उत्तरदायी, लोकाभिमुख राज्यपाल

विवेक मराठी    18-Nov-2023
Total Views |
@सुधीर जोगळेकर
9820016674
 
vivek 
माजी राज्यपाल व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पद्मनाभ आचार्यजी यांचं नुकतंच निधन झालं. पद्मनाभजींनी 75 वर्षं संघ, अभाविप, भाजपा आदी संस्थांमध्ये सक्रिय राहत व्यतीत केली. अभाविपच्या माध्यमातून ईशान्य भारताचं उर्वरित भारताशी भावनिक नातं जोडण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं होतं. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि ईशान्य भारताशी जोडलेल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख.
विस्मरण होत नसेल, तर गोष्ट 2014 सालचीच असावी.. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारल्याला सुमारे सहा-सात महिने होऊन गेल्यानंतरची.
 
 
प्रणब मुखर्जी तेव्हा राष्ट्रपतिपदी होते. त्रिपुराचे राज्यपाल वक्कोम पुरुषोत्तमन यांनी राजीनामा देऊ केला होता आणि त्यांच्या जागेवर राष्ट्रपतींनी जुलै 2014मध्ये पद्मनाभ आचार्य यांची नियुक्ती केली होती. काही सरकारी कामानिमित्त मोदी ईशान्य भारताच्या दौर्‍यावर आले होते. बहुधा तो त्रिपुराचा प्रवास असावा. तो कार्यक्रम उरकून मोदी नागालँडमध्ये जायचे होते, तिथे आणखी एक कार्यक्रम ठरला होता. त्रिपुराच्या राज्यपालपदी पद्मनाभ आचार्य होतेच, तसंच जुलै 2014पासून नागालँडच्या राज्यपालपदाचा कार्यभारही त्यांच्याचकडे होता.
 
 
विमानात बसले असताना मोदी सहज चौकशी करत होते. पूर्वपरिचय होताच, त्यामुळे त्या त्या राज्यातील राजकीय स्थितीविषयीचे उल्लेख बोलण्यात येत होतेच, तसेच वैयक्तिक विषयही गप्पात निघत होते. त्रिपुराचा कार्यभार सांभाळता सांभाळता नागालँडचा कार्यभार सांभाळण्यासाठी कसा वेळ काढता, ते सुरू असतानाच दिल्लीला किती वेळा यावं लागतं, कौटुंबिक आघाडीवर काय सुरू असतं, कवितावहिनी कुठे असतात, मुलं कुठे असतात, मुलांच्या-नातवंडांच्या भेटी कधी कशा होतात असे काही जुजबी विषय निघत होते आणि आचार्यजी जेव्हा त्रिपुरा-नागालँड सांभाळता सांभाळता दिल्लीला आणि मुंबईला जावं लागतं असं सांगत होते, तेव्हा आपल्यावर आणखी एक जबाबदारी सोपवण्याचा विचार होत असल्याचं त्यांच्या लक्षातही आलं नव्हतं.. दोन दोन राज्यं सांभाळूनही वेळ मिळतो याचं मोदी एकीकडे कौतुक तर करत होते, तर दुसरीकडे त्यांच्या डोक्यात बहुधा काही वेगळीच योजना आकार घेत होती.
 
 
मोदी दिल्लीत उतरले, आचार्यजी त्यांची कामं पुरी करून कोहिमाला परतले आणि दिल्लीतून घोषणा झाली पद्मनाभ आचार्य यांच्याकडे आसामच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवल्याची. ही गोष्ट डिसेंबर 2014ची. उत्तम, कार्यक्षम आणि अभ्यासू माणसांच्या शोधात आणि त्यांना त्यांच्यायोग्य काम देण्यात माहीर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी फासा टाकला होता आणि नकळत मोठा मासा त्यांच्या गळाला लागला होता.
 
 
vivek
 
आसामचे राज्यपाल म्हणून आचार्य यांनी सूत्रं स्वीकारली आणि 1965पासून ईशान्य भारताच्या विकासासाठी अखंड कार्यरत राहण्यासाठी पद्मनाभजींनी केलेली तपश्चर्याच जणू फळाला आली. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आलं आणि आचार्य यांच्या ईशान्य भारताशी असणार्‍या संबंधांची योग्य दखल घेतली गेली ती अशी.
 
