पाथेय

24 Nov 2023 16:15:03

vivek 
हरीजींचे व्यक्तिमत्त्व म्हणजे तल्लख स्मृती, अध्ययन, व्यासंग, अन्वय लावण्यातली तार्किकता, दहा भाषांचे जाणकार असल्याने संदर्भाची समृद्धी, सतत वाचनातून आलेली अद्ययावतता, एखादी गोष्ट माहीत नसेल तर ते कबूल करण्यातला मोकळेपणा असे लोभस मिश्रण होते. त्यांच्या दोन दिवसीय भेटीत बोलता बोलता त्यांनी आमच्या विचारांना दिशा दिली, नवे अभ्यास विषय सुचवले, हे पाथेय घेऊन त्यावर काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली!
2016-17ची गोष्ट आहे. शबरीमला मंदिरात दहा ते पन्नास वयोगटातील महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा गाजत होता. 1500 वर्षांच्या परंपरेला कोर्टात आव्हान दिलेले होते आणि या परंपरेला धक्का लावू नये, म्हणून मोठ्या प्रमाणावर केरळी समाज, राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले होते. त्यात ‘रेडी टु वेट’ म्हणत महिला मोठ्या प्रमाणात होत्या. याबद्दल मी सा. विवेकमध्ये एक लेख लिहिला होता. त्यात विविध धर्म, त्यांच्या स्त्रीविषयक, मासिक पाळीविषयक धारणा, धर्मप्रणेते पुरुष, पुस्तके यांचा प्रभाव, आजही धर्मस्थळांचा व्यवहार पाहणारे पुरुष, व्यवस्थापनात महिलांचे प्रतिनिधित्व नसणे, मंदिरांचे आर्थिक गणित असे विविध मुद्दे मांडले होते. ‘विविध धर्मांनी वेळोवेळी मानवताविरोधी, विशेषत: महिलाविरोधी, जीवनाविरोधी, शांतीविरोधी, विज्ञानविरोधी, तर्कविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. आजच्या विज्ञानयुगात धर्माच्या नावाखाली चालणार्‍या अधर्माच्या विरोधात आवाज उठवावा लागेल. धर्माचा आधार घेऊन सर्जनशक्तीची व मातृशक्तीची जी अवहेलना होते, त्याची परखड समीक्षा करावी लागेल. समानतेवर आधारित धर्माची नव्याने मांडणी करावी लागेल’ असा त्या लेखाचा आशय होता.
 
 
तो लेख वाचून मा. हरीजींचा फोन आला. ते लेख आवडला म्हणाले, म्हणजे त्यातली माझी भूमिका त्यांना पटली असावी. एक ज्येष्ठ अभ्यासक व्यक्ती इतक्या मनमोकळेपणाने आपल्या लिहिण्याची दखल घेते, हे फारच अद्भुत होते. त्यातही एका संवेदनशील विषयावर त्यांच्या वयाच्या, सामाजिक स्थानाच्या, केरळच्या पार्श्वभूमीच्या पलीकडे जाणारी भूमिका घेणे हे दुसरे आश्चर्य होते. तिसरे आश्चर्य होते त्यांनी मराठीमधला लेख वाचला होता. तोपर्यंत मा. रंगा हरीजी हे संघाचे ज्येष्ठ प्रचारक याव्यतिरिक्त मला त्यांच्याविषयी फार माहिती नव्हती. या फोननंतर मला व अश्विनीला प्रकर्षाने वाटले की, हरीजींना भेटले पाहिजे. हिंदू धर्म, स्त्रिया याबद्दल चर्चा करायला हवी, आपल्या शंकांचे निरसन करायला हवे. तो योग जुळून आला जुलै 2017मध्ये. मी व विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर दोघींनी जायचे ठरवले. मग स्त्री शक्तीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मा. निर्मलाताई आपटे, डॉ. मनीषा कोठेकर, डॉ. जयश्री यांनीही यायचे ठरवले आणि दोन दिवसांची वैचारिक मेजवानी ठरलेली ती प्रदीर्घ भेट 22 व 23 जुलैला घडली. अनेक विषयांवर बोलणे झाले, अनेक शंकांचे निरसन झाले, विचारांना स्पष्टतेचे टोक आले.
 

vivek 
 
त्या दोन दिवसांत स्त्रियांचे हिंदू धर्मातले, विविध काळातले समाजातले स्थान, त्यांची व्यक्तिमत्त्वे, क्षमता, रामायण-महाभारतातल्या स्त्रिया, मातृसत्ताक-पितृसत्ताक समाज, सवर्ण-अवर्ण रचना, सध्याचे स्त्रियांचे समाजामधले स्थान व स्थिती अशा अनेक विषयांवर कसलाही आडपडदा न ठेवता बोलणे झाले. आमच्या धर्मविषयक, स्त्रीविषयक कल्पना स्पष्ट व्हायला, प्रचलित समजुती स्वच्छ व्हायला, त्यांचा अन्वय लावायला व कालसुसंगत मांडणी करायला या गप्पांची मोलाची मदत झाली. ते पाथेय आमच्या जाणिवांमध्ये मुरले आहे, मुरते आहे व भूमिकांमध्ये अभिव्यक्तही होते आहे.
 
