गौरी माहुलीकर 9869105178
आदिशंकराचार्यांचे विलक्षण असे अद्वैत वेदांताचे तत्त्वज्ञान आणि मध्य भारत यांचा अतिशय घनिष्ठ संबंध. त्यामुळे ओंकारेश्वरला उभारले जाणारे ‘एकात्मधाम’ आणि आदिशंकरचार्यांचा 108 फूट उंचीचा पुतळा यात कुठलीच आश्चर्याची गोष्ट नाही. या 108 फूट उंचीच्या शंकरचार्यांच्या पुतळ्याचा म्हणजेच ‘एकात्मतेच्या प्रतिमे’चा अनावरण सोहळा नुकताच पार पडला. त्या निमित्ताने द्वैताकडून अद्वैताच्या प्रवासाचे हे चिंतन...
भरतखंडामाझारी। संत झाले बहुतापरी।
ही न पर्वणी आली खरी। अवांतर देशाकारणे॥
जंबूद्वीप हे धन्य धन्य। आहे पहिल्यापासोन।
कोणत्या सुखाची वाण। येथें न पडली आजवरी॥
या संत दासगणू महाराजांच्या पंक्ती भारतभूमीच्या सार्याच, विशेषतः ज्ञान आणि अध्यात्माच्या बाबतीत फळफळलेल्या भाग्याचे अतिशय मार्मिक शब्दांत वर्णन करतात. या अद्वितीय सौभाग्यातील सिंहाचा वाटा मध्यवर्ती भारताचा म्हणजेच आजच्या मध्य प्रदेशाचा. मध्य प्रदेशाचे भाग्य एवढे थोर की, एक नव्हे तर दोन युगपुरुषांनी इथे अध्यात्म दीक्षा घेतली.
ते म्हणजे - द्वापारयुगप्रवर्तक भगवान श्रीकृष्ण आणि कलियुगप्रवर्तक आदिशंकराचार्य. उज्जयनीला श्रीकृष्णांनी, तर ओंकारेश्वरला शंकराचार्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केले. भारतीय अध्यात्माच्या सनातन परंपरेच्या ध्रुवस्थानी असणारे आदिशंकराचार्य, त्यांचे विलक्षण असे अद्वैत वेदांताचे तत्त्वज्ञान आणि मध्य भारत यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे ओंकारेश्वर येथे उभारले जाणारे एकात्मधाम आणि आदिशंकराचार्यांचा 108 फूट उंचीचा पुतळा यात कुठलीच आश्चर्याची गोष्ट नाही. किंबहुना, हे कार्य याआधीच व्हावयास हवे होते. या कार्याचे महत्त्व लक्षात येऊन त्याची पायाभरणी व्हायला देखील स्वतंत्र भारताची 75 वर्षे जावी लागली. परंतु, देर आए, दुरुस्त आए! या 108 फूट उंचीच्या शंकराचार्यांच्या पुतळ्याचा म्हणजेच ‘एकात्मतेच्या प्रतिमे’चा अनावरण सोहळा नुकताच दि. 21 सप्टेंबरला पार पडला.
मुळात ‘हिंदुस्थान का दिल’ असे बिरूद मिरवणार्या आणि आपल्या राज्य पर्यटनाच्या जाहिरातीत त्याचा अभिमानाने उल्लेख करणार्या मध्य प्रदेशात शंकराचार्यांची प्रतिमा आणि अद्वैत वेदांताचे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र ‘एकात्मधाम’ उभारणे, हा विचारच किती चपखल आहे! वेगवेगळ्या पंथ-संप्रदायांमध्ये विभागलेल्या आणि त्यांच्या प्रतिस्पर्धात्मक वृत्तीमुळे वेगवेगळ्या दिशांना ताणून विखुरलेल्या भारतीय समाजाला अद्वैताच्या रेशमी एकसंध धाग्याने एकत्र बांधून भारतमातेला सनातन धर्माच्या अविरत वाटचालीची हमी देणार्या या मातृभक्त सुपुत्राचे, आदिशंकराचार्यांचे स्थान तिच्या हृदयातच अर्थात मध्यवर्ती भारतातच असले पाहिजे, नाही का? प्रकल्पाचे नावही, किती साजेसे- ‘एकात्म धाम!’ शंकराचार्यांच्या अद्वैतवादाचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे ‘जीवब्रह्मैक्यम.’ जीव आणि परमात्मा/परब्रह्म ही दोन वेगवेगळी अस्तित्वे नसून, एकच असल्याचा हा वैश्विक एकात्मतेचा सिद्धांत! त्यामुळे हा अद्वैत सिद्धांत आणि त्यावर संशोधन करण्यासाठी उभारलेल्या केंद्राचे याहून परिपूर्ण नाव शोधूनही सापडले नसते.
