जिव्हारी लागणारा पराभव, तरी संघ कौतुकास पात्र!

22 Nov 2023 12:21:44
पहिले 10 सामने या स्पर्धेत भारतीय संघासाठी फारसं काही चुकलंच नव्हतं. पण एका सामन्याने घात केला. यालाच क्रिकेट म्हणतात, कारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. रोहित आणि त्याच्या संघाने मागचा दीड महिना क्रिकेट चाहत्यांचं निखळ मनोरंजन केलं आहे आणि त्यासाठी हा संघ कौतुकास पात्र आहे. एक सामना गमावला म्हणून हे कौतुक कमी होणार नाही.

vivek
 
रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या सामन्यातील शेवटची काही षटकं बाकी होती. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडच्या शतकानंतर सामन्याचं चित्र बर्‍यापैकी ठरलेलं होतं. तेव्हापासूनच विराट कोहलीच्या डोळ्यांतील दु:ख लपत नव्हतं. फक्त त्याचा चेहरा धीरोदात्त होता. विराटच्या चेहर्‍यावर ज्याची छाया पसरली होती, तो पराभव आणखी काही षटकांनंतर प्रत्यक्षात आला. 9 साखळी सामने आणि उपान्त्य सामना प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व राखून जिंकल्यानंतरही अंतिम सामन्याचं दान भारताच्या विरोधात पडलं आणि खेळाडूंचा बांध फुटला. महम्मद सिराज मैदानातच रडत होता, बुमरा त्याचं सांत्वन करताना दिसला. रोहीतचे खांदे पडले होते. के एल राहुलने मैदानातच बैठक मारली. तर विराटने टोपीत आपला चेहरा लपवला.
 
 
अहो! मैदानात जमलेले 1.4 लाख प्रेक्षक दु:ख पचवू शकत नव्हते, तर खेळाडूंचं काय होईल? यातल्या निम्म्या खेळाडूंना मनातून माहीत होतं की, हा आपला शेवटचा विश्वचषक आहे. चार वर्षांनंतर कुणी पाहिलंय? त्यामुळे त्याचं दु:ख आणखी मोठं होतं.
प्रशिक्षक राहुल द्रविड यांना खेळाडू म्हणून 2003मध्ये एकदा चषकाने हुलकावणी दिलेली होती. मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याचा वचपा काढावा, तर पुन्हा तेच झालं. साखळी सामने निर्विवाद जिंकणारा भारतीय संघ अंतिम फेरीत मात्र पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला.
 
 
त्यातही आताचा पराभव जास्त जिव्हारी लागणारा. कारण, 2003मध्ये भारतीय संघाकडून स्पर्धेआधी विजेतेपदाची अपेक्षा कुणी केली नव्हती. आणि साखळी सामन्यांनंतरही सचिन, सौरव, राहुल, सेहवाग यांच्या संघाला कुणी हरवू शकेल तर तो ऑस्ट्रेलियन संघ, असं बोललं जात होतं. पण या वेळी सगळंच भारताच्या बाजूने होतं. घरचं मैदान होतं, खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी 1.4 प्रेक्षकांनी भरलेलं स्टेडिअम होतं, खेळपट्टी भारताला साजेशी असेल असा अंदाज होता आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे 9 साखळी सामन्यांमध्ये आणि उपान्त्य लढतीत एकदाही सर्वबाद न झालेला आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र किमान सहा वेळा गारद केलेला भारतीय संघ होता. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला पहिल्याच साखळी सामन्यांत आपण 199 धावांत रोखलं होतं आणि उपान्त्य सामन्यात द. आफ्रिकेनेही त्यांची परीक्षा पाहिलेली. म्हणजेच आताचा ऑस्ट्रेलियन संघ 2000च्या दशकासारखा अजिंक्य नव्हता.
भारतीय संघ मात्र अजिंक्य असल्यासारखा खेळत होता. 9 साखळी सामन्यांत भारताने पहिली फलंदाजी केली असेल तर त्यांचा विजयाचा फरक सरासरी 150 धावांचा होता.. म्हणजे त्यांनी सरासरी 150 धावांनी प्रतिस्पर्ध्यांना हरवलं होतं. आणि दुसरी फलंदाजी केली तर सरासरी 65 चेंडू राखून त्यांनी विजय मिळवला होता. इतकं वर्चस्व सलग 10 सामने कोण राखतं? इतकं सातत्य असलेला संघच अंतिम फेरी जिंकेल. असा सगळ्यांचा होरा होता.
 

vivek 
 
पण अंतिम सामन्यात सगळं विपरीत घडत गेलं. खेळपट्टीच्या बाबतीत तर आपणच विणलेल्या जाळ्यात आपण अलगद अडकलो की काय, अशी परिस्थिती होती - म्हणजे खूप जास्त रोलर फिरवलेली ही खेळपट्टी दुपारी अत्यंत संथ होती, रात्री मात्र चेंडू आरामात बॅटवर येत होता आणि तिच्यातला स्विंगही कमी झाला. महम्मद शामीचे चेंडू जे पहिल्या दहा षटकांत स्विंग झाले, ते पुढे होईचनात. फिरकी गोलंदाजांचे चेंडूही पुरेसे वळेनात. आणि मग ऑस्ट्रेलियन फलंदाजांचं काम सोपं होत गेलं.
 
