतात, हे ती ऐकून होती पण आज प्रत्यक्षात तिने हे घडताना पाहिलं खरं. इतका वेळ काहीच न बोलणारा तापट डोक्याचा थोरला अचानक पुढे झाला आणि लक्ष्मीच्या हाताला धरून त्यांना तिला दिंडी दरवाजाकडे ढकलली,
“तू लाज आणली आम्हाला! आजपतोर या वाड्यात असे तमाशे कधी झाले नव्हते. शेवटी तू तुझी लायकी दाखवली. तुला पाहिजे होतं तर मला म्हनली असती. मी सोन्याच्या भाराखाली चिणली असती तुला. पन इतका मोठा घात?”
 
 
त्यानं लक्ष्मीला काही बोलायला संधी दिली नाही. पाटील अस्वस्थ होऊन थोरल्याला थांबवू गेले, पण काही कळायच्या आतच ते खाली पडले. त्यांना त्याला सांगायचं होतं,
 
 
’अरे ही माझ्या मैतराची पोर.. त्यानं माझ्या भरूशावर दिली. तिला असं गुरासारखं..?
 
 
पण यातलं काही बोलायला त्यांची जीभ वळत नव्हती. घशातून फक्त बुडबुडेच येत होते.
 
 
हे आकरीत थोरल्याच्या गावीही नव्हतं. लक्ष्मीला नेसत्या लुगड्यानिशी बाहेर घालवायचा त्याने निर्धार केला होता. ढसढसा रडणारी लक्ष्मी आणि तिला उंबर्‍याबाहेर घालवायला आतुर असलेला थोरला केव्हाच दिंडीदरवाजाच्या चौकटीत पोहोचला.
 
 
बाहेर बैलांना चारा घालत असलेला गाडीवान हे सगळं पाहून चक्रावला. पाठीमागे धाडकन बंद झालेल्या दिंडीदरवाजाचा आवाज लक्ष्मीच्या कानापर्यंत पोहोचला, तेव्हाच तिला आता वाड्याचं छप्पर हिरावलं गेल्याची जाणीव झाली. ती मटकन तिथल्या धूळमातीच्या रस्त्यावरच बसली. गाडीवान हे सगळं पहात होता. त्याने आपली मर्यादा न ओलांडता तिला विनंती केली,
“ताईसाब!! तुम्हाला तुमच्या माहेरघरी पोहोचून देतो. खाल्ल्या मिठाला येवढं तर जागलं पायजेल.” त्यानं पुन्हा गाडी जुंपली.
 
 
लक्ष्मीकडे दुसरा इलाज नव्हता. ती गुपचुप गाडीत जाऊन बसली. कालपर्यंत ज्या माहेरघरी मिरवू मिरवू आली, तिथे आज अशा पद्धतीनं जाण्यापेक्षा जीभ हासडून मेलेलं बरं, असं तिला वाटत होतं. पण असलं काही न करता ती एक प्रकारच्या सुन्न अवस्थेत बापाघरी पोहोचली.. म्हणाली,
 
 
“बापा! आता हेच माझं घर. माझं म्हणणारं घर तुटलं.”
 
 
गणपत पाटील तिच्याकडे अविश्वासाने पाहत राहिले. शेवटी बड्या घरचे पोकळ वासे ही जनरीत त्यांना पुरेपूर पटली. आईच्या मायेने त्यांनी तिला पंखाखाली घेतली, तरी त्यांच्या मनात चिरड दाटून आली होती. हतबलता डोळ्यातून वाहत होती. इकडे भिकू पाटलांनाही हा धक्का सहन झाला नाही. त्यांच्या अंगावरनं वारं गेलं.
 
 
वाड्याच्या इतमामाला घरघर लागली ती लागलीच.पाटलीणबाईंची तब्येत वेगाने ढासळत गेली. श्रावणाच्या तिसर्‍या सोमवारी त्या निजधामास चालत्या झाल्या. लेकींना माहेर परकं झालं. थोरला तापट होता, पण हळवाही तितकाच होता. एकुटवाणी पोरं त्याने आजोळी पाठवून दिली. पाटील अंथरुणावर पडले होते. त्यांची सेवा हेच त्याने आपल्या आयुष्याचं ध्येय मानलं.
 
 
धाकटा वकील वकिली डावपेच घरातही वापरू लागला होता. अर्थातच ललिताच्या प्रभावानेच.
 
 
पण संचित हाही एक प्रकार असतो. निष्पाप लक्ष्मीला फसवून दडपलेला चपलाहार ललिता उजळ माथ्याने कधी घालू शकली नाही. तो चपलाहार तिने गाडग्यात घालून तिच्या खोलीत आत पुरून ठेवला होता.
 
 
कधीतरी नवर्‍याच्या संगनमताने तो चपलाहार मोडून दुसरा डाग घडवायचा तिने विचार केला. पण खोदल्यानंतर सरसरत गेलेल्या भुजंगाने तिला त्या गाडग्याला स्पर्शही करू दिला नाही.
 
