पंचाहत्तर वर्षांचा चिरतरुण!

16 Nov 2023 15:38:02

vivek
75 वर्षे हा मोठा कालखंड! विवेकपूर्वी सुरू झालेली आणि विवेकनंतर सुरू झालेली कितीतरी साप्ताहिके काळाच्या ओघात लुप्त झाली. पण विवेक अजूनही ऐन उमेदीत आहे. कालानुरूप आपल्यात बदल करण्यात ज्यांना यश येते, तेच कालप्रवाहात टिकून राहतात. विवेकमध्ये कालानुरूप काही बदल अवश्य झालेले आहेत. मात्र काही बाबतीत विवेक अजिबात बदललेला नाही. कारण विवेक कशासाठी चालवायचा हे आमच्यासमोर स्पष्ट आहे. हिंदू समाजाशी संबंधित अनेक विषयांत न थकता, न कंटाळता, आळस न करता सतत जागृती करावी लागते. हे विवेकने स्वीकारलेले व्रत आहे. घेतला वसा टाकू नको या न्यायाने विवेक या व्रतावर आजही ठाम आहे.
मोरच्या इमारतीकडे पाहून त्याने आपला टाय नीट केला. सेट केलेल्या केसांवरून उगीचच हात फिरविला आणि हातातील फोल्डर सांभाळत तो जिन्याच्या पायर्‍या चढू लागला. पहिल्या मजल्यावरच्या दोन क्रमांकाच्या दरवाजाकडे पाहून त्याने होकारार्थी मान हलविली आणि चौकटीशेजारची घंटी दाबली. दरवाजा उघडणार्‍या व्यक्तीकडे पाहून तो मंद हसला आणि म्हणाला, “अरे, विवेक आजोबा आहेत का?”
 
“आजोबा? नाहीत. का?”
 
“पण पत्ता तर हाच आहे!”
 
“बरोबर आहे. तुम्ही मुलाखत घ्यायला आलात ना? मीच विवेक! पण आजोबा नाही मी.”
 
आता मात्र पुन्हा गोंधळून जाऊन त्याने प्रश्न विचारला, “अरे, मला विवेक आजोबांची पंचाहत्तरीनिमित्त मुलाखत घ्यायची आहे. पण तुझे वय तर अगदी तरुण आहे!”
 
आता मात्र ‘विवेक’ दिलखुलासपणे हसला आणि म्हणाला, “अहो, मला जन्म देणारी जी राष्ट्रीय विचारधारा आहे, ती जरी चिरपुरातन असली तरीही नित्यनूतन आहे, मग मी कसा आजोबा असणार? नाही का? बरे, मी अरे म्हटले तर आवडेल का तुला?”
“अरे, चालेल की यार!” तोसुद्धा मनमोकळेपणे हसत विवेकने दाखविलेल्या कोचावर स्थानापन्न झाला आणि गळ्यातील टाय सैल करत म्हणाला, “चला, मुलाखतीला सुरुवात करू या. पहिला नेहमीचा प्रश्न - तुझा जन्म कसा झाला?”
 
“खरे म्हणजे दि. 26 सप्टेंबर 1948 ही माझी जन्मतारीख - म्हणजे भाद्रपद कृष्ण अष्टमी शके 1870 रोजी केवळ मूल्य दोन आण्यात माझा पहिला अंक बाजारात आला.”
 
“जरा तुझा जन्मकाळ आणि त्या वेळची परिस्थिती याबद्दल सांग.”
 
vivek
 
 
“देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळवून काँग्रेस पक्ष सत्तारूढ झाला होता. संघाबद्दल विनाकारण आकस बाळगून संघाविरुद्ध अपप्रचाराची प्रचंड यंत्रणाच त्या वेळच्या नेत्यांनी राबविली होती. त्या वेळचे वातावरण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल, पर्यायाने राष्ट्रीय विचाराबद्दलच लोकांची मने कलुषित करण्याचे होते. दिल्ली येथून संघस्वयंसेवकांच्या पुढाकाराने ‘ऑर्गनायझर’ हे इंग्लिश साप्ताहिक सुरू झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील स्वयंसेवकांनी अपप्रचाराला धैर्याने आणि संयमाने तोंड देऊन सत्यस्थिती मांडण्याच्या उद्देशाने सुघोष या नावाने साप्ताहिक काढण्याचे ठरविले; पण संपादक मंडळाला हे नाव पसंत न पडल्यामुळे ‘विवेक’ या नावाने पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्यामध्ये पहिल्या पानावर पंडित नेहरूंचे छायाचित्र होते. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या हैदराबाद पोलीस अ‍ॅक्शनचे फोटो व विविध सदरे होती.”
 
“एखादे नवे साप्ताहिक लोकप्रिय व्हावे म्हणून मोठी कसरत करावी लागते, याबद्दल तुझा अनुभव काय?”
 
“खरे म्हणजे याचेही श्रेय काँग्रेसप्रणीत राज्य सरकारला द्यावे लागेल. त्याची पार्श्वभूमी अशी - विवेकच्या पहिल्या अंकाच्या प्रती हातोहात संपल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे रंगीत मुखपृष्ठ असलेला विजयादशमी विशेषांक प्रकाशित झाला. त्या वेळेस त्याच्या तीन हजार प्रती हातोहात संपल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्यावर लादलेल्या अन्याय्य बंदी विरोधात जेव्हा सत्याग्रह पुकारला, तेव्हा विवेकच्या कार्यालयावर गुप्त पोलिसांची वक्रदृष्टी वळली. 10 डिसेंबर 1949 रोजी विवेकच्या कार्यालयाला कुलूप ठोकले गेले. विवेकचे व्यवस्थापक गोगटे, काळे आणि संपादक दादासाहेब सामंत यांना तुरुंगात टाकण्यात आले. पण या गंडांतराने विवेकचा फायदा असा झाला की, विवेकचे नाव माहीत नाही असे स्थान अवघ्या महाराष्ट्रात उरले नाही. वयाने लहान असलेल्या विवेकची प्रसिद्धी सरकारच्या चुकीमुळेच अल्पावधीत झाली. या कारवाई नाट्याला फारसा अर्थ नव्हता, कारण केवळ महिन्याभराने वसंतराव दावतर यांच्या संपादकत्वाखाली 13 जानेवारी 1949 रोजी विवेक पुन्हा सुरू झाला. पुढच्या काळात चित्तरंजन पंडित आणि नंतर बळवंत नारायण जोग हे संपादक झाले.”
 