 
आणि ऑस्ट्रेलियन संघ खेळलाही विजेत्याच्या थाटात. त्यांना याचे पूर्ण गुण द्यावेच लागतील. सामन्या आधीच्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन कर्णधाराला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, “1.4 लाख भारतीय समर्थकांसमोर खेळताना दडपण येईल का?” तर तो उद्गारला, “1.4 लाख प्रेक्षकांना गप्प करून सामना जिंकण्यात खरी मज्जा येईल. मला ते करायला आवडेल.” त्यांचा मुख्य गोलंदाज मिचेल स्टार्क खरं तर संपूर्ण स्पर्धेत फॉर्ममध्ये नव्हता. पण उपान्त्य फेरी जिंकल्या जिंकल्या तो म्हणाला होता, “आमचे खेळाडू स्पर्धेत योग्य वेळी पूर्ण क्षमतेनं खेळ करत आहेत. आम्ही अंतिम सामन्यासाठी तयार आहोत.”
 
 
ही विजेत्यांची भाषा आहे. ही जगज्जेत्यांची देहबोली आहे. ती ऑसी खेळाडूंना जमली. मैदानावरही त्यांनी तसाच खेळ केला. नाणेफेक जिंकल्यावर मिचेल स्टार्क, हेझलवूड, डम झँपा आणि पॅट कमिन्स यांनी अचूक आणि भारतीय खेळाडूंचे कच्चे दुवे ओळखून गोलंदाजी केली. पॅट कमिन्सने विजेत्याला शोभतील अशा जोखीम पत्करल्या. रोहितला लय सापडलीय आणि तो फटकेबाजी करतोय म्हटल्यावर त्याने नवव्या षटकातच ग्लेन मॅक्सवेलला आणलं. ही सगळ्यात मोठी जोखीम होती. पण रोहीत या जाळ्यात अडकलाच. शिवाय क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवतानाही कमिन्स आक्रमक होता. त्याला बळी हवे होते, एकेरी-दुहेरी धावांचं सुरुवातीला त्याला काही पडलं नव्हतं. स्टार्क आणि हेझलवूड यांनी गोलंदाजीही सुरेख केली. त्यांचं क्षेत्ररक्षण लाजबाब होतं आणि भारताचे पहिले तीन भरवशाचे फलंदाज पहिल्या दहा षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतले. यातल्या एकाचं श्रेय रोहितचा अप्रतिम झेल पकडणार्‍या ट्रेव्हिस हेडचं होतं.
 
 
vivek
 
रोहित आणि शुभमन दोघांचे फटके आततायी होते. पण ती वेळ नाही म्हटलं तरी त्यांच्यावर गोलंदाजांनीच आणली. शेवटी फलंदाजीत फारशी खोली नसलेल्या या संघात विराट आणि राहुलवर बचावात्मक खेळण्याची वेळ आली. इतकी की, 90-90 चेंडूंमध्ये चौकार लागला नव्हता. षटकामागे जेमतेम तीन धावा निघत होत्या. भारतीय फलंदाज या अख्ख्या स्पर्धेत असे दीनवाणे पहिल्यांदाच बघायला मिळाले. खेळपट्टी इतकी संथ की विराटच्या बॅटची आतली कड घेऊन चेंडू उडाला तो स्टंपवर. एरवी तो स्टंपवरून गेला असता. विराट फक्त हतबलपणे उभा होता.
 
 
धावांचा वेग वाढवायचा म्हटलं की, लगेच एक गडी बाद होत होता आणि त्यामुळे धावसंख्या 250च्या जवळही पोहोचू शकली नाही. रात्रीचं दव आणि हवेतील गारवा यामुळे निदान 280 धावा या खेळपट्टीवर व्हायला हव्या होत्या. पण जी जोखीम ऑस्ट्रेलियाने पेलली, तशी कामगिरी निदान अंतिम फेरीत एकाही भारतीय फलंदाजाला करता आली नाही. दोन्ही संघातील हा फरक उठून दिसणारा ठरला.
 