 
14 जुलै 2014 ते 31 जुलै 2019 या पाच वर्षांत पद्मनाभजींनी त्रिपुरा, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर अशा पाच राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून वेगवेगळ्या आणि क्वचित एकाच कालखंडात कार्यभार सांभाळला. राज्यपाल म्हणून तीन-तीन, चार-चार राज्यांची जबाबदारी स्वीकारणारं व्यक्तिमत्त्व एवढंच त्यांचं वेगळेपण नव्हतं, तर या कार्यकाळात पार पडलेल्या जबाबदार्‍या अहवालरूपाने जनतेला सादर करणारा ईशान्य भारतातला पहिला राज्यपाल अशी त्यांच्या कार्याची नोंद झाली, हेही तितकंच महत्त्वाचं.
 
 
आज या सार्‍या आठवणी उफाळून आल्या त्या ज्येष्ठ माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्या निधनाची बातमी ऐकल्यामुळे. 10 नोव्हेंबरला पद्मनाभजी गेले. त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित राहता आलं नाही, परंतु 1969पासून त्यांचं जे निकटदर्शन घडत गेलं, त्याच्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत.
 
 
ते नागालँडच्या राज्यपालपदी असताना त्यांच्या आग्रहावरूनच आम्ही काही कार्यकर्ते थेट राजभवनात चार दिवस राहून आलो. राज्यपालाने छोट्या-छोट्या गावात प्रवास करावा, नागरिकांशी थेट गप्पा माराव्या, आपल्या हस्तिदंती मनोर्‍यातून बाहेर पडत लोकात मिसळावं हे ईशान्य भारताला नवीन होतं.
 
 
हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रारंभीच्या कार्यकाळाबद्दल तज्ज्ञांचा असा अभिप्राय होता की ‘इट हॅज नो मेथड, बट इट वर्क्स’. ईशान्य भारतात काम करणार्‍या पद्मनाभजींचं आणि खरं तर त्यांचे पूर्वसुरी मानल्या जाणार्‍या सर्वच संघप्रचारकांचं जीवन हे त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या अभिप्रायाला शोभेसं होतं. त्यांच्या जीवनाविषयीचा जाणकारांचा अभिप्राय असा होता की ‘इट हॅड अ हिडन मेथड, अँड इट वर्क्ड’.
 
 
पद्मनाभजी मूळचे कर्नाटकातील उडुपीचे. 8 ऑक्टोबर 1931 हा त्यांचा जन्मदिवस. उडुपीच्याच प्रायमरी आणि माध्यमिक ख्रिश्चन हायस्कूलमधून ते शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले, तिथल्याच महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमधून त्यांनी पदवी शिक्षण घेतलं.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा लहानपणापासून संबंध होताच. 1948च्या संघबंदीच्या काळात त्यांनी सहा महिने तुरुंगवासही भोगला होता. नोकरी-व्यवसायाच्या शोधात ते मुंबईत आले. त्यांनी माटुंग्याच्या रुपारेल कॉलेजचं कँटीन चालवायला घेतलं आणि रुपारेल कॉलेजच्याच बाहेर कार्यालय असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे ते आकृष्ट झाले. कँटीन चालवण्याबरोबरच परिषदेचं काम करता यावं, म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठात कायद्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. विद्यार्थी परिषदेची स्थापना 1949 सालची. प्रारंभीची काही वर्षं परिषद बाल्यावस्थेत होती, कामही उत्तर भारतापुरतं मर्यादित होतं.
 
 
1960च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात झाली. स्वाभाविकपणेच पहिल्या मोजक्या निवडक कार्यकर्त्यांत पद्मनाभजी समाविष्ट झाले. अनेक नवनवीन उपक्रमांचा प्रारंभ त्या काळात झाला, ज्याचे उद्गाते पद्मनाभजी होते. प्रथम विद्यार्थी सत्कार, पुस्तक पेढी, अवकाशकालीन रोजगार योजना हे त्यातील काही. यात ‘साहचर्य संध्या’ नावाच्या आणखी एका महत्त्वाच्या उपक्रमाची भर पडली. महाविद्यालयांची संमेलनं आणि धांगडधिंगा, धुडगूस, मारामार्‍या हे जणू समीकरण बनलं होतं. त्याला विधायक, सकारात्मक, रचनात्मक संमेलनाची दिशा दिली ती ‘साहचर्य संध्या’ने. तीन-चार हजार विद्यार्थी चार-पाच तास एका ठिकाणी जमतात, विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र असूनही अमंगल काही घडत नाही, ही मोठीच अचीव्हमेंट होती.
 