 
शबरीमलाच्या निमित्ताने स्त्रियांचा मासिक धर्म, त्याला चिकटलेले अशास्त्रीय समज, अशुद्धतेचे संकेत व प्रथा, कोर्टाचा निर्णय, सुरू असलेले आंदोलन हा विषय गप्पांमध्ये निघणे अपरिहार्य होते. आजही स्त्रियांची मासिक पाळी म्हणजे ‘अळीमिळीगुपचिळी’चा प्रकार आहे. द्रौपदी वस्त्रहरण प्रसंग, तिची रजस्वला स्थिती यांची चर्चा होते, पण तेव्हा किंवा सीता चौदा वर्षे वनवासात राहिली, त्या काळात मासिक पाळीबाबत शुद्ध-अशुद्धतेचे असेच निकष, नियम होते का? त्यांना धार्मिक, धर्मग्रंथांचा आधार आहे का? अशी शंका आमच्या मनात होती. तसे संदर्भ मला आढळले नाहीत हे तर ते म्हणालेच व त्यांचा दृष्टीकोनही मांडला. हिंदू धर्म हा केवळ श्रद्धेवर आधारलेला नाही. ‘सत्याचा शोध’ ही आपली मूळ अवधारणा आहे. ख्रिस्ती, मुस्लीम हे धर्माबाबत प्रश्न विचारू शकत नाहीत. सत्य - मग ते लौकिक असो वा आध्यात्मिक, कधीही विज्ञानाच्या विरोधी असू शकत नाही. जेव्हा अय्यप्पा मंदिरातल्या 41 दिवसांच्या व्रताची चर्चा झाली असेल, तेव्हा तिथे कोणी महिला असती तर तिने नक्कीच सांगितले असते की या व्रताचे पालन करणे आम्हाला शक्य नाही. स्त्रियांचा आर्तव काळ ही नैसर्गिक घटना आहे, त्यात अशुद्धी कशी असेल? जोपर्यंत तिच्यामध्ये ही क्षमता आहे, तोपर्यंत ती सर्जनशक्ती तिच्यात आहे, हा वैज्ञानिक विचार करावा लागेल. तो ज्यांच्याजवळ नाही, ते जुन्या प्रथांना कवटाळून बसतील. पण आजच्या स्त्रिया तो विचार नक्कीच करू शकतात.
 
 
आज पाळीबद्दलच्या पूर्वीच्या अनेक जुनाट प्रथा व कल्पना पुसल्या गेल्या आहेत. कदाचित देवळात जाणे, पूजा करणे, देवपाशी दिवा लावणे अशा काही गोष्टी सोडल्या, तर या काळातही स्त्रिया घरातली अनेक कामे करतात, नोकरीवर जातात. हा बदल कोणी घडवला? हिंदू समाजाने घडवला. लिंगायत, शीख समूह, रामकृष्ण आश्रमासारख्या आध्यात्मिक संस्था या कल्पना मानत नाहीत. एखाद्या झाडाला फुलोरा यावा, मग फळधारणा व्हावी तीच ही प्रक्रिया आहे, तितकीच नैसर्गिक आहे. शबरीमला मंदिरातल्या प्रवेशाच्या निमित्ताने हिंदू समाजाने वैज्ञानिकतेची कास धरावी. त्यांनी अर्वाचीन काळातले एक उदाहरणही दिले ते विवेकानंद व निवेदितांचे. दीक्षा घेतल्यानंतर विवेकानंद व भगिनी निवेदिता अनेक महिने भारतभ्रमण करत होते. वैष्णोदेवीपासून अनेक मंदिरांना त्यांनी भेट दिली. पण त्या संपूर्ण प्रवासाच्या तपशिलात या विषयामुळे अडथळा आल्याची वा कार्यक्रमात बदल केल्याची नोंद नाही. महिलांच्या सन्मानासाठी, सहभागासाठी समाजाला वेगळा विचार करावा लागेल आणि हे नक्की घडेल, प्रागतिक व वैज्ञानिक दृष्टीमुळेच हिंदू समाजाचा विनाश होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या विषयावरच्या त्यांच्या लेखनामुळे सोशल मीडियावर ते कसे ट्रोल होताहेत, नास्तिक ठरवले जात आहेत हेही त्यांच्या नर्मविनोदी शैलीत त्यांनी सांगितले होते.
 