 
“तसे पाहता 75 वर्षे हा मोठा कालखंड! विवेकपूर्वी सुरू झालेली आणि विवेकनंतर सुरू झालेली कितीतरी साप्ताहिके काळाच्या ओघात लुप्त झाली. पण विवेक अजूनही ऐन उमेदीत आहे, याचे रहस्य काय?”
 
“एका ओळीत सांगायचे, तर कालानुरूप आपल्यात बदल करण्यात ज्यांना यश येते, तेच कालप्रवाहात टिकून राहतात. पूर्वी साप्ताहिक विवेक मोठ्या आकारात (टॅब्लॉइड फॉर्ममध्ये) निघत असे. आता तो रंगीत पाने असलेला आणि मासिकाच्या आकारात निघतो.
 
 
पूर्वी विवेक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वैचारिक लेखांनी भरलेला असे, तर आता विविध सामाजिक, सांस्कृतिक विचारप्रवाहांबद्दल माहिती देणारी आणि त्याचबरोबर चोखंदळ वाचकांची भूक भागविणारी रंजक आणि रोचक अशी विविध सदरे विवेकमध्ये प्रकाशित होतात.”
 

vivek 
 
“म्हणजे फारच बदल झाला की! विवेकने आता कातच टाकलेली आहे.” तो हसत म्हणाला.
 
त्याचा हसण्याचा भर ओसरल्यावर विवेक शांतपणे म्हणाला, “पाहा, विवेकमध्ये कालानुरूप काही बदल अवश्य झालेले आहेत. मात्र काही बाबतीत विवेक अजिबात बदललेला नाही. कारण विवेक कशासाठी चालवायचा हे आमच्यासमोर स्पष्ट आहे. विवेक केवळ रोचक माहिती देण्यासाठी, लोकांचे मनोरंजन करण्यासाठी चालवायचा नसून लोकजागृती व समाजप्रबोधन करण्यासाठी चालवायचा, हाच विवेकचा उद्देश आहे. तो माझ्या जन्माच्या वेळी होता आणि आजसुद्धा तसाच आहे. काही विषय कालसापेक्ष असतात आणि काही कालनिरपेक्ष असतात. हिंदू समाजाचे प्रश्न, हिंदू समाजावर होत असलेली उघड आणि छुपी आक्रमणे, हिंदू माणसाची याबाबत एकंदर उदासीनता, हिंदुहिताबाबतीत जागृतपणाचा भाव, हिंदू समाजातील जातीपातीचे कलह, वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हापुन्हा डोके वर काढणारी विषमता आणि अस्पृश्यता हे असे अनेक विषय आजही संपलेले नाहीत. त्यामुळे या बाबतीत न थकता, न कंटाळता, आळस न करता सतत जागृती करावी लागते. हे विवेकने स्वीकारलेले व्रत आहे. घेतला वसा टाकू नको या न्यायाने विवेक या व्रतावर आजही ठाम आहे.”
 
“काही वेळा नैसर्गिक आपत्ती कोसळतात, अतिरेकी हल्ले-बाँबस्फोट यासारख्या दहशतवादी घटना, जातीय-धार्मिक दंगली आणि त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक, धार्मिक आंदोलने असे अनेक विषय समाजजीवनात उभे राहतात. मग त्या वेळी आपले व्रत कसे चालविता?”
 
“आपल्याला त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार भूमिका घ्यावी लागते आणि उचित विचार मांडावे लागतात. जे समाजहिताचे आहे तेच परखडपणे मांडायचे, हीच आजवर विवेकची भूमिका राहिलेली आहे.
 

vivek
संपादक ब.ना. जोग
 
 
आपल्या देशात वेगवेगळी सामाजिक आंदोलने प्रबळ होत जाणार आणि सामाजिक न्यायाचे विषय ऐरणीवर येणार, हे रामजन्मभूमी आंदोलनापासूनच निश्चित झाले होते. विवेकनेही सामाजिक आंदोलनाशी बांधिलकी स्वीकारली. विवेकच्या प्रारंभीच्या काळात हिंदुत्वजागृतीला पूरक असे कार्यक्रम देशभरात होऊ लागले. गोहत्याविरोधी आंदोलन, काश्मीरचा लढा, गोवा मुक्तिसंग्राम हे त्यांतील काही प्रमुख कार्यक्रम होते. त्यामुळे विवेकची सुरुवातीची वर्षे या कार्यक्रमांचा पुरस्कार आणि प्रचार करण्यात गेली. याच काळातील काँग्रेस सरकारचे हिंदुहितविरोधी आणि पाकिस्तानप्रेमी धोरण ‘विवेक’ने अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ लेखांच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडले. या लेखनाचा दर्जा लक्षात येण्यासाठी केवळ दोनच नावांचा उल्लेख करतो. तेव्हाचे जनसंघाचे मातबर रामभाऊ म्हाळगी आणि जगन्नाथराव जोशी हे तत्कालीन संपादक ब.ना. जोग यांना कधी भेटले की विवेकच्या अभ्यासपूर्ण लिखाणाचा त्यांना केव्हा व कसा उपयोग झाला ते आवर्जून सांगत असत. तसेच विवेकने परराष्ट्रीय राजकारण हे सदर अनेक वर्षे मोठ्या नेकीने चालविले होते. थोर व्यासंगी पत्रकार व साहित्यिक विद्याधर गोखले म्हणत, की तुमचे परराष्ट्रीय राजकारणाचे सदर वाचले की माझी आठवड्याची बेगमी होते.
 
