वैद्यकशास्त्रातील नोबेल मानकरी 2023 - कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वाइसमन

विवेक मराठी    21-Oct-2023
Total Views |
@डॉ. अनिल लचके
 कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वाइसमन यांना अशा पद्धतीची लस करताना अनपेक्षित अडचणी आल्या, त्या अडचणींचा सामना करत यशस्वीरित्या त्यांनी आपले ध्येय गाठलेे. या वर्षीच्या नोबेल मानकर्‍यांनी एम-आरएनएमध्ये केलेल्या अभिनव बदलामुळे ही लस तयार झाली.

vivek
 
मराठीत ‘दृष्टिआड सृष्टी’ असे म्हटले जाते, ते खरेय. डोळ्यांना न दिसणारे काही अतिसूक्ष्म जीवाणू-विषाणू साथीचे रोग पसरवतात आणि ते जीवसृष्टीला प्राणघातक ठरतात. एखादा रोग पसरण्याची शक्यता असते, तेव्हा तो होऊ नये म्हणून योग्य ती लस टोचून घेतली जाते. मात्र कोविड-19च्या प्राणघातक साथीवर लस उपलब्ध नव्हती, कारण कोविड-19 व्याधीचा विषाणू जगाला अपरिचित होता. या साथीच्या रोगावर एका वेगळ्या वैज्ञानिक तत्त्वावर आधारित लस तातडीने तयार करणार्‍या कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वाइसमन यांना 2023 या वर्षीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. दोघेही अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहेत. कॅरिको रसायनशास्त्रज्ञ आहेत, तर वाइसमन हे प्रतिकारशक्तीसंबंधी संशोधन करतात.
 
 
साथीच्या रोगांसाठी लस तयार करण्याच्या काही ठरलेल्या पद्धती आहेत. आतापर्यंत अनेक सुरक्षित लसी तयार केल्या आहेत. पण त्यासाठी वाजवीपेक्षा जास्त वेळ लागलेला आहे. विशेषत: कोविड-19सारखी जागतिक प्राणघातक साथ आली की वित्तहानी आणि प्राणहानी होते. जनमानसात सतत चिंतेचे, भीतीचे वातावरण पसरते. सामान्यत: लस म्हणजे त्या रोगाचे मेलेले किंवा ’विकलांग’ केलेले जीवाणू किंवा विषाणू असतात. ते जंतू सबळ/प्रबळ नसल्यामुळे त्यापासून रोग होत नाही, पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो, कारण जंतूंना नेस्तनाबूत करणारी प्रतिप्रथिने (अँटीबॉडीज) तयार असतात.
 
 
रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या या शास्त्राला इम्युनॉलॉजी म्हणतात. कोविड-19ची महाघातक साथ जगभर पसरली, तेव्हा ती आटोक्यात आणण्यासाठी अनेक देशांमधील संशोधक प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी अहोरात्र झटत होते. भारतात कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन प्रकारच्या प्रभावी आणि प्रचलित लसींचा यशस्वी उपयोग करण्यात आला.
 
 
अमेरिकेसह काही देशांमध्ये मात्र कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वाइसमन यांनी तयार केलेली लस टोचण्यात आली होती. त्यांनी तयार केलेली लस अभिनव अशा एम-आरएनए (आरएनए म्हणजे रायबो न्यूक्लिइक अ‍ॅसिड)चा - मेसेंजर आरएनएचा वापर करून लस तयार करण्यात आली होती. आधुनिक संशोधनानुसार लस लवकर तयार होण्यासाठी पूर्ण जीवाणू/विषाणूंऐवजी त्यांच्या एखाद्या महत्त्वपूर्ण प्रोटीनचा एक भाग निवडून तीच लस म्हणून वापरण्याची पद्धत सुरू झाली आहे. अर्थात ते विषाणूंचे प्रोटीन व्यक्तींच्या पेशींमध्ये मूलत: डीएनएमार्फत एम-आरएनए (मेसेंजर आरएनए) तयार करते. असे असेल, तर संबंधित विषाणूंचा निवडक एम-आरएनए जर लस म्हणून टोचली, तरीही प्रतिकारशक्ती निर्माण होते.
 