 
त्या दिवशी भुजंगाच्या दर्शनानंतर ललिता वेड्यासारखं वागू लागली. दिवसेंदिवस तिचं वेड वाढत गेलं आणि एक दिवस या वेडाच्या भरातच तिने स्वत:ला घासलेट ओतून जाळून घेतलं.
 
 
तिच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी आयाबाया जमा झाल्या. सवाशीण म्हणून शेवटची अंघोळ घालताना त्यांना कसलासा आवाज आला. अंगाला चिकटलेले कपडे काढताना येणारा छनछन आवाज जास्तच स्पष्ट आला. तिच्या लुगड्याच्या ओच्यात कसलेला, धुराने काळा पडलेला एक बटवा बायकांना दिसला. तो आवाज त्या बटव्यातूनच येत होता. तिच्यात ललिताने तिचे सगळे डाग लपवून ठेवलेले होते. हे तेच डाग होते, ज्यांच्या चोरीचा आळ तिने लक्ष्मीवर घेतला होता. ही चोरी बाहेर फुटताच धाकटा मरून पाणी झाला. थोरल्याच्या नजरेला नजर न देता वावरत राहिला. ललिताची ही करणी पाहून थोरल्याचे डोळे उघडले.
 
 
वाड्याची पोरकी झालेली ओसरी, रिकामा झालेला गोठा, दुष्काळाने करपलेली द्राक्षबाग पाहून खर्‍या अर्थाने आपल्या हातून काय अघटित घडलं, याची जाणीव त्याचं काळीज कापत गेली. तो उघड्या डोळ्यांनी वाड्याची ढासळणारी पत बघत होता. घरच्या लक्ष्मीला हाताला धरून हुसकून दिल्यामुळे ही वेळ आली असेल का? अनेक विचार येऊन त्याला उपरती होई, पण कदाचित वेळ निघून गेली होती.
 
 
एक दिवस पाटलांच्या घशातून घरघर ऐकू यायला लागली, तशी वाड्यातली नोकरमाणसं सावध झाली. थोरल्याला कळून चुकलं की, आता या वाड्याचा एक भक्कम खांब निखळून पडतो आहे. ललिता गेल्यानंतर कायमचं शहरात राहायला गेलेल्या धाकट्याला वर्दी गेली. लेकीबाळींना निरोप गेले. सगळे येईपर्यंत पाटलांनी जीव श्वासात बांधून ठेवला होता. थोरला उशाशी बसून राहिला होता. पाटलांनी थोरल्याला खुणेने आणखी जवळ बोलावलं आणि हलक्या आवाजात मोठ्या कष्टाने त्यांनी त्यांची शेवटची इच्छा सांगितली.
 
 
ते तेवढं बोलल्यानंतर पाटलांना धाप लागली. लेकीबाळी दिंडीदरवाजात दिसल्यानंतर पाटलांच्या डोळ्यातल्या वाती विझत गेल्या.
लोक म्हणत, पित्तरपाटात गेलं पाटील. खरा पुन्यवान मानूस व्हता. आता त्या वाड्यात जाऊशी वाटायचं नाही. काय राबता व्हता येकेकाळी. आता जशी राक्षसीन भूस कांडती तिथं. येकबी बाईमानूस नाई, पाटील आन पाटलीनबाई नाई. येक मेली सोत्ताच्या कर्मानं, दुसरी यांनी घालवून दिली. पनौतीच लागली बघा वाड्याला. आख्खा वनवास थोरल्या पाटलाच्या नशिबात. पोरं बिचारी उघडी पल्डी..बिना आईची लेकरं..पैशाला काय करता? आईचा हात फिरला की पोट भरल्यावानी वाटतंय.. काय करतील तर करो.
 
 
सगळं जसं जसं कानावर येत होतं, तसं तसं थोरल्याची हिंमत गोळा होत होती. त्याने पाटलांची शेवटची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं.
 
 
लक्ष्मीच्या गावी जाऊन तिला पुन्हा मानाने इथे घेऊन यायचं, तिची माफी मागायची आणि या घरावर असलेला तिचा कुंकवाचा हक्क पुन्हा लागू करायचा, हे त्याच्या मनानं पक्कं घेतलं होतं. पुन्हा एकदा वाडा हसता खेळता होणार, पुन्हा एकदा वाड्यामध्ये बाईचा हात फिरणार, पोरांचं पोरकेपण संपणार, वाड्याच्या लेकींना हक्कानं माहेरपण करणारं माणूस मिळणार.. त्याला त्या विचाराने खूप बरं वाटू लागलं.
 