आधीच म्हटल्याप्रमाणे, आदिशंकराचार्यांच्या जडणघडणीत मध्य भारताचा, विशेषतः ओंकारेश्वर या स्थानाचा फार मोलाचा वाटा आहे. गुरुकुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मज्ञानप्राप्तीच्या ओढीने व्याकुळलेला लहानगा शंकर आपल्या जन्मदात्रीची परवानगी घेऊन संन्यासदीक्षा घ्यायला गुरूच्या शोधार्थ भटकू लागला. त्याची ही तहान शेवटी नर्मदातीरावर ओंकारेश्वरात भागली. इथल्या एका गुहेत आदिशेषावतारी श्रीगोविंद भगवत्पाद ध्यानमग्न बसलेले होते. बालशंकराने त्यांचा शिष्य होण्याची इच्छा व्यक्त केली असता, त्यांनी शंकराला त्याची ओळख विचारली. तेव्हा आठ वर्षांच्या शंकराने दिलेले उत्तरच, त्या पोरगेल्या वयातही असलेल्या त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेचे द्योतक ठरते. ते असे- ‘मी पृथ्वी नाही, पाणी नाही, अग्नी नाही, वायू नाही आणि आकाशही नाही. माझा कुठलाही गुणधर्म माझी व्याख्या असू शकत नाही. माझी इंद्रिये म्हणजे देखील मी नाही. मी म्हणजे फक्त अखंड चैतन्य!’ या उत्तराने प्रसन्न झालेल्या गोविंदभगवत्पादांनी शंकराच्या चेहर्यावरील बुद्धीची चमक ओळखली आणि आपला शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला.
शंकराला हवी असलेली संन्यास दीक्षादेखील दिली. पुढील चार वर्षे शंकराने गुरुसान्निध्यात राहून शिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी शंकराचे सारे शिक्षण पूर्ण झाले. ‘अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रवित्, षोडशे कृतवान्भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात्।’ या श्लोकात शंकराचार्यांचा अल्पायुषी पण असामान्य प्रतिभा दर्शवणारा जीवनप्रवास सांगितला आहे. शिवाचा वरदहस्त लाभलेल्या आणि अवघ्या चार वर्षांत आध्यात्मिक आणि योगसामर्थ्य मिळवणार्या शंकरास दिग्विजययात्रेला जाण्याची आज्ञा गुरूंनी केली. अशा त्या नुकत्याच पूर्ण केलेल्या शिक्षणाच्या ज्ञानतेजाने लकाकणार्या, दिग्विजयाला निघालेल्या 12 वर्षीय शंकराची प्रतिमा ओंकारेश्वरात उभारली गेली आहे. शंकराचार्यांच्या दिग्विजययात्रेचा हेतूच होता की, वेगवेगळ्या विचारधारा, पंथ, संप्रदाय यांच्या वादात अडकून सैरभैर झालेल्या, आपल्या विचारसरणीच्या दुराभिमानामुळे इतर विचारसरणीच्या लोकांबाबत द्वेष, मत्सर वाढत चाललेल्या समाजाला संघटित करणे. अर्थात, समाजाचे एकीकरण करणे. त्यामुळे ही शंकराचार्यांची एकात्मतेची प्रतिमा जणू आजच्या काळातही वाढत चाललेल्या तशाच परिस्थितीशी दोन हात करायला उचललेला विडाच!