कच्छ कराराच्या विरोधात जनसंघाने प्रचंड आंदोलन केले आणि दिल्लीमध्ये पाच लाखांचा मोर्चा नेला. या आंदोलनाने विवेकची पानेच्या पाने भरली होती. एवढेच नव्हे, तर भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम या संघातून निर्माण झालेल्या आणि वेगवेगळ्या आघाड्यांवर हिंदुत्वाची बाजू मांडणार्‍या अनेक संस्थांना विवेकने सतत प्रसिद्धी दिली.”
 
परराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित बांगला देशातील मुसलमानांची घुसखोरी, आसाममध्ये वाढता मुसलमान प्रभाव, कच्छ सीमेवर वाढणारे स्मगलिंग या आणि अशाच अनेक विषयांवर विवेकने लिहिले. कच्छ कराराच्या विरोधात जनसंघाने प्रचंड आंदोलन केले आणि दिल्लीमध्ये पाच लाखांचा मोर्चा नेला. या आंदोलनाने विवेकची पानेच्या पाने भरली होती. एवढेच नव्हे, तर भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम या संघातून निर्माण झालेल्या आणि वेगवेगळ्या आघाड्यांवर हिंदुत्वाची बाजू मांडणार्‍या अनेक संस्थांना विवेकने सतत प्रसिद्धी दिली.”
 
“विवेक, संघ हीच तुझी मातृसंस्था आहे. पण संघाचे काम प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहण्याचे आहे आणि असते. मग विवेकसारख्या प्रसिद्धीमाध्यमाचा संघाला कसा उपयोग झाला?”
 
 
“संघाने आपल्या चांगल्या कार्याची प्रसिद्धी करण्याचे मनावर घेतले नसले, तरी संघावर कोणी अकारण किंवा बिनबुडाची टीका केली, तर विवेकने अशा टीकेचा परखड शब्दांत समाचार घेतला आहे. तुम्हाला एक जुने उदाहरण म्हणून सांगतो. तेव्हा पानशेतचे धरण प्रकरण फार गाजले. पुण्याच्या स्वयंसेवकांनी पूरपीडितांना जीव तोडून मदत केली. पण संघाचे स्वयंसेवक कपडे वाटताना त्या कपड्यांवर संघाचा शिक्का मारतात असा आरोप पुण्याच्या साधना साप्ताहिकाने केला. तो आरोप खोडून काढताना आम्ही साधना साप्ताहिकाने पूरपीडित म्हणून सरकारकडून केवढी भरमसाठ मदत घेतली, तेही जाहीर केले. त्यावर साधनाच्या संपादकांनी खुलासा पाठविला. तो खुलासा विवेकने जसाच्या तसा छापला आणि त्या पोकळ खुलाशाची चिरफाड केली.”
 
“विवेकला संघाचे मुखपत्र मानले जाते, असे पू. श्रीगुरुजींनीसुद्धा म्हटले होते. विवेकला संघाकडून अथवा सरसंघचालकांकडून कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन मिळाले आहे?”
 
 
 
“विवेकमधील लिखाण श्रीगुरुजी बारकाईने वाचत असत. आम्ही एक गोष्ट छापली. कथाकाराने वर्णन केले होते, की एका तरुणाने रक्तदान केले आणि तो अगदी गलितगात्र झाला. रक्तदानाने त्याला फार थकवा आला. श्रीगुरुजींनी आम्हाला मुद्दाम निरोप पाठवून बोलावले आणि सांगितले, ’अरे, त्या कथाकाराला काय समजते? रक्तदान केल्याने काहीसुद्धा होत नाही. आता तुम्ही एवढे चुकीचे लिहिल्याचा परिणाम असा होईल, की वाचक रक्तदान करायलाच घाबरतील.’ आणखी एक आठवण सांगतो. त्यातून संघ महिलांबाबत कसा विचार करतो हेही तुम्हाला दिसते. 1956 ते 57 साली इंदिरा गांधी काँग्रेसच्या दौर्‍यावर महाराष्ट्रात आल्या होत्या. दौर्‍याच्या पहिल्याच भाषणात मालेगाव येथे त्यांनी संघाबद्दल अतिशय वाईट भाष्य केले आणि चावून चोथा झालेला गांधीहत्येचा आरोप केला. ‘एखाद्या स्त्रीविषयी लिहिताना शब्द फार जपून वापरावे. आपली पातळी सोडू नये’ हे तत्त्व विवेकने पाळले.
 