 
विद्यापीठ स्तरापासून शाखा स्तरापर्यंत असे उपक्रम सुरू झाले, त्यानिमित्ताने शिक्षण-उद्योग-सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांचा परिषदेशी संबंध येत गेला, संपर्कवर्तुळ विस्तारत गेलं.
 
vivek 
 
1962च्या चिनी आक्रमणाने उर्वरित भारताला ईशान्य भारतातील अराष्ट्रीय शक्तींचं जे दर्शन झालं, त्याने अस्वस्थ झालेल्यात पद्मनाभजीही होते. तीन-चार कार्यकर्त्यांना घेऊन ते ईशान्य भारतात गेले आणि तिथे सर्वदूर चितारलेल्या घोषणांनी त्यांच्या अस्वस्थतेत भरच पडली. ‘इंडियन डॉग्ज गो बॅक‘ ही होती त्यातील एक घोषणा. यावर काहीतरी दीर्घ काळासाठीची कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागेल, उद्याच्या नव्हे, परवाच्या पिढीवर बालपणापासूनच भारतप्रेमाचं सिंचन करावं लागेल, हा देश माझा आहे ही भावना त्यांच्यात रुजवावी लागेल हे त्यांना स्पष्टपणे दिसत होतं.
 
 
ईशान्य भारतातील आजच्या तरुण पिढीचं चिन्यांनी पुरतं ब्रेनवॉशिंग केलं आहे, आपला तोंडवळाच नव्हे, तर आपली संस्कृतीही वेगळी आहे, उर्वरित भारताशी आपलं काहीही नातं नाही अशी त्यांची भावना बनली आहे, हे त्यांना या प्रवासात उमगलं होतं. त्यामुळे या तरुण पिढीला उर्वरित भारतात विविध राज्यांत आणावं, आठ-पंधरा दिवस त्यांना येथील घराघरात ठेवावं, भारतीय कुटुंबांमार्फत त्यांना संस्कृती परिचय घडवावा अशा काही कल्पना त्यांच्या डोक्यात आकार घेत होत्या. त्यातून ‘आंतरराज्य छात्र जीवन दर्शन‘ ((Students Experience In Interstate Living)) या प्रकल्पाची निर्मिती झाली.
 
 
ईशान्य भारतातील तरुण कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी या प्रकल्पानुसार उर्वरित भारतात आले, येथील शहराशहरात राहिले, हिंडले, त्यांना इथल्या कौटुंबिक वातावरणाचा, आतिथ्यशीलतेचा परिचय झाला आणि आपली करून देण्यात आलेली भारताविषयीची समजूत चुकीच्या माहितीवर आधारलेली होती, याचा त्यांना साक्षात्कार झाला.
 
 
पण अशा स्वरूपाच्या महिना-पंधरा दिवसांच्या भारतभेटीच्या उपक्रमापेक्षा एखाद्या स्थायी प्रकल्पाची रुजवात केली पाहिजे, असं पद्मनाभजींच्या मनात आलं आणि त्यातून ‘ मेरा घर भारत देश‘ (My Home Is India) या प्रकल्पाने जन्म घेतला. या एका प्रकल्पाने विद्यार्थी परिषदेची सामाजिक-सांस्कृतिक प्रतिमा समाजमनात उंचावली.
 
 
ईशान्य भारतातील वय वर्षं 5-6पासूनच्या शाळकरी मुलांना मुंबईत आणून काही कुटुंबांमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्या त्या कुटुंबात राहून मुलं शालेयच नव्हे, तर क्वचित महाविद्यालयीन शिक्षणदेखील घेत राहिली आणि त्यांना मिळणारी आपुलकीची वागणूक पाहून त्यांच्या पालकांचीही पूर्वदूषित मनं बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली.
 
 
राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने परिषदेने टाकलेलं हे पाऊल ही पद्मनाभजींची मोठीच काँट्रिब्यूशन मानावी लागेल. पुढे हा प्रयोग परिषदेपुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांताने जनकल्याण समितीच्या माध्यमातून त्याची जबाबदारी स्वीकारली आणि गेली अनेक वर्षं ईशान्य भारतातील विद्यार्थी-विद्यार्थिनी महाराष्ट्रात संघाच्या मार्गदर्शनाखाली चालणार्‍या स्थानिक सेवाभावी संस्थांनी चालवलेल्या वसतिगृहात राहून शिक्षण घेऊ लागले.
 