 
241 धावांचं आव्हान ट्रेव्हिस हेड आणि लबुशेन यांची जोडी जमल्यावर खूपच छोटं वाटायला लागलं. पहिले 3 फलंदाज 50 धावांच्या आत बाद करणं शामी आणि बुमराला जमलं. पण त्यानंतर चेंडूही स्विंग होत नव्हता आणि शामीची गोलंदाजी थोडी स्वैरही होती. कुलदीप आणि जाडेजाला तर खेळपट्टीकडून टर्नही मिळत नव्हता आणि मग इथेही ट्रेव्हिस हेडने पत्करलेली जोखीमच यशस्वी ठरली. तो गरज असेल तेव्हा षटकार मारत राहिला. धावा करत राहिला आणि ऑस्ट्रेलियाने 40 चेंडू राखून विजय साध्य केलाय.
 
 
फक्त अंतिम सामन्यातील खेळ हा निकष असेल, तर ऑस्ट्रेलियन संघालाच चषक मिळायला हवा होता, हे निश्चित. भारतासाठी म्हणायचं तर या स्पर्धेतील तो सर्वोत्तम संघ होता. या पराभवानंतरही. साखळी सामने आणि मग बादे फेरीचे सामने हा स्पर्धेचा ढाचा कधीकधी असा जीवघेणा ठरू शकतो. फुटबॉल विश्वचषकात याची प्रचिती अनेकांना आली आहे. तेच भारतीय संघाच्या बाबतीत झालं.
 
 भारतीय संघाच्या बाबतीत असं 2011पासून सातत्याने होतंय. 2011मध्ये भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2015, 2019 आणि आता 2023मध्ये आपण किमान उपान्त्य फेरी गाठलीय आणि या तीन स्पर्धांत मिळून फक्त 5 सामने गमावलेत, पण ते आहेत 2 उपान्त्य फेरीचे आणि एक अंतिम फेरीचा. म्हणजे साखळीत खूप चांगली कामगिरी करूनही बाद फेरीत यशस्वी होण्यात आपण थोडे कमी पडतोय.
 
वाईट या गोष्टीचं वाटतं की, भारतीय संघाच्या बाबतीत असं 2011पासून सातत्याने होतंय. 2011मध्ये भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2015, 2019 आणि आता 2023मध्ये आपण किमान उपान्त्य फेरी गाठलीय आणि या तीन स्पर्धांत मिळून फक्त 5 सामने गमावलेत, पण ते आहेत 2 उपान्त्य फेरीचे आणि एक अंतिम फेरीचा. म्हणजे साखळीत खूप चांगली कामगिरी करूनही बाद फेरीत यशस्वी होण्यात आपण थोडे कमी पडतोय. हे सगळे पराभवही चुरशीच्या सामन्यात झालेले आहेत. राहुल द्रविडसारख्या विचारी प्रशिक्षकाने आणि बीसीसीआयनेही या गोष्टीचा थोडा गांभीर्याने विचार करावा. ऑस्ट्रेलियासारखी विजयी मानसिकता कमी पडतेय की मानसिक कणखरता हे नाही सांगता येणार. पण त्याचा आढावा धेण्याची वेळ नक्की आलीय. कसोटी विजेतेपदातही आपल्याला दोनदा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. विजेतेपदाचं गणित कुठे चुकतंय हे पाहावंच लागेल.
 
 
बाकी भारतीय खेळाडू आपल्या कामगिरीमुळे कौतुकाला पात्र आहेत. आयसीसीचा स्पर्धेतील सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा संघ जाहीर झालाय आणि त्यात सहा भारतीय आहेत. एवढं वर्चस्व या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी राखलंय. रोहित, शुभमन, विराट, श्रेयस, राहुल आणि सूर्यकुमार यांनी आपली भूमिका ओळखून खेळ केला. रोहितने आपल्या नजाकतीने आणि विराटने आपल्या धैर्याने आपली मोहोर उमटवली. रोहितइतका धडाकेबाज सलामीवीर कुठल्याही संघात नव्हता. 11 सामन्यांत त्याने 595 धावा केल्या आहेत. दर वेळी पहिल्या पंधरा षटकांत 7 च्या धावगतीने धावा केल्या आहेत. तर विराटने जबाबदार तिसर्‍या क्रमांकावरील फलंदाजीचा वस्तुपाठच या स्पर्धेत घालून दिला. विराटचा बळी मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या पैजा लागत असणार, एवढं नक्की. पठ्ठ्या कधी विकेट फेकतच नव्हता. एकदा फलंदाजीला आला की 50 षटकं खेळण्याचाच निर्धार त्याच्या देहबोलीत दिसायचा. सातत्य इतकं की, एकदिवसीय क्रिकेटमधील 49वं आणि 50वं शतक करायला त्याला फक्त दोन सामने लागले. यातही एका सामन्यात तो नव्वदीत बाद झाला. 11 सामन्यांत त्याने 765 धावा केल्यात त्या 96च्या सरासरीने. या आकड्यातून त्याचं मोठेपण जाणवतं. एकदिवसीय क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज कोण, याचं या स्पर्धेंने उत्तर दिलं आहे. श्रेयस आणि राहुलने संधी मिळेल आणि संघाला गरज असेल तेव्हा गरजेनुसार फलंदाजी केली. भारतातर्फे सर्वात जलद शतक राहुलचं होतं 62 चेंडूतील आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात सावध खेळणं ही गरज होती, तेव्हा याच राहुलने 60 धावा करायला 116 चेंडू घेतले. समयोचित फलंदाजी म्हणतात ती हीच असावी. जमून आलेल्या फलंदाजांच्या फळीमुळे स्पर्धेत पहिले चार सामने आपण यशस्वी पाठलाग केला आणि चारदा 300पेक्षा जास्त धावा केल्या.
 