vivek 
 
ज्येष्ठ संघप्रचारक मोरोपंत पिंगळे यांचीही मला आठवण होते. राष्ट्रीय विचारांच्या प्रकाशन संस्था अधिक बलशाली झाल्या पाहिजेत, विकसित झाल्या पाहिजेत हे मोरोपंत कटाक्षाने पाहत असत. संघबंदीनंतर मुंबईतून साप्ताहिक विवेक प्रकाशित होऊ लागला, तेव्हा प्रखर विचार आणि ठाम भूमिका घेणारे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले पाहिजे, असा प्रयत्न सुरू झाला. अर्थात, यात मोरोपंतांचा पुढाकार होता. मुंबई-पुण्यापुरता मर्यादित असणारा सा. विवेक मराठवाड्यात पोहोचविण्यासाठी मोरोपंतांनी योजना केली आणि काका दामलेंना सोबत घेऊन छ. संभाजीनगरचा (औरंगाबाद) प्रवास केला. मुंबईबाहेर विस्तार करायचा, तर नव्या ठिकाणी सर्वच व्यवस्था उभ्या कराव्या लागणार होत्या. काका दामलेंनी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि कशा प्रकारचे मनुष्यबळ आवश्यक असेल याची कल्पना मोरोपंतांना दिली होती. मराठवाडा निझाम राजवटीतून मुक्त झाला, तरी अजूनही राष्ट्रीय मानसिकता निर्माण झाली नव्हती. त्यामुळे छ. संभाजीनगर केंद्र करून मराठवाडा आवृत्ती प्रकाशित करण्याचे नक्की झाले. सा. विवेकची मराठवाडा आवृत्ती सुरू होईपर्यंत मोरोपंतांनी अनेक वेळा सा. विवेकसाठी छ. संभाजीनगरला प्रवास केला. योग्य कार्यकर्त्यांनी निवड केली. जयवंतराव देशपांडे, भाऊसाहेब जहागीरदार, हरिभाऊ बागडे असे तरुण स्वयंसेवक मोरोपंतांनी निवडून काढले. भाऊसाहेब जहागीरदार यांच्याकडे पालक म्हणून जबाबदारी दिली, तर हरिभाऊ बागडे यांच्याकडे विक्री, जाहिरात इत्यादी विषयांची जबाबदारी दिली आणि 23 डिसेंबर 1955 रोजी सा. विवेकची मराठवाडा आवृत्ती सुरू झाली. मुंबईहून आठ पाने छापून पाठविली जात. छ. संभाजीनगर येथे चार पाने छापली जात. असा एकूण बारा पानांचा सा. विवेक मराठवाड्यात प्रकाशित होऊ लागला. मराठवाड्यात सुरू झालेले संघविचारांचे हे पहिलेच नियतकालिक होते.”
 
 
“कोणतेही वृत्तपत्र केवळ ध्येयधोरणांच्या आणि विचारांच्या बळावर चालविता येत नाही. वृत्तपत्रे आर्थिक तोंडमिळवणीसाठी आपले स्वातंत्र्य लक्ष्मीकडे गहाण ठेवताना दिसतात. हे लेखणीचे स्वातंत्र्य कसे जपले?”
 

vivek 
 
“संघाच्या विरोधकांना अपप्रचार चालविण्याचे मुळीच वावडे नव्हते. त्यांचे उद्योग अगदी आरंभापासून सुरूच होते, हे तू पाहिले आहेसच! पण विद्वान प्रतिभासंपन्न लेखकांनी विवेक नेहमीच आपला मानला. ज.द. जोगळेकर, भा.कृ. केळकर हे विवेकच्या सुरुवातीपासून लिहीत. त्यांच्यापासून ते महादेवशास्त्री जोशी यांच्यापर्यंत अनेकांनी विवेकचे विशेषांक समृद्ध केले. त्या वेळचे प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या कुंचल्याने विजयादशमी विशेषांकाचे मुखपृष्ठ सजलेले असे. स्त्रीच्या उत्तान चित्रांविना विशेषांकाचे अत्यंत आकर्षक मुखपृष्ठ हे विवेकच्या या अंकाचे वैशिष्ट्य असे.
 
 
तू म्हणतोस ती गोष्ट खरी आहे की, कोणतेही वृत्तपत्र द्रव्याच्या आधाराशिवाय चालविता येत नाही. मात्र द्रव्यासाठी विवेकने धनपतींच्या दारात कधी पाऊल टाकले नाही की रुचिहीन लिखाणाचा कधी आसरा घेतला नाही. अशा वेळी विवेकचा स्वयंपूर्ण आर्थिक संसार उभा करताना मोलाचे साहाय्य करणारे खंदे सहकारी लाभले होते, ते म्हणजे मनोहरपंत कुंटे, केशवराव केळकर, श्यामराव देशपांडे, काकासाहेब दामले आणि बाबूराव काणे. यापैकी कुंटे, केळकर, देशपांडे यांच्याकडे जाहिराती आणि दामले व काणे यांच्याकडे व्यवस्था-विक्री आणि मुद्रणालय हे विभाग होते. या सर्वांच्या अविश्रांत कामाच्या भरवशावरच आमच्या लेखण्या कोठल्याही आणि कोणाच्याही दबावाविना चालत असत. या काळात विवेकवर सरकारची नेहमीच अवकृपा असे, तेव्हाही आणि आताही वाचकांच्या भरवशावर आणि संघाच्या आधारावर विवेक ताठ कण्याने उभा आहे.”
 
 
vivek
 
“आपल्या देशात सामाजिक आंदोलने प्रबळ होत जाणार, सामाजिक न्यायाचे विषय ऐरणीवर येत जाणार, हे रामजन्मभूमी आंदोलनापासूनच दिसू लागले होते. ‘विवेक’ने अशा सामाजिक आंदोलनांशी बांधिलकी कशी स्वीकारली आणि निभावली?”
 
 
“विवेकने नेहमीच सामाजिक बांधिलकीचे आणि सामाजिक समरसतेचे अनेक विषय स्वीकारले. 1987 साली महाराष्ट्रात ’रिडल्स ऑफ राम अँड कृष्ण’ या विषयावरून वादंग उठले. दलित आणि दलितेतर अशी समाजाची विभागणी अधिक तीव्र झाली. शिवसेनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित रिडल्सविरोधात भूमिका घेतली. दलित संघटनांनी समर्थनाची भूमिका घेतली. मात्र साप्ताहिक ’विवेक’ने समन्वयाची भूमिका घेतली. याच काळात ’राम विरुद्ध आंबेडकर : समाज पोखरणारा वाद’ ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. तसेच ’विवेक’च्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही रिडल्सवादात समाजाला जोडणारी भूमिका घेतली. रिडल्सवादात सन्मानाने जो तोडगा निघाला, त्यात ’विवेक’ची भूमिका महत्त्वाची ठरली.
 