 
लक्ष्मीला माहेरी घालवण्याला वर्ष-दीड वर्षं होऊन गेलं होतं. ती कशी आहे? काय करते? याचा त्याने मधल्या काळात तपासच केलेला नव्हता. तिच्या माहेरूनही कोणी घडल्या प्रकाराबद्दल जाब विचारायला म्हणून आलं नव्हतं. एखादं भलबुरं स्वप्न पडावं आणि दिवसाचा गोंडा उगवला की ते मागे पडावं, असं काहीतरी लक्ष्मीच्या त्या थोड्या काळातल्या सहवासाबद्दल झालं होतं. इतके दिवस पाटलांची शुश्रुषा करण्यात त्याला तिच्या नसण्याची धग तितकीशी जाणवली नव्हती. पाटलीणबाई गेल्या, ललिताचं ते विचित्र आजारपण, ती गेल्यानंतर धाकट्याचं पोरांना घेऊन शहरात निघून जाणं, अंथरुणावर पडलेल्या पाटलांची देखरेख या दुष्टचक्रात त्याला लक्ष्मीबद्दल विचार करायला वेळही मिळालेला नव्हता. या काळात वाड्यातली शांतता पोळून निघाली होती. आता घरात फक्त थोरला आणि काही नोकरमाणसं शिल्लक होती.
 
 
भलामोठा वाडा एकट्याला भेव दाखवीत होता. थोरल्याला हे सगळं असह्य झालं. पश्चात्तापाचे अश्रू उसं भिजवीत होते.
 
 
कशाचा एवढा माज होता आपल्याला? आपकमाईने मिळालेल्या पदाचा? की बापकमाईने मिळालेल्या पैशाचा? ती काहीच करू शकत नव्हती हे माहीत होतं, म्हणून तिच्यावर हात उचलायची हिम्मत केली आपण. तिची चूक होती की नव्हती हे सांगायची संधीसुद्धा दिली नाही. ललिता असं वागली असती, तरी तिच्या माहेरची देशमुखी आठवून तिचा बिनधास अपमान करायची हिम्मत झाली नसती कोणाची. आपणच आपल्या बायकोला गरीब म्हणून तिला वाटेल तसं बोललो. पहिल्या कारभारणीच्याच आठवणीत राहिलो. पण यात लक्ष्मीचा काय दोष?
 
 
उलटसुलट विचारांमध्ये रात्र हरवत चाललेली. आढ्याच्या तुळयांमध्ये त्याला लक्ष्मीचा निरागस रडवेला चेहरा दिसत राहिला. दुसर्‍या दिवशी पहाटेच थोरला गाडी करून लक्ष्मीच्या गावी गेला.
 
 
लक्ष्मीचं म्हणजेच गणपत पाटलाचं घर पडझड झालेलं होतं. एक खोली कशीबशी शाबूत होती. तिथे थोडीशी जाग दिसत होती. उरल्या जागेत मोठे मोठे गवताचे दोन दोन हात वाढलेले तुरे उगवलेले. त्या बाजूला बर्‍याच दिवसापासून कोणी राहत नाही असं वाटत होतं. त्या शेजारच्या एका खोलीत लक्ष्मी कशीबशी दिवस काढत असणार. थोरल्याला याची जाणीव होऊन पोटात तुटलं. हुरदं दाटून आलं. त्याने हिंमत गोळा करून भरल्या गळ्यानं आवाज दिला.
 
 
“कोन आहे का?”
 
 
आतून एक अनोळखी बाई आली. त्यानं तिच्याजवळ लक्ष्मीची चौकशी केली. तिने जी हकीगत सांगितली, त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे न कळून थोरला बधिर अवस्थेत चालत परत गाडीत बसला.
 
 
लक्ष्मी माहेरी आल्यानंतर कुठे चार ठिकाणी कामधाम करून राहत होती. बापाचं दुखलंखुपलं बघत होती. पण ती अशा पद्धतीने माहेरी आल्याचा धसका सहन न होऊन अवघ्या काही महिन्यांतच गणपत पाटील यांनी जीव सोडला होता. एकटी लक्ष्मी कुणाच्या आधाराने राहणार होती? अखेर तिच्या मामाने एका म्हातार्‍या बिजवराशी तिचा मोहतर लावून दिला. एक छप्पर आणि गळ्यात दोन काळे मणी एवढीच अपेक्षा करणारी लक्ष्मी आता शब्दश: तेवढ्याच आधारावर राहत होती. कुणाच्या तरी दुसर्‍याच्या बांधावर सावडीवावडी कामाला जात होती. तिथे गडगंज पैसाअडका नव्हता, पण संपत्तीचा तोरा मिरवत तिला तिथून हाकलणारं कुणी नव्हतं. ताटात अर्धी भाकरी असेल, पण ती सन्मानाची होती.
 
 
आपण काय गमावलंय याची दुखरी जाणीव होऊन थोरला रिकाम्या हाताने वाड्यात परतला.
 
 
कितीतरी वर्षं सरली..
 
 
वाड्याच्या उंबरठ्याशी इमान राखणारी पिढी मातीआड गेली. पुढची पिढी मोठ्या मोठ्या स्वप्नांचे पंख लावून वाड्याबाहेर, गावाबाहेर, तालुक्याबाहेर गेली.
 
 
गाडग्यात पुरलेला चपलाहार अजूनही तिथेच आहे. त्याच्यावर विराजमान असलेला भुजंग थोरल्याला कधीतरी दिसत असतो. एका हाराच्या मोहापायी घडलेल्या पडझडीची आठवण देतो..
 
--------------------------