सुखलोलुप झाली काया

02 Oct 2023 13:26:47
विषवृक्षाची बीजे या लेखमालिकेतील हा सहावा लेख. बदलत्या सामाजिक वास्तवाचा व कुटुंबव्यवस्थेवर होत असलेल्या त्याच्या परिणामांचा वेध आपण घेत आहोत. गेल्या भागात जागतिकीकरण - वस्तू उत्पादन - जाहिरात या मुद्द्याचा विचार केला होता. त्यामुळे लैंगिकतेच्या संदर्भात आपली विचारपद्धती कशी बदलली, हे या लेखात पाहू या.
 
vivek
जागतिकीकरण ही नजीकच्या काळातली विश्वव्यापी घटना आहे. बाजारपेठा, मॉल, दुकाने विविध वस्तूंनी, उत्पादनांनी भरून वाहत आहेत. समृद्धी मोजण्याची एककेही सकल उत्पन्न व सकल उपभोग आहेत. ही पाश्चिमात्य भौतिकतावादी पद्धत आता जागतिक पद्धत झाली आहे. यालाच विकास असेही म्हटले जाते. भारतीय वैचारिक परिवेशातला मूलभूत सिद्धान्त - मर्यादित उपभोग, सीमित उपभोग आता कालबाह्य झाला आहे की काय, अशी शंका येते. नसलेल्या गरजा निर्माण करून उत्पादन विकण्याचे जाहिरात व्यवसायाचे कौशल्य वादातीत आहे.
 
 
अशा परिस्थितीत सधन कुटुंबात जन्मलेल्या अपत्यांना सर्व सुखसाधने स्वत: कष्ट करून कमावण्यापूर्वीच मिळतात. आईवडिलांच्या सधनतेवर आपला जन्मजात हक्क आहे, असे त्यांना वाटू लागते. संपत्तीचा संचय प्रचंड प्रमाणात करण्याची विविध पारंपरिक व अपारंपरिक साधने, जमीनजुमला, सोने, जडजवाहीर, घरे, शेअर्स, देशी-परदेशी बँकांमध्ये खाती यांच्या जोडीला क्रिप्टो करन्सी आज उपलब्ध आहेत. महागड्या गाड्या, घड्याळे, विशिष्ट ब्रँडचे कपडे, मनोरंजन अशी भौतिक सुख देणारी साधने आहेतच. जोडीला उंची सौंदर्यवर्धन साधने, उपचार पद्धती म्हणजे कॉस्मेटिक सर्जरीही उपलब्ध आहेत. श्रीमंत व उच्च वर्गाचे अनुकरण करत मध्यम व निम्न आर्थिक वर्गही आपली वाटचाल करत असतो. त्याची एक साखळी व जीवनक्रम बनत असतो. आता हे सोडून सर्वांनीच संन्यास घ्यावा काय? असे अजिबात नाही. पण संयत व मर्यादित उपभोग हे एक जीवनमूल्य आहे, आजच्या हवामान बदलाच्या भयावह प्रश्नाचे तेच शाश्वत उत्तर आहे, याचा विसर पडू देऊ नये आणि विकासाच्या या तथाकथित प्रतिमानामध्ये माणूसपण हरवू नये, एवढी अपेक्षा!
 
 
‘सेन्स ऑफ एन्टायटलमेंट’
 
पालकांच्या आर्थिक स्तरामुळे व मुलांना सहज उपलब्ध होत असलेल्या सुविधांमुळे एक प्रकारचा ‘सेन्स ऑफ एन्टायटलमेंट’ - हक्कभावना अपत्यांमध्ये तीव्र होत जात आहे. हवे ते न मिळाल्यास मुले कोणत्याही थराला जातात. ‘मला अमुकच कॉलेज वा क्लास हवा’पासून पॉकेट मनी न मिळाल्यास चोरी, हिंसा, ब्लॅकमेलिंग, अतिरिक्त पैसा मिळवण्यासाठी देहविक्री, अमली पदार्थांची वाहतूक अशा प्रकारचे गैरव्यवसाय करणे अशापैकी काहीही घडू शकते. अपत्यांच्या मनात अशी हक्कभावना विकसित होणार नाही, ही जबाबदारी पालकांचीच आहे. प्रेम, लाड व मूल्ये यात गल्लत न करता कुशल सर्जरी करणार्‍या डॉक्टरचे, योग्य वेळी झाड कापणार्‍या माळ्याचे कौशल्य आत्मसात करायला हवे. ‘कट टु साइझ’ हे तत्त्व महत्त्वाचे आहे.
 