बाळासाहेब गायकवाड यांचे ’ख्रिस्ती महार’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची मुखपृष्ठ कथा ’विवेक’ने केली होती. या मुखपृष्ठ कथेमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ख्रिस्ती महार हा विषय उचलून धरला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय विषयसूचीवर एक वर्ष हा विषय गाजत राहिला.
 
या काळात बाळासाहेब गायकवाड यांचे ’ख्रिस्ती महार’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची मुखपृष्ठ कथा ’विवेक’ने केली होती. या मुखपृष्ठ कथेमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ख्रिस्ती महार हा विषय उचलून धरला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय विषयसूचीवर एक वर्ष हा विषय गाजत राहिला. 1987 साली डॉ. गंगाधर पानतावणे समरसता परिषदेला आले, म्हणून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीने त्यांना बहिष्कृत केले. त्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी ’विवेक’ने उपलब्ध करून दिली.”
 
 
“विवेकने सामाजिक बांधिलकी जपली, त्याचबरोबर विवेकचा वाचकवर्गसुद्धा अशीच सामाजिक बांधिलकी जपणारा आहे, असा तुला नेहमीच अनुभव आला, त्याबद्दल काही सांगशील का?”
 
 
“यमगरवाडी प्रकल्पापाठोपाठ मगरसांगवी, अनसरवाडा, नेरले या गावी आणखी काही प्रमुख प्रकल्प उभे राहिले. या प्रकल्पांची पैशाची गरज फार मोठी आहे. सुरुवातीला एक प्रयोग करण्यात आला. ’विवेक’च्या वाचकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी वर्गणीबरोबर महिन्याला एक रुपया याप्रमाणे 12/- रुपये प्रकल्पाला दान द्यावेत. या आवाहनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता दर वर्षी भटके-विमुक्त विकास प्रकल्पासाठी सहा ते सात लाख रुपये उभे केले जातात. साप्ताहिक विवेक या सर्व प्रकल्पांचा एक प्रमुख आधारस्तंभ झाला आहे. ’विवेक’च्या विविध लेखांमधून भटके-विमुक्त समाजाच्या दैन्य-दु:खाबरोबर प्रगतीच्या कथाही वारंवार प्रकाशित केल्या जातात.”
 
 
“खरे म्हणजे आठवड्याला साप्ताहिक प्रकाशित करणे हेच एखाद्या साप्ताहिकाचे कार्य आणि स्वरूप असते. पण साप्ताहिक विवेकने अगदी चित्रपटनिर्मितीपर्यंत भरारी घेतली, याबद्दल काय सांगशील?”
 
 
“आठवड्याला साप्ताहिक प्रकाशित करण्याबरोबरच अभिव्यक्तीची अन्य माध्यमेसुद्धा विवेकला खुणावत होती. याचा व्याप इतका वाढत आहे की, ‘या सर्व व्यापाच्या जोडीला आम्ही आठवड्याला साप्ताहिकसुद्धा प्रकाशित करतो’ असे विनोदाने म्हणावे लागेल. नियमित अंकाबरोबर वेगवेगळ्या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या रूपाने हा प्रवास सुरू झाला. भारतात धार्मिक लोकसंख्येचे संतुलन बिघडून हिंदू समाज अल्पसंख्य होण्याच्या मार्गावर आहे, या विषयावरील जनजागृती करणारा ’तुमचा नातू हिंदू राहील का?’ हा विशेषांक केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात गाजला. याच विषयावरील ’हिंदू अल्पसंख्य होणार का?’ हे पुस्तक ’विवेक’ने प्रकाशित केले. माहितीपूर्ण ठरू शकतील अशा विशेषांकाची निर्मिती हा ‘साप्ताहिक विवेक’चा हातखंडा झाला आहे. घरकूल, पर्यटन, पैठणी, आयटी अशा विविध विषयांची रेलचेल असणारे विशेषांक विवेक दर वर्षी प्रकाशित करीत असतो. अत्यंत उपयुक्त ठरू शकेल अशी विविध विषयांवरील माहिती या विशेषांकांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचते. या माहितीच्या आधारावरच विवेकचे ते ते अंक संग्राह्य ठरतात.”
  
 
“तशी पुस्तके प्रकाशित करणार्‍या विविध संस्था आणि पब्लिशिंग हाउसेस महाराष्ट्रात भरपूर आहेत. विवेकच्या पुस्तक प्रकाशनाचे वेगळेपण कोणते?”
 