शंकराचार्यांच्या पर्वताएवढ्या कार्याची महती सर्वश्रुत आहे. संपूर्ण भारतभ्रमण करून इतर पंथ, परंपरा असलेल्या पंडितांना शास्त्रार्थात हरवून सनातन वैदिक धर्माची पुनर्स्थापना त्यांनी केली. प्रमुख दहा उपनिषदांवर, भगवद्गीतेवर आणि वेदांत तत्त्वज्ञानाचा आद्य शास्त्रग्रंथ ‘ब्रह्मसूत्रा’वर भाष्ये लिहिली. अद्वैतावर अनेक प्रकरणं, ग्रंथ लिहिले. अद्वैताचा मूळ सिद्धांत निर्गुणब्रह्माच्या सर्वव्यापी सार्वभौमत्वाचा असला, तरी सगुणब्रह्माच्या उपासनेला आचार्यांनी कधीच कमी लेखले नाही. या सगुणोपासनेसाठी षण्मताची स्थापना त्यांनी केली. अद्वैताचे सिद्धांत आणि षण्मतांतील वेगवेगळ्या देवतांवर स्तोत्रे लिहिली. भारतीय गुरुपरंपरेच्या अखंडतेसाठी भारताच्या चार कोपर्यांत चार मठांची स्थापना केली. याशिवाय संन्याशांच्या ‘दशनामी’ संप्रदायाची स्थापना केली आणि हे सारे फक्त आपल्या 32 वर्षांच्या अल्पायुष्यात केले. प्रकांडपांडित्य, असामान्य काव्यप्रतिभा, तेजःपुंज व्यक्तिमत्त्व, दयाळू वृत्ती, गुरुचरणी लीन होण्याची विनयशीलता, मोठ्या मोठ्या पंडितांना आव्हान देण्याची निर्भयता आणि स्वतःच्या ज्ञानावरील अपार श्रद्धा व आत्मविश्वास हे सर्व गुण एकाच व्यक्तीच्या ठायी कसे, असा विचार केल्यावर शंकराचार्य हे, त्या सदाशिवाने धर्मपुनर्स्थापनेसाठी घेतलेला अवतार होते, हे पटते.
एकात्मतेविषयी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, एकात्मतेचा अर्थ बळजबरीने निर्माण केलेले साधर्म्य किंवा समानता नव्हे. आपली विविधता आणि त्यातून येणारी सांस्कृतिक समृद्धी जपत शेवटी आपण सर्व एकच आहोत, असा ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा जगप्रसिद्ध संदेश देणारी ज्ञानप्रगल्भता म्हणजेच एकात्मता! बाहेरील भौतिक रूपे वेगवेगळी असली तरी या सार्या प्रपंचाचा आत्मा एकच असल्याचे सांगणारी वैचारिक संपन्नता म्हणजे एकात्मता! भारताच्या संस्कृतीचे ठळक वैशिष्टय असलेल्या ‘विविधतेत एकता’ याचेच हे आध्यात्मिक विस्तारित रूप म्हणावे लागेल किंवा कदाचित अद्वैतवेदांत सिद्धांताच्या कणाकणांत भरलेल्या एकात्मतेचे सामाजिक रूप म्हणजे भारताची संस्कृती!
‘आधी अंडे की कोंबडी’ या प्रश्नाला जसे उत्तर नाही; तसेच भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव संस्कृतीवर की संस्कृतीचा तत्त्वज्ञानावर, या प्रश्नालाही उत्तर नाहीच. किंबहुना एक ठोस उत्तर नाही, हीच भारतीय ज्ञानपरंपरेची विशेषता आहे. तिच्या बहुपेडी सर्वसमावेशक वृत्तीची पदोपदी येणारी प्रचिती भारताच्या ‘विश्वगुरू’ पदवीला सार्थ ठरवते. अशा या एकात्मतेचे प्रतीक असलेल्या बालशंकराचे चित्र विश्वविख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी चित्तारले आणि त्यांनी चित्तारलेल्या आदिशंकराचार्यांच्या चित्राचा आधार घेऊन प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपूरे यांनी बालशंकराची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती साकारली. शंकराचार्यांच्या प्रतिमेबरोबरच अद्वैत लोक पुराण वस्तुसंग्रहालय, अद्वैत नर्मदा विहार अशा वास्तूही एकात्मधाम प्रकल्पाचा भाग आहेत. यावर कडी म्हणजे ‘आचार्य शंकर आंतरराष्ट्रीय संस्था.’ या अंतर्गत सात वेगवेगळ्या केंद्रांची स्थापना होणार आहे. यात चार संशोधनकेंद्रे, एक ग्रंथालय, एक अद्वैताचे प्रसार केंद्र आणि एका गुरुकुलाचा समावेश आहे. येथील चार संशोधन केंद्रांना आचार्यांच्या चार शिष्यांची नावे देण्यात येणार आहेत.