 
शरीरसुखाच्या कल्पना
 
अगदी गेल्या 25-30 वर्षांपर्यंत भारतात तरी कुमारवयीन शारीरिक संबंधांवर पालक व समाज लक्ष ठेवून होते. तरुण वयात लैंगिक भावना मनात येणार, विरुद्धलिंगी व्यक्तीचे आकर्षण असणार; पण हे वय विद्यार्जनाचे, आयुष्याच्या पायाभरणीचे, त्यामुळे लक्ष करियरकडे, मोठ्या उद्दिष्टांकडे ठेवण्याचा संस्कार व दबावही होता. शरीरसुखाचे महत्त्व होतेच, त्यामुळेच लग्नव्यवस्था होती. पण एकनिष्ठा व सुरक्षित संबंध हा नियम होता. नियम तोडणार्‍यांना प्रतिष्ठा नव्हती. आज हे कौटुंबिक नियम, संकेत, दबाव नाहीसे झालेले दिसतात. किती मुले-मुली विवाहपूर्व लैंगिक अनुभव घेतात, संबंध ठेवतात याची आकडेवारी मिळवणे कठीण आहे. पण आजची तरुण मुलेमुली त्यात काही गैर मानत नाहीत, बहुसंख्य मुले व मुली केवळ अनुभवाच्या पातळीवरही न राहता नियमित संबंध ठेवून असतात. एकनिष्ठा हा विषयच नसल्यामुळे किंवा त्याचा लग्नाशीही संबंध नसल्यामुळे सोयीनुसार जोडीदार बदलतात. समलिंगी संबंधांपासून ते थ्रीसम, फोरसम ग्रूप्स, विवाहानंतरही चवबदल म्हणून संमतीने जोडीदार बदलणे, विवाहबाह्य संबंध असे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत व चित्रपट, मालिका, वैचारिक चर्चा यांमध्ये त्यांचे समर्थन केले जाते.
 


vivek 
 
भारतीय संस्कृतीचे एक जीवन तत्त्वज्ञान आहे. त्यात व्यक्तिविकासाच्या, जीवनधारणेच्या व समाजधारणेच्या काही कल्पना व त्यांना जोडून सामाजिक, कौटुंबिक मूल्यव्यवस्था आहे. या मूल्याधारित जीवनव्यवस्थेत चार आश्रम - (1) ब्रह्मचर्य, (2) गृहस्थ, (3) वानप्रस्थ (4) संन्यास हे सांगितलेले आहेत. आज त्यांचा उच्चार, परिचय तरी नव्या पिढीला सांगितला जातो का? भौतिक सुखांच्या उपभोगाला त्यात नक्कीच स्थान आहे, पण भौतिकवादी होऊ नका असा संदेश पालक, शिक्षक व समाज आजच्या पिढीला देत आहे का? मुक्त शारीर लैंगिक संबंध हा अधिकार आहे की ही जबाबदारी आहे याची चर्चा होते का? हुकअप्स, रिलेशनशिप्स व ब्रेकअप्स हे तरुणाईचे महत्त्वाचे प्रश्न झाले आहेत.
 
 
कौमार्यजतन
 
आपल्या समाजात मुलीच्या चारित्र्याकडे आजही गांभीर्याने पाहिले जाते, जणू योनिशुचिता हा कौमार्याला - र्ींळीसळपळीूंला समानार्थी शब्द आहे. पण मुलग्याच्या र्ींळीसळपळीूंची किंवा कौमार्यभंगाची चर्चाही केली जात नाही. कौमार्यजतन हे ब्रह्मचर्य आश्रमातील म्हणजे विद्यार्थिदशेतील जर महत्त्वाचे मूल्य असेल, कौमार्यभंग हे अयोग्य असेल, तर तो नियम दोघांनाही का नको? मुलगी कुमारी हवी, कारण गर्भधारणा झाल्यास शरीरसंबंधांचे परिणाम उघड होतात. मात्र मुलग्याकडून तशी अपेक्षा, नियम वा सक्ती केली जात नाही. उलट लैंगिक संबंध हा ‘पराक्रम’ वा अभिमानाचा विषय मानला जातो. त्याचा असा संबंध त्याची सामाजिक पत, स्थान कमी करत नाहीत, हे दुर्दैव आहे.
 