 
पद्मनाभजी यथावकाश मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून गेले, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सदस्य बनले. विद्यार्थी हा उद्याचा नागरिक नाही, तो आजचाच नागरिक आहे, विद्यापीठाच्या संचालनात आणि शिक्षण क्षेत्राच्या जडणघडणीत त्याचीही जबाबदारीची भूमिका आहे या परिषदेच्या भूमिकेचाच तो आविष्कार होता. आज विविध विद्यापीठांच्या सिनेट्समध्ये विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत निवडून गेलेले दिसतात आणि विद्यापीठ संचालनात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात, त्याची सुरुवात पद्मनाभजींनी करून दिली हे विसरता येणारं नाही.
 
 
छात्रसंघांच्या निवडणुका हादेखील त्याच रणनीतीचा एक भाग होता. संपर्क, संभाषण, संवाद, संबंध आणि संग्रह यातून संघटनेसाठी जन-मन-धन कसं मिळवायचं, हे पद्मनाभजींनी परिषदेतील अनेक पिढ्यांना शिकवलं. मीही त्यातलाच एक. मोठमोठ्या उद्योगपतींकडे जाताना ते आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला बरोबर नेत, त्यांच्याकडे कसं जावं, काय बोलावं, आपल्या संघटनेची माहिती त्यांना कशी द्यावी आणि भीडभाड न बाळगता संघटनेसाठी जे काही हवं असेल ते त्यांच्याकडे संकोच न करता कसं मागावं, याचे वस्तुपाठ पद्मनाभजींनी आम्हाला घालून दिले.
 
 
परिषदेत विविध कार्यक्रमांतून, प्रकल्पांतून चैतन्याचं वादळवारं आणलं तेही पद्मनाभजींनी. 1969 ते 1973 अशी चार वर्षं त्यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी मला लाभली. परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनांना जाताना पद्मनाभजी बरोबर असत, तिसर्‍या वर्गानेच प्रवास करत. ते स्वत: उत्तम खवय्ये, त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबली की खाली उतरून बरोबरच्या कार्यकर्त्यांना खायला घेऊन यायचं, हा त्यांचा शिरस्ता. बारा गावचं पाणीही प्यायलं पाहिजे आणि पदार्थही चाखले पाहिजेत, प्रवासात, पोटाला सगळं पचवायची सवय लागली पाहिजे सामाजिक काम करायचं तर हे त्यांचं तत्त्वज्ञान असे.
 
 
याच काळात कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना पद्मनाभजींनी मला ईशान्य भारताचा पहिला प्रवास करण्याची संधी दिली. आजवर सवय होती मराठी बोलण्याची, मुंबई-पुणं प्रवास करण्याची. पण पद्मनाभजींनी एकदम कोलकात्यालाच जायला सांगितलं. गाडीचे सगळे प्रवासी उतरून निघून गेले, तरी मला न्यायला कुणीच आलं नाही हे पाहिलं आणि भीड चेपून कार्यालयाचा पत्ता शोधत एकटाच बाहेर पडलो. तिथून दुसर्‍या दिवशी विमानाने दिब्रुगडला गेलो, तिथून एकटाच नहरकटियाला गेलो आणि संध्याकाळच्या पावसाळी वातावरणात पत्ता शोधत शोधत डाक बंगल्यावर जाऊन थडकलो. 69 सालची गोष्ट. पावसाळी रात्र, दिवे गेलेले. डाक बंगला सापडला, वॉचमनने खोली उघडून दिली आणि रात्रभर एकटाच तिथे राहिलो. मुंबईहून माझ्या आधी रेल्वेने निघालेले कार्यकर्ते आणि ती दहा-बारा शाळकरी मुलं दुसर्‍या दिवशी तिथे येऊन पोहोचली आणि आमचा प्रवास सुरू झाला, त्या मुलांना त्यांच्या त्यांच्या घरी सुट्टीसाठी सुखरूप पोहोचवण्याचा.
 
 
पद्मनाभजी एक वर्ष परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष बनले, तेवढेच. त्यानंतर त्यांचा विद्यार्थी चळवळीशी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंध राहिला तो विद्यापीठ सिनेट निवडणुका, ईशान्य भारतातून मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या मुलांचं शिक्षण आणि व्यापक अर्थाने शिक्षणाच्या सुविधा ईशान्य भारतात उपलब्ध व्हाव्यात एवढ्यापुरताच.
 