 
“महाराष्ट्रात 1990पासून भटके-विमुक्त विकास परिषदेच्या कामाला सुरुवात झाली. भटके-विमुक्त समाजाचे प्रश्न विविध प्रकारे समाजापुढे आणण्याचे काम ’विवेक’ने स्वीकारले. 1993 सालापासून यमगरवाडीचा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पामागेही ’विवेक’ ठामपणे उभा राहिला. 1993 सालापासूनच गिरीश प्रभुणे यांचे लेखन ’विवेक’मध्ये प्रकाशित होऊ लागले. दर दिवाळी अंकात एकेका भटक्या-विमुक्त जमातीचा परिचय त्यांनी कथारूपाने करून दिला. या लेखांचे पुढे ’पालावरचं जिणं’ या नावाने पुस्तक प्रकाशित झाले. महाराष्ट्रात त्याचा विक्रमी खप झाला. ’विवेक’ राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या अनेक विषयांचा पाठपुरावा सातत्याने करीत असतो. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांविषयीची माहिती गावोगावी प्रवास करून व त्या माहितीचे संकलन करून ती ’विवेक’मध्ये वेळोवेळी प्रकाशित केली गेली आहे. पाण्याच्या प्रश्नावर माधवराव चितळे यांचे ’भारतीय जलक्रांतीची पदचिन्हे’ हे पुस्तकच ’विवेक’ने प्रकाशित केले आहे. राष्ट्रीय विषयावरील आणखी काही महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन ’विवेक’ने सातत्याने केले आहे. ‘संघर्ष महामानवाचा‘, ‘जेव्हा गुलाम माणूस होतो’, ‘भट्टी ओतार्‍याची’, ‘इस्लामी दहशतवाद - जागतिक आणि भारतीय’, ‘वंदे मातरमची आत्मकथा’ अशी काही ठळक पुस्तके आहेत. ‘मन : सर्व शक्तींचे आगर’, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या इंग्लिश कवितांचा मराठी भावानुवाद - ‘माझी जीवनयात्रा’, सतीश हावरे यांच्यावरील ‘आर्यक’ हे पुस्तक, त्याचबरोबर ‘रसमयी लता’ हे पुस्तक आणि त्याचा रसिकमनावर अजूनही रुंजी घालणारा नेत्रदीपक कार्यक्रम अशा काही वेगळ्या विषयांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल.”
 
 
“या पुस्तक प्रकाशनाकडून ग्रंथांच्या प्रकाशनाकडे तुझी पावले कशी वळली?”
 
 
“गेली पंचवीस वर्षे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथनिर्मितीच्या कामात ’विवेक’ गुंतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख प्रचारकांचा तसेच संस्थांचा धावता इतिहास ग्रंथबद्ध करण्याचे काम ’विवेक’ने केले आहे. आतापर्यंत ‘अमृतपथ’, ‘राष्ट्रसाधना’, ‘संघगंगोत्री’, ’राष्ट्ररत्न अटलजी’, ‘राष्ट्रऋषी श्रीगुरुजी’, ‘भाजपा - ध्येयपथावरील पंचवीस वर्षे’, ‘कृतिरूप समरसता’,
 

vivek  
‘समाजसंघटक दामुअण्णा’, शिवराय तेलंग स्मृतिगंध या ग्रंथांमुळे संघअभ्यासकांना संदर्भासाठी लिखित संघविषयक चर्चा जेव्हा चालते, तेव्हा संदर्भग्रंथ म्हणून वरील ग्रंथांचा उपयोग केला जातो. 2006 साली प्रकाशित केलेल्या ’कृतिरूप समरसता’ या ग्रंथात भटके-विमुक्त समाजाच्या भावपूर्ण कथा, परिवर्तनाच्या कथा दिलेल्या आहेत. पारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारून अनन्वित अन्याय आणि अत्याचार होतात. त्यांना वाचा फोडण्याचे काम कैक वेळा ‘विवेक’ने केले आहे. पोलिसांनी दुर्योधन काळे या पारधी युवकाची हत्या केली. या हत्येची पूर्ण बातमी ’विवेक’मध्ये प्रकाशित झाली. पुढे या हत्याप्रकरणी पोलीस निलंबित झाले. त्यांच्यावर खटला भरला गेला आणि त्यांना शिक्षाही झाली.
 
 
त्यानंतरच्या काळात आम्ही विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण पुस्तके प्रकाशित केली आणि वेगवेगळ्या विषयांवर उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती केली गेली. मग विवेकने हाती घेतला ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश’ हा बारा खंडांचा महत्त्वाकांक्षी महाप्रकल्प. मराठी बाणा घडविणार्‍या विविध क्षेत्रांतील स्त्री-पुरुषांचा परिचय करून देणारे हे बारा खंड प्रकाशित करण्याची योजना आहे. विवेकने पूर्वी मर्मबंध या नावाने टिळक आणि आगरकर यांच्यावरील दूरदर्शनपटाची निर्मिती केली होती आणि अगदी अलीकडेच ‘कालजयी सावरकर’ हा स्वातंत्र्यवीर सावकरांवरील चित्रपट आणि ‘दुर्दम्य लोकमान्य’ हा लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील चित्रपट निर्माण केला आहे.
 
 
 
युवकांच्या गरजा लक्षात घेऊन ‘साप्ताहिक विवेक’ने ’युवा ’टेलिस्कोप’ हा उपक्रम सुरू केला आहे. करिअर, उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास हे विषय केंद्रस्थानी असलेल्या या उपक्रमात महाराष्ट्रातील हजारो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या विषयांत तज्ज्ञ म्हणून काम करणार्‍या अनेक मान्यवरांनीदेखील या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.”
 
 
 
माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगातही ’विवेक’ मागे नाही. वाचकांशी संवाद साधू शकेल अशी वेबसाइटही ’साप्ताहिक विवेक’तर्फे चालविण्यात येत आहे. एका विशिष्ट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले ‘विवेक’ साप्ताहिक काळानुरूप बदल करत आज उभे आहे.”
 
 
“बरे मित्रा, आता तुझ्या परिवाराबद्दल थोडे सांग ना!” त्याने उत्सुकतेने विचारले.
 