 
हे लक्षात घेऊन कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वाइसमन यांनी एम-आरएनएच्या क्रमवारीचा छोटा तुकडा वापरला. असा एम-आरएनए (पेशीच्या आत गेल्यानंतर) संबंधित प्रथिन तयार करतो. हे प्रथिन म्हणजे बाह्यहल्ला असल्याचे पेशीला तत्काळ समजते. लागलीच प्रतिकारशक्ती जागृत होऊन त्या प्रथिनांचा नाश करणारी प्रतिप्रथिने (अँटीबॉडीज) तयार केली जातात. तथापि कॅरिको आणि ड्र्यू यांनी प्रयोगशाळेत काही पेशी घेऊन ही पद्धत वापरल्यावर एक मोठी अडचण आली, ती म्हणजे एम-आरएनएच्या (लसीच्या) तुकड्यालाच बाह्यहल्ला असे समजून पेशीने त्याचे तुकडे करून नाश केला. यावर उपाय म्हणून जो एम-आरएनए लस म्हणून वापरायचा आहे, त्यात किंचित बदल केला गेला. हा किंचित केलेला बदल म्हणजे एम-आरएनए युरीडीन या बेस (अल्कली)ऐवजी बदललेले स्युडो (छद्मी) युरीडीन करून ते लस म्हणून वापरले. हा बदल पेशीला कळला नाही, म्हणून पेशीने ही लस स्वीकारली. कारण असाच छोटासा बदल केलेला अन्य एम-आरएनए प्रत्यक्ष पेशीमध्ये नेहमीच असतो, असे त्यांनी निरीक्षण केलेले होते. असा एम-आरएनए पेशीने सहजतेने स्वीकारून संबंधित कोविड-19चा विषाणू बनवतो तसे प्रोटीन बनवले.
 
 
या वर्षीच्या नोबेल मानकर्‍यांनी एम-आरएनएमध्ये केलेल्या अभिनव बदलामुळे लस तयार झाली. साहजिकच हा शोध नोबेल विनिंग ठरला आहे. कारण त्यामुळे जगाला लस लवकर तयार करण्याची सुरक्षित पद्धत मिळाली. लसीचे उत्पादन करण्यासाठीदेखील ही पद्धती सुलभ ठरणार आहे. एवढेच नव्हे, तर झिका, मर्स किंवा मलेरिया यासारख्या अन्य अनेक व्याधींसाठी लस तयार करण्याची नवीन पद्धत जगाला प्राप्त झाली आहे.
 
 
कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वाइसमन यांना अशा प्रकारची लस करताना अनेक अनपेक्षित अडचणी आल्या, कारण नेचर आणि सायन्स या अव्वल दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकांनी त्यांचा या विषयाचा महत्त्वपूर्ण शोधनिबंध नाकारलेला होता. कालांतराने तो इम्युनिटी नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झाला. एम-आरएनएविषयक संशोधन करताना निधी मिळवणे कठीण असते. कारण एम-आरएनएच्या संबंधित काही प्रयोगांना नेहमी अपयश आल्याचे दिसून येत होते. कॅटालिन कॅरिको यांना नोकरी करताना आणि ती टिकवताना अनेकदा अडचणी आल्या. ज्याचा शेवट गोड असतो, ते सगळेच गोड मानावे, असे म्हटले जाते. आतापर्यंत 1901पासून फक्त बारा महिलांना वैद्यकशास्त्रातील नोबेल मानकरी होण्याचा सन्मान लाभलाय. या मालिकेत कॅटालिन कॅरिको तेराव्या नोबेल मानकरी महिला झालेल्या आहेत. एवढेच नव्हे, तर व्यावसायिक पद्धतीने लस तयार करणार्‍या एका मोठ्या प्रयोगशाळेमध्ये त्या उपाध्यक्ष म्हणून कार्य पाहत आहेत.