 
vivek
 
लैंगिक संबंध व कायदे
 
मुलग्यांनाही विवाहाचे वय, संमतीने संबंध, पोक्सो कायदा या कायद्यांची माहिती असायला हवी. याविषयीच्या शारीरिक भावना, त्यांचे शारीरिक परिणाम व मानसिक परिणाम, होऊ शकणारे रोग हेही माहीत हवेत. आज संमतीने शरीरसंबंध ठेवण्याच्या वयाबद्दल चर्चा केली जाते. मुले-मुली लवकर वयात येतात, अनेक देशात हे वय 14 ते 16 आहे, असे दाखले दिले जातात. लग्नाचे वय व लैंगिक संबंध ठेवू शकण्याचे वय यात तफावत आहे असे दाखवले जाते, ते खरे आहे. म्हणून खबरदारीचे उपाय करून सुरक्षित संबंध ठेवायला काय हरकत आहे? असा प्रश्न विचारला जातो. माध्यमांमधून अनावृत लैंगिक कंटेंट, विवाहपूर्व, विवाहबाह्य व सर्व प्रकारच्या लैंगिक संबंधांचे केवळ चित्रण नव्हे, तर उदात्तीकरण केले जाते. वारंवार ते दाखवून आकर्षित केले जाते, समाजाची त्या विषयांची संवेदनशीलता बोथट केली जाते. यामुळे पुढे जाऊन आयुष्यभराचे नातेसंबंध तयार होण्यात काय अडचणी येतात, याचा अभ्यास व्हायला हवा. संमतीने संबंध असले, तरी विशेषत: आंतरजातीय, आंतरधर्मीय संबंधांमध्ये पालक पोलिसात तक्रारी दाखल करू शकतात, करतात. त्यामुळे आर्थिक, मानसिक, करियरचे नुकसान होऊ शकते. हे युवकांचे स्वातंत्र्य आहे की बेबंदपणा आहे, रिलेशनशिपबद्दलचे आकर्षण व जबरदस्त पियर प्रेशर असताना वाटेतले हे खड्डे ओळखायचे की स्व-घात करायचा, याचा निर्णय घ्यायला मुलांना सक्षम करायला हवे.
 
 
लाइफ सायकल मॅनेजमेंट
ब्रह्मचर्य-गृहस्थ-वानप्रस्थ-संन्यास हे आश्रम म्हणजे जीवन प्रबंधन आहे, लाइफ सायकल मॅनेजमेंट आहे हे विसरून चालणार नाही. ब्रह्मचर्य म्हणजे लैंगिक संबंधांना प्रतिबंध, विरोध नव्हे, तर ‘सेक्शुआलिटी मॅनेजमेंट’ आहे. भारताच्या संदर्भात लैंगिकता ही आत्मिक उन्नतीच्या प्रवासात, मनुष्य प्राणिपातळीवरून उन्नत होण्याच्या प्रवासातील आवश्यक अवस्था आहे. त्याचे महत्त्व मान्यच आहे, पण ते मर्यादित आहे, गंतव्य स्थान ते नाही. स्वत:च्या किंवा आपल्या अपत्याच्या जीवनाचे प्रबंधन करताना, पायाभरणी करताना कोणती मूल्ये असावीत, भौतिक सुखाच्या, कायिक सुखलोलुपतेच्या मागे जाताना आपण कोणत्या तडजोडी करतो आहोत, याचे भान नव्या पिढीला देण्यात आपण कमी पडतो आहोत. लैंगिकता ही प्रकृती आहे, ती आज विकृतीकडे वळत आहे. या विकृतीला वळसा घालून समाजाला संस्कृतीकडे नेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कुमारवयातले संबंध ही कूल, इन थिंग झालेली असेलही, पण कौमार्यजतन हे मागासलेपणाचे लक्षण नक्कीच नाही. ‘सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा?’ हा प्रश्न आजही तितकाच Relevant - समर्पक आहे.
Powered By Sangraha 9.0