 
“अरे, आतापर्यंत तुला जे माझे अन्य उपक्रम सांगितले, तो माझा परिवारच की! परिवार म्हणजे मला वाटते तुला माझ्या भावा-बहिणींची माहिती हवी आहे तर! ऐक - मला दोन लहान भाऊ आहेत. एकाचे नाव आहे ‘हिंदी विवेक मासिक’ आणि दुसर्‍याचे नाव आहे ‘शिक्षण विवेक मासिक’. त्यांची तुला ओळख करून देतो.” असे म्हणून ‘विवेक’ने आत पाहत हाक मारली आणि लागलीच दोन तजेलदार गुटगुटीत बाळे बाहेर आली. थोरल्याच्या खांद्यावर हात ठेवून विवेक म्हणाला, “हा हिंदी विवेक, महाराष्ट्राबाहेर ज्याने माझी ओळख अमराठी लोकांतही उत्तमपणे वाढीस लावली आहे. यामुळे मराठी भाषकांचे कुंपण ओलांडून विवेक अखिल भारतीय झाला. हे काम सोपविण्यात आले अमोल पेडणेकर या विवेक समूहातील धडाडीच्या कार्यकर्त्याकडे. त्याने हे आव्हान समर्थपणे पेलले आणि यशस्वी करून दाखविले. त्यानंतर नियतकालिकांची मालिकाच सुरू झाली. वैद्यराज, ज्येष्ठपर्व आणि नंतर शिक्षण विवेक यामुळे विवेकच्या वाचकांचा परीघ वाढला. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यात मैत्रभाव जपणारे ‘शिक्षण विवेक’ हे मासिक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, छत्रपती शिक्षण मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि भारतीय शिक्षण प्रसारक संस्था या संस्थांमधील 80 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. शिक्षण विवेकतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन होत असते. काव्य अभिवाचन स्पर्धा, पपेट सादरीकरण स्पर्धा, दिवाळी अंक स्पर्धा, किल्ले स्पर्धा, महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, सांगू का गोष्ट स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, तसेच उन्हाळी शिबिरे, बालसाहित्य संमेलन, ‘शिक्षण माझा वसा’ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार, लेखन कार्यशाळा अशा स्पर्धा-उपक्रमांना विद्यार्थी-शिक्षक-पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.”
 
 
“एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे तुझ्या या चिरतरुण तजेलदार आणि बाळसेदार रूपाचे रहस्य काय?” त्याने थोडा साशंकतेने बिचकतच प्रश्न विचारला.
 
 
तो प्रश्न ऐकून ‘विवेक’ अगदी दिलखुलासपणे हसला आणि म्हणाला, “मित्रा, हा प्रश्न विचारायला इतका वेळ संकोच का बाळगून होतास! यात फार मोठे रहस्य नाही आणि असलेच तर ते उघड केल्याने आमची कोणतीही हानी वा तोटा होणार नाही, कारण आमच्या या ट्रेड सिक्रेटची कोणाला नक्कल वा कॉपी करता येणार नाही. मित्रा, माझ्या चिरतरुणपणाचे रहस्य आहे माझ्यावर अगदी अपत्यवत प्रेम करणारे माझे संपादक आणि व्यवस्थापक व त्याचबरोबर माझा देवदुर्लभ कार्यकर्त्यांचा चमू! त्यांच्या नावांची यादी फार मोठी आहे आणि अनेकांना त्यांच्या नावाचा उल्लेख करणे आवडणारसुद्धा नाही. पण तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मला ते कर्तव्य पार पाडणे भाग आहे. असो, वानगीदाखल काही नावांचा येथे उल्लेख करणे अगदी प्रस्तुत होणार आहे.
 
 
 
त्यात सुरुवातीला उल्लेख करावा लागतो राजाभाऊ नेने यांचा, ज्यांच्या नावाने आपण एक पुरस्कारसुद्धा देत असतो. राजाभाऊ नेने आधी गुजरातमध्ये संघप्रेरणेने सुरू झालेल्या ‘साधना’ या साप्ताहिकाचे संपादक होते. नंतरच्या काळात पत्रकारिता क्षेत्रापासून काही काळ दूर राहिलेले राजाभाऊ श्रीगुरुजींच्या प्रेरणेने पुन्हा पत्रकार झाले आणि विवेकचे संपादक म्हणून काम करू लागले. ‘विवेक’मध्ये दिवसभर वाचन, लेखन, आल्यागेल्याचा संपर्क, मुद्रितशोधन अशी अनेक कामे चालू असत. प्रचलित प्रश्नांवर चर्चा हा तर साप्ताहिकाचा प्राणच असतो. पण चर्चा करताना राजाभाऊंची मांडणी तर्कशुद्ध असे. लेखक नसलेल्याला लेखक करणे, नव्या लेखकांना रुळलेले लेखक बनविणे, शुद्धलेखन कसे करावे ते लेखकांना सांगणे, मजकूर उत्तम संपादित करून जुळार्‍याकडे देणे, संदर्भ नीट जतन करणे, अंक वेळेवर तयार करणे वगैरे सर्व कामे राजाभाऊ करत असत. त्यांनी या कामाला अतिशय चांगली शिस्त लावली होती.
 
 
पुढच्या काळात माझी काळजी घेऊन माझ्यात कालानुरूप बदल घडविणारे पालक मला लाभले, ते म्हणजे प्रबंध संपादक दिलीप करंबळेकर! गोव्यातील प्रचारकी जीवन संपवून 1980 साली ते विवेकमध्ये रुजू झाले. 1980 ते 1997 हा कालखंड हिंदुत्ववादी विचारांच्या दृष्टीने फार मोठा खळबळीचा कालखंड होता. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधीच्या हुकूमशाहीविरुद्ध लढा देण्याकरिता सर्व पक्ष एकत्र आले. पण दीड वर्षातच पुन्हा सर्व पक्ष अलग होण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. 1980 साली भाजपा स्वतंत्रपणे वाटचाल करू लागला. भाजपाच्या प्रारंभिक धोरणांमुळे कार्यकर्त्यांत निर्माण झालेली अस्वस्थता, त्यानंतर विहिंपच्या एकात्मता यज्ञ कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, त्यापाठोपाठ उभे राहिलेले श्रीरामजन्मभूमीचे आंदोलन, अडवाणींची सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा, यादरम्यान देशभरात साजरी झालेली आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची जन्मशताब्दी, कारसेवा, 6 डिसेंबरचा उद्रेक, महाराष्ट्रात झालेले सत्तांतर आदी देशाच्या भविष्यावर दीर्घकालीन परिणाम घडविणारा हा कालखंड होता. याच कालखंडात राजकारणावरील वैचारिक पगडा कमी झाला व जातीपातीच्या राजकारणाने मूळ धरले. या सर्वाचे साक्षेपी विश्लेषण या काळातील विवेकच्या अंकामध्ये करण्यात आले.
 