आचार्य पद्मपादांचे नाव अद्वैत तत्त्वज्ञानाच्या, आचार्य हस्तामलकांचे नाव शास्त्राच्या, आचार्य सुरेश्वरांचे नाव समाजशास्त्रांच्या तर तोटकाचार्यांचे नाव कला, संगीत आणि साहित्यशास्त्राच्या संशोधन केंद्राला देण्यात आले आहे. अद्वैत तत्त्वज्ञान संशोधन केंद्रात अद्वैताच्या वेगवेगळ्या परंपरांवर आणि त्या परंपरांची आजच्या काळातली प्रासंगिकता, यावर संशोधन केले जाईल. या केंद्राचे स्थापत्य भारताच्या पूर्वभागात दिसणार्या वास्तूंवर, विशेषतः पुरीमधील जगन्नाथ मंदिराच्या स्थापत्यावर आधारित असेल. शास्त्रसंशोधन केंद्रात अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाची क्वांटम मेकॅनिक्स, कॉस्मोलॉजी यांसारख्या आजच्या काळातली शास्त्रांशी सांगड घालून संशोधन केले जाईल. या केंद्राचे स्थापत्य भारताच्या पश्चिम भागात दिसणार्या वास्तूंवर, विशेषतः द्वारका मंदिरावर आधारित असेल.
समाजशास्त्र संशोधन केंद्रात आजच्या समाजात असणार्या समस्यांवर अद्वैताचे तत्त्वज्ञान वापरून उपाय शोधले जातील. या केंद्राचे स्थापत्य भारताच्या दक्षिण भागात दिसणार्या वास्तूंवर, विशेषतः शृंगेरीच्या शारदापीठाच्या स्थापत्यावर आधारित असेल. कला, संगीत आणि साहित्यशास्त्राच्या संशोधन केंद्रात साहित्यात दिसणार्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतांवर प्रकाश टाकणे आणि कलेमार्फत अद्वैताचा प्रसार करणे, यावर संशोधन होईल. या केंद्राचे स्थापत्य भारताच्या उत्तर भागात दिसणार्या वास्तूंवर विशेषतः हिमालयीन प्रदेशांत दिसणार्या वास्तूंच्या स्थापत्यावर आधारित असेल. एकात्मधामात नागर, द्राविड, होयसळ, ओरिया, उत्तर भारतीय आणि केरळचे प्रांत विशिष्ट स्थापत्य एकाच ठिकाणी बघता येईल. ही निव्वळ कल्पनाच किती अनोखी आणि रोमांचकारी आहे! ‘एकात्मधाम’ हे खर्या अर्थाने ‘विविधतेत एकता’ या भारतीयांच्या अद्वितीय सांस्कृतिक मूल्याचे प्रतीक ठरेल. या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी मध्यप्रदेश सरकार आणि ‘आचार्य शंकर सांस्कृतिक एकता न्यास’ ही विश्वस्त संस्था या दोघांच्या समर्थ खांद्यांनी पेललेली आहे. या प्रकल्पाला सर्व जनतेने हातभार लावला आहे. सर्वांचे योगदान मिळून हा ‘एकात्मधाम’ प्रकल्प साकार होत असल्याने खर्या अर्थाने तो राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.
आजच्या काळातही भारताचा बहुतांश तरुण समाज चित्रविचित्र पाश्चात्य विचारधारांत अडकला आहे. या परदेशी विचारधारा बहुरंगी, बहुढंगी, बहुपेडी आणि तरीही अद्वितीय अशा भारतीय समाजाला लागू होतील का? या प्रश्नाचे उत्तर न शोधता, त्या विचारधारांच्या दृष्टिकोनातून भारतीय समाजाचे मूल्यमापन केले जाते. या अनाठायी प्रयोगातून आपसूक आलेल्या स्वसंस्कृतीच्या न्यूनगंडातून पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण वाढले आहे आणि भारताच्या अतुल्य तत्त्वज्ञानाचा, मूल्यांचा विसर पडत चालला आहे. अशावेळी तरुण भारताला परदेशी झापडातून जागे करून भारतीय दृष्टी देण्यासाठी आदिशंकराचार्यांशिवाय इतर कोणाला साद घालावी? या युगपुरुषाचे जीवनकार्य आणि त्याने दिलेला अद्वैत सिद्धांत इतका थोर आहे की, इतर कोणाचे नावही स्मरत नाही. अशा वेदांतसूर्य शंकराचार्यांना वाहिलेला हा ‘एकात्मधाम’ प्रकल्प सर्व भारतीयांना द्वैताच्या अंध:काराकडून अद्वैताच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारा ठरो, ही शंकरचरणी प्रार्थना!
(लेखिका ’चिन्मय इंटरनेशनल फाऊंडेशन’, आदि शंकर निलयम्, वेलियनाड, केरळ येथे अॅकेडमिक डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत.)
पूर्व प्रकाशित - मुंबई तरुण भारत