 
vivek
 
भारताच्या प्राचीन संस्कृतीचे त्यांनी काही कालखंड केले होते. त्यांच्या मते प्रथम कालखंड म्हणजे वैदिक व उपनिषदांचा काळ. यातले महिलांचे स्थान आजही महिलांसाठी, समाजासाठी अनुकरणीय आहे. दुसरा कालखंड हा रामायण व महाभारत काळ. या काळात महिलांच्या स्थानात बदल झालेला दिसतो. तिसरा पुराणांचा कालखंड (200 AD) हा काळ महिलांसाठी विपरीत आहे. महिलांबाबतच्या धारणांवर परिणाम झालेला दिसतो. भागवताने द्रौपदीचे स्थान कलुषित केले, कलंकित केले असे मत त्यांनी व्यक्त केले होते. चौथा कालखंड हा मुस्लीम आक्रमणाचा. या आक्रमण काळात समाज, धर्म, महिला, मालमत्ता यांच्या सुरक्षेची वेगळी आव्हाने उभी राहिली. पाचवा कालखंड औपनिवेशिक म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा. या काळात शिक्षण, कुटुंबव्यवस्था व आर्थिक आव्हाने गंभीर झाली. सहावा कालखंड हा समकालीन सुधारणांचा आहे. विरोधाभास व मतभेद (Contradiction & Controversy ) यांना बाजूला ठेवून या सर्व काळाचा अभ्यास केला पाहिजे.
 
 
पुराणकाळातल्या त्रुटी वेदकालावर थोपवल्या जातात. विविध कालखंड व त्यांची परिमाणे, मिती वेगळी आहेत हे लक्षात घ्यायला हवे. (Parallax Error) भौतिकशास्त्रात लंबन त्रुटीचा नियम आहे. दोन वेगळ्या ठिकाणांहून एकच वस्तू पाहिली, तर तिची स्थिती समान दिसत नाही. धावत्या गाडीतून जाताना लांबची वस्तू जवळ येताना दिसते, जवळची वस्तू दिसत नाही, तीच भूमिका भारतीय स्त्रियांच्या बाबतीत विचार करताना ठेवायला हवी. गोष्टी समतल दिसायच्या असतील तर दूरचा वैदिक काळ पाहिला पाहिजे. वेद-उपनिषदांमध्ये स्त्री व पुरुष यात भेद नाही. गत दोन हजार वर्षांतल्या स्थितीचा अन्वय लावताना मूळची भारतीय दृष्टी, दर्शन व काहींनी काढलेले निष्कर्ष यात फरक केला पाहिजे. तो अन्वय वास्तविकतेवर आधारित असावा, आपल्या कल्पनांवर व समजांवर बेतलेला नसावा हे महत्त्वाचे. प्राचीन भारतीय दृष्टी आणि काढले जाणारे निष्कर्ष यात भिन्नता नसावी, त्यासाठी उपलब्ध ग्रंथ मुळातून वाचावेत, कला, साहित्य, भाषा, शब्दांची व्युत्पत्ती, तर्क व विज्ञान यांचा उपयोग करणे गरजेचे आहे.
 
 
मला फार आश्चर्य वाटले ते एक प्रगाढ अभ्यासक नोंदींचा अन्वय किती वेगवेगळ्या प्रकारे लावू शकतो याचे, ही प्रगल्भता थक्क करणारी होती.
 
 
त्यांनी सांगितलेला दुसरा संदर्भ शूर्पणखेचा. लक्ष्मणाने तिचे नाक कापले, तिने रावणाकडे तक्रार केली, त्याने बदला घेण्याचा निश्चय केला ही आपण ऐकलेली प्रचलित गोष्ट! उलट शूर्पणखा थेट रावणाच्या दरबारात धडकते. त्याची गुप्तहेर व्यवस्था अकार्यक्षम असल्याबद्दल रावणाची कानउघाडणी करते. आज रामायणातल्या शूर्पणखा, शबरी यासारख्या काही व्यक्तिरेखांना ‘मार्जिनलाइज्ड’ म्हणजे शोषित, दलित, पीडित दाखवून रामासारख्यांनी म्हणजे प्रस्थापितांनी त्यांच्यावर अन्याय केला, असा त्याचा अर्थ लावला जातो. वाल्मिकी रामायणात मात्र असा उल्लेख नाही, हे त्यांनी सांगितले होते. तिचे नाक कापण्याची घटना चित्रकूटमध्ये घडते. तिथून तिला लंकेत रावण दरबारात पोहोचायला लागलेला वेळ पाहता ती जखम बरी झाली असेल ही शक्यता तार्किक आहे. शबरीची क्षमता, ज्ञान, राज्यकारभाराची समज व वाक्पटुत्व आजही थक्क करते.
 