 
याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रातील आव्हानेसुद्धा कमी नव्हती. वृत्तपत्रसृष्टी वैचारिक पत्रकारितेकडून झपाट्याने व्यावसायिक बनत गेली. वृत्तपत्र व्यवसायनिष्ठ झाले नाही, तर त्यांना भवितव्य नव्हते. त्यामुळे या संक्रमणकाळातही टिकून राहण्यासाठी पुढील प्रवासाची काटेकोर आखणी आवश्यक होती. याच पंधरा-सोळा वर्षांच्या कालखंडात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विवकेने विविध उपक्रम केले. त्यातच ‘विवेक व्यासपीठ’ची निर्मिती झाली. श्रीरामजन्मभूमीच्या लढ्यानंतर हिंदुत्वाविषयी देशात व परदेशांत जागृती निर्माण झाली. त्या अभ्यासाला चालना मिळावी, म्हणून हिंदू विवेक केंद्राची स्थापना करण्यात आली. विवेक दर्पण या संस्थेचीही निर्मिती झाली. अशा अनेक उपक्रमांतून समाजप्रबोधनाचा वसा चालवीत विवेक गतिमान राहिला.
 
 
मात्र 1980मध्ये साप्ताहिक विवेकचे प्रकाशन काही काळासाठी बंद पडले व नंतर ते पुन्हा सुरू झाले. तेव्हा अनंत अडचणी होत्या व असंख्य तक्रारी होत्या. या काळात ज्यांनी महाराष्ट्रभर प्रवास करून या तक्रारीचा कडवट घोट पचविला व आपल्या आर्जवी आणि आपुलकीपूर्ण स्वभावाने विवेकशी अनेक मंडळी जोडली व कार्यकर्त्यांचा गोतावळा जमविला, ते कल्याण-डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांचा मला हिंमतीने उभे करण्यात सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर हळूहळू विवेकचा संच बनत गेला. जाहिरात विभाग सांभाळणारे अशोक मुडे यांनी आर्थिक बाबतीत व विवेकचे व्यवस्थापक शहाजी जाधव यांनी सन्मवयाच्या बाबतीत आपापले योगदान दिले. तसेच 1985 साली विवेकमध्ये आलेले संपादक रमेश पतंगे यांनी आपल्या वैचारिक मांडणीने विवेकचा स्वतंत्र ठसा उमटविला. सामाजिक समरसता मंच, समरसता साहित्य परिषद, भटके-विमुक्त विकास परिषद असे सामाजिक न्यायाच्या विविध विषयांसाठी पाठबळ उभे करण्याचा भरभक्कम प्रयत्न झाला. माझ्या पंखामध्ये नवीन बळ भरले गेले आणि काळानुसार नवीन झेप घेण्यासाठी मी सज्ज झालो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अमृतमहोत्सवी वाटचाल शब्दबद्ध करणारा ‘अमृतपथ’ हा विशेष ग्रंथ रमेश पतंगे यांच्या कुशल संपादकत्वाखाली सिद्ध झाला आणि त्याने एक इतिहासच घडविला. आपल्या वाचकवर्गाची अशी वैचारिक भूक लक्षात घेऊन ती भागविण्यासाठी विविध जिल्ह्यांच्या ‘संघसरिता’ ग्रंथांची मालिकाही निर्माण झाली आणि आतासुद्धा आगामी संघशताब्दीनिमित्त हिंदू राष्ट्राच्या जीवनोउद्देशाच्या क्रमबद्ध विकासाची अभिव्यक्ती सांगणारा विशेष ग्रंथ निर्माण होत आहे. अशा रितीने माझ्या बाळसेदार आणि चिरतरुण रूपाचे कौतुक करीत असाल, तर त्यासाठी मला घडविणारे हे अनेक हात कारणीभूत आहेत.”
 
 
“वाऽ वाऽऽ! खरोखरच प्रेरणादायक वाटचाल आहे बुवा तुझी! ही मुलाखत खूपच रंगली! बरे, तुझ्या पुढील वाटचालीला मनापासून शुभेच्छा! आणि मित्रा, तुझे चिरतरुण रूप पाहता ‘औक्षवंत हो’ असेच म्हणायचे ना!” त्याने गुगली टाकली.
 
 
“हो.. जरूर दे! माझ्या शतकपूर्तीची मुलाखत घेण्याचे भाग्य तुला लाभो अशा मी तुला शुभेच्छा देतो. आणि जाता जाता... विवेकचा ग्रंथ-पुस्तक प्रकाशन विभाग आता स्वतंत्रपणे सुरू आहे. साप्ताहिक विवेकची धुराही आता नव्या पिढीकडे सोपविण्यात आली आहे. या टीमने छापील अंकाबरोबरच विवेकला डिजिटल माध्यमातही नेले. या माध्यमातून दृकश्राव्य कार्यक्रम, व्याख्याने योजत आपले कार्यक्षितिज विस्तारले आणि ते विस्तारतेच आहे. तेव्हा पुन्हा भेटूच, धन्यवाद!”
 
 
Powered By Sangraha 9.0