 
vivekशामीने उपान्त्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 7 बळी टिपले आणि तो सामनावीर झाला. ज्या सामन्यांत 700च्या वर धावा निघाल्या होत्या, तिथे एक गोलंदाज सामनावीर होतो, हेच विशेष होतं. शामीने सातत्याने ही विशेष कामगिरी केली. विश्वचषकातील सर्वात यशस्वी गोलंदाज तोच ठरला. स्पर्धेत उशिरा संधी मिळाल्यानंतरही त्याने सर्वांना मागे टाकून 24 बळींची मजल मारली.
 
फलंदाजांशी स्पर्धा करणारे गोलंदाज हे या भारतीय संघाचं वैशिष्ट्य होतं. जसप्रीत बुमरा, महम्मद शामी आणि महम्मद सिराज हे तेज त्रिकूट या स्पर्धेतील सगळ्यात भेदक त्रिकूट ठरलं. शामीने उपान्त्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 7 बळी टिपले आणि तो सामनावीर झाला. ज्या सामन्यांत 700च्या वर धावा निघाल्या होत्या, तिथे एक गोलंदाज सामनावीर होतो, हेच विशेष होतं. शामीने सातत्याने ही विशेष कामगिरी केली. विश्वचषकातील सर्वात यशस्वी गोलंदाज तोच ठरला. स्पर्धेत उशिरा संधी मिळाल्यानंतरही त्याने सर्वांना मागे टाकून 24 बळींची मजल मारली. कुलदीप आणि जाडेजा अख्ख्या स्पर्धेत अचूक आणि धावा रोखण्याचं काम करत होते, म्हणूनच इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियालाही आपण स्वस्तात सर्वबाद करून वर्चस्व मिळवलं. श्रीलंकेला तर 55 धावांत गुंडाळलं. भारतीय तेज गोलंदाजांची चर्चा होतेय असं काहीसं दुर्मीळ चित्र या स्पर्धेत मात्र वारंवार दिसलं.
 
 
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचंही नाव घ्यावं लागेल. निवृत्तीनंतर काही वर्षं विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी आधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्यांच्याच शहरात बंगळुरूत ही अकादमी असल्यामुळे त्यांना घरच्यांबरोबर वेळ घालवता येणार होता. या काळात भारतीय खेळाडूंबरोबर जवळून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. 2021मध्ये ते मुख्य प्रशिक्षक बनले, तेव्हा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवूनच हे उघड होतं. आता त्यांनी स्पर्धेचं नियोजन चोख होईल याकडे लक्ष दिलं.
 
 
फलंदाजीचा क्रम ठरवण्यापासून कुठल्या क्रमांकावर कुठला खेळाडू हवा याकडे लक्ष दिलं. तसे खेळाडू स्पर्धेआधीच हेरले आणि त्यांच्यावर मेहनत घेतली. गोलंदाजांचा वेग आणि दिशा यावरही पारस म्हांब्रेंनी लक्ष दिलं आणि स्पर्धेची तयारी अगदी व्यवस्थित होईल असं पाहिलं.
 
 
 
टी दिलीप या क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकांनी तंदुरुस्ती आणि चपळतेवर मेहनत घेतली. त्यामुळेच क्षेत्ररक्षणही सुधारलेलं होतं. खरं तर पहिले 10 सामने या स्पर्धेत भारतीय संघासाठी फारसं काही चुकलंच नव्हतं. पण एका सामन्याने घात केला. यालाच क्रिकेट म्हणतात, कारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. रोहित आणि त्याच्या संघाने मागचा दीड महिना क्रिकेट चाहत्यांचं निखळ मनोरंजन केलं आहे आणि त्यासाठी हा संघ कौतुकास पात्र आहे. एक सामना गमावला म्हणून हे कौतुक कमी होणार नाही.
Powered By Sangraha 9.0