 
1975नंतर परिषदेच्या कामातून ते बाजूला झाले खरे, परंतु राणी मॉँ गाईडिन्ल्यू भवनात चालणार्‍या अ‍ॅकॅडेमी फॉर इंडियन ट्रायबल डायलेक्ट्सशी त्यांचा जवळून संबंध आला. भारतातील विद्यापीठांमध्ये ईशान्य भारतातील जनजातींच्या बोलींचा अभ्यास व्हावा, त्यांच्यासाठी रोमनऐवजी स्थानिक लिपी उपलब्ध व्हावी यासाठी संशोधन व्हावं, हा त्यांचा प्रयत्न तेव्हापासूनच राहिला. ईशान्य भारतातील राणी माँसह दहा जनजाती नेत्यांची चरित्रं त्यांनी अ‍ॅकॅडेमी फॉर इंडियन ट्रायबल डायलेक्ट्सच्या माध्यमातून प्रसिद्ध केली. या जनजातींच्या बोलींमधील म्हणी, लोककथा, कविता यांचंही प्रकाशन घडवून आणलं.
 
 
1980मध्ये पद्मनाभजी भारतीय जनता पार्टीच्या कामाशी जोडले गेले. 1987 साली ते पार्टीच्या उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा युनिटचे अध्यक्ष झाले, तर 1987मध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीवर त्यांची निवड झाली. 1991 साली भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर त्यांची निवड झाली आणि ईशान्य भारताची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम आणि नागालँडचे ते प्रभारी झाले. 1995 साली भारतीय जनता पार्टीचे ते राष्ट्रीय सचिव बनले आणि 2002पर्यंत त्यांच्याकडे ही जबाबदारी राहिली. 2002मध्ये त्यांच्यावर केरळ आणि लक्षद्वीपच्या, तर 2005मध्ये तामिळनाडूच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली.
 
 
हळूहळू जबाबदार्‍या वाढत गेल्या. पार्टीच्या एससी/एसटी मोर्चाचे ते राष्ट्रीय प्रभारी बनले, ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि नॉर्थ-ईस्ट इंडिया संपर्क सेलचे राष्ट्रीय प्रभारी म्हणूनदेखील ते राहिलेच.
 
 
8 ऑक्टोबर 1931चा पद्मनाभजींचा जन्म आणि 10 नोव्हेंबर 2023चं त्यांचं निधन. तब्बल 92 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं, त्यातली 75 वर्षं पद्मनाभजींनी संघ, परिषद, भाजपा आदी संस्थांमध्ये सक्रिय राहत व्यतीत केली. एक कृतार्थ जीवन त्यांना लाभलं.
 
 
कवितावहिनींनी संसार, मुलं-नातवंडं सांभाळता सांभाळता ईशान्य भारतात प्रवास-वास्तव्य करून पद्मनाभजींना संपूर्ण साथ दिली, म्हणूनच पद्मनाभजी कौटुंबिक पाशामध्ये फारसे न अडकता आयुष्यभर काम करत राहिले. यथावकाश वयोमानापरत्वे पद्मनाभजी राज्यपालपदावरून निवृत्त झाले खरे, परंतु वैद्यकीय तपासण्यांच्या निमित्ताने ईशान्य भारतात डॉक्टर्स पाठवणं, शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईतून वैद्यकीय पथकं घेऊन जाणं, आयएनएफसी, ईश्वरपुरम (पुणे) यासारख्या संस्थांसाठी ईशान्य भारतातून निवडक विद्यार्थी आणणं, त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणं, त्यांना भेटण्यासाठी प्रत्यक्ष प्रकल्पस्थानी येणं, त्या त्या मुलांशी त्यांच्या त्यांच्या भाषेत संवाद साधणं, नागालँड-अरुणाचल प्रदेश सरकारांकडून या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देणं अशी अनेक कामं निवृत्तीनंतरही पद्मनाभजी करत राहिले.
 
 
1965 सालापासून पद्मनाभजींचा ईशान्य भारताशी जो आत्मीय संबंध राहिला, त्याचीच परिणती या सर्व राज्यांत राष्ट्रवादी विचारांची आणि केंद्रातील मोदी सरकारच्या हातात हात घालून चालणारी सरकारे स्थापन होण्यात झाली.
 
 
1965-66 सालात जी मुलं शिकण्यासाठी मुंबईत आली, वेगवेगळ्या घरात-कुटुंबात त्यांचेच घटक बनून राहिली, ती शिक्षण पूर्ण करून आपापल्या गावी परत गेली ती राज्य लोकसेवा आयोगाच्या, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस/आयपीएस बनून, मोठमोठ्या पदांवर जात निवृत्त झाली आणि तरीही त्यांचा पद्मनाभजींशी निकटचा स्नेह राहिला.
आज पन्नास वर्षांनंतर मागे वळून पाहताना हे दिसतं, तेव्हा थक्क व्हायला होतं.