 
अहल्येच्या उद्धाराची कथाही प्रचलित कथेपेक्षा वेगळी आहे. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ या श्लोकात कर्नाटक, आंध्र, तामिळनाडूत ‘कर मूलेतुगोविंद’ऐवजी ‘सीतागौरी’ म्हटले जाते, असे अनेक संदर्भ त्यांच्या बोलण्यात आले. दोन दिवसांच्या या गप्पा म्हणजे एकातून पुढचा विषय निघत जावा, तशा विकसित होत गेलेल्या गप्पा होत्या. त्याला विषयाची कठोर आखीवरेखीव चौकट नव्हती, तरीही निश्चित दिशा होती ती भारतीय संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यात स्त्रियांची परिस्थिती कशी होती याची. काळाचा पटही हजारो वर्षांचा, कधी इसवी सनामागे दहा-बारा हजार वर्षे जाणारा, तर कधी काळाच्या या पुढच्या सावध हाका ऐकणारा! त्यात भारताच्या संदर्भाने कुटुंबव्यवस्थेचा विचार येणे साहजिकच होते. बदललेली कुटुंबरचना, आव्हाने, कुटुंबप्रबोधन, नवी मूल्यरचना यावर हरीजींची मते त्यांच्या वयाच्या, स्थानाच्या व काळाच्याही पुढची होती. त्यांचे विचार व तत्त्वचिंतन आधुनिक होते.
 
 
आजच्या महिलेची समाजातली भूमिका, तिच्या आकांक्षा व त्याला पूरक घररचना यांचा विचार केला जात नाही. मुलांचे पालकत्व, घरकामाची विभागणी यांचा कालानुकूल विचार, प्रत्यक्ष समानता आधारित व्यवहार, अधिकारांची जोपासना ही काळाची गरज आहे. कौटुंबिक एकात्मतेच्या आधारावर, अपरिवर्तनीय मूल्यांच्या आधारावर व बदलत्या परिवेशाचा विचार करून कुटुंबप्रबोधनाचा व राष्ट्रीयतेच्या प्रश्नांचा विचार व्हायला हवा. कुटुंबप्रबोधन विषयात हे नवे विषय असायला हवेत. आदर्श हिंदू परिवार, आदर्श हिंदू घर म्हणजे फक्त तुळशीचे रोप, रांगोळी व संस्कार नव्हेत. धर्माने उभे केलेले प्रश्न, सरोगसीसारखे विज्ञानाने उभे केलेले प्रश्न, सामाजिक प्रश्न वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकरून सोडवायला हवेत. चर्चा करून कुटुंबव्यवस्थेसमोरच्या आव्हानांना भिडले पाहिजे. त्यात काही विरोध करणार नाहीत, गप्प राहतील, कृती करणार नाहीत. साहित्यात, कला क्षेत्रात परिवर्तन व्हावे, पुरुषप्राबल्य कमी व्हावे, महिलांच्या दृष्टीकोनातून लेखन व्हावे. कला, सादरीकरण हे माध्यम प्रभावी आहे. चित्रपट व सर्वच कलांमध्ये मूल्य दिसावीत.. असे अनेक मुद्दे त्यांच्या बोलण्यात आले.
 
 
हरीजींचे व्यक्तिमत्त्व म्हणजे तल्लख स्मृती, अध्ययन, व्यासंग, अन्वय लावण्यातली तार्किकता, दहा भाषांचे जाणकार असल्याने संदर्भाची समृद्धी, सतत वाचनातून आलेली अद्ययावतता, एखादी गोष्ट माहीत नसेल तर ते कबूल करण्यातला मोकळेपणा असे लोभस मिश्रण होते. बोलता बोलता त्यांनी आमच्या विचारांना दिशा दिली, नवे अभ्यास विषय सुचवले, हे पाथेय घेऊन त्यावर काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली!
 
 
सादर वंदन!
 
nayanas63@gmail.com

लेखिका भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या
राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
Powered By Sangraha 9.0